दिगंबर शिंदे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या वर्षी पावसाने अनेक भागात ओढ तर दिलीच; पण पुढच्या हंगामापर्यंत सालबिजमी कशी करायची याची चिंता आजच लागली आहे. शाळू ज्वारीचा दर किलोला ७५ रुपयांपर्यंत पोहचला असल्याने ही चिंता अधिकच तीव्र बनण्याचा धोका आहे. केवळ बागायती म्हणजे नगदी पिके घेऊन पोटाची आग भागवता येणार नाही. यासाठी तृणधान्यही महत्त्वाचे आहे. या तृणधान्यामध्ये ज्वारी हे महत्त्वाचे पीक मानले जाते. कारण प्रत्येकाच्या ताटात भाकरीही असतेच. विशेषत: दख्खनच्या पठारावरील मुख्य अन्न म्हणून ज्वारीचीच गणना केली जाते.

या वर्षीच्या हंगामात पावसाने ओढ दिल्याने बहुसंख्य ठिकाणी झालेला खरिपाचा पेरा अडचणीत आला. खरीप ज्वारीचे उत्पादन कमी होण्याच्या शक्यतेने आणि अवर्षण स्थिती निर्माण झाल्याने आता बाजारात शाळू ज्वारीचे दर किलोला ६५ रुपयांपर्यंत पोहचले आहेत. सांगलीचा जत, सोलापूर, बार्शी, मंगळवेढा हा रब्बी ज्वारीसाठी प्रसिद्ध असलेला भाग आता या भागात परतीच्या पावसावर रब्बी ज्वारीच्या पेरण्या सुरू आहेत. तर दिवाळीनंतर अद्याप थंडीचा हंगाम सुरू झालेला नाही. यामुळे सध्या असलेल्या उष्ण वातावरणात ज्वारीची उगवण होऊ शकते. महिन्याचा विलंब झाला असला, तरी सध्या होत असलेला अवकाळी पाऊस शाळू पिकाला पोषक ठरणारा आहे.

हेही वाचा >>>ऊसतोड मजुरांचा विचार धोरणात हवा

दख्खनच्या पठारावर काळय़ा, करलाट जमिनीतील कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून रब्बी ज्वारी म्हणजेच शाळू ओळखले जाते. राज्यातील सुमारे एक तृतीयांश उत्पादन सोलापूर, मंगळवेढा, जत, सांगोला या भागात होते. गव्हापेक्षा पचनास हलके आणि कसदार धान्य म्हणून शाळूची गणना केली जाते. सामान्यातील सामान्य माणसाच्या ताटातही सहजरीत्या उपलब्ध असलेली भाकरी या वर्षी अपुऱ्या पुरवठय़ामुळे महाग झाली. परिणामी चटणी-भाकरी सामान्याच्या ताटातील रोजची गरज आज श्रीमंतांच्या ताटातील मेजवानी बनू लागली आहे. ज्वारीमध्ये तांदळापेक्षा प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.

शाळू पिकाला साधारणत: २७ ते ३२ अंश सेल्सिअस तापमान लागते, परंतु काही प्रकार ३८ ते ४४ अंश सेल्सिअस तापमानातही वाढू शकतात. हिवाळी हंगामातील प्रकारांना १६ अं. से. पर्यंत किमान तापमान चालते. सर्वसाधारणपणे हे पीक सपाट प्रदेशात वाढणारे आहे, परंतु कर्नाटकात काही प्रकार ९०० मी. उंचीवरील प्रदेशातही लागवडीखाली आहेत. वार्षिक ५० ते १०० सेंमी पर्जन्यमानाच्या प्रदेशात ज्वारीचे पीक चांगले येते.

ज्वारीचे पीक अगदी रेताड व चोपण जमिनी सोडून बहुतेक सर्व प्रकारच्या काळय़ा, मध्यम काळय़ा अगर दुमट जमिनीत चांगले येते. काही मर्यादेपर्यंत क्षारधर्मी (अल्कलाइन) जमिनीत हे पीक वाढू शकते. मात्र ज्या ठिकाणी कमी पाऊस असतो अशा ठिकाणी करलाट म्हणजे दहा ते पंधरा फूट जमीन काळय़ा मातीची आहे अशा जमिनीत या पिकाची वाढ जोमाने होते. एकदा का जमीन चांगली गरगरीत पावसाने भिजली की पुन्हा केवळ कोळपणीवर हे पीक हमखास उत्पन्न देते. अशीच जमीन मंगळवेढा, सांगोला, बार्शी, जत या भागात पाहण्यास मिळते. यामुळे या परिसरात या रब्बी ज्वारीचे पिक पारंपरिक मानले जाते. या पिकाकरिता जमीन दर वर्षी नांगरीत नाहीत. तीन-चार वर्षांतून एकदा नांगरली तरी चालते. मे महिन्यात दोन-तीन वेळा १०-१२ सेंमी खोलीपर्यंत जमीन कुळवाने मोकळी करतात.

हेही वाचा >>>सांस्कृतिक सपाटीकरणाला विरोध!

शाळू पिकाची पेरणी प्रामुख्याने हस्त नक्षत्र संपल्यानंतर म्हणजे १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या काळात केली जाते. जमिनीत पुरेशी ओल झाल्यावर पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीप्रमाणे जमीन चांगली भिजून वाफसा आल्यावर पाभरीने बी पेरतात. यात पावसाचे पाणी शक्य तितके मुरवून नंतर जमिनीची मशागत करून पाभरीच्या दोन फणांत ४५ सेंमी. अंतर ठेवून बी पेरतात. काही ठिकाणी टोकन पद्धतीचा वापरही केला जातो. जमिनीत पुरेशी ओल होऊन वाफसा आला म्हणजे ४५ बाय ४५ सेंमी अंतरावर सरळ ओळीत ५-६ सेंमी खोल (ओलीपर्यंत) भोके पाडून त्यांमध्ये प्रत्येकी ६-८ ज्वारीचे दाणे टाकून ओल्या मातीने ती भोके झाकून टाकतात. बी उगवल्यावर बी विरळणीच्या वेळी प्रत्येक टोकणीच्या जागी दोन-तीन जोमदार रोपे ठेवून बाकीची उपटतात. पेरणीसाठी निवडक बी वापरतात. त्यासाठी बी चाळून, पाखडून घेतात. पिकात पुढे कवकीय (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींमुळे होणारे) रोग उद्भवू नयेत म्हणून पेरण्यापूर्वी बियांना पारायुक्त कीटकनाशक अथवा गंधक चोळून घेतात. त्याचप्रमाणे उत्पादन वाढविण्यासाठी सुधारलेल्या प्रकारांचे बी वापरणे आवश्यक असते. धान्याच्या पिकासाठी हेक्टरी ९-१० किलो आणि वैरणीच्या पिकासाठी ५०-६० किलो बी वापरावे लागते.

पेरणीनंतर (अगर बी टोकल्यानंतर) तीन आठवडय़ांनी पिकाला कोळपणी देतात. निंदणी करून ओळीतील तण काढून घेतात. पुढे तर पंधरा दिवसांनी पिकाला कोळपणी देतात. पिकात तण वाढू देत नाहीत. कोळपणीमुळे जमीन भेगाळत नाही, पिकाच्या मुळांना हवेचा, वनस्पतिपोषक द्रव्यांचा व पाण्याचा पुरेसा पुरवठा होतो. एकूण ३-४ कोळपण्या व दोन-तीन खुरपण्या देतात.

खत

वार्षिक ७५ ते ८२ सेंमी पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात ज्वारीच्या कोरडवाहू पिकाला हेक्टरी ६ टन आणि बागायती पिकाला १२ ते १८ टन शेणखत अगर कंपोस्ट पूर्व मशागतीच्या वेळी देतात. हेक्टरी ८० किलो नायट्रोजन मिळेल असे कोणतेही रासायनिक खत आणि १९० किग्रॅ सुपरफॉस्फेट पेरणीच्या वेळी देतात.

कोरडवाहू पिकाला सर्व नायट्रोजन आणि फॉस्फरिक आम्ल एकाच हप्तय़ात पेरणीपूर्वी देतात. बागायती पिकाला नायट्रोजनची निम्मी मात्रा आणि फॉस्फरिक आम्ल आणि पोटॅश यांची पूर्ण मात्रा पेरणीच्या वेळी आणि नायट्रोजनची राहिलेली निम्मी मात्रा पेरणीनंतर ३०-४५ दिवसांनी (पीक ५०-६० सेंमी उंच झाल्यावर) देतात. ज्या भागात पाऊस खात्रीचा असतो आणि जमिनीतील ओल ज्वारीच्या पिकाची गरज पुरी होईपर्यंत टिकेल अशी शाश्वती असते किंवा पिकाला खत दिल्यानंतर पाणी देण्याची सोय असते, अशा ठिकाणीच रासायनिक खते (वरखते) देणे श्रेयस्कर असते.

ज्वारीचे पीक तयार व्हायला किमान १३० ते १४० दिवस लागतात. पीक काढणीलायक होण्याच्या आधी २०-२५ दिवस त्याच्या ताटांवरील खालची बुंध्याकडची दोन-चार पाने काढून घेतल्यामुळे पिकात हवा खेळती राहून अकार्यक्षम पानांमध्ये जाणारा अन्नरस वाचून त्याचा ताटाला उपयोग होऊन कणसात दाणे चांगले भरतात.

जमिनीचा दर्जा, पर्जन्यमान (अथवा पाणी पुरवठय़ाची साधने), खताची मात्रा आणि मशागत यांवर ज्वारीचे उत्पन्न अवलंबून असते. कोरडवाहू रबी ज्वारीचे उत्पन्न हेक्टरी ६५० ते ७५० किग्रॅ असते व दाण्याच्या दोन ते अडीच पट कडब्याचे उत्पन्न मिळते. बागायती ज्वारीचे हेक्टरी उत्पन्न १२०० ते १८०० किग्रॅ असते. भारी जमिनीत ते हेक्टरी ४००० किग्रॅपर्यंतही असते. ओल्या वैरणीचे उत्पन्न हलक्या जमिनीत हेक्टरी २० टन आणि भारी जमिनीत ३० ते ३५ टन मिळते.

बहुउपयोगी ज्वारी

नेहमीच्या आहाराचा एक प्रमुख भाग म्हणून ज्वारीचा भारतात, विशेषत: कमी पर्जन्यमानाच्या भागात, उपयोग करतात. शिवाय कणसे काढून घेतल्यावर वाळलेली ताटे (कडबा) यांचा जनावरांना वैरण म्हणूनही उपयोग होतो. दाण्याचे पीठ करून त्याच्या भाकरी करतात अथवा लाह्या, हुरडा व लापशी या स्वरूपांतही दाण्याचा वापर करतात. दाण्यापासून ‘माल्ट’ तयार करतात व त्याचा उपयोग लहान मुलांचे अन्न तयार करण्यासाठी अथवा बीअर तयार करण्यासाठी करतात. दाण्यातील स्टार्चपासून किण्वनाने (आंबवून) एथिल अल्कोहॉल, सिटोन व ब्युटिल अल्कोहोल तयार करतात. ज्वारीचा स्टार्च मक्याच्या स्टार्चप्रमाणे असून त्याचा खाद्य पदार्थाच्या उद्योगांत आणि कापडधंद्यात खळीसाठी उपयोग होतो. कागद आणि पुठ्ठा तयार करण्याच्या उद्योगातही ज्वारीच्या स्टार्चचा खळीसाठी वापर होतो.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokshivar sowing of shalu rain shalu jowar rate a staple food of the deccan plateau amy