शैलेंद्र रिसबूड
भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे कौस्तुभमणी म्हणजे लोकमान्य टिळक. ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडणाऱ्या स्वातंत्र्य लढ्याबरोबरच त्यांनी अनेक लोकसाह्य चळवळी सुरू केल्या. पैसाफंड, राष्ट्रीय शिक्षण, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जागरूकता, सोलापूरच्या विणकर, साळी व कोष्टी समाजासाठी पाठिंबा व मदत, गिरणी कामगारांच्या हक्कासाठी लढा, इतकेच काय पण १९०० साली प्लेगमध्ये नागरिकांच्या अडचणींसंदर्भातील सभेत नायकिणींची बाजू त्यांनी समर्थपणे मांडली. १८९५ साली पुण्यात भरणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला सर्व व्यवसाय करणारे तेली, तांबोळी, कामगार, हमाल आदींना सभासद म्हणून नोंदवले जावे यावर टिळकांचा आग्रह होता. ते शेतकऱ्यांचे, कोळ्यांचे, गिरणी कामगारांचे नेते होते. या चळवळींबरोबरच अर्थात शिवजयंती उत्सव आणि सार्वजनिक गणेशोत्सव विसरता येणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन ब्रिटिश साम्राज्याला सामोरे जाणे हे त्यांचे तत्त्व होते. पण सध्या सोयीचेच राजकारण चालू असल्याने प्रत्येक जण टिळक हा विषयसुद्धा जातीजमातीच्या भिंती उभ्या करण्यासाठीच वापरतो आहे. वास्तविक लोकमान्यांनी जसे ब्रिटिश सरकारला धारेवर धरले तद्वतच पुण्यातील सुशिक्षित ब्राह्मणांवर ताशेरे ओढण्याचे त्यांनी कमी केले नाही. ०६ जुलै१८९७ च्या ‘केसरी’ मधील प्रसिद्ध अग्रलेखात (‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’) ते म्हणतात – ‘पुण्यातील पाच-पंचवीस ब्राह्मणदेखील एखादे चांगले काम एकजुटीने करतील, अशी आमची स्थिती नाही. मग खुनासारख्या (रँड हत्या) भयंकर गुन्ह्यासंबंधाने तर बोलावयासच नको’. २०जुलै१८९७ च्या ‘केसरी’मधील अग्रलेखात (‘राजद्रोह कशाला म्हणतात?’) ते लिहितात – ‘पिंपळाच्या मुळ्यांनी शतधा विदीर्ण झालेल्या जुन्या पाराप्रमाणे पुण्याच्या ब्राह्मणांची सध्या स्थिती झाली आहे’. आधुनिक समाजातील ब्राह्मणवर्गाने कसे कार्य करावे याबद्दल टिळक म्हणतात – ‘ब्राह्मणांनी लोकशिक्षणासाठी मिशनरी लोकांप्रमाणे काम करायला हवे’. या संदर्भात ते ‘ग्रॅजुएट रामदासी’ असा शब्दप्रयोग करतात.

हेही वाचा: एकेरी उल्लेख आत्यंतिक प्रेमापोटी, मग त्याला शिवाजी महाराज अपवाद कसे असतील?

दिनांक १४ सप्टेंबर१९०७ रोजी पुण्यात गायकवाडवाड्यात सार्वजनीक गणेशोत्सवात झालेल्या सभेत टिळक म्हणतात – ‘राष्ट्रीय शिक्षण केवळ ब्राह्मणांकरिताच नको आहे. चांभार, लोहार, शेतकरी, सोनार या अठरापगड जातीसह सर्व धर्माच्या सर्वांनाच राष्ट्रीय शिक्षण दिले गेले पाहिजे. सर फिरोजशाह मेहता म्हणतात, सरकारी शाळेतूनच आम्ही निघालो; तसेच आणखीही लोक निघतील. रानडे, मेहता हे न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षणातून निघाले. पण फार झाले तर शेकडा एके-दोन निघाले. आम्हाला शेकडा शंभर पाहिजे आहेत, हे कसे निघणार? सर्वांवर राष्ट्रीय विचारांचा ठसा उमटला पाहिजे आणि ते राष्ट्रीय शाळांवाचून होणार नाही.’

लोकमान्य टिळकांनी, समर्थ विद्यालयात राष्ट्रीय शिक्षणावर दिलेल्या भाषणात, ते म्हणतात – जातीभेद, जातीद्वेष, व जातीमत्सर यांच्या योगाने आपला देश कसा विभागला जात आहे, कसा भाजून निघत आहे, कसा करपून जात आहे, याचेही ज्ञान राष्ट्रीय शाळेतील मुलांना मिळाले पाहिजे. जातिभेद मोडण्याची आवश्यक्यता किती आहे, हे आमच्या विद्यार्थ्यांना समजले पाहिजे. जातीजातीचे तंटे न होऊ देण्याची खबरदारी घेणे हे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे, ही गोष्ट राष्ट्रीय शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात आली पाहिजे. प्रस्तुत परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रीय विद्यालयात सर्व धर्माच्या विद्यार्थ्यांच्या धर्मशिक्षणाची सोय झाली पाहिजे’.

लोकमान्य टिळकांचे, ‘होमरूल लीग’च्या प्रचारासाठी पहिले भाषण ३१ मे१९१६ रोजी झाले. या भाषणात टिळकांनी ‘परके’ या शब्दाची अत्यंत महत्त्वपूर्ण व्याख्या केली. परके म्हणजे केवळ धर्माने परके लोक आपल्याला अभिप्रेत नाहीत, असे ते म्हणतात. ‘मुसलमान असो व इंग्रज – त्याने या देशातील लोकांचे भले केले, तर तो परका नाही. परकेपणा धर्माशी, जातीशी, व्यापाराशी व पेशाशी निगडित नाही; हा प्रश्न हितसंबंधांचा आहे… एखादा माणूस भारताच्या हितासाठी कष्ट करत असेल आणि त्या दिशेने उपाय योजत असेल, तर मी त्याला परका मानणार नाही; पण सध्याचे सरकार तसे करत नाही, त्यामुळे तो फरक आहे.’

हेही वाचा: लेख: बेरोजगारांपेक्षा कंपन्याच लाभार्थी…

९मार्च१९२० रोजी संकेश्वर आणि हुक्केरी तालुक्यांच्या वतीने देण्यात आलेल्या मानपत्राच्या कार्यक्रमात ते म्हणतात – ‘हिंदू आणि मुस्लिम यांच्यात ऐक्य होऊ शकते, तर ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तर यांच्यात ते का होऊ नये’. या कार्यक्रमात ते उच्च-नीचता याविषयी कळकळीने बोलले होते. बेळगाव परिषदेमध्ये टिळकांना मानपत्र देण्यास दोघा ब्राह्मणेतर नेत्यांनी विरोध केला. धाडसाने पुढे येऊन स्वतःची मतं मांडल्याबद्दल या दोघांचे टिळकांनी अभिनंदन केले. सरकारला विरोध करतानाही त्यांनी हाच स्वतंत्र बाणा व धाडस दाखवावे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

२९ डिसेंबर १९१६ रोजी लखनौ अधिवेशनात लोकमान्य टिळकांचे भाषण जे झाले ते अभूतपूर्व होते. ते म्हणतात – ‘आम्हाला ब्रिटिश सांगतात की, तुम्ही आर्यांचे वंशज आहात. तुम्ही या भूमीचे खरे मालक नाहीत. आम्ही आर्यांनी येथील मूळ वंशाच्या लोकांकडून हा देश घेतला. त्यांनतर मुसलमानांनी या देशावर आक्रमण करून हा देश काबीज केला. इंग्लिश राज्यकर्ते हे या भूमीचे पालक आहेत. ठीक आहे, त्यांचा हा युक्तिवाद आपण मान्य करू या, पण मग प्रश्न उरतो, तो असा की, ते तरी या भूमीचे मालक कुठे आहेत? जर ते या भूमीचे रक्षणकर्ते आहेत तर मग त्यांनी ही भूमी सोडून चालते व्हावे आणि जे या भूमीचे खरे पुत्र आहेत, त्या भिल्ल, गोंड आणि आदि द्रविड आदींच्या ताब्यात आपली सत्ता सोपवावी.’ लोकमान्य टिळकांनी एक क्षण थांबून, टाळ्यांच्या कडकडाटानंतर परत एकदा आवाज चढवून म्हटले की ‘या भूमीचे मालक मग ते कोणीही असोत, आम्ही त्यांच्याबरोबर काम करण्यास तयार आहोत’.

लखनौहून टिळक पुण्यास परत आल्यानंतर लवकरच शनिवारवाड्याजवळ एक सभा झाली. लखनौस पास झालेल्या स्वराज्याच्या योजनेला पुष्टी देणे हा या सभेचा उद्देश होता. १८ जातींचे व संप्रदायांचे प्रत्येकी दोन- दोन असे वक्ते मुख्य ठरावावर बोलले. केवळ ब्राह्मणांचे प्रतिनिधी या नात्याने टिळकांनी बोलावे असे सभाध्यक्ष कर्मवीर वि. रा. शिंदे यांनी सुचविले. ही सूचना मान्य करून टिळकांनी या सभेत जे भाषण केले त्यांतील पुढील विचार महत्त्वाचे आहेत : ‘आता आपल्याला पूर्वीचे स्वराज्य नको असून पाश्चात्य धर्तीवरील स्वराज्य पाहिजे आहे. आपल्या जातिभेदामुळेच येथे ब्रिटिश राज्य स्थापन झाले आहे व जातिभेद असाच पुढे चालू राहाणार असेल तर स्वराज्यातही आमची अशीच अधोगती होईल’.

हेही वाचा: आयुर्वेद पदव्युत्तर प्रवेशात ‘मराठी’ कोंडी

लोकमान्य टिळकांवर आजही ब्राह्मणी पक्षपाताची टीका करणारे अनेक जण सापडतात. प्रत्यक्षात त्यांनी ०१जून१९२०ला टिळकांच्या कॉंग्रेस लोकशाही पक्षाचे जे उमेदवार जाहीर केले आहेत, त्यांवर नजर टाकल्यास त्या यादीत, जमनादास मेथा (मेहता), राजाराम तुकाराम सावे, दौलतराव अप्पासाहेब मोहिते, वामन सीताराम मुकादम, वासुदेव बापू अकूत, शेठ हिरालाल रामलाल नाईक, रत्नागिरीहून मौलाना काकासाहेब इब्राहिम मूलेनाजी नायसी अशी नावे आहेत. त्यांचा कटाक्ष हा नक्कीच होता की, विधिमंडळासाठी जो उमेदवार उभा केला जाईल, तो किमानपक्षी शिक्षित असावा. त्यामुळेच या यादीत डॉक्टर, वकील अशी नावे जास्त दिसतात. त्यांचे एक वाक्य आजही ऐकवले जाते, ‘विधिमंडळात शिंपी जाऊन काय कपडे शिवणार काय, कोष्टी कापड विणणार काय? होय, ते तसे म्हणालेही, पण त्याआधी त्यांनी ‘ब्राह्मण विधिमंडळात जाऊन काय घंटा वाजवणार की पूजाअर्चा करणार?’ असेही म्हटले होते. हे त्यांचे शब्द कोणीही विसरू नयेत.

मार्च १९१८ मध्ये मुंबईत बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्यता निवारण परिषद आयोजिली होती. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे टिळकांनी या परिषदेत उपस्थित राहण्याचे मान्य केले. यावेळी त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाो ठोस समर्थन केले. जुन्या काळी ब्राह्मणांच्या जुलमाने अन्याय घडले हे त्यांनी कबूल केले. पण या रोगाचे आता निर्मूलन झाले पाहिजे असे ते म्हणाले. ‘अस्पृश्यता देवास मान्य असेल तर मी त्यास देवच मानणार नाही’ असे टिळक म्हणताच जो टाळ्यांचा प्रचंड गडगडाट झाला.

हेही वाचा: पूर व्यवस्थापनात धरण नियंत्रक अभियंत्यांनी कोणती तत्त्वे पाळायला हवीत?

त्यांनी कधीच जातीपातीचा विचार केला नाही. एका उदाहरणावरून हे अधिक स्पष्ट होईल. भारतात अस्पृश्यता निवारणाचे काम करणारे पहिल्या क्रमांकाचे नेते म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे होते. ते समतेचे पुरस्कर्ते होते.लोकमान्य टिळकांच्या कामात आपण मदत करावी, असे शिंदे यांना वाटले. याद्वारे येणारे स्वराज्य ब्राह्मणांचे असेल हा लोकांचा समज दूर करण्याचे कामही यायोगे त्यांना करायचे होते. त्यामुळे त्यांनी काही सभा घेतल्या, टिळकांना खूप मदत केली. पुढे केवळ सामाजिक कार्यात नव्हे तर आपणही पूर्णपणे राजकीय चळवळीमध्ये काम करायची इच्छा त्यांना लोकमान्याना बोलून दाखवली. तेव्हा टिळकांनी नकार दिला आणि तुम्ही करत असलेले अस्पृश्यता निवारणाचे काम फार मोठे असून त्यात खंड पडता कामा नये, असे त्यांना सांगितले. लोकमान्यांना विषमता हवीच असती, तर त्यांनी कधीच शिंदे यांना या कामापासून परावृत्त केले असते चांगला मासा आपल्या गळाला लागला, असे मानून समतेचे काम मागे टाकण्यासाठी पुढाकार घेतला असता. मात्र टिळकांनी कधीच हा विचार केला नाही. अशा एक ना अनेक घटनांमधून लोकमान्यांच्या निर्णायक मतांचा परिचय घडतो. शिंद्यांच्या कार्यावर ‘केसरी’कार म्हणून नसला, तरी टिळक म्हणून त्यांचा विश्वास बसून चुकला होता.

shailendrarisbood@hotmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokmanya balgangadhar tilak is not only for brahmins css
Show comments