हर्षवर्धन जतकर

मदनदास देवींनी कोणताही दंभ वा बडेजाव न करता नुकतंच बाळसं धरू लागलेल्या विद्यार्थी परिषदेशी तरुणांना जोडण्याची जबाबदारी पार पाडली..
२५ जुलै, २०२३, दुपारचे तीन वाजून गेलेले. बेंगळूरुच्या संघ कार्यालयात एका काचेच्या बंद पेटीत विद्यार्थी परिषदेचे माजी अ. भा. संघटनमंत्री व रा. स्व. संघाचे माजी सरसहकार्यवाह मदनदास देवी डोळे मिटून चिरनिद्रा घेत शांतपणे विसावले होते. त्यांचा तो विझलेला चेहरा पाहून ‘तुझं हे कसं काय झालं रे मित्रा?’ असं मनात आलं. मदनजी मला आठवतात, ते परिषदेच्या डिसेंबर १९६४ मधल्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या औरंगाबादमध्ये झालेल्या अभ्यास वर्गापासूनचे.

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
Boys dance on nach re mora ambyahya vanat song at school get together function funny video goes viral
“नाच रे मोरा आंब्याच्या वनात” गेट दुगेदरला शाळेतल्या जुन्या मित्रांनी केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
anoushka kale cambridge
ऐतिहासिक केंब्रिज युनियनच्या अध्यक्षपदी भारतीय विद्यार्थिनीची निवड; कोण आहेत अनुष्का काळे?
daughter in law hugs mother-in-law tightly
अगंबाई…! सुनबाईंची सासूबाईंना कडकडून मिठी; VIDEO ची एकच चर्चा
Ministry of Statistics report reveals 25 6 percent youth deprived of education employment and skills
आजचे तरुण ‘बिन’कामाचे आणि ‘ढ’?
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…

आणखी एक मिश्कील व हसतमुख सवंगडी अशी त्यांची मनात नोंद झाली इतकंच. तेव्हा ते साहजिकच होतं. त्या रात्री एका टुकार थिएटरात परिषदेतले आमचे गुरुजी प्रा. यशवंतराव केळकर, प्रदेश अध्यक्ष द. मा. मिरासदार आणि आम्ही काही तेव्हाचे टोळभैरव शम्मी कपूर-साधनाचा ‘राजकुमार’ चित्रपट पाहायला गेलो होतो. आजूबाजूच्यांच्या फिरक्या घे, फालतू विनोद मार, पडद्यावर फिल्म दाखवणाऱ्या प्रकाशझोतात हात घालून सावल्यांचा खेळ कर अशा आमच्या खोडय़ांत मदनजीही सहभागी होते! लहान गावातले गरीब प्रेक्षक बिचारे आम्हा मुंबईकर मवाल्यांचे हे व्रात्य चाळे मुकाट सहन करत होते. अखेर कंटाळून ‘आम्हाला गावात राहायचंय!’ म्हणत दादा यशवंतरावांना घेऊन दुसरीकडे जाऊन बसले! अर्थात मुंबईला पोहोचताच आम्ही सुतासारखे सरळ झालो आणि नंतर आयुष्यभर सक्रिय सामाजिक कार्यकर्ते झालो, ही गोष्ट वेगळी! तेव्हा सर्वसामान्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसारख्या वाटणाऱ्या व वागणाऱ्या मदनजींची प्रतिमा काही वर्षांतच पाहता पाहता बदलत गेली, तेव्हा कुठे हळूहळू त्यांच्याकडे माझं लक्ष गेलं! आणि मग खिळूनच राहिलं! खरं तर मदन हे नाव शोभून दिसावं, असं देखणं व्यक्तिमत्त्व, चांगल्या खात्यापित्या घरचे वाटावेत अशी शरीरयष्टी, हुशार, बुद्धिमान. एम. कॉम, एलएल. बी. (सुवर्णपदक) आधीच करून सीएसाठी मुंबईत आलेले स्वयंसेवक. वर संघाची भावपूर्ण गीतंही सुरेल व निरामय आवाजात गाणारे. पण यातल्या कशाचाही दंभ नाही, फुकाचा आव नाही की बडेजाव नाही! ऐन गद्धेपंचविशीतला, माझ्यापेक्षा फार तर वर्षभराने मोठा असा हा सळसळत्या रक्ताचा तरुण कार्यकर्ता इतका सालस, निगर्वी, सदैव शांत, सर्वाशी सदैव मिळूनमिसळून राहतो आणि तरीही कोणात गुंतत नाही, कोणाला आपल्यात गुंतू देत नाही, याचं मला अतिशय आश्चर्य वाटत असे!

परिषदेच्या पायाभरणीचं काम लहानसहान, सोपे, शाळकरी पातळीवरचे कार्यक्रम करून नव्या महाविद्यालयात शिरकाव मिळवण्यात व कार्यकर्त्यांची त्यातून जडणघडण होऊ देण्यात संघटन श्रेणीतील अष्टप्रधान मंडळींत अग्रेसर होते मदनजी! चौकटीबाहेरील समाजात विशिष्ट दूरदृष्टीने वावरणाऱ्या परिषदेच्या ‘जागरण श्रेणी’तील धडाडीच्या कार्यकर्त्यांना, विद्यार्थ्यांना चटकन आकर्षून घेणारे राष्ट्रीय पातळीवरील काळजीच्या विषयांवर आधारलेले प्रायोजित प्रकल्प, कार्यक्रम, उपक्रम व त्याबरोबर उदंड प्रसिद्धी, प्रचार, प्रकाशन, पैशाचा व विद्यार्थ्यांचा ओघ परिषदेला मिळवून दिला. नवनव्या प्रयोगांत वेगवेगळय़ा पार्श्वभूमीची व मनोरचनेची शेकडो मुलं सहभागी झाली. त्यातील अनेकांना परिषदेची विचारधारा, भाषा, कार्यपद्धती वा एकूणच सामाजिक कार्याचा गंधही नव्हता. आणि विद्यार्थी परिषद हा काही बेकार उंडग्यांचा अड्डा नव्हता. की ती विरक्त संन्याशांची मठीही नव्हती!
महाविद्यालयांत सहशिक्षण घेणाऱ्यांसाठी निघालेली ही संघटना. पण स्थापन झाल्यावर दहा- बारा वर्षे परिषदेत फक्त मुलेच होती. काहींनी आधी आपल्या स्वत:च्या बहिणींना परिषदेत आणलं. इतरांनी चाळींत, सदनिकांत वा वसाहतींत राहणाऱ्या व लहानपणापासून बरोबर वाढलेल्या ओळखीच्या मुलींना आणलं. मग काय, एकाहून एक सुशील, गुणवंत अन् कर्तबगार मुलींची परिषदेत रीघच लागली! मुलींशी मदनजींचं वागणं बोलणं हे बहीण- भावांसारखे सहजसुंदर, सोज्वळ, समंजस व संतुलित होतं. नुकतंच बाळसं धरू लागलेल्या परिषदेत आपल्या मुलींना पालकांनी निश्चिंतपणे पाठविण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांसाठी तो एक आदर्श होता! या सर्व जणांना जोडून घेऊन, योग्य पद्धतीने, दिशेने कामात रमवणं हे महाकठीण काम होतं. गैरसमज होत. मनं मोडत. नको तशी जुळत. हवं-नको, कमी-जास्त होई. अशा वेळी एकेकाशी स्वतंत्रपणे बोलणं, सौम्य शब्दांत चुका ध्यानी आणून देणं, आपल्या चुका सरळ मान्य करणं, हळुवारपणे समजूत घालणं अन् पुन्हा त्यांचं लक्ष आपल्या लक्ष्याकडे वळवणं ही जबाबदारी यशवंतरावांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडणाऱ्यांत मदनजी सदैव आघाडीवर होते.

कार्यकर्ता-कार्यकर्ती संबंध हा परिषदेत तेव्हा सखोल चिंतनाचा वा मुक्त चर्चेचा नाही तर घोर चिंतेचा विषय होता! ब्रह्मचर्याश्रमातील तरुण मुलं-मुली पूर्वी गुरुकुलात भावंडांप्रमाणे राहात. आत्ताच्या कार्यकर्त्यांनीही तसंच राहावं अशी अपेक्षा कालबाह्य वाटली तरी पूर्णत: अनाठायी नव्हती. याबाबतीत किमान पथ्यं आपण होऊन जिथे पाळली गेली नाहीत त्या संस्था या ‘वधू-वर सूचक मंडळ’ होऊन लयाला गेल्याचं ठाऊक होतं. म्हणूनच संघटनेत कौटुंबिक जिव्हाळा तर जपून ठेवायचाच पण कुटुंबाची व्याप्ती आधी विद्यार्थी, मग समाज आणि शेवटी समस्त राष्ट्र अशी वाढवत न्यायची. अंतिम उद्दिष्टावर ध्यान केंद्रित करून रचनात्मक कामासाठी आपली सर्व ऊर्जा व ऊर्मी खर्च करायची हे परिषदेचं ध्येय होतं. सगळय़ांनी हे समाधानाने व समजूतदारपणे केलं तर एकमेकांत कुणी गुंतून अडकणार नाही आणि कुणी कुणाला छेद देऊन पुढे जाणार नाही यावर गाढ विश्वास असलेल्या मदनजींनी वेळोवेळी हा गुंता सोडविण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे व मनापासून प्रयत्न केला! आपला-परका, आत-बाहेर असे छक्के पंजे करणारे गटबाज राजकारणी ठायी ठायी दिसतात. आपली तळी उचलणाऱ्यांची फळी उभी करून खरं-खोटं बेमालूम वापरून मतभेद पेरणाऱ्या टोळय़ा जागोजागी असल्याने अनेक संघटना मोडल्या. अशा क्षुद्र, स्वार्थी अन् कोत्या वृत्तीचा मागमूसही त्यांच्यात नव्हता. यशवंतरावांच्या तालमीत घडलेल्या अशा अनेक शिष्योत्तमांपैकी मदनजी एक होते.

गेली बरीच वर्षे ते आजारी होते. स्वत:च्या मनावर विलक्षण ताबा असलेल्या मदनजींना आपल्या शरीरात उत्पन्न झालेल्या विविध व्याधींवर मात्र मात करता आली नाही. ते बंगळूरुला आले की त्यांची कायम सोबत करणारे परिषदेतले आमचे सहकारी मित्र मला फोन करून कार्यालयात वा रुग्णालयात विशेष खोलीत बोलावून घेत. मग तास-दोन तास आमच्या गप्पागोष्टी चालत. गाणी गायली जात. आठवणींना उजाळा मिळे. जुन्यापान्या चुकांची मनमोकळी कबुली देत क्षमा मागण्याचा मोठेपणा परिषदेतील जिव्हाळय़ाने आम्हाला शिकवला असल्याने ही देवघेवही सहजपणे चालू असायची.
अशीच एकावरील प्रदीर्घ अन्यायाची दुरुस्ती मदनजींनी माझ्या आग्रहाने शब्द टाकून केली व ती होताच मुंबईहून फोन करून, ‘हर्षां, तुझं काम केलंय रे!’ असं तत्परतेने मला त्यांनी सांगितलंही. सीए झालेले मदनजी अशी दुरावलेली व दुखावलेली मने पुन्हा जोडून घेण्याचे हिशेब चुकते करण्यातही तत्पर होते. प्रवासाला जाताना सामान कमी न्यावं तसं त्यांनी कुणाचीही काही बाकी ठेवली नाही! निसर्गोपचार करून झाले, काही शस्त्रक्रिया झाल्या, औषधोपचार सुरूच होते, पण म्हणावा तसा गुण आलाच नाही. पण जिद्द न सोडता ते प्रवास करत राहिले. अडखळत का होईना पण बोलत राहिले व स्वयंसेवक त्यांचं ऐकत राहिले. पण मग हळूहळू त्यांची वाचाही बंद होत गेली! पाच-सहा महिन्यांपूर्वी इथल्या एका रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये त्यांना बघायला गेलो होतो. एके काळचा तेजस्वी पण आता पार वाळून खंगलेला चेहरा, वाढलेली दाढी व भिरभिरणारी नजर अशा अवस्थेत त्यांना पाहून भडभडून आलं. हळू आवाजात त्यांनी, ‘तुझं वय काय?’ विचारलं. मी ते सांगताच क्षणभर मंदपणे हसून ‘काळजी घे!’ असं पुटपुटले. दुसऱ्याच क्षणी त्यांची नजर वळली व दूरवर काही तरी न्याहाळत राहिली! जणू ते सांगत होते, ‘माझं मात्र काही खरं नाही! आता लागले नेत्र रे, पैलतीरी!’

(लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व सक्रिय कार्यकर्ते आहेत.)

Story img Loader