डॉ. आनंद नाडकर्णी
लोकसत्ता ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक संस्थेची एक कहाणी आहे आणि ती आपल्या सर्वांना नीतीचा,चांगुलपणाचा आणि सद्भावाचा दिलासा देणारी आहे. त्यासाठी ‘लोकसत्ता’ने स्वत:चा वापर माध्यम म्हणून करणे ही फार मोठी गोष्ट आहे. कारण इतर सनसनाटी बातम्या येतच असतात. पण या उपक्रमामुळे समाजामध्ये समाजाच्या भल्यासाठी काम करणारी इतकी सारी मंडळी आहेत, हे कळते.
या संस्थांनी आपल्या देण्यामधून काय घ्यायचे, तर शाबासकीची थाप. या उपक्रमातून त्यांना असे वाटते की माझ्या पाठीशी कुणीतरी उभे आहे आणि ते फक्त शब्दरूपात नाहीयेत. कारण सामाजिक सहभागातून भरघोस रक्कम निर्माण होणे, ही गोष्ट फारच महत्त्वाची आहे. सर्व संस्थांना तो दिलासा सामूहिक कृतीमधून मिळत असतो आणि तो त्यांच्याकरिता प्राणवायूच आहे. एखादी संस्था चालवणे हे कधीच सोपे नसते. या सर्व संस्थांकडे मनोधैर्य, स्वत:च्या ध्येयाची बांधिलकी असते. पण त्या कामासाठी लागणारा पैसा कुठून आणायचा हे कळत नसते. आपण या संस्थांना मदत केली नसती तरीही त्यांचे काम सुरू राहणारच होते. त्यामुळे आम्ही मदत केली आणि तुमचे कार्य चालू राहिले ही भावना नसावी. आपण जी मदत करतो ती स्वत:साठी आहे. त्या माध्यमातून आपल्या मनामधला सद्भाव जागा होतो. त्यातून या संस्थांना पुढे जाण्यासाठीची उमेद मिळते.
हेही वाचा >>> कर्करोगाच्या कराल दाढेतून वाचण्यासाठी जनजागृती महत्त्वाची!
‘लोकसत्ता’ने दानयज्ञ हा शब्द खूप छान शब्द दिला आहे. विनोबा असे म्हणतात की ‘दान आणि त्याग’ या दोन्ही गोष्टी धर्माच्या आहेत. दानाची जागा ही धर्माच्या पर्वताच्या पायथ्याशी आहे. तर, त्यागाची जागा ही त्या पर्वताच्या माथ्याशी आहे. ‘लोकसत्ता सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून हितचिंतकांनी केलेले दान म्हणजे त्याग आहे. त्यागाची आरती ही ज्ञानाने करायची असते. या सर्व सेवाभावी संस्था याही धर्माच्या पर्वताच्या माथ्यावर आहेत. सर्व दाते हे या पर्वताच्या पायथ्याशी आहेत. दानाच्या माध्यमातून त्यांच्याकडे पाहून त्यांच्या त्यागाची कदर करून आपण त्यांना दाद देतो. यानिमित्ताने आपण सर्वजण सद्भावाला वंदन करतो. सत्पात्री केलेले दान हे इतरत्र कळू नये, असे सांगितले आहे. अलीकडे दानापेक्षाही दातृत्वाची जास्त जाहिरात पाहण्याची सवय आपल्याला झालेली आहे. ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून दिलेले दान हे सर्व दात्यांनी स्वइच्छेने दिलेले आहे. अनेक हितचिंतक या उपक्रमाशी बांधले गेले आहेत. त्यामुळे हे दान खूप महत्त्वाचे आहे. यज्ञ हा दुसरा शब्द आहे. यज्ञ शब्दाचा अर्थ स्वत:ची मालकी सोडणे असा होतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट यज्ञ वृत्तीने करा म्हणजे संस्कृत भाषेतील उक्तीनुसार ‘इदं न मम’. याचा अर्थ असा की, हे माझे नव्हे. यज्ञ वृती म्हणजे सेवा करणाऱ्या व्यक्तींनी कर्तृत्वावरची मालकी सोडलेली आहे. कोणत्याही स्वार्थाशिवाय ते समाजासाठी काम करत आहेत. स्वत: कर्तृत्व करून त्याचे श्रेय मात्र कमीत कमी घ्यायचे, याला यज्ञ म्हणतात. दान करणाऱ्या व्यक्तींसाठी स्वत:च्या भोगतृत्वावरची मालकी सोडणे हा यज्ञ आहे. त्या धनाचे आपण भोगते आहोत, पण त्या भोगतृत्वावरची आणि कर्तृत्वावरची मालकी सोडणे म्हणजे यज्ञवृत्ती आहे. याचमुळे दानयज्ञ या शब्दाची ही जोडी समर्पक आहे. माणूस, समाज आणि सृष्टी यांचा एकमेकांवरचा विश्वास वाढला पाहिजे. या यज्ञवृत्तीमुळे एकमेकांवरील विश्वास वाढीस लागतो.
‘गीताई’मध्ये ‘रक्षा देवास यज्ञाने, तुम्हा रक्षतो देव’ असे सांगितले गेले आहे. हा देव मूर्तीमधला नसून, ती पंचमहाभूते आहेत. सृष्टी, समाज आणि माणूस या सगळयांनी एकमेकांबरोबर सहकार्य करत पुढे जावे, हा परस्पर सहकार्याचा दानयज्ञ आहे. या सहकार्यामधून उत्तमच होणार आहे. दोन्ही गोष्टी एकमेकांचे रक्षण करणार आहेत. हेच सेवाव्रती सद्भाव पुढे सुरू ठेवणार आहेत. आपण त्यांना यथाशक्ती मदत करत राहणार आहोत. आपण सर्वजण एकमेकांवर अवलंबून आहोत. आपण एखादी गोष्ट केली असे म्हणतो ते नेहमी अर्धसत्य असते. आपण कोणतीच गोष्ट फक्त स्वत: करत नाही. श्वास घ्यायचा म्हटले तरी प्राणवायूची पातळी निसर्गावर अवलंबून असते. प्रदूषण किती हे मी ठरवू शकत नाही. त्यामुळे मी काय करतो याला खूप मर्यादा आहेत. त्या मर्यादा आम्ही काय करतो यामुळे कमी होतात. कारण ‘मी’ पणाच्या ठिकाणी ‘आम्ही’ येतो. पुरातन काळापासून एकत्र या असे सांगितले आहे. परंतु ‘मी’ कडून ‘आम्ही’कडे जाणे हा प्रवास कठीण आहे. त्याचे कारण पुन्हा मीच आहे. कारण सहजपणे आम्ही होता येत नाही.
अनेक सेवाभावी संस्थांमध्ये ‘आम्ही’कडून ‘मी’कडे खेचणारी चढाओढ चालू असते. त्यामुळे दानयज्ञ महत्त्वाचा. कारण, सहकार्यामधून एकमेकांना जोडणे हा एक भाग आहे. त्याला परस्परावलंबन म्हणतात. सगळे दाते हितचिंतक आणि सेवावृत्ती यांच्यामधील नाते म्हणजे परस्परअनुबंध. परस्परअनुबंध असेल तेव्हाच परस्परावलंबन स्थायी स्वरूपाचा होईल. परस्परअनुबंध नसेल तर परस्परावलंबन फक्त देवाण-घेवाण राहील आणि ती हिशोबी होईल. परस्परअनुबंध असेल तर त्याला भावना जोडल्या जातील आणि कोरडा हिशोब मागे पडेल. म्हणून ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाच्या माध्यमातून जे होतेय, त्यामध्ये आपण एकमेकांसोबत जोडले जात आहोत.
आजच्या जगामध्ये पर्यटनालासुद्धा उपभोक्तावादी केले आहे. आपण सद्भावाचे पर्यटन करणे फार महत्त्वाचे आहे. ज्या संस्था खूप सक्षम झाल्या आहेत, सगळयांना माहीत आहेत, तिथेच आपण पर्यटनाला जातो. मात्र या पर्यटनाची खरी गरज ही फारशा माहीत नसलेल्या संस्थांना आहे. त्या आपल्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. जे आपली भाजीभाकरी प्रेमाने देऊ शकतील, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचायला हवे. आपण पर्यटनासाठी या जिल्ह्यांत गेलो तर कोणाला भेटू शकतो याचे नियोजन करायला हवे. याला पर्यटन नव्हे तर परस्परअनुबंध म्हणावे. अनुबंध हे पर्यटन नाही, तर ती यात्रा असते. या सर्वांमुळे एकमेकांमध्ये समरसता निर्माण होते. समाजाला या एकात्मतेची, समरसतेची गरज असते. गीतेमध्ये त्याला लोकसंग्रह धर्म असे म्हटले आहे. समरसता, एकत्व वाढणे हा समाजाच्या वेगवेगळया गटातला, घटकांमधला हा लोकसंग्रह धर्म आहे.
रूटगर ब्रेगमन या लेखकाने ‘ह्युमन काईंड अ होपफुल हिस्टरी’ नावाचे पुस्तक लिहिले आहे त्यात असे म्हटले आहे की माध्यमे सद्भावाचा प्रसार करत नाहीत, तर ती जे आहे ते कसे वाईट आहे, याबद्दल लिहितात. सद्भावाला जाहिरात करायची सवय नसते. हे कार्य आयपीएचच्या ‘वेध’ उपक्रमातून केले जाते. आपल्याला माहिती नाही, असे काम ज्या व्यक्ती करतात, त्यांना आपण आपल्या माध्यमाद्वारे लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न करतो. सर्व सेवाभावी संस्थांना स्वत:च्या ध्येयाबद्दलची बांधिलकी असते, उमाळा असतो. पण संस्था चालवण्यासाठी, स्थिर करण्यासाठी आणि त्यांचा विचार सर्वदूर पसरवण्यासाठी यंत्रणेची आणि कौशल्यांची गरज असते. ध्येय आणि निष्ठा याबाबत संस्था कमी पडत नाही. पण कौशल्य आणि यंत्रणा याबाबत त्यांना मर्यादा असतात. आपल्याला आजच्या काळात चांगल्या पद्धतीने संस्था चालवण्यासाठी कोणती कौशल्ये आत्मसात करायला हवीत आणि कोणत्या यंत्रणा उभारल्या पाहिजेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. कौशल्यामधून जे शक्य होईल ते करणे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. यामुळे दानयज्ञात सहभागी होणारी माणसे अधिक विश्वासाने दान देतात. कारण आपले दान सत्पात्री पडले आहे आणि ही संस्था आपले कार्य पुढे नेत आहेत, याचा एक दिलासा त्यांना मिळतो.
एखादी संस्था ही एखाद्या कुटुंबापुरती मर्यादित राहते. पण तिला तिचा विचार रुजवायचा असेल तर तो कुटुंबाच्या बाहेर नेणे गरजेचे आहे. त्याकरिता कार्यकर्त्यांची एक फळी तयार करावी लागते. आपला विचार रुजवण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतात. या सगळया कामांमध्ये आपण सगळयांनी दान केले. सेवावृत्तींनी त्याग केला, हे महत्त्वाचे आहे.
गौतम बुद्धांची एक गोष्ट आहे. त्यांचा एक शिष्य भिक्षा मागण्यासाठी एका खेडयामध्ये जातो. त्याला कोणीच भिक्षा देत नाही. पण गावाच्या टोकाला एक अतिशय वृद्ध स्त्री एकटी राहत असते. तिच्याकडे एकच भाकरी असते. पण ती कसलाही विचार न करता त्याला आपल्यातली अर्धी भाकरी देते. तो शिष्य गौतम बुद्धांकडे येऊन आपल्याला ती भाकरी कशी मिळाली ते सांगतो. त्यावर ते म्हणतात, की त्या स्त्रीने तुला फक्त भिक्षा नाही, तर एक आधार दिला आहे. आधाराचे असे अदृश्य खांब तुझ्या माझ्या आजूबाजूला आहेत म्हणूनच आभाळ अजूनपर्यंत कोसळलेले नाही. हे खांब अदृश्य आहेत, तोपर्यंत संस्कृतीचे आकाश कोसळणार नाही, याची ग्वाही तुम्हाला आणि आम्हाला देणारा असा हा ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रम आहे.
शब्दांकन – वेदिका कंटे