कुठल्याही ऋतुबदलाच्या काळात हवामानामध्ये विचित्र बदल होत असल्याचा कायम अनुभव येतो. याचा माणसांबरोबरच पिकांवरही मोठा परिणाम होत असतो. दिवसभर कडक ऊन, संध्याकाळी पाऊस, पहाटे थंडी, धुके अशा विचित्र हवामानामुळे सध्या अनेक पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव होत असतो. याचा सर्वाधिक फटका आले आणि हळद या कंदवर्गीय पिकांना बसत असून या पिकांचे कंदकुज मोठ्या प्रमाणात होत आहेत. यामुळे उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑक्टोबर हीटची अनुभूती देणारे कडक ऊन, परतीच्या पावसाची लगबग तर पहाटे पडणारे धुके यामुळे कंदवर्गीय असलेल्या आले आणि हळदीला कंदकुज रोगाचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात हळदीबरोबरच गेल्या चारपाच वर्षांपासून कडेगाव, कडेपूर भागात आले पिकाची लागवडही वाढली असून कंदकुजमुळे उत्पन्नात घट येण्याची भीती व्यक्त होत आहे. या रोगापासून कंद वाचविण्यासाठी उपाययोजना केली तर होणारे नुकसान टाळता येऊ शकते.

हेही वाचा >>>लोकशिवार: कांद्याच्या बनावट बियाण्यांचा धोका

यंदाच्या हंगामात पावसाचे प्रमाण जास्त आहे. तसेच ऑक्टोबरमध्ये थंडीचा हंगाम सुरू होण्याची अपेक्षा असताना परतीचा पाऊस रेंगाळला आहे. दिवसभर उन्हाचा कडाका असला तरी ढगाळ हवामानही राहत आहे. तसेच सायंकाळी कधी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होतो तर कधी पावसाची हलकी एखादी सर येऊन जाते. यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन, भुईमूग या पिकांचे तर नुकसान होतेच, पण हळद, आले या कंदमुळ असलेल्या पिकांना रोगांचा सामना करावा लागत आहे. पहाटे धुके पडत असल्याने पानावर ठिपके पडत आहेत. यामुळे पानांची अन्न निर्मितीची प्रक्रिया तर थंडावतेच, पण सततच्या पाण्यामुळे पाणी साचून राहत असल्याने कंदकुजलाही सामोरे जावे लागत आहे.

सध्याच्या वातावरणात हळद पिकावर कंदकुज, पानांवरील ठिपके या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. या रोगांच्या प्रादुर्भावामुळे हळद पिकाच्या पानांवर तसेच कंदाच्या दर्जावर परिणाम होतो. प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. कंदकुज म्हणजेच रायझोम रॉट हा रोग फ्युजारिअम, पिथीअम, फायटोप्थोरा, रायझोयटोनिया या बुरशींमुळे तसेच सूत्रकृमी आणि कंदमाशी यांच्या एकत्रित प्रादुर्भावामुळे होतो.

सुरळीतील पानांचे शेंडे वरून व कडेने पिवळे पडून १ ते १.५ सें.मी. खालीपर्यंत वाळतात. पुढे संपूर्ण पान वाळते. खोडाचा गड्ड्यालगतच्या बुंध्याचा रंग तपकिरी काळपट होतो. या ठिकाणची माती बाजूला करून पाहिल्यास गड्डा वरून काळा व निस्तेज झालेला दिसतो. प्रादुर्भावग्रस्त फुटवा ओढल्यास सहज हातामध्ये येतो. जमिनीतील कंद बाहेर काढल्यास तो पचपचीत व मऊ लागतो. त्यातून दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर पडते. या रोगात सर्वप्रथम झाडाची सुरळी मरते.

कंदकुज व पाने पिवळी पडणे या रोगास अनुकूल घटक सध्या निर्माण झाले आहेत. यामध्ये भरपूर पाऊस, जास्त आर्द्रता, ढगाळ ऊबदार हवामान. भारी काळी कसदार व कमी निचरा होणारी जमीन. हे रोगास पोषक घटक असतील तर रोगाचा प्रादुर्भाव बळावतो.

हेही वाचा >>>सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता?

उपाययोजना

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ट्रायकोडर्मा प्लस प्रति एकरी २ ते २.५ किलो पावडर २५० ते ३०० किलो शेणखतामध्ये मिसळून जमिनीत पसरवून द्यावी. अतिपावसामुळे कंदकुजीने प्रादुर्भावित झालेले कंद उपटून नष्ट करावेत. तसेच शेजारील रोपांच्या वाफ्यात बुरशीनाशकाची आळवणी करावी. वाफसा पाहून सिंचनावर भर दिला पाहिजे. जमिनीतील ओल पाहूनच पाणी व्यवस्थापन करावे. वाफ्यात पावसाचे पाणी साचले असेल तर ते बाहेर काढून देता येत असेल तर द्यावे. जेणेकरून रानातील पाण्याचा निचरा होऊन रोगांना पोषक स्थिती राहणार नाही.

अतिरिक्त पाण्याचा निचरा करताना शेतामध्ये उताराला आडवे चर घेऊन पावसाच्या पाण्याचा निचरा करावा. पाणी साठू देऊ नये. हळद व आले पिकात उत्पन्नाचा स्राोत जमिनीत वाढणारे कंद असल्यामुळे जमिनीचे चार प्रमुख घटक जसे मातीचे प्रमाण, सेंद्रिय पदार्थ, हवा आणि पाणी यांचे संतुलन राखावे. जमिनीत केवळ मातीचे कण राहिले तर जमीन कोरडी होऊन मुळांच्या वाढीला वाव मिळत नाही, कंद पोसणार नाहीत.

जमिनीत आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी झाल्यास कंद कुजण्याचे प्रमाण वाढते. ज्या जमिनीत मातीचे प्रमाण ४५ टक्के, सेंद्रिय पदार्थ ५ टक्के, हवा आणि पाणी प्रत्येकी २५ टक्के असते अशा जमिनीत पिकाची वाढ चांगली होते. आणि कंदकुज रोगाला आळा बसण्यास मदत होते.

पावसाचे आणि पाण्याचे प्रमाण अति झाले तर पाने पिवळी पडतात. सुरळीत पाने पिवळी पडल्याचे आढळताच, तो कंद अथवा फुटवा बाजूला काढणे फायदेशीर ठरते. कारण याची लागण अन्य चांगल्या कंदांना होऊ शकते.

आंतरमशागत केल्यास जमिनीतील वरचा भाग लवकर पाण्यापासून मुक्त होतो. वरच्या बाजूला हवा खेळती राहण्यास मदत होते. परिणामी कंद पोसण्यास मदत होते. आंतरमशागत करताना गड्ड्यांना इजा होऊ देऊ नये. कुजलेले गड्डे बांधावर न टाकता जाळून नष्ट करावेत.

उपाययोजना

प्रति लिटर पाण्यात कार्बेन्डाझीम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब (७५ डब्ल्यूपी) २ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झियलोराइड (५० डब्ल्यूपी) ५ ग्रॅम तीव्रता जास्त असल्यास मेटॅलॅयिसल (एम ४ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६४ टक्के) यांची फवारणी करावी. हवेत आर्द्रता व जास्त पाऊस असल्यास या औषधांची फवारणी रोग नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते.

पाने, सुरळी पिवळी पडत असल्याचे आढळल्यास रोगग्रस्त पाने तोडून नष्ट करावीत. या रोगाच्या नियंत्रणासाठी (प्रति लिटर पाणी) मॅन्कोझेब (७५ डब्ल्यू.पी.) २ ते २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम (५० डब्ल्यू.पी.) १ ते २ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झियलोराइड (५० डब्ल्यू.पी.) २.५ ते ३ ग्रॅम तीव्रता जास्त असल्यास, १ टक्का बोर्डो मिश्रणाची किंवा प्रोपीकोनॅझोल (२५ ई.सी.) ०.५ ते १ मिलि किंवा क्लोरोथैलोनील (७५ डब्ल्यू.पी.) २ ते २.५ ग्रॅम. याची फवारणी करावी. धुक्याचे प्रमाण जास्त असल्यास अथवा पाणथळ जमिनीवर म्हणजे ओढा पात्र नजीक असलेल्या जमिनीवरील पिकासाठी १५ दिवसांच्या अंतराने वरील बुरशीनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.

digambarshinde64 @gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokshivar decline in production due to root rot of ginger and turmeric crops amy