अमोल रामकृष्ण मिटकरी, विधान परिषद सदस्य

नुकत्याच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजप शिंदेंची शिवसेना व अजितदादांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळाले. लोकसभेत महायुतीला फटका बसल्यानंतर अत्यंत सावध व सतर्क राहून महायुती या निवडणुकीला सामोरी गेली. सरकारने राबविलेली लाडकी बहीण योजना या यशात ‘गेमचेंजर’ ठरली. जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र अक्षरश: पिंजून काढला. दादांना पक्षातील नेत्यांसह तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांची साथ मिळाली व महायुतीच्या यशात ५५ पैकी ४१ जागा जिंकून दादांनी आपले ‘सर्व क्षेत्राधिपती’ हे बिरुद सिद्ध केले. उमेदवार निवडीपासून काळजी घेतली. दिवस-रात्र एक केला व स्वत:च्या प्रकृतीकडे प्रसंगी दुर्लक्ष करून विजयश्री खेचून आणली.

बारामतीकरांनी विकासालाच प्राधान्य देत दादांना भरभरून आशीर्वाद दिले आहेत. अनेक जिल्ह्यांत घड्याळ चिन्हाचा उमेदवार नसताना महिला मतदार भगिनींनी ‘आम्हाला १५०० रु. महिला ओवाळणी देणाऱ्या भावाला मतदान करायचं’ म्हणून घड्याळ समजून कमळ व धनुष्यबाणालाही मतदान केले; हे चित्र मी स्वत: माझ्या अकोला जिल्ह्यात बघितले.

दर दिवसाला पाच ते दहा सभा, उमेदवारांच्या बैठका, विरोधकांची समजूत काढून त्यांचे बंड शमविणे, बूथप्रमुखांच्या भेटीगाठी, पत्रकारांना मुलाखती… अक्षरश: विशीतील तरुणालाही लाजवेल अशी अफाट मेहनत दादा घेताना दिसले. दादांच्या प्रत्येक भाषणात उज्ज्वल महाराष्ट्राचे स्वप्न दडलेले होते. महिला सबलीकरण, शिव- शाहू- फुले- आंबेडकरवाद, बटेंगे तो कटेंगेचा स्पष्ट विरोध, तरुणांना रोजगार, शेतकऱ्यांची वीज बिल माफी, उपसा सिंचन योजना, मतदारसंघाचा विकास आराखडा व सर्वधर्मसमभाव हा दादांच्या भाषणाचा गाभा असायचा.

बोले तैसा चाले याची प्रचीतीही तिकीटवाटपातून दिसून आली. महाराष्ट्रात जेवढे पक्ष निवडणूक रिंगणात होते त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा एकमेव पक्ष ठरला ज्यात दादांनी १० टक्के महिला उमेदवार, १० टक्के मुस्लीम उमेदवार, १२ टक्के अनुसूचित जातींचे उमेदवार, १४ टक्के अनुसूचित जमातींचे उमेदवार; तर उरलेले ५४ टक्के ओबीसी मराठा उमेदवार दिले.

दादांचे कष्ट, काम करण्याची पद्धत, आखलेली रणनीती व तळागाळापर्यंत पोहोचविलेल्या योजना या सर्व गुणसंवर्धनामुळे दादांनी ४१ जागा जिंकून, शिंदेंच्या सेनेपेक्षा वरचा स्ट्राइकरेट मिळवून प्रादेशिक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात एक नंबर बनविले. दादांच्या झंजावाताने तुतारीची अवस्था गाजराच्या पुंगीसारखी केली. विरोधकांचे अक्षरश: वाभाडे निघाले. या निकालातून ‘राष्ट्रवादी’ तावूनसुलाखून निघाली. कार्यकर्त्यांची मोलाची साथ व सहकाऱ्यांचे कष्ट सार्थकी लागले आणि या यशाचे मानकरी ‘डिझाइन बॉक्स’वाले अरोरा बनले. त्यांनी चक्क पक्ष नेतृत्वाच्या खांद्यावर हात टाकून ‘सॅलरी टीम’ला यशाचे श्रेय बहाल केले. चंडीगडहून राष्ट्रवादीत घुसलेला हा गुलाबी रंग दादांच्या पुण्याईने नावारूपास आला.

मात्र यशाला अनेक जनक असतात अपयश हे पोरके असते. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंकडे अनेक ‘पी. आर. एजन्सी’ आहेत.

त्यांनी कधीच यशाचे श्रेय घेतले नाही, उलट भाजप वा शिवसेनेच्या एजन्सीचे नाव मला किंवा कोणालाच माहिती नाही. शिंदे/फडणवीसांच्या खांद्यावर हात ठेवायची कुणाची हिंमत नाही. इथे मात्र ‘डिझाइन बॉक्स’वालेच पक्षाचा मालक बनतो की काय असे वाटू लागले. अजितदादांच्या अखंड मेहनतीने कमावलेले हे यश व त्या यशाचे ‘डिझाइन’ केवळ राष्ट्रवादीचे आहे. पडद्याआड राहून, घरच्या भाकरीवर सोशल मीडियाद्वारे काम करत राहणारा पक्षातील सामान्य कार्यकर्ता बहिर्जी नाईकांप्रमाणे निष्ठेने आजही काम करतो, म्हणूनच तो दादांचा खरा ‘सोल्जर’ ठरतो.

नुकतेच शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी ‘राष्ट्रवादीने आमची बार्गेनिंग पॉवर कमी केली’ असे विधान करून, कारण नसताना महायुतीत मिठाचा खडा टाकला. तसे पाहता या निवडणुकीत ‘लढवलेल्या व जिंकलेल्या जागा’ या निकषावर राष्ट्रवादी सरस भरली. विरोधी पक्षनेता सभागृहात नसण्याची वेळ विधिमंडळावर आली. महायुतीच्या त्सुनामीत भलेभले संपून गेले. बारामतीच्या राजकारणातही अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. आशाकाकींना प्रचारात उतरवले गेले, शर्मिलावहिनी पवार यांनी तर बूथप्रमुख ते बूथ एजंट यांच्यावर गुंडगिरीचा आरोप केला. रोहित पवार हे दादांच्या बदनामीत सदैव अग्रेसर दिसले. या साऱ्याला जितेंद्र आव्हाड यांची अश्लाघ्य टीका, गुलाबी जॅकेटबद्दल वारंवार खालच्या पातळीवर टीका करणारे खासदार कोल्हे यांची साथ मिळाली. एकीकडे टीकाकारांची झुंड, पवारसाहेबांच्या स्टेजवरून आगपाखड करणारे हौशे, गवशे, नवशे असताना राष्ट्रवादीची ‘सोशल मीडिया टीम’ तितक्याच ताकदीने प्रतिकार करत होती. सुदर्शन जगदाळेसारखा दिव्यांग गरीब कार्यकर्ता युद्धात प्रसिद्धीपासून अलिप्त असूनही कर्णासारखे बाण सोडत होता. गाव पातळीवरील कार्यकर्ता पेटलेला होता.

दुसरीकडे पार्थ पवार व जय पवार हे दोघे खमकेपणाने दादांच्या प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेवून होते. जय पवारांनी बारामती अक्षरश: पिंजून काढली होती. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता गुलाबी झेंड्याचा पाईक नव्हता तर स्वराज्याचा भगवा पेलण्याचे सामर्थ्य मनगटात असणाऱ्या अजित दादांचा प्रचारक होता. लाडक्या बहिणींच्या लाडक्या दादांनी राज्याचे नेतृत्व करावे ही भावना हिंदूंसह मुस्लीम भगिनींचीपण होती. त्याच जोरावर दादांनी हा विजयाचा ध्वज फडकवला.

आता विधानसभा निवडणूक हा इतिहास ठरला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल फेब्रुवारीत वाजेल. आता राष्ट्रवादी पक्षाच्या खऱ्या कसोटीचा, पक्ष संघटन बांधणीचा काळ सुरू झाला आहे. पक्षश्रेष्ठींकडून संघटनात्मक जाळे मजबूत करायला सुरुवात होणार आहेच. मात्र त्यासाठी पैशाने विकत आणलेली एजन्सी कामी येणार नाही तर घरच्या भाकरीवर काम करणारा, वाहून घेणारा प्रचार हाच पक्षाचा कणा असणार आहे.

पक्षात प्रवेश व्हावा, जबाबदारी मिळावी, पक्ष वाढावा, थोडे शासकीय पाठबळ मिळावे सोप्या भाषेत हा पक्ष सर्वसामान्यांचा व्हावा ही प्रत्येकाची अपेक्षा आहे. वरिष्ठांनी आमच्या भावना समजून घ्याव्या ही माफक अपेक्षा असणे काही गैर नाही. नाहीतर पंढरी व पांडुरंगाचे महत्त्व वाढवावे संतांनी- वारकऱ्यांनी आणि विठ्ठलाला घेरावे भलत्यांनीच असे होता कामा नये. गुलाबी बडवे विठ्ठलाला सोडायलाच तयार नसतील तर सामान्य वारकरी तिथे पोहोचेल कसा? यशवंतराव चव्हाण ते सुधाकरराव नाईक, वसंतदादा पाटील ते पवारसाहेब अशा अनेक सुसंस्कृत राजकारण्यांना महाराष्ट्रने पाहिले आणि अनुभवले. आता या विचारांचा परिपाक अजित त्यांच्या रूपाने आला आहे, तो जपला जावा इतकीच काय ती अपेक्षा.

दादा स्वयंभू आहेत, त्यांना इतरांनी दिशा दाखवावी इतके ते नक्कीच छोटे नाहीत. राष्ट्रवादीचे यश हे दादांच्या नेतृत्वाचे, कर्तृत्वाचे आहे. यात असंख्य कार्यकर्त्यांचे काबाडकष्ट आणि दिवस-रात्रीची मेहनत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने अतिशय मेहनतीने मिळविलेला यशाच्या पीठावर कुणी बाहेरच्या माणसाने रेघोट्या ओढून भाकरी थापण्याचे करू नये हीच माफक अपेक्षा आम्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आहे. अरोरांच्या नावात ‘नरेश’ असेलही; पण आमचं दैवत, राष्ट्रवादी परिवाराचे पालक, कुटुंबप्रमुख हे आमचे लोकनेते अजितदादा पवार आहेत आणि आमच्यासाठी ‘नरेश’ म्हणजेच ‘राजा’ ही महाराष्ट्राची सर्वसामान्य जनता आहे. त्यामुळे आमच्या यशाच्या ‘रांगोळी’त कुणी स्वत:चे प्रोफेशनल ‘डिझाइन’ मिसळण्याचा प्रयत्न करू नये, हे बरे. तसे करणाऱ्यांना, त्यांच्या नसलेल्या यशाचा ‘बॉक्स’ गुंडाळून लोक आणि कार्यकर्तेच घरी बसायला भाग पाडतील.