युरोअमेरिकी उन्हाळ्यातल्या कथाकादंबरी वाचनोत्सवात यंदा मुराकामी वगैरे खूपविके आहेतच पण बानू मुश्ताकसुद्धा आहे…

पंकज भोसले

Future medical directives
रुग्णशय्येवरील उपचारांबाबत इच्छापत्रानुसार निर्णय
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Charlotte Wood novel Stone Yard Devotional
बुकरायण: आस्तिक-नास्तिकतेचे मुक्त चिंतन…
Borderline Personality Disorder BPD among youth
स्वभाव, विभाव : एकाकीपणातली असुरक्षितता
upsc preparation marathi news
UPSC ची तयारी: अर्थशास्त्र विषयाची तोंडओळख
Dabeli recipe at home easy way of making dabeli trending now
घरच्या घरी झटपट करा चविष्ट ‘दाबेली’, लगेच लिहून घ्या साहित्य आणि कृती
Risk of Heart Attack During Angiography
अँजिओग्राफीदरम्यान हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
girish kuber sitaram Yechury marathi news
अन्यथा: एकेक फोन गळावया…

‘‘इंटरनेट हे वाचनावर अपायकारक परिणाम करू शकते. कारण त्यात इतर विषयांसह पुस्तकाच्या संबंधीदेखील कुचाळक्या आणि कुटाळक्या भरलेल्या अनेक गोष्टी असतात. त्या तुमच्या वाचनवेळेचा मृत्यूू घडवू शकतात. शिवाय ग्रंथवाचनासाठी किंवा लिहिण्यासाठी जी एकाग्रता लागते, तीदेखील संपुष्टात आणू शकतात.’’– सुझन हिल, ‘इयर ऑफ रीडिंग फ्रॉम होम’ (२०१०)

भरगच्च आणि वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य गाठीशी असलेल्या ब्रिटिश लेखिका सुझन हिल एके दुपारी आपण फडताळात आठवणीच्या जागी ठेवलेले पुस्तक हवे म्हणून गेल्या. ते पुस्तक तेथे नव्हते. पण त्यांच्या लक्षात आले, की त्या जागेवर ठेवलेली डझनांहून अधिक पुस्तके आपण वाचलेलीच नाहीत. मग इच्छित ग्रंथासाठी हिलबाईंचा शोध इतर खोल्यांमधील फडताळांवर नजर फिरवू लागला. मात्र लपंडाव खेळत असल्यासारखा तो ग्रंथ सोडून इतर न वाचलेल्या शेकडो पुस्तकांचा समूह त्यांना दिसू लागला. त्यानंतर त्यांना स्वत: वाचलेली आणि आपल्या फडताळात असल्याची आठवण नसलेली काही डझनांवारी पुस्तके दिसू लागली. त्यापुढल्या शोधात स्वत:च्या फडताळातच कुठे तरी असलेली पुन्हा वाचावीशी वाटणारी दीडेकशे पुस्तके दर्शन द्यायला लागली. लोक जसे जानेवारी महिना आला की कसले कसले संकल्प करतात तसा या बाईंनी आपल्याच खासगी वाचनालयातील पुस्तके वाचण्याचा आणि त्यावर लिहिण्याचा निश्चय केला. आता जगातल्या कुठलाही कोपऱ्यातला वाचक या संकल्पनेला मूर्खात काढेल. पण तसे नाही. वाचनालये, लेखक मित्रांच्या भेटीतून दाखल होणारी नवी पुस्तके, दरसाल बाजारात शेकड्यानी येणारी पुस्तके यांचा मोह टाळत वाचन करायचे हा सुझनबाईंचा निश्चय होता. घरात साठवलेलेच अन्न वर्षभर खाण्यासारखा घरात असलेली वाचावीच अशी पुस्तके संपवण्याचा संकल्प तर या बाईंनी पूर्ण केलाच, पण त्याचे ‘इयर ऑफ रीडिंग फ्रॉम होम’ हे पुस्तकही २०१० साली आले होते.

आरंभी असलेले सुझन हिल यांचे उद्धृत किंवा त्यानंतरचा त्यांचा एक वर्ष चालणारा वाचननादाबाबतचा उतारा हा एवढ्याचसाठी की, ब्रिटिश किंवा अमेरिकी लोकांचे पुस्तक आणि वाचनवेड कोणत्या थरातील आणि स्तरातील असते त्याचा हा प्रातिनिधिक दाखला ठरतो. वाचनशत्रू म्हणून इंटरनेटचा त्यांनी जो उल्लेख आपल्या पुस्तकाच्या पहिल्याच पानात केला, तेव्हा म्हणजे पंधरा वर्षांपूर्वी फेसबुक स्थिरावले होते. व्हॉट्सअॅप (२००९) बाल्यावस्थेत होते, पण इन्स्टाग्राम (२०१०) आणि टिकटॉक (२०१६) नवशत्रू यायचे होते. ते आल्यानंतरच्या दीडेक दशकात आजघडीला रील- मेसेज- पोस्ट- पिंग्ज यांमध्ये दिवसाचा आरंभ आणि अंत करताना ‘वाचनासाठी वेळ राहतो कुठे?’ हा जागतिक प्रश्न बनायला हवा होता. पण सध्या तरी तो जगात सर्वाधिक इंटरनेट ओरपणाऱ्या (जानेवारी २०२४ च्या आकडेवारीनुसार ७५.१५ कोटी) भारतीय नागरिकांबाबत तीव्र आहे. त्यातही प्रगती-विकासाच्या घोड्यांवर विराजमान मराठी भाषकांच्या बाबत सर्वाधिक ठरवता येईल. आक्रसलेली पुस्तक दालने, तिथली (अपवादात्मक अवस्थेतील बरी) ग्रंथ खरेदी. जुन्यांचा कडकडीत कढ, उत्तम नव्या पुस्तकांवर चर्चांचा अभाव, समाजमाध्यम मिळाल्याने सुमारांना सद्दी प्राप्त करण्याच्या संधीतून अजीर्ण वाटावी इतकी भलामण अशी परिस्थिती असलेले चित्र कुणी जोरदारपणे नाकारू शकेल काय?

कुण्या एके काळीही गंभीर वाचन-संस्कृती नसलेल्या आपल्या वाचकांचे वाचकपण ‘आता उरले दिवाळी अंकांपुरते’ देखील म्हणण्याची सोय राहिलेली नाही. ‘व्हॉट्सअॅप’, ‘फेसबुक’वर दिखाऊ ‘वाचक-कट्टे’- ‘बुकक्लब’, ‘वाचनवेडे’-‘वाचनप्रेमी’ मंडळी यांनी चर्चाउत्साहाचा तिथला वेळ जर प्रत्यक्ष ग्रंथात रमण्यासाठी वापरला, तर खरे वाचन होऊ शकते, हे त्यांच्यापर्यंत कोण पोहोचवणार? दिवाळी अंकांच्या संच खरेदीइतका उत्साह त्यांच्या वाचनासाठी आणि नंतर त्यातील चांगल्या मजकुरावर बोलण्यासाठी शेकडा १० टक्के वापरला गेला, तरी वाचनासाठी दिशादर्शक असे वातावरण तयार होईल. पण हे सध्या होते काय?

‘मराठीत सुरू असलेली, वाचली जात असलेली, लोकप्रिय असलेली पाच साहित्यिक मासिके सांगा?’ हा स्पर्धा परीक्षेसाठी काठिण्य पातळीवरचा प्रश्न ठरू शकतो. आपल्याकडे इंटरनेटमुळेच ‘वाचनासाठी वेळ राहतो कुठे?’ ही जी समस्या आहे, ती ब्रिटन-अमेरिकेतील वाचक गटाला का नाही सतावत बरे, असा विचार करायची वेळ आली आहे. मे महिन्याच्या अखेरपासून तिथल्या वाचन-व्यवहाराचा उत्सव जाहीरपणे दिसू लागतो. दोन खंडांचे अंतर असले तरी या देशांत जून- जुलै- ऑगस्ट हा उन्हाळा मानला जातो. एरवी वर्षभर तिथले वाचनप्रिय लोक वाचतच असले, तरी या तीन महिन्यांचा कालावधीत सुट्टीतले वाचन हा आपल्याकडच्या दिवाळी अंकांहून कैक मोठा अब्जावधी उलाढालीचा कालावधी बनतो. वृत्तपत्रांच्या पुरवण्या संपूर्णपणे ‘समुद्रकिनारी वाचायला काय न्याल?’पासून ‘खास समरकाळात वाचायच्या नव्या कथा-कादंबऱ्यां’ची यादी जाहीर करायला सुरुवात करतात. यात कुठेही त्यांच्या जुन्या लेखकांमधील आपापल्या ‘लाडक्या व्यक्तिमत्त्वा’चा अभिमानसोस दिसत नाही. (वुडहाऊस-हेमिंग्वे फडताळसंरक्षक भिंती बनून राहतात), बुुजुर्ग अभ्यासकही इंग्रजी भाषेसाठी ‘ललामभूत’ वगैरे ठरणारे लेखक-कवी सोडून ताजे लेखक या समरात काय लेखनदिवे लावत आहेत, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. वाचनातही ‘स्मरणरंजनसुख’च कवटाळू पाहणारी माणसे भारतात खोऱ्यांनी सापडू शकतील. इतरत्र मात्र नव्याचा शोध आणि त्यातून घेतलेला बोध हा ग्रंथव्यवहाराला आर्थिक आणि मानसिकरीत्या उत्तेजित करण्याचे बळ पुरवतो. उदाहरण म्हणून या दोन्ही खंडांत तयार होणाऱ्या ‘समर फिक्शन’ विशेषांकाकडे पाहता येते.

यंदा काय आहे?

‘न्यू यॉर्कर’, ‘पॅरिस रिव्ह्यू’, ‘ग्रॅण्टा’च्या ‘फिक्शन स्पेशल’ अंकाची प्रतीक्षा जून महिन्याच्या आरंभापासून सुरू होते. दर वर्षी यानिमित्ताने ते आपल्या जगभरातील म्हणजे जिथे उन्हाळा नाही, तिथल्याही वाचकांना ‘समरार्थ फिक्शन’ने समृद्ध करतात. दर आठवड्याला जगातील महत्त्वाच्या लेखकांचे इंग्रजी अनुवादित किंवा मूळ कथालेखन देणाऱ्या ‘न्यू यॉर्करने’ दोन आठवड्यांपूर्वी चार भरगच्च कथा आपल्या फिक्शन विशेषांकात दिल्या. वेगवेगळ्या पिढीतील कथात्म साहित्य देणारे लेखक त्यात निवडले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचे लेखन म्हणजे जपानी लेखक हारुकी मुराकामी यांच्या ‘काहो’ या ताज्या कथेचा पाच पानी अनुवाद.

वर्षाच्या सुरुवातीला मुराकामीने एक कथावाचनाचा कार्यक्रम जपानमध्ये केला होता. सामाजिक उपक्रमासाठी देणगी उभारली जाणारा हा कार्यक्रम तिथे केवळ अकराशे श्रीमंत कथाप्रेमी देणगीदारांनाच अनुभवता आला होता. पत्रकारांना काही दिवस या कथेच्या नावासह तपशिलाबाबत गुप्तता राखण्याच्या अटीवर कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. मुराकामीचे सारे इंग्रजीत आलेले लेखन आणि त्याशिवाय अधिकृतरीत्या अनुवादित न झालेले लिखाणही चिनी बनावटीच्या इंग्रजी भाषांतरांसह प्रसारित झाले आहे. (त्यात बड्या युरोपीय प्रकाशकांतर्फे अद्याप येऊ घातलेली ताजी कादंबरीही) हे कट्टर मुराकामी चाहत्यांमधील ‘उघड रहस्य’ आहे. पण त्यांची ‘काहो’ कथा अनुवादासह कुठे प्रकाशित होईल, याबाबत असलेली उत्सुकता न्यू यॉर्करने संपविली. ‘तुझ्याइतक्या कुरूप मुलीशी आयुष्यात माझा संपर्क कधीच आला नाही.’ हे पहिल्याच भेटीत (नव्हे ‘डेटी’त) प्रत्येक तरुणीला सांगण्याची विकृत सवय असलेल्या सहारा नावाच्या उच्चभ्रू समाजातील नायकाची ही गोष्ट. ही कथा सुरू होते याच आशयाच्या वाक्याने. ‘काहो’ या एकलकोंड्या चित्रपुस्तक लेखिकेशी पहिल्याच डेटिंगमध्ये सहारा हे ठेवणीतील वाक्य उच्चारून तिला पुरेपूर अपमानदग्ध करण्याचा प्रयत्न करतो. मात्र बिलकूल अपमानित न झाल्याचे भासवत सहाराला नामोहरम करण्याचा पवित्रा काहो दाखविते. पुढे तिची सहाराशी दुसऱ्यांदा भेट होते. त्या वेळी आणि त्यानंतर ‘काहो’ काय करते, हे मुराकामीच्या कथाबाज शैलीतच वाचावे.

सॅली रूनी ही ३३ वर्षीय आयरिश खूपविकी ‘लिटररी’ लेखिका. तिची तीन पुस्तके आली. त्यातील दोन टीव्ही मिनी सीरीजमध्ये गाजली. फक्त लेखन या उद्याोगावर ‘टाइम’ साप्ताहिकाच्या प्रभावशाली व्यक्तींमध्ये तिचा समावेश झाला आहे. ‘ओपनिंग थिअरी’ ही तिची नवी कथा न्यू यॉर्करच्या विशेषांकात वाचता येते. ती आहे बुद्धिबळात निष्णात असलेला वीस वर्षांचा इवान आणि कलाकेंद्रात काम करणारी तीस वर्षांची मार्गारेट यांमधल्या संबंधांची. या साप्ताहिकाच्या संकेतस्थळावर लेखकांच्या मुलाखती वाचायला मिळतात. कथा सुचण्यापासून ते लेखनाच्या प्रक्रियेपर्यंचा प्रवास जाणून घेणे, हा तिथला गंभीर आणि गमतीशीर अभ्यास ठरू शकतो. बुद्धिबळ खेळत नसलेल्या रूनी यांची मुख्य व्यक्तिरेखेची इमारत बांधणी कशी झाली, ते त्यांनी तिथे सांगितले आहे. त्यांच्या सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या कादंबरीतील हे एक प्रकरण आहे. पुस्तक येण्याआधी त्याचे आणि मालिका बनविण्याचे हक्क लिलावाद्वारे विकले जाण्याची खात्री असल्याने त्याचा अंश आधी वाचल्याचे समाधान या कथेचे वाचक घेऊ शकतात.

अॅनी प्रूल (Annie Proulx) या न्यू यॉर्करनेच जगभर पोहोचविलेल्या ८८ वर्षीय लेखिकेची ‘द हडल झोन’ ही ताजी कथा या अंकात आहे. १९९७ साली त्यांची ‘ब्रोकबॅक माऊंटन’ ही कथा याच साप्ताहिकाने प्रसिद्ध केली. त्यावरचा ऑस्कर विजेता चित्रपट अनेकांनी पाहिलेला आहे. सिनेमातील त्याच निवांत परिसराला कथा-कादंबऱ्यांमध्ये आणणाऱ्या अॅनी प्रूल यांनी या कथेत आईसलॅण्डमधून आपल्या अमेरिकेतील मूळ वास्तूत परतलेल्या नायकाची कहाणी मांडली आहे. कित्येक वर्षांनी प्रूल यांनी कथा लिहिली आहे. ती लिहिण्यातील वर्तमान पेचप्रसंग मुलाखतीत सांगितले आहेत.

शोध पत्रकारितेसारखा कथांचाही शोध घेणाऱ्या या साप्ताहिकाने विशेषांकासाठी ई. एल. डॉक्टरो (१९३१-२०१५) या दिवंगत लेखकाची ‘ड्रमर बॉय ऑफ इंडिपेण्डन्स डे’ पन्नास-साठच्या दशकात लिहूनही अप्रकाशित राहिलेली आणि आजच्या अमेरिकी काळाशी सुसंगत असलेली कथा हुडकून काढली आहे. ब्रूस वेबर या अभ्यासकाने शोधून काढलेल्या या कथेचा सातेक दशकांनंतर प्रकाशित प्रवासही अचंबित करणारा आहे. शंभरीपार गेलेल्या स्वातंत्र्यसैनिकाची ४ जुलै रोजी शहरातून चालणारी परेड आणि त्याचे असमयोचित भाषण एका स्थानिक पत्रकाराच्या निवेदनातून ही कथा सांगते. कथांबरोबर न्यू यॉर्कर एक पानी टिपणही देते. त्यात यंदा वेगवेगळ्या पिढीतील लेखकांच्या पाच रसरशीत नोंदी आणि तिथल्या प्रकाशनविश्वाची सद्या:स्थिती सांगणारा रिबेका मेड यांचा लेख आहे.

न्यू यॉर्करच्या पलीकडे…

पॅरिस रिव्ह्यूने आपल्या समर इश्यूमधील गद्या विभाग सात लेखकांनी सजवला आहे. रेनी ग्लॅडमन या लेखिकेची ‘माय लेस्बियन नॉव्हेल’ ही कथा अलीकडच्या दहा वर्षांत आलेल्या अमेरिकी साहित्यातील नव्या प्रवाहावर गमतीशीर भाष्य करते. रुडाल्फो एन्रिक फॉगविल या स्पॅनिश लेखकाची ‘पॅसेंजर ऑन नाइट ट्रेन’ ही कथा वाचनीय आहे. पण यंदा पॅरिस रिव्ह्यूने भारतीयांनाही पूर्णपणे परिचित नसलेल्या बानू मुश्ताक या कन्नड लेखिकेची ‘रेड लुंगी’ ही उत्तम कथा शोधून अनुवादित करून घेतली आहे. कर्नाटकमधील एका मुस्लीमबहुल गावातील वय वर्षे ७ ते १२ या मुलांच्या सामूहिक सुंता कार्यक्रमाचा तपशील असलेली ही कथा भारतातील प्रगत आणि अप्रगत जगण्यातील फरक स्पष्ट करणारी आहे. ज्या श्रीमंताच्या घरी हा सोहळा चालतो, त्यातील मुलांवर शस्त्रक्रिया डॉक्टरचा आधार घेऊन करतात. इतरांवर पारंपरिक पद्धतीचा जाच आणि त्रास अनिवार्य असतो. त्यातील विनोद आणि वर्णने ही प्रचंड पकडून ठेवणारी आणि गावातील आर्थिक परिस्थिती सादर करणारी आहे. इंग्रजीत पहिल्यांदाच त्यांच्या कथांचे पुस्तकही आले असल्याने येत्या काळात कर्नाटकमधील कथांचा जगाला आणखी परिचय होणार आहे.

‘ग्रॅण्टा’च्या समर विशेषांकात केव्हिन ब्राझील, जे.एम. कुट्झी, सोफी कॉलिन्स यांच्यासह सहा कथा आहेत. ‘न्यू यॉर्क रिव्ह्यू बुक्स’ या समीक्षेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नियतकालिकाचा ताजा अंकही ‘फिक्शन विशेषांक’ आहे. त्यात लेखांसह दोन कथा आहेत. हेलन डेव्हिट यांनी अनेक वर्षांनी या खास अंकासाठी दोन पानांत मावेल इतकी लघुकथा दिली आहे.

आणखी काही समर विशेषांक येणे अद्याप शिल्लक असले, तरी समुद्रकिनारी किंवा सुझन हिल यांच्यासारख्या वर्षभर ठरवून घरातच वाचाव्यात अशा शेकडो कादंबऱ्या गेल्या दोन महिन्यांत प्रकाशित झाल्यात. त्यांबाबत ‘वाचन याद्या’ आणि ‘वाचून याद्या’ हे दोन्ही प्रकार वृत्तपत्रे आणि समाजमाध्यमांतून प्रसारित होत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठीत ‘दिवाळी अंकां’च्या वाचनापुरतेदेखील न उरलेले आपण कसे आणि किती वाचन करतो, असा प्रश्न स्वत:ला विचारावा. उत्तर न मिळाल्यास दोन खंडांतील ‘समर फिक्शन’ तरी तुमच्यासमोर इंटरनेट, रिल- मॅसेज- पोस्ट- पिंग्ज आदी इतर पर्यायांत हजर असेलच.

न्यू यॉर्करमधील तीन कथांची प्रक्रिया आणि एका कथेची शोधप्रक्रिया सांगणाऱ्या मुलाखती. त्यांतच कथांचेही दुवे आहेत.

https://shorturl.at/vqqgU
https://shorturl.at/z7Ddw
https://shorturl.at/LkxQ3
https://shorturl.at/lYQup