अविनाश कदम

संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात शाहिरांनी फार मोठे योगदान दिले. त्यांच्यापैकी एक असलेल्या शाहीर आत्माराम पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष आजपासून (९ नोव्हेंबर) सुरू होत आहे. त्यानिमित्त ‘खुशाल कोंबडं झाकून धरा।’ असे आव्हान देणाऱ्या या शाहिराच्या कार्याविषयी..

Wardha, crushed notes caught fire,
नोटांचा चुरा भरलेला ट्रक पेटला, तर्कवितर्क सुरू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
pune samyukta Maharashtra movement
त्यागी लोकप्रतिनिधी आणि पदनिष्ठ राजकारणी
Baramati Assembly Constituency Assembly Election 2024 Ajit Pawar Yugendra Pawar print politics news
लक्षवेधी लढत: बारामती : बारामती कोणत्या पवारांची?
home voting in nala sopara
वसई: नालासोपाऱ्यात १२१ नागरिकांचे गृहमतदान
akola vidhan sabha election 2024
प्रचारातून विकासाचे मुद्दे हद्दपार, जातीय राजकारण, बंडखोरी व मतविभाजनाचे गणितच चर्चेत; सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याच्या प्रश्नांना बगल
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र
Surganas backward image will change says Dhananjay Munde
सुरगाण्याची अतिमागास प्रतिमा बदलणार, धनंजय मुंडे यांचे आश्वासन

महाराष्ट्राला शाहिरीची जुनी परंपरा आहे. ही शाहिरी रंजनप्रधान, शृंगारप्रधान, आध्यात्मिक, वीररसप्रधान व ऐतिहासिक वर्णनात्मक होती. शाहिरीचे हे स्वरूप प्रथम पालटले फुले-आंबेडकरी चळवळीतील सत्यशोधक जलसे व आंबेडकरी जलशांनी. सत्यशोधक जलशांमध्ये प्रथमच सामाजिक विषय व समस्या मांडल्या गेल्या. सामान्य लोकजीवनात रुजलेल्या नमन, भारूड, गवळण, पोवाडे, लावणी, वग आदी शाहिरी बाजांचा उपयोग समाजप्रबोधनासाठी व समाजजागृतीसाठी केला गेला आणि सत्यशोधकी जलसे सुरू झाले. हीच परंपरा पुढे चालवून आंबेडकरी चळवळीचे जलसे सुरू झाले. १९४२ नंतरच्या कामगार-कष्टकरी समाजातील सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सुरू झालेल्या लोकशाहिरांच्या परंपरेला सत्यशोधक, आंबेडकरी जलशांचा वारसा आहे. अण्णा भाऊ साठे, अमरशेख, गवाणकर या लोकशाहिरांपासून सुरू झालेल्या या परंपरेतील आपल्या विपुल शाहिरी लिखाणाने महत्त्वाचे स्थान प्राप्त केलेले एक शाहीर म्हणजे शाहीर आत्माराम पाटील.

पालघर जिल्ह्यातील एका खेडेगावात खंडकरी शेतकऱ्याच्या कुटुंबात ९ नोव्हेंबर १९२४ रोजी जन्मलेल्या आत्माराम पाटील यांचे बालपण वारली, कोळी, ठाकर यांच्यात गेले. त्यांचे दैन्य, दारिद्रय़, अंधरूढी त्यांनी जवळून पाहिले. सफाळे परिसरातील भादवे-दातिवरे व माकुणसार या गावांत त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यांच्यावर स्वातंत्र्य चळवळीचा प्रभाव पडला. त्यांनी त्या काळातील प्रभात फेऱ्यांत भाग घेतला. तरुणपणी शेतीत भागत नाही म्हणून मुंबईला आले. कामगार झाले. पुढे भाजीविक्रीचा व्यवसाय केला. तो चांगला चालल्यावर भायखळय़ाच्या मार्केटमध्ये गाळा घेतला. एका हातात तराजू व दुसऱ्या हातात लेखणी घेऊन त्यांनी शाहिरीची आवड जोपासली.

हेही वाचा >>> युरोपियन युनियन ‘उजव्या’ वळणावर?

१९४६ साली गांधींच्या प्रेरणेने ‘खेडय़ात चला’ हे दीर्घकाव्य लिहिले. नंतरच्या काळात त्यांनी पोवाडा लिहिण्यास सुरुवात केली. ‘पुरोगामी छत्रपती (शाहू महाराज)’, ‘भीमू कांबळेचा पवाडा’, ‘महात्मा गांधींचे मातम’, ‘४२ क्रांतीचा रणतुरा’, ‘१९५६चा आंबेडकर धर्मपरिवर्तनाचा पवाडा’ इ. गाजलेले पोवाडे लिहिले. गोवा मुक्ती- संग्रामात सेनापती बापट सत्याग्रही म्हणून गोव्याच्या हद्दीत प्रवेश करत असताना पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेने अस्वस्थ होऊन आत्माराम पाटील यांनी ‘जय गोमांतक’ हा पोवाडा रचला. अमरशेखांना तो खूप आवडला. ‘मी स्वत:च हा पोवाडा गाणार’ म्हणत अमरशेखांनी आत्माराम पाटलांना सत्याग्रहात सहभागी करून घेतले. गोवा मुक्तीसंग्रामावर ‘जय गोमांतक’, ‘श्री गोमांतक वर्णन’, ‘फिरंगी सैतानशाही’, ‘गोवा सत्याग्रह मोहीम’ व ‘गोिवदा आला’ हे पाच पोवाडे त्यांनी लिहिले. हे पंचक अमरशेख, अण्णाभाऊंनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोहोचवले. त्यानंतर हे पाच पोवाडे व अण्णा भाऊ व अमरशेखांची गीते असलेली ‘शाहिरी हाक’ ही पुस्तिका आत्माराम पाटील यांनी छापली. 

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी हिरिरीने भाग घेतला. त्यांचा ‘संयुक्त महाराष्ट्राचा पवाडा’ व त्यांनी लिहिलेले ‘संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा।’ हे गोंधळगीत विशेष गाजले.

द्विभाषिकाचा दुतोंडी कावा

उडतोय माझा डोळा डावा।

साडेतीन कोट सिंहाचा छावा

पकडाय मांडला पिंजरा नवा।

वळिकलंय आम्ही जवाच्या तवा

अन् शाहिरी साद दिली गावोगावा।

जागृत केलाय दख्खन पुरा

न खुशाल कोंबडं झाकून धरा।

हे गीत महाराष्ट्रात सर्वांना तोंडपाठ झाले. काँग्रेसचे नेते जिथे जिथे जात तिथे पोरेटोरे हे गीत गाऊन काँग्रेसच्या पुढाऱ्यांची खिल्ली उडवत. १९६० साली शिवाजी पार्कच्या मैदानात डांगवासीयांची मोठी सभा भरली. त्यात आत्माराम पाटलांचे ‘रानात रान बाई डांगाचं, लांब लांब डोंगरी रांगांचं। उंच उंच ठिगोऱ्या सागाच ग, रहाणं मराठी वाघाचं।’ हे प्रदीर्घ संवादगीत गायले गेले. ते इतके प्रत्ययकारी होते की त्यानंतर आचार्य अत्रे म्हणाले ‘‘डांगची आर्थिक-सामाजिक स्थिती काय आहे याचा आढावा या कवनातून उत्तमरीत्या घेतला आहे. आता या पुढे मी काय बोलू?’’ हे गीत पुढे शालेय क्रमिक पुस्तकात घेतले गेले.

त्यांची ‘ज्ञातिविसर्जनाची लावणी’ गाजली. या लावणीत त्यांनी महाराष्ट्रातील ११७ जातींचे वर्णन करून जातीव्यवस्थेच्या सूक्ष्म अभ्यासाचा प्रत्यय दिला. ‘मिसळ झाली मुंबई’ या गीतात त्यांच्या भविष्यदर्शी दृष्टीचा प्रत्यय येतो. त्यात ते म्हणतात :

मराठी भाषेत झालीया मिसळ

कर्ता कर्म सारं इंग्रजी दिसल

क्रियापदापुरती मराठी असल।

आज ते अनुभवाला आल्याचे दिसते. शाहीर आत्माराम पाटलांच्या कवनात समाजातील घटनांचे पडसाद उमटलेले दिसतात. सामाजिक राजकीय चळवळ असो की कोकणातील चक्रीवादळ, महाराष्ट्र-बिहारमधील दुष्काळ, पानशेत धरणफुटी, किल्लारी भूकंप.. त्यांचे प्रतिबिंब कवनात उमटले. समाजातील विकृतीवरही शाहिरांनी कोरडे ओढले. महाराष्ट्रातील आधुनिक परंपरेतील हे शाहीर जनतेशी, तिच्या सुखदु:खांशी आणि संघर्षांशी समरस झालेले दिसतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शाहिरांनी असे वातावरण निर्माण केले होते की खेडय़ापाडय़ांतील वा मुंबईतील कामगार वस्त्यांतील कार्यक्रमांना सहज १५-२० हजारांचा श्रोतृवर्ग जमत असे. जे काम हजार भाषणांनी होणार नाही ते शाहिरांच्या कार्यक्रमांनी केले.

१९६० साली पाटील यांचे इंद्रायणी पुरव यांच्याशी लग्न झाले. लोअर परळ येथील कवळीवाडी कंपाऊंडमध्ये १० बाय १२च्या खोलीत त्यांनी संसार मांडला. येथेच त्यांनी विपुल शाहिरी लिखाण केले. ते देव मानत नव्हते. पण ‘देहो देही देश दिसतसे, देशची या देवांचा देव। मी जाईन परि या देवाला, ठेवीन अक्षर शाहिरी ठेव।’ अशी प्रतिज्ञा करून शाहिरीवरच्या अपार निष्ठेने त्यांनी लेखनावर लक्ष केंद्रित केले. ते संशोधक वृत्तीचे शाहीर होते. पोवाडे, लावण्या, डफगाणी, फटके, गोंधळ, समूहगीते, समरगीते, जागरगीते आदी शाहिरीचे विविध प्रकार त्यांनी हाताळले. शाहिरीचा इतिहास, शाहिरी वाङ्मयावरील माहिती, विविध शाहिरांच्या कवनांचे संकलन, प्रभातफेऱ्यांची गाणी आदीसंदर्भात त्यांनी संशोधक वृत्तीतून केलेल्या लेखनाचे ४० खंड भरतील इतके विपुल भांडार निर्माण केले. वारली, कोळी, ठाकर यांच्या बोलींच्या शब्दकोशाचे कामही त्यांनी केले. वयाच्या ७६ व्या वर्षांनंतर २००१ साली ‘लोकयुगीन आत्मशाहिरी’ या नावाने त्यांनी लिहिलेल्या ‘पवाडे व कवने’, ‘प्रभातफेरीची जागरगाणी’, ‘लावणी आणि डफगाणी’, ‘समर-समूह-स्मरणगीते’ या चार खंडांचे प्रकाशन झाले. अजून विपुल साहित्य अप्रकाशित आहे. लिखित साहित्याच्या क्षेत्रात आणि ग्रंथव्यवहारांमध्ये मध्यमवर्गीय/ अभिजन वर्गाच्या साहित्याचीच मक्तेदारी राहिल्यामुळे मौखिक परंपरेतील लोकशाहिरांच्या लिखाणाला प्रसिद्धी मिळाली नाही. वयाच्या ८६व्या वर्षी १० नोव्हेंबर २०१०ला त्यांचे निधन झाले.

अमरशेख, अण्णाभाऊ काय किंवा आत्माराम पाटील काय, सर्वसामान्य जनतेच्या मनातली समाजपरिवर्तनाची ईर्षां, आकांक्षा आणि धग सतत जिवंत व धगधगती ठेवणाऱ्या या लोककलावंतांची अभिजन महाराष्ट्राने पुरेशी नोंद घेतली नाही. सर्वसामान्य जनतेत अफाट लोकप्रिय असलेले हे शाहीर साहित्यिक म्हणून उपेक्षित राहिले. ‘‘आपल्या साहित्य प्रांतात लोकप्रियता हा अपराध गणला जातो. साहित्याचा (म्हणजे कला वगैरेचा) आस्वाद घेण्याचा अधिकार अल्पसंख्यांना बहाल केलेला आहे. सबब तो आस्वाद बहुसंख्यांनी घेतल्यास ती कला खरी नव्हे.. स्त्री-शूद्रांना वेद वाचण्याचा अधिकार नाकारणाऱ्यांचेच आपण वंशज आहोत असे, हे लोकप्रियतेचे व्यस्त गणित आहे’’ (मं. वि. राजाध्यक्ष, ‘युगांतर’ नोव्हेंबर १९६९). शाहिरी वाङ्मयाला ‘प्रचारकी’ म्हणून हेटाळले गेले, हिणकस मानले गेले. पण संयुक्त महाराष्ट्राचा कलश हाताशी आणून पोहोचवण्यात या लोककलावंताचे फार मोठे योगदान होते. त्याचे ऋण मराठी माणसाला तरी विसरता येणार नाही.

जनवादी चळवळीतील गेल्या ६० ते ७० वर्षांतील सुमारे तीनशे-साडेतीनशे शाहिरांचे हस्तलिखित वाङ्मय विस्कळीत स्वरूपात उपलब्ध आहे. त्याला संकलित स्वरूपात प्रसिद्धी मिळाली, तर खेडय़ापाडय़ांतील व शहारातील वस्त्या-झोपडय़ांतील दलित कष्टकरी जनांच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनाचा जिवंत इतिहास, त्यांच्या इच्छाआकांक्षा, सुखदु:ख, जीवनसंघर्ष आणि परिवर्तनाचा लढा यांचे सर्जनशील दर्शन घडवणारे भव्य दालनच मराठी साहित्याला उपलब्ध होईल.

लेखक सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

avinashh50@yahoo.co.in