शोभेच्या फुलांमध्ये ऑर्किडची फुले सर्वात देखणी मानली जातात. या फुलांना बागेतील लागवडीपासून ते सजावटीतील वापरापर्यंत सर्वत्र मागणी असते. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ऑर्किड शेतीही सर्वत्र दिसू लागली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अशाच एका यशस्वी ऑर्किड शेतीच्या प्रयोगाविषयी..
ऑया महागडय़ा समजल्या जाणाऱ्या फुलांची प्रामुख्याने थंड हवेच्या ठिकाणी लागवड केली जात असते; मात्र उष्ण आणि दमट अशा वातावरणात पॉलीहाऊसच्या माध्यमातून या फुलांची लागवड केली जाऊ शकते हे रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील निरुपमा मोहन यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
अनेक दिवस टिकणारे फूल अशी ऑर्किडची ओळख आहे. सतत ताजेतवाने दिसणारे हे फूल उत्सव काळात शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न देऊ शकते. प्रामुख्याने जून ते जानेवारी या कालावधीत या फुलांचा बहर सर्वाधिक असतो. उत्सव काळात या फुलांच्या एका काठीला चाळीस ते पन्नास रुपयांचा भाव मिळत असतो. त्यामुळे निरुपमा मोहन यांनी या फुलांची लागवड करण्याचा निर्णय घेतला.
व्यवसायाने शिक्षका असलेल्या निरुपमा यांनी करोना काळात कर्जत येथे शेतीसाठी जमीन घेतली होती. त्या जमिनीत फुलांची किंवा भाजीपाला शेती करावी यासाठी त्यांनी तळेगाव येथील हॉर्टिकल्चर महाविद्यालयात प्रशिक्षण घेतले आणि कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली येथे जाऊन ऑर्किड शेतीचा अभ्यास केला. त्यातील बारकावे समजून घेतले. यानंतर आपल्या शेतजमिनीत ऑर्किड लागवडीचा निर्णय घेतला.
कर्जत येथे कृषी अधिकारी सल्ल्याने त्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानामधून हरितगृह बांधण्यासाठी अनुदान मिळावे असा अर्ज केला. शासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन माहिती भरून प्रतीक्षा केली. यानंतर जानेवारी २०२३ मध्ये वेणगाव येथील जमिनीमध्ये २० गुंठे क्षेत्रात पॉलीहाऊस उभारून घेतले. मात्र, ऑर्किड फुलांची शेती करण्यासाठी अनेकांच्या सल्ल्यानंतर पुणे येथील राइज एन शाइन या कंपनीबरोबर करार करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑर्किड फुलांचे कंद आणून त्यांची लागवड सुरू केली. चार महिन्यांनी म्हणजे जून महिन्यात ऑर्किडच्या तब्बल १९ हजार कंदांची लागवड नारळाच्या चौडामध्ये करण्यात आली. सुधारित प्रकारे मातीमध्ये लागवड न करता ते कंद जमिनीच्या वर तीन फूट वर जीआय पाइपच्या साहाय्याने उभारलेल्या बेडवर करण्यात आली. त्याच्या बाजूने खते आणि कीटकनाशक यांचा वापर करण्यासाठी ठिबक सिंचन वाहिन्या जोडणी केली.
कंद लागवड झाल्यावर साधारण सात ते आठ महिन्यांनी फुले येण्यास सुरुवात झाली. पॉलीहाऊसमधील तापमान नियंत्रित रहावे यासाठी व्यवस्था केली. हवा, पाणी आणि आद्र्रतेचे व्यवस्थापन केले. कीटकनाशके आणि खतांचा पुरवठा योग्य प्रकारे केला. त्यामुळे फुलांची शेती चांगलीच बहरली. मुंबईत या फुलांना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे या पॉलीहाऊसमधील फुले प्लॅस्टिक बॅगमध्ये पॅक करून मुंबईच्या बाजारात विक्रीसाठी पाठवण्यास सुरुवात केली. त्याला चांगला दर आणि मागणी होऊ लागली.
कर्जतसारख्या उष्ण हवामानाच्या प्रदेशात पॉलीहाऊसमध्ये ऑर्किड लागवडीचा पहिलाच प्रयोग करण्यात आला. तो यशस्वी ठरला आहे. ज्यातून त्यांना लाखमोलाचे उत्पादन मिळू लागले आहे.
मुंबई आणि ठाणे या महानगरांमध्ये फुलांना मोठी मागणी असते. मात्र रायगड जिल्ह्यात फुलांचे शेतकरी फारसे उत्पादन घेत नाहीत. त्यामुळे फुलांसाठी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रावर मुंबईला अवलंबून राहावे लागते. या वाहतुकीत फुलांचे नुकसान होण्याचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे रायगड जिल्ह्यात फुलशेतीला चांगली संधी असल्याचे निरुपमा सांगतात. या उपक्रमात कृषी विभागाचेही चांगले सहकार्य मिळत असल्याचे त्या सांगतात. कृषी विभागाचे उप विभागीय अधिकारी बालाजी ताटे, तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी दिनेशकुमार कोळी आणि अन्य कृषी पर्यवेक्षक, सहायक आठवडय़ातून दोनदा भेट देतात. चांगले मार्गदर्शन करतात. त्यामुळे कामाचा हुरूप वाढण्यास मदत होत असल्याचे त्या सांगतात. खुल्या बाजारात फुलांची विक्री करण्याबरोबरच फुलांची थेट विक्री करण्यावर निरुपमा यांनी भर दिला आहे. त्यांनी स्वत:चे संकेतस्थळ विकसित करून घेतले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑर्किड फुलांचे वितरण सुरू केले आहे. रायगडातील तरुण आणि होतकरू तरुणांनी फुलशेतीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे त्या सांगतात.