एल अँड टी ही देशातील सर्वांत बलाढ्य कंपन्यांपैकी एक. काही दिवसांपूर्वी या कंपनीच्या इंटर्नल ऑनलाइन मीटिंगचा एक भाग लीक झाला किंवा करवलाही गेला असेल. त्यामध्ये दोघेजण बोलताना दिसतात. एका अधिकाऱ्याने प्रश्न केला की, “एल अँड टी ही सर्वांत मोठ्या उद्योग समूहांपैकी एक आणि भारताच्या व्यावसायिक कामाचा चेहरा असतानाही कर्मचाऱ्यांना शनिवारी काम का करायला लावले जाते?” त्यावर उत्तर देताना चेअरमन एस एन सुब्रमण्यम म्हणाले की, “प्रामाणिकपणे सांगायचे तर मला खेद वाटतो की तुम्हाला रविवारी काम करायला का लावू शकत नाही? काय करता तुम्ही रविवारी घरी बसून? किती वेळ तुम्ही तुमच्या बायकोकडे पाहू शकता किंवा बायको नवऱ्याकडे पाहू शकते? त्यापेक्षा ऑफिसला या आणि काम करा. तुम्हाला रविवारी काम करायला लावलं तर मला आनंद होईल. कारण मी रविवारीही काम करतो. खरे तर आठवड्यातून ९० तास काम करायला हवे.”
काहीच दिवसांपूर्वी, अगदी अलीकडेपर्यंत मध्यमवर्गीयांच्या गळ्यातील ताईत, भारताच्या सक्सेस स्टोरीचे हिरो वगैरे असणाऱ्या इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्याला ७० तास काम करावे असा प्रस्ताव मांडला होता. म्हणजे सहा दिवसांचा आठवडा धरला तर रोजचे जवळपास १२ तास काम आणि पाच दिवसांचा आठवडा असेल तर रोजचे पूर्ण १४ तास काम. अशा पद्धतीने संघटित क्षेत्रात काम करायला लागले तर ही नोकरी आहे की वेठबिगारी असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडल्या वाचून राहणार नाही. सुब्रमण्यम यांनी तर त्या पुढे उडी मारली आहे. आठवड्याचे ९० तास काम करावे असा सल्ला त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे. म्हणजे रोजचे जवळपास १३ तास. त्यामध्ये अर्थातच रविवारच्या सुट्टीलाच सुट्टी दिली आहे.
हेही वाचा – मराठवाड्याच्या अस्वस्थतेची पाळंमुळं
कर्मचाऱ्यांनी आठवड्याचे ७० किंवा ९० तास काम केल्याने कंपनीला जो काही फायदा होईल त्यामध्ये कर्मचाऱ्यांना वाटा किती मिळेल याबद्दल अर्थातच मूर्ती किंवा सुब्रमण्यम या दोघांनाही काही बोलावेसे वाटलेले नाही. अर्थातच कंपनीला मिळणाऱ्या नफ्यातील काही भाग का होईना कंबरतोड काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये वाटून टाकण्याचा त्यांचा हेतू असेल याची शक्यता शून्य आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांनी स्वतःचे वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून आठवड्याच्या १६८ तासांपैकी ७० किंवा ९० तास कंपनीला अर्पण करावेत, म्हणजे रोजचे १२ ते १३ तास. उरलेल्या ११ ते १२ तासांमध्ये जे काही जगायचं असेल ते जगून घ्यावं असा यांचा खाक्या आहे.
आता हा झाला केवळ प्रसंगानिष्ठ विचार. मूर्ती आणि सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया आल्या त्यामध्ये एक महत्त्वाचा फरक होता. मूर्ती यांनी कर्मचाऱ्यांच्या पत्नीबद्दल अवमानकारक टिप्पणी केली नव्हती. त्यांच्या बोलण्यामध्ये केवळ कर्मचाऱ्यांचे शोषण आणि स्वतःचा फायदा एवढाच भाग दिसत होता. सुब्रमण्यम यांनी त्यापुढे जाऊन सरसकट स्त्रीद्वेष्टे विधान केले आहे. त्यामुळे सुब्रमण्यम यांच्यावर स्त्रीद्वेष्टेपणाचाही शिक्का बसला. पण हा केवळ स्त्रीद्वेष्टेपणा आहे का असाही प्रश्न आहे.
हेही वाचा – काम महत्त्वाचेच, पण जगणे अधिक महत्त्वाचे…
गेल्या काही वर्षांतील घडामोडी आणि सरकारी धोरणे पाहता कर्मचाऱ्यांना असणारे कायद्याचे संरक्षण पातळ होत गेले आहे. सध्याच्या नोकऱ्यांचे स्वरूप काही ठिकाणच्या विशिष्ट कामाप्रमाणे असणारे अपवाद वगळता सर्वसाधारणपणे दररोज आठ तासांचे काम असे आहे. ते वाढवून १० किंवा १२ किंवा १४ तास करण्यासाठी आवश्यक मानसिकता, वातावरणनिर्मिती तर केली जात नाही ना, त्यादृष्टीने नॅरेटिव्ह सेटिंगसाठी वरील उद्योगपती जमिनीची मशागत तर करत नाहीत ना हेही पाहायला हवे. त्यातूनच पुढे कर्मचाऱ्यांसमोर ‘नोकरीच नाही की रोज बारा तास कामाची नोकरी’ असा पर्याय ठेवणे शक्य होईल आणि कर्मचारी अर्थातच ‘बारा तास तर बारा तास पण नोकरी हवी’, असा पर्याय निवडतील. अर्थात हा टोकाचा विचार झाला, हे ओव्हरथिंकिंग आहे असेही काहींना वाटू शकते. तसेच असेल तर चांगलेच आहे, वाईट वाटून घ्यायचे कारण नाही. पण बेसावध राहूनही चालणार नाही. रात्रच काय दिवसही वैऱ्याचे आहेत, मग ते ७० तासांमध्ये मोजा की ९० तासांमध्ये!
nima.patil@expressindia.com