– अक्षय सतीश भुमकर
एल. अँड टी. या विख्यात आस्थापनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रमण्यम यांनी देशातील तरुणांना ‘रविवारी सुट्टी न घेता ९० तास काम करा’ असा सल्ला दिल्याचे वृत्त माध्यमात झळकत होते. कुणी या बातमीवर टीका केली, तर कुणी तिची टर उडवली. (दिवसभर बायकोच्या चेहऱ्याकडे काय बघत बसणार? ही सुब्रमण्यम यांची टिप्पणी तर निव्वळ पुरुषी मानसिकता दर्शवणारी होती. शिवाय एखाद्याला आवडत असेल बायकोबरोबर वेळ घालवणं तर ते कोण आक्षेप घेणार? ही बातमी पाहताच मनात विचार आला एवढ्या मोठ्या पदावर बसलेल्या आणि भरभक्कम पगार घेणाऱ्या व्यक्तीला तळागाळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात का येत नसतील ?
अमाप पैसा प्रसिद्धी ऐशो आरामाची उपलब्ध साधने आल्यानंतर ही मोठी माणसं विचार करण्याची क्षमता गमावतात का? असा प्रश्न माझ्यासारख्या व्यक्तीला सर्वसामान्य नागरिक आणि कर्मचारी म्हणून पडणे स्वाभाविक आहे.
हेही वाचा – नक्षलवाद संपवण्याचा अगम्य आशावाद…
भारतावर शेकडो वर्ष राज्य करून गेल्यानंतर ब्रिटिशांची गुलामगिरीची पद्धत आज देखील भारतात कॉर्पोरेटच्या नावाखाली चालू असल्याचे अनेक उदाहरणे सातत्याने समोर येत राहतात त्यापैकीच मध्यंतरी पुण्यात एका तरुणीचे कामाचा ताण न सहन झाल्याने मृत्यू झाल्याचे ऐकिवात आले होते. त्यावर जास्त चर्चा झाली नाही. या प्रकरणी कोणत्याही मोठ्या आस्थापनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विराजमान असलेल्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याकडून चकार शब्द देखील काढण्यात आलेला नाही.
माणसाला जगत असताना जेवढे काम महत्त्वाचे आहे, तेवढेच कुटुंब आणि सामाजिक जीवन देखील महत्त्वाचे आहे आणि याचे भान या मोठ्या अधिकाऱ्यांना राहिल्याचे दिसून येत नाही. प्रत्येक मिनीट, प्रत्येक तास फक्त काम आणि काम हीच गोष्ट त्यांच्या डोक्यात सुरू असते. आपले कर्मचारी कोणत्या तणावातून जात आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे कधीही जाणून घेण्याचा प्रयत्न हे अधिकारी करताना दिसून येत नाहीत. प्रत्येक वेळी कर्मचाऱ्यांवर कोणत्या ना कोणत्या कारणाने दबाव आणून काम करून घेण्यातच हे धन्यता मानत असतात. यापैकी एखाद्या कर्मचाऱ्याला दबाव सहन झाला नाही, तर त्याच्यावर शिस्तभंग कारवाई करून घरचा रस्ता दाखवण्यासही हे मागेपुढे पाहत नाहीत.
आपल्याकडे जेवढी शारीरिक आजाराबद्दल केली जाते तेवढी मानसिक आजाराबद्दल चर्चा केली जात नाही. परंतु आजकालच्या या युगात मानसिक आरोग्य देखील महत्त्वाचे आहे आणि ते नीट ठेवायचे असेल तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण जिथे काम करतो तिथले वातावरण हे संतुलित हवे. काम करण्याच्या ठिकाणातील संतुलित वातावरण हे त्या कर्मचाऱ्यांच्या आयुष्यावर परिणाम करत असते आणि हेच वातावरण असंतुलित असेल तर कुटुंबकलह, वाद विवाद असे प्रकार मानसिक आरोग्य बिघडल्यानंतर पाहायला मिळतात. बहुतांश प्रकरणात मानसिक आरोग्य बिघडण्यास दिवसभर काम करताना येणारे दडपण व दबाव हेच कारणीभूत असतात ज्याची चर्चा देखील समाज माध्यमात या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणे अपेक्षित आहे.
मध्यंतरी इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी देखील कामाचे तास वाढवण्याबाबत सूतोवाच केले होते. परंतु त्याबरोबरच त्यांनी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा, पगार वाढ, आरोग्यविषयक विमा या सर्व गोष्टींची देखील चर्चा करणे व यामध्ये काय सुधारणा करता येऊ शकतील याबाबत बोलणे गरजेचे होते. परंतु या महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा झालीच नाही.
हेही वाचा – बीडचे धडे!
ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा या विकसित देशांमध्ये कर्मचाऱ्यांकडून आठवड्यामध्ये ३५ तास काम करून घेतले जाते आणि भारतात कर्मचाऱ्यांकडून आठवड्यातून सरासरी ४६ तास काम करून घेतले जाते. कमी वेळात उत्पादनक्षम काम कसे करावे याचा आदर्श या देशांकडून घेणे अपेक्षित असताना फक्त आणि फक्त तास वाढवून कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम कसा होईल याचाच विचार हे वाचाळवीर उच्चपद अधिकारी करताना दिसून येतात. ज्या देशात नागरिक आनंदी असतात, त्या देशात सर्व सुखसुविधा नांदतात. याचं उत्तम उदाहरण पाहायचं असेल तर काही दिवसांपूर्वी २०२४ चा आनंदी निर्देशांक अहवाल प्रसिद्ध झाला होता त्यामध्ये भारताचा क्रमांक हा १४३ वा होता इस्राइलसारख्या देशात वारंवार युद्धजन्य परिस्थिती असतानाही इस्राइलचा क्रमांक हा चार होता. युद्धजन्य परिस्थितीत देखील तेथील लोक आनंदी राहू शकतात तर आपण भारतात का आनंदी राहू शकत नाही याचा विचार करणे गरजेचे आहे.
फक्त कामाचे तास वाढवून उत्पादन क्षमता वाढत नाही त्यासाठी कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य, कौटुंबिक स्वास्थ्य देखील महत्त्वाचे आहे आणि त्याचा विचार करून उच्चपद अधिकाऱ्यांनी वक्तव्यं करायला हवीत.
asbhumkar1112@gmail.com