– डॉ. अजित मगदूम

काळाप्रमाणे ज्ञानशाखांची नावंही बदलत राहतात. पूर्वी आर्ट्स किंवा कला शाखा, काही ठिकाणी मानव्यविद्या शाखा म्हटलं जायचं. त्याऐवजी आता लिबरल आर्ट्स ही शाखा नव्याने उदयास आली आहे. एकेकाळी अकरावीला अन्य कुठल्याही शाखेत प्रवेश नाही मिळाला की आर्ट्स हा शेवटचा पर्याय असे. मग न्यूनगंड आणि पराभूत मानसिकतेतून ही मुलं वर्गात बसायची. काही वर्षांपूर्वी अकरावी आर्ट्सच्या वर्गात दहावीला ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी क्वचितच असत. पण हे चित्र आता बदललेलं आहे. आता बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर लिबरल आर्ट्स शाखेमध्ये प्रवेश घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे. गेल्या दशकभरात प्रथम वर्ष पदवीला ९० टक्क्यांना प्रवेश बंद होत आहेत. प्रतिष्ठित महाविद्यालये, विद्यापीठे आणि नव्यानं उदयास आलेल्या खासगी विद्यापीठांनी लिबरल आर्ट्स हा मुक्त अभ्यासक्रम दशकभरापूर्वी सुरू केला. आणि आता त्याची जणू लाट उसळली आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थिप्रिय होत आहे.  

बदलत्या काळात ज्ञानशाखांच्या रुंदावलेल्या कक्षा तसंच एकंदर पालकांच्या आणि मुलांच्या दृष्टिकोनात झालेला बदलही यास कारणीभूत आहे. दुसरं म्हणजे डॉक्टर होणं खडतर आणि खर्चिक तर इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण झालेले ८५ टक्के इंजिनिअर्स लगेच नोकरी ‌मिळण्यास अपात्र ठरतात असा एका पाहणीचा निष्कर्ष आहे. आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या तीन पठडीतल्या, चाकोरीबद्ध विद्याशाखांत विषय निवडीच्या मर्यादांमुळे विद्यार्थ्यांना स्वारस्य राहिले नाही. या परिस्थितीत लिबरल आर्ट्स या ज्ञानशाखेमध्ये उपलब्ध असलेल्या आंतरशाखीय पर्यायांना विद्यार्थ्यांची अधिक पसंती मिळू लागली आहे.

Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
grse recruitment 2024 opportunities in indian education sector
शिक्षणची संधी : ‘जीआरएसई’ मध्ये संधी
artificial intelligence to develop ability to create substances with specific qualities
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतून हव्या त्या गुणधर्मांचा पदार्थ

हेही वाचा – पंतप्रधानांची ‘मौन’ की बात! मणिपूरमधील हिंसाचाराविषयी ५० दिवसांनंतरही गप्प

लिबरल आर्ट्स या ज्ञानशाखेमध्ये साहित्य, इतिहास, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, राज्यशास्त्र, पत्रकारिता, जनसंपर्क, सर्जनशील लेखन, विधीशास्त्र, राज्यशास्त्र, भाषा, भाषाशास्त्र, प्रकाशन, समाजकार्य, मानसशास्त्र,  जनधोरण, नागरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, व्यवस्थापन इ विषयांचा किंवा अभ्यासक्रमांचा समावेश होतो. आजची पिढी स्वतंत्र विचार करणारी आहे. स्वतःचं वेगळेपण दाखवू पाहणारी आहे. त्यांच्यासाठ़ी ही ज्ञानशाखा वरदानच म्हणता येईल, अशी आहे. मात्र नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे हे लोण अद्याप तरी ग्रामीण भागात पोहोचलेलं नाही. विशेषतः बड्या शहरांमध्ये या अभ्यासक्रमाची चलती दिसते. “लिबरल आर्ट्स हे शिक्षण सर्जनशील आणि विश्लेषणात्मक म्हणजेच मेंदूच्या दोन्ही बाजूंचा विकास होण्यास चालना देते” असं नवीन शैक्षणिक धोरणात (२०२०) म्हटलं आहे. विद्यार्थ्यांना “काय” विचार केला पाहिजे हे शिकवण्यापेक्षा “कसा” विचार करता आला पाहिजे हे शिकवणे असा हेतू या शिक्षणात आहे. यातून विद्यार्थ्याला विविधांगी कौशल्याचं भांडार प्राप्त होतं. त्याचं उपयोजन विद्यार्थी विविध क्षेत्रांत, नोकरीत किंवा व्यवसायात करू शकतात.

या पार्श्वभूमीवर लिबरल आर्ट्स या  ज्ञानशाखेला अलीकडे खूप महत्त्व आलं आहे.  लिबरल आर्ट्समध्ये चिकित्सक विचार, प्रभावी संज्ञापन, समस्यांचे निराकरण या क्षमता आणि कौशल्यांबरोबर एकूणच  मानवी समाजाचं सखोल, व्यापक आकलन यावर अधिक भर आहे. इतर ज्ञान शाखांसारखं यामध्ये व्यवसाय प्रशिक्षण असणार नाही. हा एकूण तीन वर्षांचा अभ्यासक्रम असून काही विद्यापीठांत चौथं वर्ष हे संशोधनासाठी, प्रबंध लिहिण्यासाठी दिलं जातं. काही विद्यापीठांनी अशी मोकळीक दिलेली आहे की विद्यार्थी स्वतःहून विषयांची निवड करून आपला पदवी अभ्यासक्रम स्वतःच तयार करू शकतात. लिबरल आर्ट्सचं  वैशिष्ट्य असं की सर्जनशीलता, कलात्मकता, नावीन्य आणि कल्पनाशक्तीला भरपूर वाव आहेच पण त्याचबरोबर संगणकशास्त्र, गणित किंवा संख्याशास्त्र असा एखादा उपयुक्त विषयही जोडीला घेता येतो. वेगवेगळ्या ज्ञानशाखा धुंडाळताना विद्यार्थ्यांची क्षितिजे रुंदावतात व आंतरशाखीय विचारप्रक्रियेतून नवं, चिरंतन असं काही हाती येऊ शकतं. आज आंतरशाखीय अभ्यास आणि संशोधनास खूप महत्त्व आलं आहे. यात  व्यवहारी फायद्यांपेक्षा जीवनभर शिकण्याची उर्मी ताजी कशी राहील अशी दृष्टी निर्माण करण्यावर भर असतो. यातूनच जगण्याचा हेतू गवसण्याच्या शक्यता निर्माण होतात. उदा. कोणतीही भाषा चांगली अवगत असेल आणि शब्दांची निवड चपखल करता येत असेल तर जाहिरातीच्या क्षेत्रात भरपूर वाव आहे. आज मुलं स्क्रिप्ट, कॅप्शन, कन्टेन्ट रायटिंग या लेखनात करियर करू शकतात. आपल्या भाषेबरोबर अन्य भारतीय किंवा विदेशी भाषा चांगली येत असेल तर दुभाषी, अनुवादक होता येतं. म्हणजेच आपल्यातील हुनर किंवा छंदाला व्यवसायाशी जोडता येतं, हे लिबरल आर्ट्सचं वैशिष्ट्य म्हणता येईल.

विविध विषयांतर्गत संबंध शोधण्याची कुवत असणं गरजेचं आहे. अनेक विषयांचं व्यापक आकलन होण्यासाठी समग्र, एकत्रित विचार करण्याची क्षमता इथं महत्त्वाची आहे. उदा. जनसंज्ञापन अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर चित्रपट क्षेत्र, रेडिओ, वृत्तवाहिन्या, दूरचित्रवाणी, पत्रकारिता, जनसंपर्क अशा अनेक क्षेत्रात वाव मिळू शकतो. लिबरल आर्ट्स शाखेतील पदवीमुळे त्यांच्यात जीवनातील कोणत्याही आव्हानांना सामोरं जाण्यासाठी लागणारा दृष्टिकोन, आणि आत्मविश्वास येण्यास मदत होते.

यापुढील काळात ऑटोमेशन व कृत्रिम बुद्धिमत्ता या नव्या तंत्रज्ञानामुळे सर्व क्षेत्रात क्रांतिकारक व थक्क करणारे अंतर्बाह्य बदल घडून येतील. येत्या काळात विशिष्ट मानवी कौशल्यं अवगत असणाऱ्यांची गरज भासणार आहे. यात चिकित्सक विचार करणं, नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणं, सांस्कृतिक बुद्धिमत्ता, परानुभूती (Empathy) तसंच प्रभावी संवाद इत्यादी कौशल्यांमुळे लिबरल आर्ट्स शाखेद्वारे कार्पोरेट क्षेत्रातही जाता येते. अमेरिकेत सिलिकॉन व्हॅलीतील माहिती-तंत्रज्ञानाच्या अनेक कंपन्यांमध्ये संगणकाबरोबर अन्य विषयांमध्ये उदा. भारतीय संगीत, आदिवासी नृत्य, किंवा सनईवादन अशा कोणत्या तरी एका विषयात पारंगत अथवा संशोधन असणाऱ्यांची मागणी वाढते आहे. आतापर्यंत कला शाखेमध्ये केवळ साहित्याचं नोबेल पारितोषिक दिलं जात होतं. आता आंतरशाखीय विद्या व्यासंगाचे मूल्य समजावं, त्याबद्दलची जाण व जाणीवही समाजात निर्माण व्हावी या उद्देशाने नॉर्वे सरकारने २००४ पासून लडविग इंटरनॅशनल मेमोरियल प्राईझ देण्यास सुरुवात केली. प्रा. नटाली झेमॉन डेव्हिस या पारितोषिकाच्या पहिल्या मानकरी आहेत. त्यांनी विमेन्स हिस्ट्री आणि मानववंश विज्ञान या दोन शाखांमध्ये संशोधनपर लेखन केले. या ठिकाणी महाराष्ट्रात मानववंशशास्त्र आणि साहित्य यांना जोडणारे लेखन करणाऱ्या इरावती कर्वे आणि दुर्गाबाई भागवत महाराष्ट्रातील दोन विदुषींचे कार्य याच तोडीचे होते हे नमूद करावेसे वाटते.

हेही वाचा – भारत-अमेरिका संबंधांच्या ‘अभूतपूर्व उंची’तला विषमतोल!

आज ज्योती दलाल स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स (मुंबई), अजीम प्रेमजी विद्यापीठ (बंगळुरू), शिव नाडर विद्यापीठ (दिल्ली), थापर स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स (पतियाळा) फ्लेम विद्यापीठ (पुणे), ऑरो विद्यापीठ (पडुचेरी), ओ.पी. जिंदाल विद्यापीठ (सोनीपत) अशा नव्या व खासगी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची मागणी दसपटीने वाढली आहे. त्यामुळे तिथं प्रवेश मिळणं अत्यंत स्पर्धात्मक झालं आहे. प्रवेश परीक्षा घेऊन या विद्यापीठांत प्रवेश दिले जातात. या अभ्यासक्रमासाठी शुल्कही बरेच असते. सिम्बॉयसिस पुणे ३.८५ लाख रुपये शुल्क आकारते. जिंदाल विद्यापीठ ५ ते १८ लाखांपर्यंत विषय निवडीप्रमाणे शुल्क आकारते. तर आयआयटी कोझिकोडे येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी १५ लाख रुपये मोजावे लागतात.

हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांपैकी ९० टक्के विद्यार्थ्यांना सहा ते दहा लाखांपर्यंतचे पॅकेज असलेल्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. एक उदाहरण द्यायचे झाल्यास श्री राम कॉलेज फॉर वुमेनमध्ये १०० च्या वर कंपन्यांनी ११५ विद्यार्थिनींची ७.५ लाखांच्या पॅकेजवर नोकऱ्यांसाठी निवड झाली. एका विद्यार्थिनीची बँक ऑफ अमेरिकेकडून वार्षिक ३७.८ लाख पॅकेजवर नेमणूक करण्यात आली‌. या कॉलेजच्या नेमणूक कक्षाने इंटर्नशिपची संधी उपलब्ध केल्याने ३५० बड्या कंपन्यांनी या विद्यार्थिनींची इंटर्नशिपसाठी निवड केली. सर्वात जास्त म्हणजे १.५ लाख रुपये दोन महिन्याकरता एका विद्यार्थिनीला मानधन देण्यात आले. मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त म्हणजे वार्षिक सहा ते वीस लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळाले आहे. लिबरल आर्ट्स विद्याशाखेत आंतरशाखीय संशोधनासाठी विशेषतः परदेशातील ऑक्सफर्ड, केंब्रिज सारखी विद्यापीठे अनेक विद्यापीठे स्वागतशील आहेत.

नव्या शतकाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि नव्या जगाच्या आशा आकांक्षांना पंख देण्यासाठी असा अभ्यासक्रम स्वागतार्हच म्हटला पाहिजे.

(पूर्व प्राचार्य, लेखक-अनुवादक व तौलनिक साहित्याभ्यासक )

(ajitbalwant@gmail.com)