कांद्याचे दर वाढल्यामुळे अनेक शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात कांदा लागवडीकडे वळले आहेत. याच परिस्थितीचा फायदा घेत सध्या बाजारात बनावट कांदा बियाण्यांचा धोका वाढला आहे. बियाणेच फसले की पुढील सर्व मेहनत, खर्च वाया जाऊन शेतकऱ्यांच्या पदरी केवळ निराशा आणि तोटा येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर दक्ष करणारा हा लेख…

कांद्याचे दर वाढल्यामुळे अनेक शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात कांदा लागवडीकडे वळले आहेत. याच परिस्थितीचा फायदा घेत सध्या बाजारात बनावट कांदा बियाण्यांचा धोका वाढला आहे. कांदा वा कुठल्याही पिकाचा बियाणे हा पाया मानला जातो. बियाणे बनावट निघाले तर महागड्या दरात केलेली खरेदी. रोपे तयार करण्यासाठी उपसलेले कष्ट वाया जातात. शिवाय संपूर्ण हंगाम हातातून जातो. कांद्याचे विविध कंपन्यांचे बियाणे खरेदी करणाऱ्या १० पैकी तीन शेतकऱ्यांना बनावट बियाण्यांच्या समस्येला तोंड द्यावे लागते, असे महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे निरीक्षण आहे. संपूर्ण राज्यात बनावट बियाण्यांमुळे दरवर्षी मोठ्या संख्येने कांदा उत्पादकांची फसवणूक होते. बियाणेच फसले की पुढील सर्व मेहनत, खर्च वाया जाऊन शेतकऱ्यांच्या पदरी केवळ निराशा आणि तोटा येऊ शकतो. मागील दुष्काळी वर्षामुळे यंदा रब्बी हंगामात बियाण्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे बनावट बियाण्यांचा बाजार पुन्हा भरास येण्याची चिन्हे असून उत्पादकांनी नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याची गरज आहे.

हेही वाचा >>>लोकशिवार: आले, हळदीची कंदकुज !

राज्यात वर्षभरात खरीप, लेट खरीप आणि रब्बी या तीन हंगामात कांद्याचे पीक घेतले जाते. दिवाळीनंतर रब्बी हंगामासाठी लागवड सुरू होईल. नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत ती चालते. दुष्काळामुळे गतवर्षी बहुतांश शेतकऱ्यांना स्वत: बियाणे तयार करता आले नाही. त्यामुळे यंदा संबंधितांना खासगी कंपन्यांच्या बियाण्यांवर अवलंबून रहावे लागणार आहे. या परिस्थितीत काळ्या बाजाराला चालना मिळते. महागड्या दरात बियाणे खरेदी करावे लागते. बनावट बियाण्यांमुळे उत्पादकांची फसवणूक होण्याची शक्यता वाढते. कांद्याचे बियाणे काळ्या रंगात व विशिष्ट आकाराचे असते. वाफ्यात वा पाच ते १० गुंठ्यात त्यांची लागवड करून प्रथम रोपे तयार केली जातात. शेतात टाकल्यानंतर १०-१२ दिवसानंतर त्याची उगवण क्षमता लक्षात येते. रोपे पूर्ण तयार होण्यास साधारणत: ४५ ते ५० दिवसांचा कालावधी लागतो. पाऊसमान, वातावरण, रोगराईचा प्रादुर्भाव अशा कारणांस्तव हा कालावधी काहिसा मागे-पुढे होऊ शकतो. रोपे तयार झाल्यानंतर त्यांची शेतात पुनर्लागवड केली जाते. खरीप आणि लेट खरीप कांदा ९० ते ९५ दिवसांत तर रब्बी कांद्याला लागवड केल्यानंतर १२० दिवस लागतात.

कांद्याचे बियाणे दोन प्रकारात उपलब्ध होतात. एक म्हणजे जे शेतकरी स्वत: तयार करतो. आपल्या शेतात पिकलेल्या कांद्यातून उत्कृष्ट दर्जाचा कांदा तो स्वत: बाजुला काढतो. त्याची नंतर वाफा पद्धतीने कमी क्षेत्रात लागवड करतो. त्याची उगवण होऊन फुले येतात. नंतर गोंडे तयार होऊन काळ्या बिया तयार होतात. हेच बियाणे तो वापरतो. त्याची उत्पादकाला पूर्ण खात्री असते. कारण चांगल्या दर्जाच्या कांद्यापासून पारंपरिक पद्धतीने ती तयार केलेली असतात. ज्यांच्याकडे अशा प्रकारचे बियाणे नसते, त्यांना दुसऱ्या प्रकारातील म्हणजे खासगी कंपन्यांची बियाणे घ्यावी लागतात. यातच फसवणुकीचा धोका असतो. या कंपन्या काही शेतकऱ्यांशी करार करून बियाणे तयार करवून घेतात. प्रतवारी करून आकर्षक वेष्टण करतात. यात जुन्या बियाण्यांची भेसळ होंण्याची शक्यता असते. बियाणे जेवढे जुने, तेवढी त्याची उगवण क्षमता कमी होते. अलीकडे तर बियाणे कंपन्या ७० टक्के उगवण होईल, असे पाकिटावर नमूद करतात. याचा अर्थ १०० बिया टाकल्या तर ७० बियांची उगवण होईल. ही सुद्धा एकप्रकारे उत्पादकांची फसवणूक असल्याचे महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे सांगतात. कधीकधी प्रारंभीच्या टप्प्यात बियाणे परिपक्व नसल्यास, जुने असल्यास रोपे मृतप्राय होतात. कधी रोपे तयार होऊन पुनर्लागवड झाल्यावर त्यावर पांढऱ्या रंगाचे फूल येते. तसे घडायला नको. केवळ पात राहिली पाहिजे, असे जाणकार सांगतात. बियाण्यात उत्पादकांची कोणी फसवणूक केल्यास त्याला कठोर कारवाईला सामोरे जावे लागावे, अशा कठोर कायद्यासाठी संघटना पाठपुरावा करीत आहे.

हेही वाचा >>>भारतात एवढे फुकट देऊनही… भुकेचा प्रश्न गंभीरच

नामांकित कंपन्यांच्या बियाण्यांचे बनावटीकरण होते. अनेकदा बियाण्यांची अतिशय महागड्या दरात खरेदी करावी लागते. काही दिवसांपूर्वी गुजरातमधील काही शेतकरी कांदा बियाणे खरेदीसाठी नाशिकमध्ये आले होते. दोन हजार रुपये किंमतीचे बियाणे त्यांना साडेतीन हजार रुपये दराने विकण्यात आले. तुटवटा असल्यास राज्यातील उत्पादकांना कमी-अधिक प्रमाणात अव्वाच्या सव्वा रुपये मोजावे लागतात. काही घटक भूलथापा देत कमी किंमतीत बियाणे विकतात. समाजमाध्यमात महाराष्ट्र कांदा व्यापारी संघटनेच्या नावाने गट आहे. तिथे ‘घरगुती तयार केलेले खात्रीशीर पुना फूरसुंगी उन्हाळी कांदा बियाणे मिळेल’ अशा जाहिराती दृष्टीपथास पडतात. मुळात अशी कोणतीही संघटना राज्यात नाही. समाजमाध्यमांवर काहीही नाव देऊन फसवणूक करणारे लोक जाहिरात करून बनावट बियाणे विकण्याचे काम करीत असल्याचे महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे म्हणणे आहे. कांदा उत्पादकांनी स्वत:च्या अनुभवावर स्वत:ला लागणारे बियाणे तयार करणे, हा फसवणूक टाळण्याचा सर्वात खात्रीशीर मार्ग आहे. स्वत:ची गरज भागवून काही बियाणे शिल्लक राहिल्यास विश्वासपात्र गरजू शेतकऱ्याला ती योग्य दरात विकता येतील. या माध्यमातून भांडवलासाठी उत्पादकाच्या हाती दोन पैसे येतील. जेव्हा आपण कंपन्याच्या ताब्यात जातो, तेव्हा दर जास्त मोजावा लागतो. चांगले आहेत की बनावट याची शाश्वती नसते. कांदा तयार झाल्यानंतर त्याला मिळणारे दर हा नंतरचा भाग आहे. या शेतीत सुक्ष्म नियोजन करून उत्पादन खर्च कमी करण्यावर प्रत्येकाने भर देण्याची गरज भारत दिघोळे मांडतात. कांदा उत्पादनातून होणारे पैसे माहिती नसतात. कमी खर्चात जास्त उत्पादन घेतले तर नफ्यात वाढ होते. बियाणे स्वत: तयार केल्यामुळे बियाण्यांचा खर्च बराचसा कमी करता येतो.

बनावट कांदा बियाणे विक्रेत्यांवर संघटनेचे पदाधिकारी लक्ष ठेवतात. खासगी कंपन्यांचे बियाणे खरेदी करताना उत्पादकांनी सर्व व्यवहार ऑनलाईन करावे. म्हणजे आपल्या खात्यावरून संबंधित शेतकरी असो वा बियाणे विक्रेता असो, यांना पैसे त्यांच्या खात्यावर पाठवावेत. आधार कार्ड झेरॉक्स, पक्के देयक घ्यावे. कांदा बियाणे खरेदी करताना, शेतात टाकताना, पुनर्लागवड करताना वेळोवेळी छायाचित्र व चित्रफीत भ्रमणध्वनीवर पुरावा म्हणून काढावी. बनावट बियाणे विकल्यानंतर शेतकऱ्यांची कुठल्याही कारणांनी फसवणूक झाल्यास संबंधित कंपनीकडे बोट दाखवून विक्रेते आपली जबाबदारी झटकत होते, अशा प्रकारात बियाणे कंपनीसह संबंधित विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई करता येते. संघटना त्यासाठी प्रयत्नशील असते. कंपन्यांसह विक्रेत्यांनी सचोटीने व्यवसाय करावा, ही अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.

Aniket.sathe@expressindia. com