जगाच्या पाठीवर अनेक महापुरुष होऊन गेले. त्यांचे जीवनचरित्र आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रेरक प्रसंगांतून समाजात मूल्ये रुजवली गेली. ज्यांचा सकारात्मक परिणाम आजही जाणवतो. यामुळे त्यांनी सांगितलेली किंबहुना प्रत्यक्ष जगलेली मूल्ये हाच त्यांच्या आयुष्याचा अजरामर ठेवा आहे आणि म्हणून समाजातील सर्व नागरिकांनी त्यांचे पालन करणे अभिप्रेत आहे, तर त्यांचे अनुयायी म्हणून घेणाऱ्यांनी ते व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनात पाळलीच पाहिजेत. तरच त्या महापुरुषाच्या व त्यांनी मांडलेल्या विचारसरणीचा विजय झाला, असे म्हणता येईल. मात्र सद्यस्थितीत अनुयायी म्हणवून घेणे हे अनेकार्थांनी लाभदायी असल्याने अनुयायांचे पेव फुटले आहे, असेच म्हणता येईल. प्रत्यक्ष आचरणाची पूर्वअट मोडीत निघाल्याने अनुयायी म्हणून घेत व्यावहारिक लाभ मिळवण्याकडे कल आहे. याहून मोठे दुर्दैव म्हणजे अनुयायीपणाचा शिक्का मारून घेत महापुरुषांची मुल्ये सर्रास पायदळी तुडवली जातात. महात्मा गांधींच्याबाबतीत तर हे स्पष्टपणे जाणवते.
महात्मा गांधी यांची हत्या सर्वार्थाने निषेधार्ह बाब होती. मात्र स्वतःच्या वैचारिक विरोधकांना झोडपण्यासाठी महात्मा गांधी यांच्या हत्येचा आजही कसा उपयोग केला जातो याचे उत्तम उदाहरण म्हणजे इतिहासाचे अभ्यासक असे म्हणवणाऱ्या डॉ. राजेंद्र डोळके यांचा ‘लोकसत्ता’मधील ‘गांधीहत्या म्हणताच काय आठवते?’ हा (३० जानेवारी) लेख. खरेतर हा प्रश्नाला उत्तर देण्यापेक्षा प्रतिप्रश्न केला जाऊ शकतो की, महात्मा गांधी यांचे अनुयायी म्हणवून घेणाऱ्यांना फक्त ३० जानेवारीलाच महात्मा गांधी यांचे स्मरण का होते? त्यांच्या व्यक्तिगत किंवा सार्वजनिक आयुष्यात महात्मा गांधी यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब का केला जात नाही? केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला झोडपण्यासाठी गांधीहत्येची घटना सातत्याने का वापरावी लागते?
लेखात त्यांनी संघविरोधी परंपरेप्रमाणे गांधीहत्येसाठी संघ विचारसरणीला जबाबदार ठरवले आहे. यासाठी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे पत्रव्यवहार तसेच स्वामी विवेकानंद यांना हिंदू धर्मापासून तोडण्याचा चंग बांधलेले दत्तप्रसाद दाभोलकर यांच्या पुस्तकांचा आधार घेतला आहे. गांधीहत्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा कुठलाही संबध नाही हे सांगणारी अनेक पुस्तके आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणातून अशा प्रकारचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्यावर न्यायालयात खटला चालू आहे. याबाबत ससंदर्भ विस्ताराने सांगता येईल मात्र मूळ विषय आहे गांधीहत्येच्या घटनेचा वापर करण्याचा.
गांधीजींच्या विचारसरणीचा अनुयायाकडून पराभव
महात्मा गांधीनी आयुष्यभर सत्य व अहिंसेची शिकवण दिली. मात्र गांधीहत्या झाल्यानंतर दंगल उसळावी आणि त्यात ब्राह्मण समाजाला लक्ष्य करण्यात यावे हा महात्मा गांधी यांच्या विचारसरणीचा पराभव नव्हे का? डोळके यांनी त्यांच्या लेखात याबाबत एक शब्दही खर्च केला नाही. त्यांनी तसे केले नाही याचे कारण त्याना गांधीहत्येबद्दल कळवळा असण्यापेक्षा संघ विचारसरणीला लक्ष्य करायचे होते. नथुराम गोडसे ब्राह्मण समाजातील होता म्हणून ब्राह्मण समाजातील नागरिकांची हत्या करा, मारझोड करा, घरे जाळा अशा कृत्यांना आमचे समर्थन नाही. हे महात्मा गांधी यांच्या विचारसरणीच्या विरुद्ध आचरण आहे असे वक्तव्य कोणा गांधीवादी विचारवंतानी जाहीरपणे केल्याचे ऐकिवात नाही. याउलट महात्मा गांधी यांचे वास्तव्य असलेल्या वर्धा सेवाग्राम येथील आश्रमाच्या व्यवस्थापनावरून मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
महात्मा गांधी केवळ संघविरोधासाठीच उरले आहेत ?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभर वर्ष पूर्ण करत आहे. २०१४ पासून केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. अनेक राज्यांतही भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आहे. काँग्रेस पक्ष आणि संघविरोधी वर्तुळात नेहमीच संघावर टीका केली जाते. मात्र यासाठी तार्किक आधारावर वैचारिक मुद्दे नसतात. दाभोळकर त्यांच्या पुस्तकात लिहितात की, स्वयंसेवक घरी आला आणि पेढ्याचा तुकडा देऊन कोणालाही न सांगता गुपचूप खाऊन टाक असे सांगितले. असे झाले म्हणजे संपूर्ण भारतभर सर्वत्र असेच झाले असणार. हा त्यांचा तर्क.
संघाच्या विचारसरणीकडून महात्मा गांधी प्रात:स्मरणीय झाले याचे फार मोठे दु:ख संघ विरोधी मंडळीमध्ये खदखदत असते. प्रस्तुत लेखकानेही ते व्यक्त केलेच आहे. आणि म्हणून त्याचा अर्थ लावताना नथुराम गोडसेची आठवण व्हावी म्हणून महात्मा गांधी प्रात:स्मरणीय केले आहेत, असा द्राविडीप्राणायाम केला आहे. गांधी आणि नेहरू यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या काँग्रेस पक्षात त्यांच्या मूल्यांचे आचरण कुठेही आढळून येत नाही. बोटावर मोजण्याइतक्या उरलेल्या सेवादलाच्या कार्यकर्त्यांना केवळ सांगकामे केल्याचे दुर्दैवी चित्र आहे. त्यामुळे संघावर टीका करण्यासाठी केवळ गांधीहत्या हा एकमेव आधार विरोधकांच्या भात्यात शिल्लक आहे. मात्र हे शस्त्र आता बोथट होत असल्याचे दिसून येते.
महात्मा गांधी यांनी सांगितलेली मूल्ये, विचारसरणी यांचे प्रत्यक्ष आचरण न करता केवळ अनुयायी म्हणवून घायचे आणि त्या आवरणाखाली व्यावहारिक लाभ मिळवायचे अशी ही दुहेरी लाभाची पुरोगामी योजना आहे. मात्र हा वैचारिक ढोंगीपणा दिवसेंदिवस उघडा पडत आहे. अशा प्रयत्नाने महात्मा गांधी यांच्या विचारसरणीचा पराभव होत आहे, हे खरे दुर्दैव. prasadj21@gmail.com