शिक्षण हे विद्यार्थीकेंद्री असायला हवे, पण आज ते वर्गपद्धतीत घड्याळकेंद्रीत झाले आहे, हे नाकारता येणार नाही. उत्साहाने सळसळणाऱ्या मुलांना शाळेतल्या बाकांवर बसवून त्यांना फारसे स्वारस्य नसलेल्या विषयांचा अभ्यास करायला लावणारी शाळा कितपत परिणामकारक ठरेल? ज्यांना मुलांनी केवळ अज्ञाधारक असावे, असे वाटते, त्यांच्या दृष्टीने ती शाळा चांगली, मात्र स्वतंत्रपणे विचार करणाऱ्या मुलांना असे साचेबद्ध शिक्षण फारसे रुचत नाही. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे बुद्धिबळातील जगज्जेता गुकेश डोम्माराजू. गुकेश चौथीपर्यंत शाळेत गेला आणि नंतर त्याने घरीच राहून शिक्षण घेतले. या संदर्भातील वृत्ते प्रसिद्ध झाल्यापासून होम स्कुलिंग विषयी चर्चा समाजमाध्यमांवर सुरू झाली. मात्र होम स्कुलिंग ही काही आजचीच शिक्षणपद्धती नाही. यापूर्वीही अनेक वर्षांपासून पालक आपल्या मुलांना घरीच शिकविण्यास प्राधान्य देत होते आणि आजही देत आहेत. कोरोनाकाळातील टाळेबंदीने अशा शिक्षण व्यवस्थेची गरज अधोरेखित केली. ज्यांना खेळात करिअर करायचे आहे, त्यांना वर्गात जाऊन शिकणे शक्यच नसते. त्यामुळे गुकेशसारखे अनेक खेळाडू शाळेत न जाता होम स्कुलिंगचा पर्याय स्वीकारतात आणि करिअर घडवतात.
अल्विन टफलर यांनी लिहिलेल्या ‘द थर्ड वेव्ह’ या पुस्तकात त्यांनी मानवाचा इतिहास तीन टप्प्यांत मांडला आहे. पहिली लाट म्हणजे शेतीवर आधारित समाज होय. दुसरी लाट म्हणजे औद्योगिकीकरणामुळे झालेले बदल आणि तिसरी लाट माहिती तंत्रज्ञान विकसित झाल्याने येत आहे. प्रत्येक लाट जुन्या समाजांना आणि संस्कृतींना बाजूला सारत पुढे जात आहे. अशा तीन लाटांचा परिणाम शिक्षण, माध्यमे, कुटुंबपद्धती अशा अनेक घटकांवर झाला. पहिल्या लाटेत शिक्षण घरोघरी होत होते. अनेक संत, राजे-महाराजे गुरूकुल पद्धतीत शिकले. तोही होम स्कुलिंगचाच एक प्रकार होता.
हेही वाचा >> २०२५ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कशी असेल?
दुसऱ्या लाटेचे वैशिष्ट म्हणजे मोठ्या संख्येने एकत्र येऊन उत्पादन घेणे हे त्या काळातील उद्दीष्ट होते. त्याासठी एकाच पद्धतीने विचार करणारे विद्यार्थी तयार होणे गरजेचे होते. शाळा, विद्यालये, महाविद्यालये ही असे एकसाचीपण आणण्यासाठी उत्तम व्यवस्था होती. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे तिसरी लाट पुन्हा शिक्षणाचे विकेंद्रीकरण करणारी ठरली. उत्पादन व माध्यमांचे विकेंद्रीकरण आपण अनुभवतो आहोत. पण तिसऱ्या लाटेत बुद्धिमत्ता आणि कौशल्य अधिक महत्त्वाचे ठरत आहे. आज या तंत्रज्ञानामुळे शेकडो विद्यार्थी ठरवलेला एकच अभ्यासक्रम शिकतात जे दुसऱ्या लाटेचे वैशिष्ट होते. ते तिसऱ्या लाटेत बदलेल. आज नवीन शैक्षणिक धोरणात मुलाचे कौशल्य आणि आवड यांचा विचार करून विषयांची निवड करता येणार आहे. प्रत्येक मुलाची क्षमता लक्षात घेऊन त्याचा अभ्यासक्रम ठरवता येईल. शिक्षणाची ही तिसरी लाट अजून आपल्या देशात खूप क्षीण आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर सोयी-सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. असे विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांचीही मानसिक तयारी करून घ्यावी लागेल.
आज काही कुटुंबे पैसे आणि वेळ काढून मुलांच्या शिक्षणात वैयक्तिक लक्ष घालू लागली आहेत. काही ठिकाणी शहरात तर आहेतच पण ग्रामीण भागातही असे शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू आहेत. सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, विराट कोहली किंवा गूकेश सारख्या अन्य विषयांत कुषल असलेल्या विद्यार्थ्यांना सर्वांसोबत विज्ञान, इतिहास, भूगोल हे विषय शिकवे लागले असते, तर त्यांना सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला नसता. ते रोज दहा तास किंवा जास्तच सराव करत होते. शाळेत गेले असते तर एवढा वेळ रोज सरावासाठी देणे अशक्य होते. त्यामुळे ज्या मुलांना आपले कौशल्य समजले आणि त्यांची त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी होती, त्यांनी इतिहास घडवला.
हेही वाचा >> सरकारला पॅथींचा वाद सोडवायचा आहे की नाहीच?
खरेतर मुलांमधल्या क्षमता, अंगभूत गुण व सभोवतालचे वातावरण, त्यातून उपलब्ध होणाऱ्या संधी यातून मुलांचा विकास घडत असतो आणि ती शिकत असतात. अशा अनेक मुलांसाठी नवीन शैक्षणिक धोरणात मुक्त शिक्षणाचा म्हणजे होम स्कुलींगचा विचार केला आहे. आज कित्येक मुले स्वतःचे करिअर घडवण्यासाठी तासंतास आपल्या आवडीच्या क्षेत्रात सराव, अभ्यास करतात आणि आपल्या सोयीच्या वेळांनुसार एक उत्तम व्यक्ती म्हणून विकसित होण्यासाठी आवश्यक तेवढे क्रमिक शिक्षण घरच्या घरीच पूर्ण करतात. आधुनिकिकरणामुळे शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील शिक्षकाकडून हवे ते ज्ञान इंटरनेटच्या माध्यमातून मिळविणे, स्वअध्ययन करणे शक्य झाले आहे.
असे असले तरी, होम स्कुलिंग हा सर्वांनाच स्वीकारता येईल, असा पर्याय नाही. ज्यांच्या पालकांना मुलांच्या शिक्षणात स्वत:हून लक्ष घालण्याएवढा वेळ, जे स्वत: उच्चशिक्षित आहेत किंवा ज्यांना मुलांसाठी घरीच आवश्यक विषयांची शिकवणी घेणारे शिक्षक नेमणे शक्य आहे, अशांनाच होम स्कुलिंग करता येणे शक्य आहे. भारतासारख्या देशात जिथे अनेक विद्यार्थ्यांचे पालक साक्षरही नसतात, जिथे आई-वडील दोघेही स्वेच्छेने वा नाईलाजाने नोकरीच्या चक्रात अडकलेले असतात आणि जिथे अनेकांना अनुदानित शाळेचे नाममात्र शुल्क भरण्यासाठीही काटकसर करावी लागते, तिथे होम स्कुलिंगचा पर्याय सर्रास स्वीकारता येणे शक्य नाही. त्यामुळे सध्या तरी बहुसंख्य विद्यार्थ्यांसाठी शाळा आणि क्रमिक शिक्षण हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे.
हेही वाचा >> सशस्त्र दलातील सुधारणांचे वारे कसे असणार ?
होम स्कुलिंगमधील आणखी एक आव्हान म्हणजे शाळेमुळे जी शिस्तबद्धता येते, इतर सहाध्यायींशी जुळवून घेण्याची वृत्ती विकसित होते, एकत्र मोठे होण्यातील, मैत्रीतील जो आनंद असतो, तो घरात एकट्याच शिकणाऱ्या विद्यार्थ्याला मिळू शकतो का? त्यासाठी त्याला तसे सवंगडी मिळवून देणे पालकांना शक्य असेल, तर उत्तम मात्र तशी व्यवस्था नसेल, तर काय हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. कदाचित देशाची आर्थिक, शैक्षणिक प्रगती होत जाईल, तसा हा पार्याय आधिक स्वीकारार्ह ठरू शकेल.
(लेखक करिअर समुपदेशक असून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. शैक्षणिक, सामाजिक विषयावर लेखन करतात) tatyasahebkatkar28@gmail.com