संसदेतील दोन्ही सभागृहांमध्ये प्रश्नोत्तर आणि शून्य प्रहर हे दोन्ही महत्त्वाचे दोन तास असल्यामुळं लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला आसन सोडत नाहीत. अनेकदा याच तासांना गोंधळ होतो. सकाळचं हे सत्र घडामोडींचं असतं. या तासाला राज्या-राज्यातील राजकारण आणि हेवेदावेही समोर येतात. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा होता. लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होता. प्रश्न विचारले जात होते, मंत्री जमेल तसं उत्तर देत होते. कुठल्या तरी एका प्रश्नाला राजस्थानचे खासदार दुष्यंत सिंह यांनी पूरक प्रश्न विचारला. दुष्यंत म्हणजे राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि मोदीविरोधक वसुंधरा राजे यांचे पुत्र. वसुंधरा राजे आणि बिर्ला दोघेही राजस्थानचे, पण, विरोधी गटातील. बिर्ला हे मोदी-शहांचे निष्ठावान. बिर्लांना राजस्थानचे मुख्यमंत्री होण्याची स्वप्नं पडतात. राजस्थानमध्ये वसुंधरा राजे आणि त्यांच्या गटाला दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने बाजूला केलं असलं तरी, वसुंधरा राजेंची ताकद संपुष्टात आली असं नव्हे. त्यामुळं या गटाला कुठंही फारशी संधी न देण्याचं धोरण असावं. संसदेत तेच दिसलं. बिर्लांचा आविर्भावच सांगून गेला. पूरक प्रश्न विचारण्यासाठी दुष्यंत यांचं नाव पुकारलं गेलं. दुष्यंत यांनी लगेच प्रश्न विचारायला सुरुवात केली. बिर्लांना दुष्यंत यांचं थेट प्रश्न विचारणं आवडलं नाही. त्यांनी दुष्यंत यांना थांबवलं. तुम्हाला पूरक प्रश्न विचारण्याची संधी दिली, थँक्यू कोण म्हणणार, असा आक्रमक प्रश्न बिर्लांनी केला. बिर्लांचा चढा आवाज बघून दुष्यंतही काही क्षण चपापलेले दिसले. मग, त्यांनी स्वत:ला सावरत बिर्लांचे आभार मानले. बिर्लांचं गुणगान गायलं. मग, पूरक प्रश्न विचारला. वसुंधरा राजे विरुद्ध मोदींचे निष्ठावान असा सामना संसदेतही रंगलेला दिसला. या दोन्ही गटांच्या रस्सीखेचीमध्ये बिर्लांनी दुष्यंत यांची कोंडी केली. दुष्यंत यांनी प्रश्न विचारायला मिळाला यातच समाधान मानलं असेल.

पुन्हा सेल्फीचं खूळ

मध्यंतरी ‘सेल्फी विथ मोदी’चं खूळ आलं होतं. लोकसभा निवडणुकीआधी हे खूळ देशभर पसरलं होतं. वास्तविक, केंद्र सरकारच्या वतीनेच या खुळाचा प्रचार केला जात होता. जिथं तिथं मोदींचा फलक उभा केला जायचा आणि त्याच्या शेजारी उभं राहून तुम्ही सेल्फी काढा, असं आवाहन केलं जात होतं. भारतमंडमपमध्ये जी-२० शिखर परिषद झाली होती, त्यानंतर दरवर्षीप्रमाणं पुस्तक प्रदर्शन भरलं होतं, या दोन्ही वेळा ‘सेल्फी विथ मोदी’ची सुविधा उपलब्ध होती. त्या आधी तर दिल्लीत रस्त्या-रस्त्यावर मोदींचे फलक दिसायचे आणि लोक सेल्फी काढताना दिसायचे. प्रत्येक मंत्रालयामध्ये मोदींचे फलक आणि सेल्फीची सुविधा देण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीत मोदींच्या भाजपला चारसो पार जाता न आल्यानं ‘सेल्फी विथ मोदी’ हा प्रकार मागं पडला. ‘सेल्फी विथ मोदी’ म्हणजे मोदी स्वत:च्या प्रेमात आणि लोक मोदींच्या प्रेमात असा प्रेमाचा प्रवाह ओथंबून वाहात होता. आता हेच प्रेम राहुल गांधींबाबतही ऊतू जाऊ लागलं आहे. अहमदाबादमध्ये साबरमती रिव्हरफ्रंटवर काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं. तिथं प्रवेशद्वारावरच ‘सेल्फी विथ राहुल गांधी’ची सुविधा होती. आत्तापर्यंत तरी राहुल गांधींवरचं कार्यकर्त्यांचं प्रेम घोषणाबाजीतून व्यक्त होत होतं. पण, अहमदाबादपासून ते सेल्फीतून व्यक्त होऊ लागल्याचं पाहायला मिळालं.

टवाळक्या आणि मास्तर

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये खासदारांना फारसं काम नसतं. यावेळीही काही विधेयकं आणली गेली, ती यथावकाश संमतही केली गेली. अनुदानित मागण्या, वित्त विधेयक मंजूर झालं. फक्त वक्फ दुरुस्ती विधेयक केंद्र सरकारसाठी संवेदनशील आणि प्रतिष्ठेचं होतं. हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी भाजप आणि ह्यएनडीएह्णच्या घटक पक्षांनी व्हीप जारी केला होता. बाकी अन्य विधेयकं सहजपणे संमत झाली. या इतर विधेयकांच्या चर्चेवेळी सभागृहात खूप सदस्य उपस्थित असतातच असं नाही. अनेकदा आसनं रिकामी असतात. सदस्य जाऊन-येऊन असतात. ज्यांना बोलायचं आहे, ते आपलं नाव कधी पुकारलं जातंय याची वाट पाहात असतात. या सदस्याच्या गटातील खासदारही थांबलेले असतात. सदस्याला बोलण्याची संधी मिळाली की, त्याच्या गटातील खासदार त्याच्या मागच्या आसनावर बसतात, जेणे करून कॅमेऱ्यामध्ये चेहरा दिसावा आणि आपल्या सदस्याला पाठिंबा दिल्याचंही मतदारांना दिसावं हा त्यामागचा हेतू. सदस्य आपापलं भाषण व्हॉट्सअॅपवरून व्हायरल करत असल्यानं सहकाऱ्यांचाही हेतू यशस्वी होतो. हे सगळं वातावरण सैलसर असतं. पीठासीन अधिकारी म्हणून पॅनलमधील कोणी तरी बसलेलं असतं. त्याला कारभार नीट चालवायचा असतो. त्यामुळं तो इतर सदस्य काय करताहेत याकडं लक्ष देत नाही. मग, सदस्य गप्पांचा फड रंगवतात. गलका करतात. शाळेत पोरं गोंधळ घालतात तसा हा प्रकार असतो. एकदा तर लोकसभाध्यक्ष ओम बिर्लांच्या उपस्थितीतही पोरांनी गलका सुरू केला होता. मंत्री कुठलंसं विधेयकं मांडत होते, त्यांच्या मागं उभं राहून इतर मंत्री एकमेकांशी गप्पा मारत होते. त्यांचं बोलणं विधेयक मांडणाऱ्या मंत्र्याच्या भाषणामध्ये अडसर निर्माण करत होतं. बिर्लांनाही ते काय म्हणताहेत हे ऐकू येईना. मग, बिर्लांनी बोलणाऱ्या मंत्र्यांना खाली बसवलं. काही सदस्य तर एका कोपऱ्यात उभं राहून बोलताना दिसले. त्यांनाही बिर्लांनी मंत्री बोलत असताना मध्ये मध्ये येऊ नका, असं डाफरलं होतं. लोकसभेत अशा टवाळक्या झाल्या की, मास्तरांना छडी उगारावी लागते.

मन की बात

पंतप्रधान नरेंद्र मोदी महिन्यातून एकदा ‘मन की बात’ करतात आणि त्यांच्या मनातील प्रत्येक गोष्ट भाजपच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना ऐकावी लागते ही बाब आता नवी राहिलेली नाही. पण, मोदींच्या सरकारमधील मंत्री देखील ‘मन की बात’ करू लागले आहेत. त्यांच्या तोंडून सातत्याने ‘मेरे मन की बात…’ असं बोललं जातं. केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री म्हणून किरेन रिजिजू यांनी वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडलं. विधेयक मांडण्याआधी ते संविधानाच्या चौकटीत आहे की नाही याची शहानिशा केली जाते. म्हणजे, हे विधेयक मांडण्याला विरोध असेल तर कोणाही सदस्याला तो व्यक्त करण्याचा अधिकार असतो. मग, त्यावर केंद्रीय मंत्री आपलं म्हणणं मांडतो. रिरिजू यांनी विधेयकावर सुरुवातीची टिप्पणी करताना ‘मेरे मन की बात’ इथं मी बोलून दाखवत आहे असं सांगितलं. रिजिजू यांनी मनातील बरंच काही बोलून दाखवलं. रिजिजू यांच्या उत्तराचंही सत्ताधाऱ्यांनी कौतुक केलं. दोन्ही भाषणं लांबलचक होती. तेरा-तेरा तासांच्या चर्चेनंतर रिजिजू यांनी तितक्याच उत्साहानं उत्तर दिल्यामुळं, त्यातही विरोधकांना टोमणे मारत भाषण खुलवत नेल्यानं मध्यरात्री सभागृहात झोपलेलेही जागे झाले. रिजिजूच नव्हे प्रश्नोत्तराच्या तासाला केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनीही ‘मन की बात’ सांगताना शेरोशायरी सुरू केली. मात्र ही ‘मन की बात’ माझी नव्हे काँग्रेसची आहे, असं ते म्हणाले. पण, बिर्लांनी त्यांना थांबवत, प्रश्नोत्तराच्या तासाला शेरोशायरी करू नका, असं सांगावं लागलं.