ॲड. राजा देसाई
१. आम्हां सामान्य धार्मिकांना कुंभमेळा ही गोष्ट नवीन कधीच नव्हती पण या वेळी मात्र इतर अनेकांना ती तशी वाटली ; कारण त्यात दोन कुंभ होते : एक प्रामाणिक श्रद्धेचा व दुसरा हिंदूधर्माच्या ( प्रामाणिकच पण ) महा-अस्मितेचा! खरा तसंच भासित इतिहास अस्मितेद्वारे समूहाच्या वर्तमान मानसावरही प्रचंड प्रभाव टाकीत असतो हे तप्त वास्तव. व्यक्तींत जळीस्थळी दिसणारा अहंकार तेच तत्व समूहातील अस्मिता ! आजच्या प्रगत युरोप/अमेरिकेचंही चित्र पहा. पण वहात न जाण्यात माणसाचं मूल्य दडलेलं आहे. अस्मिता आली की द्वेष आलाच; त्यात स्वधर्मविनाशाचंच रुप दडलेलं असतंच. ते कसं? कारण ‘द्वेष हा, तो करणाऱ्याचंच अधःपतन करतो’ (स्वामी विवेकानंद )! एवढं तरी आपण धार्मिकांनी, पेललं नाही तरीही, निदान विसरता नये.

२. भारतात हिंदू धर्माच्या स्वरुपामुळं व येथील शेकडो वर्षांच्या परकीय व परधर्मीय शासनकाळामुळं त्या प्रतिक्रियेनं इथं हिंदू धार्मिक अस्मितेचं तीव्र रूप घेतलं आहे. सत्त्ताधारीच त्याचं नेतृत्व करीत असल्यामुळं बहुसांस्कृतिक भारतात त्याचे राष्ट्रीय ऐक्यावरही गंभीर परिणाम होत आहेत. त्याशिवाय त्यातून धर्म म्हणून तरी हाती काय लागेल? अखेर राष्ट्र अशांत/अस्वस्थ राहील व धर्म वृध्दिंगत होईल हे कसं घडेल? खुद्द इस्लामचा सत्ताकारणाचा अनुभव आजही काय दाखवित आहे? कुंभमेळा संपून पुरेसा काळ लोटला आहे. पूर्वग्रहरहित व विना-दुर्भाव मनानं मुठभरांकडून तरी थोडासा तटस्थ विचार होण्याची अंधुक शक्यता!

३. ‘प्राणप्रतिष्ठे’प्रमाणेच या वेळचा ‘कुंभमेळा’ही जवळपास पूर्णतः सरकारीच बनवला गेल्यामुळं त्या अखेरीस पंतप्रधानांचं त्याविषयीचं दीर्घ निवेदन प्रसिध्द होणं हे ओघानंच आलं; त्याच आधारे इथं आपण सुरुवात करणंही योग्य ठरावं. एकंदरीतच फार मोठं नवं ‘धर्म-परिवर्तन’च घडत असल्याचा एक स्पष्ट भाव त्यातून ओसंडून जात आहे ( तसं असेलही! असूं दे! ) : ‘जेव्हा देशाची जाणीव जागृत होते, जेव्हा ती पराधीनतेच्या शतकानुशतकांच्या जुन्या मानसिकतेच्या जोखडातून मोकळी होते, तेव्हा ती नव्या ऊर्जेने भरलेल्या ताज्या हवेत मोकळा श्वास घेते…याचाच परिणाम प्रयागराज येथील एकतेच्या महाकुंभमध्ये पाहायला मिळाला!’

ओsह! म्हणजे स्वातंत्र्य मिळून लौकरच ८० वर्षं होतील तरीही ‘शतकानुशतकांचं पराधीन मानसिकतेचं जोखड’ आपण या ‘कुंभा’पर्यंत वहातच होतो आणि याचा आपल्याला पत्ताही नव्हता! ( ‘अमृतकाल’ वगैरे उपचार ?) आत्ताआत्ताच ‘जागृत’ केली गेलेली भारताची राष्ट्र-ऊर्जा, निद्रिस्त असतांना शेकडो वर्षांतील असंख्य कुंभांत त्याचा परिणाम कसा दिसणार व राष्ट्र ‘ताजा मोकळा श्वास’ तरी कसा घेणार? शिवाजी महाराज, राणा प्रताप, गुरु गोविंदसिंग/तेघ बहाद्दूर इत्यादींच्या जीवनसमर्पणातही ही नव्या ‘कुंभ-ऊर्जे’चं दर्शन कसं घडणार? आणि हा नवा बुध्दी दिपवणारा प्रकाश आपल्याला आता तरी का बरं लाभतोय? कारण देशातील लाखो तरुण ज्यावेळी आपली जीवनं ‘इन्किलाब झिंदाबाद’मध्ये उधळून ‘वाया’ घालवीत होते, भगतसिंग-सुखदेव फासावर चढत होते, लो. टिळक मंडाले-शिक्षेच्या वेळी ईश्वरी न्यायाकडे बोट दाखवीत होते, बॅरिस्टरीनं पुढे वाढून ठेवलेलं उत्तम जीवनाचं ताट झिडकारून सावरकर अंदमानात यातना भोगत होते, डाॅ. आंबेडकर ‘मी हिंदू म्हणून मरणार नाही’ अशा शब्दांनी दलितांचा आक्रोश मांडीत होते, भारताच्या शेकडो वर्षांच्या राजकीय/सामाजिक नष्टचर्याचं अपार दुःख गिळून स्वामी विवेकानंद उलट जगासमोर मानवी ऐक्यासाठी वेदांतांतील विश्वधर्माची पायाभूत दृष्टी मांडताना ऐकून जग स्तंभित होत होतं नेमक्या त्याच वेळी ते स्वातंत्र्य आंदोलन, अस्पृश्यतानिवारण वा अगदी स्वामीजींचा विश्वधर्माचा वेदान्त विचार या साऱ्या ( ‘निरर्थक’ !) गोष्टींपासून दूर राहून इथे एक वर्ग आत्ताच्या ‘कुंभा’त पंतप्रधानांना दिसलेल्या ‘ऊर्जेच्या साधने’त व्यग्र होता! या कुंभात त्यांना दिसलेली राष्ट्रैक्याची वगैरे फळं ही अर्थातच त्या गेल्या केवळ ‘शंभर वर्षां’च्या कठोर साधनाप्राप्त ऊर्जेची आहेत !

४. ते काही असो; पण कुंभात सांपडलेल्या इतक्या महत्त्वपूर्ण नव्या कोऱ्या करकरीत ‘ऊर्जा’शोधाचं ‘मोकळ्या श्वासा’नं कौतुक करावं असं तीव्रपणं वाटत असतानाच काही प्रश्न मनात उठतात; शेकडो वर्षांतील असंख्य ‘कुंभां’तून ही नवी ताजी ऊर्जा, ही आज ‘प्रथमच निर्माण झालेली’ भारताची ‘एकता’ ( तीही ‘१४० कोटीं’ची : म्हणजे कोणा धर्माचाही भेदभाव नाही ! ग्रेट! ), हा आजचा ताजातवाना ‘मोकळा श्वास’ वगैरे वगैरे वगैरे हे सारं, काही काही म्हणून नव्हतं, हे इतके दिवस मुळात आमच्या लक्षातच कसं नाही आलं? की पुढील काही प्रश्नांनी भारताच्या एकतेचं चित्र आमच्या मनांत केव्हाचंच रंगवून ठेवून आम्हाला भ्रमात ठेवलं? उदा. एकतेची भावना नसेल तर नजीकच्या इतिहासात भारतातील एक राजवट ( उदा. मौर्य, गुप्त, चोला इत्यादी ) दुसऱ्याचा प्रदेश काबीज जरुर करीत होत्या पण तेव्हा जितांत ‘आपण परकीय राजवटीखाली आहोत’ अशी कटू भावना होती का ? त्याचे तसे पडसाद नंतरच्या काळात उठलेले दिसतात का ? शिवाजी महाराज आपल्या स्वराज्याला हिंदवी म्हणतात, मराठी वगैरे नाही, हे का? अब्दालीला रोखायला हजारो मैल उत्तरेत जाताना ‘आपण भारताच्या रक्षणाला जात आहोत’ हीच भावना मराठ्यांची नव्हती का? १८५७ च्या लढाईत साऱ्या देशात ‘ही आपली लढाई ‘ आहे हीच भावना नव्हती का? टिळक-जीना करार लखनौला कसा होतो? कोणालाच कोणी ‘परकी’ का वाटत नाही ? तत्पूर्वी १८८५ ला काँग्रेस ही संपूर्ण भारताची संघटना म्हणूनच स्थापन झाली नव्हती का? लक्षात घेऊया : केवळ २० च वर्षांपूर्वी, राष्ट्र तुटण्याइतकं गंभीर यादवी युध्द एकधर्मीय ख्रिश्चन अमेरिकेत चार वर्षं चाललं होतं. इथं मात्र पाण्यानं ऊंचावरून सखल भागाकडे यावं इतक्या सहजतेनं १९४७ ला भारत राजकीय दृष्ट्या स्वेच्छेनं एक झाला (आणि फाळणी सोडल्यास चर्चिलचं भविष्य पुढेही खोटं ठरलं ) : सरदार पटेलांचं कर्तुत्व मान्यच पण एवढ्या खंडप्राय प्रदेशाचं राष्ट्र म्हणून एकत्व कोणी अगदी महात्माही पाचपन्नास वर्षांत घडवू शकत नसतो; हे श्रेय आहे हजारो वर्षांतील गीता-उपनिषद् कार, बुध्द/महावीर यांसारख्या अनेक महात्म्यांनी आम्हाला दिलेल्या जीवनदृष्टीला! (गांधी त्याचंच एक उत्कृष्ट फळ! ) येथील हिंदू-बौध्द-जैन वा अनेक पंथोपंथांतील वाद-संघर्ष यांची सेमिटिक धर्मांतील इतिहासाशी वैज्ञानिक तटस्थतेनं तुलना करून पहा. प्रथम, एका सलग भूमींत रहाणाऱ्या माणसामाणसांत ‘आपण एक आहोत’ ही भावना दृढ व्हावी लागते आणि मग त्यातून राष्ट्र बनतं! बाहुबल लोकांना एका भूमीत रहायला भाग पाडू शकतं; ऐक्य निर्माण करू शकत नाही! बराचसा मध्य आशिया व अरब भूमी अनेक वर्षं ऑटोमन साम्राज्यात होती, संपूर्ण एकधर्मीय : पण आज किती बरं राष्ट्रं आहेत त्यांची ? १८९४ ला ‘शिकागो’त जगानं स्वामी विवेकानंदांकडे हिंदू-भारताचे प्रतिनिधी म्हणून पाहिलं की हिंदू बंगालचे? त्यानंतर संपूर्ण भारतभर त्यांचं स्वागत झालं ते केवळ हिंदू म्हणून की भारतीय म्हणूनही? उदाहरणं द्यावीत तेवढी थोडी !

५. शेकडो वर्षांच्या इतिहास-काळात अनेक परदेशी प्रवासी/राजकीय प्रतिनिधी भारतात आले. उदा. मेगास्थेनिस ( ग्रीस, इ.पू. ३०० ), फा हेन ( चीन, पाचवं शतक ), ह्यू एन संग ( चीन, सातवं शतक), इब्न बतुता ( मोरोक्को, ११ वं शतक), अल्बेरुनी ( म.आशिया, ११ वं शतक) मॅक्रोपोलो ( इटली, १४ वं शतक ) इत्यादी. अशांनी भारताविषयी केलेल्या निरीक्षणांचे इतिहासकारांनी उल्लेख केलेले आहेत. अत्यंत सामान्य वाचक म्हणून अशा काहींवर पडलेली जुजबी नजरही असा फील देते की हे सारे पाहुणे या संपूर्ण भूमीकडे एकच समूह म्हणून रहाणारांचा भूप्रदेश ( तेव्हा आधुनिक राष्ट्रं ही गोष्ट अस्तित्वातच नव्हती ) म्हणून पहात आहेत. हे बरोबर असेल तर हे का घडलं? याचा अर्थ काय?

पंतप्रधानांनी त्यात पुढे ‘स्वामी विवेकानंदांपासून ते अरविंदांपर्यंत प्रत्येक थोर विचारवंताने आपल्याला सामूहिक संकल्पांच्या शक्तीची जाणीव करून दिली ‘ असंही म्हटलं आहे ( गाधींचंही नाव जोडलं आहेच : असावं आपलं ! ): शब्द-फुलोरा सुंदर; ( देशातील आजचा राजकीय व्यवहारही सोडा ) पण याचा नेमका अर्थ तरी काय? भारताचे परम ‘मिठी’मित्र ट्रम्पसाहेब यांचं फार छान असतं, सगळं काही खुल्लम खुल्ला ! २५ लाखांना हुसकावून गाझाचा रिसाॅर्ट बनवण्याची योजना जाहीर करणं असो की ‘बलशाली राष्ट्रवादी’ भारताकडे हातकड्या घालून नागरिक परत पाठवणं असो : उगाचच कोणतेही मुलायम बुरखे नाहीत!

तेही जाऊं द्या, पण एवढ्यावरच निवेदन संपतं तर ते आश्चर्यच ठरलं असतं! आज त्यांना दिसलेल्या त्या ऊर्जा स्त्रोताचं अंतिम रहस्य त्यांच्या या वाक्यात आहे : ‘स्वातंत्र्योत्तर काळात जर या सामूहिक शक्तीची ताकद ओळखली गेली असती, आणि त्याचा उपयोग सर्वांच्या कल्याणासाठी झाला असता, तर नुकतेच स्वातंत्र्य प्राप्त केलेल्या आपल्या देशासाठी ती एक मोठी ताकद ठरली असती. दुर्दैवाने, हे यापूर्वी केले गेले नाही’. आणि पुढे ‘ विकसित भारतासाठी लोकांची ही सामूहिक शक्ती ज्या प्रकारे एकत्र येत आहे, ते पाहून मला आनंद वाटत आहे.’ (थोडक्यात जी एकता आज दिसतेय, जो काही भारत आज आहे ते सारं फक्त २०१४ पासूनच! अगदी ‘पिचाई/नदेला’ सुध्दा त्यामुळंच !) ठीक आहे.

६. पण मग मुळात राज्यघटनेनं पायाभरणी झाली, त्यांत बरंच काही सांगून जाणारं प्रिॲम्बल/वी द पीपल’ वगैरे आलं, पंचवार्षिक योजना, ज्या पायावर आज भारत जगात उड्या घेत आहे त्या अनेक आधुनिक वैज्ञानिक/तंत्रज्ञान शिक्षण/संशोधनाच्या संस्था, दलित/मागासांना सर्वत्र आरक्षण व त्या आधारे त्यांचा झालेला विकास, देशाचा आधुनिक औद्योगिक पाया ( तेव्हा ‘संगणक चिप्स नकोत, पोटॅटो हवेत ‘कोण बरं म्हणत होतं?) अशा असंख्य गोष्टींतून ‘सामूहिक संकल्प शक्ती’ नव्हती? जेवढा भौतिक विकास अधिक होईल तेवढी एकतेला मदत जरुर होते व पंतप्रधान काळानुरुप मार्गानं ते जोमानं जरुर करीत आहेत, काळ/परिस्थिती आज अधिक अनुकुलही आहे. कुंभातही ‘विकास-संदेश’ दर्शन!काही शक्य आहे! पण विकास म्हणजे राष्ट्राची एकता का? भारत अत्यंत दरिद्री होता तेव्हाही तो एक होता. साम्राज्यवादातून समृध्द झाल्यावरही युध्दे करून थकल्यावर युरोप शांतीसाठी ‘ईयू’द्वारे केवळ व्यापारी ऐक्याचा प्रयत्न करू लागला. भारतही लक्ष्मीचा दुस्वास करीत नाही ( तीही एक देवताच ) पण ती त्याचा प्राण नव्हे. भयंकर वेगानं सततच बदलणाऱ्या काळाचा अर्थ काय, त्याला सामोरं कसं व का जावं, व्यक्ती/समूहानं समाधानी सौहार्दपूर्ण जीवन कसं जगावं, जीवनांत भौतिकाचं स्थान काय इत्यादींविषयी अखंड ऊर्जा देणारी मौलिक जीवनदृष्टी आम्हाला भारताच्या पूर्वजांनी दिली : निदान त्या अमृताचा उपयोग तरी ‘व्होट’कारणी चिखल मळण्यासाठी पाणी म्हणून केला जाणार नाही एवढे तरी उपकार त्या पूर्वजांवर आपण साऱ्यांनीच करावेत ! एरवी ‘आपल्या राज्यातला पूल पडला तर ‘ ॲक्ट ऑफ गाॅड’ व विरोधी राज्यातला पडला तर ताबडतोब तो ‘ॲक्ट ऑफ फ्राॅड ‘ इत्यादीं ‘सनातन धर्मा’ला वृध्दिंगत करणाऱ्या उच्च मौलिक विचारांसाठी, ‘कुंभा’ला न राबवता, असंख्य व्यासपीठं उपलब्ध आहेतच नाही का?

७. एकंदरीतच ‘पंचतारांकित रिसाॅर्टी’ सत्ताकारण-व्यापारात सामाजिक नैतिकतेची व्याख्या रोज रोज कशी नवी होत आहे हा विषय वेगळा. पण धर्म सत्ताकारणाच्या ‘व्होट-शाही’त अधिकाधिक अडकत गेला की पुढे जे होतं त्याचे परिणाम राष्ट्रैक्यावर व प्रत्यक्ष धर्म-सत्वावरही होतात याच्याशी आमचं देणंघेणं. मोहम्मद अखलखची फ्रीज तपासणी/मृत्यू इथपासून ते आता गावातील जत्रेत मुसलमान व्यापाऱ्यांना बंदी घालणारा ठराव अशा अनेक घटना : हे नवं ‘धर्म-परिवर्तन’ हां हां म्हणता आता कुठं पोहोचलंय? प्रभू रामचंद्रांऐवजी आता औरंगजेबाचंच नाव रोज कानांवर पडणं ही तर आता किरकोळ गोष्ट ; आता त्याची कबर उखडून टाकण्याच्या मागणीला उच्चपदस्थ सत्ताधाऱ्यांचा ताबडतोब आशिर्वाद! उत्तमच !नव्या युगाचा घोष : ‘व्होटशक्ती हाच धर्म, हेच ज्ञान’! एक विचार मनात येतो : भारताच्या इतिहासात हिंदू-धर्माचं प्रत्यक्ष तलवार-रक्षण (अत्यंत द्वेषहीन भावानं : ‘युध्यस्व विगतः ज्वर ‘! भगवद्गीतेशी ईमान राखून ) करण्याचं अतुलनीय कार्य करणाऱ्यां शिवरायांनी खुद्द अफझलखानाची कबर बांधण्याची स्वतःच आज्ञा दिली. तीही तिच्या देखभालीच्या व्यवस्थेसाठी आर्थिक व्यवस्था करून! बरं विवेकानंदांनी सुध्दा अशा धर्म-रक्षण मार्गाचं निदान सूतोवाच तरी का करू नये? काय उपयोग त्या खंडीभर वेदान्त-ज्ञानाचा? तेही जाऊं द्या. सुमारे १७२०ते १८००या काळात अटकेपर्यंत मराठ्यांचं मनगट कोणी धरू शकत नव्हतं तेव्हा सुध्दा त्यांनी अशा धर्म-रक्षणाचं असं एकही ‘पवित्र कार्य’ करू नये? नियतीनं भारताला त्यासाठी आत्ताआत्तापर्यंत ताटकळत ठेवावं? केवढा हा अधर्म!धर्मरक्षणासाठी शिवरायांनीही राजकारण केलं पण अशा नैतिकतेनं, उदार मानवतेनं की जेणेकरून मुळात ज्याचं रक्षण करायचं तो धर्म जिवंत राहील/वर्धमान होईल! शोधा जगाच्या धर्मेतिहासात अशी उदाहरणं! ( परकीय शासकांची इथली सर्वज्ञात उदाहरणं सोडा ) इतिहासकार म्हणतात : ‘ ख्रिश्चन बायझंटाईन राजवटीचा पराभव केल्यावर काॅन्स्टंटिनोपलमधील ख्रिश्चन जगतातील सर्वात मोठ्या कॅथेड्राॅलची लगोलग मशीद बनवून ‘ ( १४५३ : बाबर इथे येण्यापूर्वी सुमारे पाऊणशे वर्षं ) ऑटोमन सुलतान थांबले नाहीत; तर ‘…त्यांनी अधिकाधिक चर्चेसच्या मशिदी बनवणं चालू ठेवलं…उरलेल्या चर्चेसचा बाह्य डौल ( external profile ) हा मशिदींपेक्षा सामान्य राहिला पहिजे असे नियम व त्यासाठी सभोवतीचे टाॅवर्स वगैरेही तोडावे लागले…प्रार्थनेची वेळ झाल्याचं चर्च बेल्स वाजवून धार्मिकांना सांगण्यास बंदी…’ आणि या अनुभवानंतरही पहा पाऊणशे वर्षांनी कॅथलिक-प्राॅटेस्टंट यांच्यात सुरू झालेल्या संघर्षांचा इतिहास. आम्हाला आता या धर्माची तहान लागली आहे पण काय लागलं हाती त्यांच्या या धर्मदृष्टींतून ? थोडक्यात ‘इतिहासाचा धडा एवढाच की माणूस इतिहासापासून धडा घेत नाही’ याची निदान नोंद तरी आपण करूया !

८. भारताचं चित्र कसं राहीलं? इथं पहिलं चर्च झालं ते ख्रिश्चन धर्म स्थापनेनंतर ५२ वर्षांत ( जेव्हा रोमन साम्राट, ते ख्रिश्चन नसताना, त्यांचा छळ करीत होते ) तर मशीद उभी राहिली ती इस्लाम स्थापनेनंतर लगेचच प्रेषितांच्या हयातीतच ६२९ साली ! आमच्या सामाजिक विषमतेच्या/पुरोहितगिरीच्या काळ्या बाजूला सामोरं जातानाच या कमाल लखलखीत गोऱ्या बाजूचा श्रेष्ठत्वहीन मार्गदर्शक आनंद आम्ही वर्तमानानं गमवावा का? जात असो वा धर्म, प्रश्न तुलनेचा/श्रेष्ठकनिष्ठत्वाचा कधीच होता नये; तो तर अधर्मच ! मात्र सर्वच धर्मींनी (आणि निधर्मींनीही ) आता २१व्या शतकात तरी आपापल्या धर्म/आयडियाॅलाॅजींतील विचार/अर्थ, इतिहासातील त्यांचा व्यवहार/परिणाम व अनुभवाधारित त्यातील कमतरता/चुका यांना वैज्ञानिक तटस्थपणं सामोरं गेलं पाहिजे. आपण सामान्य माणसं परिस्थिती बदलू शकत नाही पण मन मुक्त असेल तर शिकणं कधीही न संपण्यात असलेला जीवनातील एक सर्वात मौल्यवान आनंद मात्र आपण जरुर घेऊ शकतो; तीच ‘ऊर्जा’ सर्वश्रेष्ठ आहे. आपल्यातील त्रुटी/अमंगल न स्वीकारण्याचा ईगो कशाला? ‘ व्यक्ती वा समूह, कोणातही केवळ वाईट वा केवळ चांगलं कधीच नसतं; एकाच्यामागे दुसरी गोष्ट दडलेलीच असते !’ स्वामी विवेकानंद. याच मार्गानं व्यक्ती/समाज प्रगती करीत असतो. ना आम्ही ( केवळ चांगले असे ) हिंदू म्हणून आकाशातून पडलो ना इतर कोणीही केवळ वाईट म्हणून! सर्वांच्यात चांगलं/वाईटाचं मिश्रण आहे. ज्याला जे कोणत्याही कारणांनी चांगलं लाभलं आहे त्याचा त्यानं विकास करणं वा वाईट कमी करणं यात धर्म व मानवी संस्कृतीचा विकास दडलेला आहे. असो पण भारताच्या वरील दैदीप्यमान वारशाखाली नियतीलाच आता कोळसा दिसत असेल तर कोण काय करणार?

९. आज देशाच्या एकंदरीतच संपूर्ण वातावरणात भयंकर द्वेष-वैरभाव व उन्माद भरून राहिला आहे, त्यातून हिंसा जन्म घेते हे सारं समाजहिताचं नाही. यातही ज्यांना ‘मोकळा श्वास’ दिसतो त्यांच्याशी आमचं अजिबात भांडण नाही. ‘अस्मिता-धर्मा’च्या तृप्तीपोटी ‘औरंगजेब’ व्होट-पीक किती काळ येत राहील हे ईश्वर जाणे! काळ कोणाच्या हातात आहे ? मात्र एकंदरीतच जे सारं घडत आहे त्यातून आमचा भारत हा ‘भारत’ राहील का ही प्रामाणिक चिंता आहे. ‘चूक/बरोबर कोण/काय’ याचे वाद कधीच संपणार नाहीत; इतिहास तर ‘ब्लॅक होल’च आहे! पण ‘काही ना काही निमित्त काढून आपल्याला सतत आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे’ अशी भावना राष्ट्राच्या एका प्रचंड मोठ्या समूहात निर्माण होण्यातील भयंकर धोक्यांचं निदान भान तरी ‘अस्मिते’पोटी सुटूं न देण्यात भारताचं भारतपण आहे. एकतेची खरी परीक्षा ‘कुंभा’पेक्षा यात आहे.

१०. ‘विरोधही पोटात सामावून घेण्याची भारताजवळ एक विशिष्ट दृष्टी आहे… त्यातून तमिळी वेगळेपणाची चळवळही निवळवण्यात तो यशस्वी झाला…’ ( हे नव-ऊर्जेतील ‘काशी-तमिळ संगम’ वगैरेंच्या बरंच आधी; पण आता मात्र आपण त्या प्रश्नाला पुन्हा हवा देत आहोत का ?) ‘…भारत आपला मार्ग सोडील तर जगातील अध्यात्मिकताच नष्ट होईल !..’ ॲरनाॅल्ड टाॅयनबी. खरोखरच जगाच्या इतिहासाकडे पहाता ‘सातएकशे वर्षांच्या परकीय परधर्मीय राजवटींत कोणी वाचवलं हिंदू-धर्माला’ असा प्रश्न क्षणभरही आपल्या मनात उठत नाही का ? अन्यायाचं पारिपत्य करतानाही ‘भारत जर आपल्या वेदान्ताच्या एकत्वाच्या (‘एकं सत्…’) धर्माला घट्ट धरून राहील तर त्याच्या केसालाही कोणी धक्का लावू शकणार नाही आणि भारत तो सोडील तर ईश्वरही त्याला वाचवू शकणार नाही !’ कोणाचे शब्द हे? सांगायला हवं? इतिहासातील सूड घेऊन धर्माचंच नुकसान झालं व सूड न घेताही धर्म वृध्दिंगतच झाला, राष्ट्र बळकटच झालं तर आपल्याला पसंत काय? उद्याच्या जगाचा इतिहास हिंदू म्हणून आपल्याविषयी काय मोलाचं मानील?

११. ‘एवढ्या प्रदीर्घ परकीय परधर्मीय परदास्यानंतरही आम्ही जिवंत आहोत ते आमच्या सहिष्णुतेमुळंच’ हे विवेकानंदांचे शब्द ‘एकं सत्…’ चा जणू अंतिम धर्मार्थ सांगतात ; याचा किमान विचारही न करण्याइतकं तरी त्यांच्या जीवनाच्या अवमूल्यनाचं पाप आपणा हिंदूंकडून न घडो ! बाकी ‘यथेच्छसि तथा कुरु…’ हे भगवान श्रीकृष्णांचे शब्द प्रत्येकासाठीच अंतिम!
rajadesai13@yahoo.com