उज्ज्वला देशपांडे

“मुलं फक्त परीक्षा देतात” पण फक्त शिकत राहण्याचं, फक्त परीक्षा देण्याचं एक वय असतं, सर्व शालेय शिक्षण आणि पुढे फारतर बारावीपर्यंत. ज्या मुलांची शालेय शिक्षणाचीही ऐपत नसते, पण शिकायची आवड असते, शिक्षणाचं महत्त्व समजलेलं असतं, ती मुलं शाळेच्या बरोबरीने काम करून शिकत राहतात (त्यात काही वेळेस ती बालकामगारांच्या श्रेणीतही येतात). शहरांमध्ये आलेले फक्त परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची कष्टांची, हालआपेष्टांची तयारी असते, त्यांच्या घरच्यांचीही तयारी असते. पण हे सर्व एका काळापर्यंत किंवा वयापर्यंत करायचं असतं हे त्या विद्यार्थ्यांनी, त्यांच्या घरच्यांनी समजून घेणं गरजेचं आहे.

असं फक्त परीक्षांना बसणाऱ्या तरुणांची संख्या २५ लाखांच्या वर असेल आणि परीक्षा देण्याचं वय ३८ ते ४३ पर्यंत असेल; तर किती मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ न वापरलं जाता, फक्त परीक्षा देत राहतं? यात समाजाचं तर नुकसान होतंच, शिवाय विविध उद्योगांनाही मनुष्यबळ मिळणं थांबतं आणि ‘विद्यापीठातून नुसतीच पदवी मिळते, पण या पदवीमुळे नोकरी नाही’ यावर शिक्कामोर्तब होतं. विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबाचं तर अपरिमित नुकसान होतं. त्याविषयी विविध अहवालांत अभ्यासकांनी आपली निरीक्षणं मांडली आहेतच.

मग ग्रामीण भागांतल्या विशिष्ट जाती-वर्गांतून आलेल्या मुला-मुलींनी अधिकारी होण्याची स्वप्नं पाहायचीच नाहीत का? तर तसं नाही. नक्कीच मोठं व्हायची स्वप्न पाहायची पण ए. पी. जे. अब्दुल कलाम सर म्हणतात तसं डोळे उघडे ठेवून. म्हणजे काय?

हेही वाचा >>>न्याय की देवाचा कौल?

मुलांच्या गावात सरकारी सोडल्या तर नोकऱ्या नाहीत, उद्योग नाहीत, शेती अवघड होऊन बसलेली – हेच सगळे मुद्दे आहेत स्थलांतराचे हा आहे मुलांना आपल्या गावापासून दूर नेणारा ‘पुश फॅक्टर’- जो आपल्याला आपल्या गावातून, आपल्या माणसांतून, आपल्या जमिनीतून उठून दूर जाण्यास भाग पाडतो. नोकऱ्या, उद्योग, विविध संधी, सुविधा हे असतात स्थलांतराचे ‘पुल फॅक्टर्स’, जे मुलांना शहरांत जाण्यास भाग पाडतात.

मग आता ‘डोळे उघडे ठेवून स्वप्न पाहायची’ म्हणजे काय करायचं? बरं डोळे फक्त विद्यार्थ्यांनी उघडे ठेवल्याने काम भागेल? तर तसं नाही. सरकारने, उद्योगांनी आणि विद्यापीठांनीही डोळे सताड उघडे ठेवले पाहिजेत. सरकारने वेळेवर परीक्षा घेऊन, वेळेवर भरतीचे आदेश काढून; तर उद्योगांनी अविकसित भागांत उद्योगांची निदान एखादी तरी शाखा सुरू करून! – जे उद्योग अविकसित भागांत अशी शाखा सुरू करून स्थानिकांना रोजगार देतील त्यांना इन्कम टॅक्स/जीएसटी किंवा इतर टॅक्समध्ये सवलत देऊन किंवा कपात करून सरकारकडून प्रोत्साहन मिळालं पाहिजे. एनईपी २०२० मध्ये ज्याप्रमाणे म्हटले आहे त्याप्रमाणे कौशल्याधारित शिक्षण विद्यापीठांनी दिलं पाहिजे.

अशा परीक्षांचे जे क्लासेस पुणे-मुंबई-दिल्लीत आहेत, त्यातले काही क्लासेस या मुलांना जवळ असतील अशा ठिकाणी सुरू केले पाहिजेत. त्यात ‘आर्थिक फायदा नाही, अडचणी जास्त आहेत’ असे असले तरी मोठ्या प्रमाणात तरुणाईला विस्थापित न करता, चांगले मार्गदर्शन देण्याचे काम तरी होईल.

लिहिणं सोपं आहे की, ‘सरकारने यांव करावं व उद्योगांनी त्यांव करावं, विद्यापीठाने असं तर क्लासेसने तसं.’ पण आपल्या कुणाकडेच हे घडवून आणण्या एवढी क्षमता नाही. आपण फक्त अपेक्षा करू शकतो. सर्वांत महत्त्वाचं विद्यार्थी. त्यांनी डोळे उघडे ठेवून मोठं होण्याची स्वप्न बघायची म्हणजे काय करायचं? तर त्यांनी प्रत्यक्ष कृती करायची. प्रत्यक्ष कृती म्हणजे काय?

हेही वाचा >>>जर्मनीला भारताशी सहकार्य हवेच आहे…

१. आपल्या स्वतःसाठी एक कालमर्यादा आखून घ्यायची. ‘मी या वयापर्यंतच परीक्षा देणार’. झालात उत्तीर्ण तर उत्तमच पण नाही झालात तर केलेला अभ्यास आणि वापरलेली वर्षं वाया गेलीत असं नाही समजायचं. एक तर आपल्याला काही विषयांची चांगली जाण आली आहे आणि समाजाशी ते सगळं जोडता येतं, हे खूप महत्त्वाचं आहे.

२. ही कालमर्यादा आपल्या घरच्यांनाही विश्वासात घेऊन सांगायची. अपयशी झाल्याने सगळं संपत नाही, आपण निदान प्रयत्न केला म्हणून स्वतःला शाबासकी द्यायची.

३. ही कालमर्यादा व्यवहार्य असली पाहिजे, म्हणजे योग्य वयात, योग्य वेळेत मला दुसरं काहीतरी करता आलं पाहिजे- नोकरी, उद्योग, इत्यादी.

४. दुसरी नोकरी, उद्योग करायला प्लॅन बी नेहमी तयार ठेवायचा. फक्त परीक्षेसाठीच नाही तर आयुष्यात प्रत्येक निर्णयात प्लॅन बी फार महत्त्वाचा असतो. हा प्लॅन बीदेखील व्यवहारीच असला पाहिजे, तोही घरच्यांना माहीत असला पाहिजे.

५. आपल्या गावातून आयएएस, आयपीएस होऊन गेलेल्यांकडे बघून ‘आपल्यालाही असंच हवं’ असं वाटणं साहजिक आहे. पण आपल्या मर्यादा मान्य करून खरंच मला हे जमेल का याचा विचार करून गावातून बाहेर पडायचं. जर मी शाळा-कॉलेजमध्ये फक्त परीक्षेपुरता रट्टा मारून अभ्यास करणारा असेन तर मला रोज १२-१५ तास अभ्यास अचानक कसा जमणार याचा विचार झाला पाहिजे.

६. एक मार्ग असाही असू शकतो- परीक्षेचं वय जर ३८ ते ४३ पर्यंत असेल, तर आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन करून म्हणजे वय २३, पुढची सात वर्ष म्हणजे वय ३०, पर्यंत नोकरी, उद्योग करून स्थिर स्थावर व्हायचं आणि मग पुढची तीन-चार वर्षांची टाइमलाईन घेऊन परीक्षा द्यायची म्हणजे वय ३४. उत्तीर्ण झालात तर उत्तम. नाही झालात तर सीव्हीमध्ये अनुभवाची भर पडेल आणि आता मिळालेल्या जास्तीच्या ज्ञानाच्या आधारे नव्याने धडाक्यात सुरुवात करता येईल.

तुम्ही सगळे अभ्यासू हे वाचल्यावर म्हणाल ‘या कोण आपल्याला हे नव्याने सांगितल्यासारखं सांगतात, आम्हाला तर हे माहीत आहे’.

मग फक्त आई-बापाकडे बघा, स्वतःची ३८-४३ व्या वर्षी कल्पना करा आणि ठरवा प्रत्यक्ष कृती करायची का फक्त ‘आम्हाला तर हे माहीत आहे’ म्हणून वहावत जायचं? मी महाविद्यालयात एफवायपासून एमए पर्यंतच्या माझ्या विद्यार्थ्यांना हे नेहमी प्लॅन करायला लावायचे, लिहूनच काढा म्हणायचे:

१. मी पुढच्या पाच वर्षांनी काय करत असेन?

२. माझा प्लॅन बी काय आहे?

तुम्ही पण बघता करून? ऑल द बेस्ट!

(ज्या मुलांना शहरात येऊन अभ्यासाच्या नावाखाली फक्त उनाडक्या करायच्या आहेत त्या मुलांबद्दल मी या लेखात काहीच लिहिलेलं नाही).

ujjwala.de@gmail.com