मिलिंद म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव, उत्पादन शुल्क

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लोकसत्ता’च्या वर्धापन दिन सोहळ्यात रंगलेल्या ‘बिनकामाच्या गप्पा’ या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याशी संवाद साधला.

मी आयआयटीमधून केमिकल इंजिनीयर झालो. माझ्या प्राध्यापकांनी मला तंबी दिली होती, की या सहा महिन्यांत तू आयएएस झालास तर ठीक, नाहीतर आयआयटी जी शिष्यवृत्ती देईल,ती घेऊन तुला अमेरिकेत जावे लागेल. ही चर्चा आमच्या ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटमध्ये चालू असताना प्रा. विजया राजाध्यक्ष अचानक मला म्हणाल्या, तू मराठी वाङ्मय घे. भूषण गगराणी यांच्या नोट्स एकदम तयार आहेत, त्या वापर. मराठी वाङ्मयाशी माझा असा संबंध आला.

‘लोकसत्ता’चे माजी संपादक अरुण टिकेकर यांचं आणि आमचं कुटुंब सोलापूरला तीन पिढय़ा एकत्र राहात होतं. त्यांचे आजोबा आणि भाऊ हे ख्यातनाम ग्रंथपाल होते. त्यामुळे वाचनाची आवड लागली. मुंबईला माझं पहिलं पोस्टिंग झालं, तेव्हा अरुण टिकेकरांचं घर वांद्रे येथे माझ्या बाजूला होतं. ‘न्यूयॉर्कर’, ‘इकोनॉमिस्ट’, ‘ग्रायटा’ अशा दर्जेदार नियतकालिकांची सवय त्यांनी लावली. त्यांच्या वडिलांनी आम्हाला संस्कृतची सवय लावली. साहित्य असो किंवा संगीत, हे आपलं आंतरविश्व असतं, याचं मला फार महत्त्व वाटतं.

माझं साहित्यावर प्रेम आहे. खरं म्हणजे भूषण आणि माझ्यामध्ये जी. ए. कुलकर्णी हा एक समान धागा आहे. जी. ए., खानोलकर.. काही लेखक पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटतात. शिवाय बरीचशी नवीन पुस्तंक.. काही तर तुम्हाला खिळवून ठेवतात. सध्या मी वाचतोय ते म्हणजे ‘जीमॅन.’ एडगर्ड हूवर हे ५० वर्षे अमेरिकेचे ‘एफबीआय’चे संचालक होते. त्यांच्या कार्यकाळात अमेरिकेचे सात अध्यक्ष झाले, पण शेवटपर्यंत त्यांना कुणीही पदावरून काढू शकले नाही. शेवटी हृदयविकाराने हूवर यांचं निधन झालं. शेवटी ‘एफबी’ संचालक म्हणूनच ते दिवंगत झाले.. अशी पुस्तके वाचण्यामध्ये एक फार मोठा आनंद असतो. पण ती सतत शोधत मात्र राहावी लागतात.

आमचं क्षेत्र कंटाळवाणं, रुक्ष असं काहींना वाटतं. पण तसं अजिबात नाही. खूप गोष्टी आपल्या हातून होऊ शकतात, करता येण्यासारख्या असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक पोिस्टगमध्ये नवीन असं काही तरी असतं की ते तुम्हाला शिकावंसं वाटतं. डॉ. करीर सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे विक्री कर विभागात गेल्यानंतर त्यांना काही गोष्टी नव्याने समजल्या. मी ‘म्हाडा’मध्ये गेल्यावर नवीन काही शिकायला मिळालं. संपूर्ण नवीन विभाग होता.. लोकांना घरं देणं किंवा इतर काही. अशा प्रकारे प्रत्येक क्षेत्रात नवीन काहीतरी करता येतं.. या नोकरीतील प्रत्येक क्षण कंटाळवाणा जात नाही, हे लक्षात घेऊन आपण येथे आलं पाहिजे.

(शब्दांकन :संदीप नलावडे)

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta anniversary celebrations bin kamachya gappa event actress sonali kulkarni nitin karir amy