स्वत:वर आलेल्या संकटाने खचून जायचे की त्यावर मात करत इतरांनाही आधार देण्यासाठी हात पुढे करायचा हे ज्याच्या त्याच्या मनोबलावर ठरते. सोलापूर जिल्ह्यातील अनु मोहिते आणि प्रसाद मोहिते यांऩी दुसरा पर्याय स्वीकारला. त्यातून साकारले आहे मोहोळ तालुक्यातील ‘प्रार्थना फाउंडेशन’चे ‘बालग्राम’. अनु आणि प्रसाद हे दाम्पत्य आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आधार देण्याचा प्रयत्न करत वाटचाल करत आहेत. त्यासाठी समाजाची मदत मिळतच आहे, पण ती पुरेशी नाही. हे सेवाकार्य पुढे सुरू ठेवण्यासाठी या संस्थेला सढळ हाताने मदतीची गरज आहे.
लापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात मोरवंची येथे अनु आणि प्रसाद मोहिते या तरुण दाम्पत्याने ‘प्रार्थना फाउंडेशन’च्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील निराधार, त्यावरची बेघर मुले आणि अनाथ बालके तसेच वृद्धांना आधार दिला आहे. गेली दहा वर्षे सुरू असलेल्या या समाजसेवेची पार्श्वभूमी तशीच रोमांचकारी आणि प्रेरणादायी आहे. या सेवाव्रताला समाजाचा आधार हवा आहे.
एमएसडब्ल्यू समाजकार्याची शैक्षणिक पदवी घेतलेल्या अनु आणि प्रसाद यांची समाजकार्यात सक्रिय असताना एकमेकांशी ओळख झाली. प्रसाद विठ्ठल मोहिते हा बार्शी तालुक्यातील वैरागजवळील इर्लेवाडी या छोट्याशा गावातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलगा. तर अनंतम्मा कृष्णया तिरकमान म्हणजेच अनु ही सोलापूरच्या सोमवार पेठेतील सामान्य कुटुंबातील एका मिल कामगाराची मुलगी. सामाजिक जाणिवेतून समाजकार्याला सुरुवात केल्यानंतर त्याचसाठी सर्व आयुष्य व्यथित करायचे अशी शपथ घेऊन त्यांनी सामूहिक विवाह सोहळ्यात आंतरजातीय विवाह केला. लग्नातच अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करून त्यांनी एक सामाजिक संदेशही दिला.
हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : अनाथ, मतिमंद आणि वयोवृद्धांसाठी मायेचा आधार
आतापर्यंतच्या आयुष्यात दाहक अनुभवाने संवेदनक्षम बनलेल्या या समविचारी दाम्पत्याने अनाथ, फुटपाथवर भिक्षा मागणाऱ्या दहा मुलांना ‘वंचितांची शाळा-एक पाऊल प्रगतीकडे’ या प्रकल्पाला सुरुवात केली. या माध्यमातून वंचित आणि शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणताना अनु आणि प्रसाद दोघेही नोकरी करीत होते. परंतु नोकरीमुळे वेळेचे गणित जुळेना. मग प्रसादने ऑटोरिक्षा घेतली. ती चालवून पैसे आणि हवा तसा वेळ मिळू लागला. अनुने उदरनिर्वाहासाठी मेस सुरू करण्याचा पर्याय निवडला. याचदरम्यान, काळाने त्यांच्या बाळावर घाला घातला. या कठीण परिस्थितीतही धीर धरत तान्ह्या बाळाचे देहदान करून त्यांनी आणखी एक आदर्श घालून दिला.
आपल्या दिवंगत बाळाच्या स्मरणार्थ अनु आणि प्रसाद यांनी ‘प्रार्थना फाउंडेशन’ची स्थापना केली. या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जाऊ लागले. भिक्षामुक्ती अभियानाच्या माध्यमातून ‘मुलांना भीक देऊन दुर्बल बनवण्यापेक्षा, शिक्षण देऊन स्वावलंबी बनवा!’ असा संदेश देत समाजात जनजागृती केली जाऊ लागली. दुसरीकडे तरुणांच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी ‘कृतिशील तरुणाई शिबीर’ राबविण्यात येऊ लागले. अशा निवासी शिबिरात राज्यभरातून समाजभान जपणारी तरुणाई सहभागी होते. त्यामध्ये विविध सामाजिक समस्यांवर चर्चा होतात, सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे कार्यकर्ते मुलांना मार्गदर्शन करतात आणि त्यांना स्वत:ची ओळख निर्माण करून देतात. ही मुले त्यानंतर आपापल्या भागातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात.
हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : वेशीबाहेरील मुलांची शाळा
अशा उपक्रमासाठी तसेच रस्त्यावरील बेघर आणि अनाथ मुले-मुली तसेच वृद्ध आजी-आजोबांसाठी ‘प्रार्थना बालग्राम’ हा निवासी प्रकल्प हक्काच्या जागेत असणे अधिक श्रेयस्कर म्हणून प्रसाद मोहिते यांनी तसा संकल्प केला. या कामी त्याच्या विधवा आईने आपली पाच एकर जमीन, सोने दिले. ‘प्रार्थना बालग्राम’चे भूमिपूजन करायला पद्माश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांनी आनंदाने होकार दिला. मोहिते दाम्पत्याची धडपड, चिकाटी आणि समाजसेवेचा ध्यास पाहून निवासी प्रकल्पाच्या बांधकामाला मदत करण्यासाठी समाजातून अनेक हात पुढे आले.
करोना संकटावर मात
करोना महासाथीमुळे बालग्राम प्रकल्पातील दैनंदिन जीवनचक्र थांबले. येथील अनाथ मुलांवर, निराधार वृद्धांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली. या कठीण काळात अनाथ मुले, निराधार वृद्धांना जगवण्यासाठी काही ना काही उपाय करणे गरजेचे होते. निवासी प्रकल्प उभारण्यासाठी समाजातून आलेली मदत तसेच पुरस्कारातून मिळालेली रक्कम खर्च करून या संकटाला तोंड देण्याचा प्रयत्न केला. केवळ अनाथ मुले, निराधार वृद्धांच्या पालनपोषणाचा प्रश्न नव्हता. तर मुलांचे पालक, परिसरातील गरीब कुटुंबेही जगवायची होती. करोनाकाळात ३० हजार लोकांना अन्नदान, तीन हजार कुटुंबांना अन्नाची पाकिटे आणि शेकडो व्यक्तींना मुखपट्ट्या, सॅनिटायझर पोहोचवले गेले. हे सर्व स्वत:ची एक वर्षाची तान्हुली आणि प्रकल्पातील मुलांना सांभाळत सुरू होते. दररोज पहाटे उठून स्वयंपाकाची तयारी करणे, बाळाला घरी निजवून जेवण वाटप करण्यासाठी पायपीट करणे, अशा अथक परिश्रमातून अनु मोहिते यांनी सेवा बजावली. या भयावह महासंकटातून बाहेर पडत हळूहळू समाजजीवन सुरळीत झाल्यानंतर ‘प्रार्थना फाउंडेशन’ पुन्हा जोमाने कामाला लागले.
वृद्धांच्या नातेवाईकांचे कटू अनुभव
सध्या शेतकरी आत्महत्याग्रस्त अनाथ, वंचित, निराधार, रस्त्यावर भिक्षा मागणाऱ्या, एक पालक असलेल्या मुला-मुलींसाठी प्रार्थना ‘बालग्राम’ निवासी प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पात ४५ मुले-मुली असून त्यांचे शिक्षण व संगोपन संस्थेत होत आहे. याशिवाय अनाथ, बेघर, बेवारस वृद्धांना आधार मिळावा म्हणून मोफत स्वरूपात वृद्धाश्रम चालविले जातात. या वृद्धाश्रमात सध्या २३ वृद्धांना आधार दिला जात आहे. बहुसंख्य निराधार वृद्ध सधन कुटुंबातील कर्तबगार व्यक्ती आहेत. शेतीवाडी, व्यापार, नोकरी करून मुलांना घडविलेल्या या वृद्धांची आयुष्याच्या संध्याकाळी वाताहत होऊन त्यांना रस्त्यावर पडावे लागले. ते आता फाउंडेशनच्या वृद्धाश्रमात शांतपणे जीवन व्यतीत करीत आहेत. त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेताना विविध उपक्रम राबविले जातात. वृद्धाश्रमात कोणाचा मृत्यू झाल्यास त्याची माहिती त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना कळविली जाते. संवेदना बोथट झालेला कोणी वारसदार माहिती कळवूनसुद्धा न आल्यास मृताचा अंत्यविधी संस्था करते.
मुलांच्या भविष्यासाठी धडपड
रस्त्यावर, चौकात सिग्नलवर भिक्षा मागणाऱ्या सुमारे अडीचशे मुलांसाठी संस्था काम करीत आहे. त्यांना चांगले शिक्षण देणे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वस्त्यांमध्ये राहणाऱ्या महिला व मुलींसाठी मासिक पाळीवर समुपदेशन करण्यासह आरोग्य शिबिरेही आयोजिली जातात. येथील मुले काही अंतरावरील दुसऱ्या शाळेत जातात. त्यांच्यासाठी स्वतंत्र शाळा उभी करायची आहे. त्या दृष्टीने इमारत बांधकामासह स्वतंत्र स्वयंपाकगृह, भोजन कक्ष आदी सुविधा निर्माण करावयाच्या आहेत. त्यासाठी सढळ मदतीची अत्यावश्यकता आहे. त्याशिवाय संस्थेला स्कूल बस आणि रुग्णवाहिकेचीही गरज आहे. शाळेची इमारत, स्वतंत्र स्वयंपाकगृह, भोजन कक्ष याबरोबरच रुग्णवाहिका, स्कूल बस या सुविधांसाठी मोठा खर्च अपेक्षित आहे.
संस्थेपर्यंत कसे जाल ?
ही संस्था सोलापूर शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर मोहोळ तालुक्यातील मोरवंची गावात उभारण्यात आली आहे. सोलापूर पुणे महामार्गावर सावळेश्वर टोल नाक्याच्या पुढे गेल्यावर अर्जुनसोंड फाट्यालगत, लोकमंगल साखर कारखाना रोड, मोरवंची येथे प्रार्थना ‘बालग्राम’ संस्था आहे. भ्रमणध्वनी क्र. ९५४५९९२०२६/ ९०४९०६३८२९
प्रार्थना फाउंडेशन ( Prarthana Foundation)
ऑनलाईन देणगीसाठी तपशील
●बँकेचे नाव : कॉसमॉस बँक, शाखा सोलापूर
●खाते क्रमांक : 084100107146
●आयएफएससी कोड : COSB0000084