बालाजी बच्छेवार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचून अखेर सोमवारी संपला. तरीही कदाचित, ‘व्हॉट्सॲप विद्यापीठा’तून खासगीरीत्या, छुपा प्रचार सुरूच राहील. पण या प्रचाराच्या गदारोळातही एक बाब लपली नाही – आपल्या राज्याच्या आज पर्यंतच्या इतिहासातील सगळ्यात तत्वशून्य,नीतिमत्ताशून्य व अत्यंत पातळीहीनपणे लढली गेलेली निवडणूक म्हणून २०२४ च्या या निवडणुकीची नोंद होईल. याची कारणे अनेक आहेत आणि ती आजची नाहीत. २०१९ च्या निवडणूक निकालानंतर हळुहळू उघड होत गेले की, जवळपास सर्वच पक्षांनी विश्वासार्हता गमावली आहे..

हाताच्या बोटावर मोजण्याएवढे काही नेते सोडले तर इतर सर्व नेत्यांनीही कंबरेचे सोडून डोक्याला बांधल्याची परिस्थिती आहे. ना पक्षाची ध्येयधोरणे; ना नेत्याचे आश्वासक शब्द व कार्य. फक्त कुठे ‘शांत झोप लागेल’- अर्थात ईडी/सीबीआय/ आयकर खाते यांपासून संरक्षण कुठे मिळेल, कुठे खायला मिळेल, निवडणुकीचे तिकीट मिळेल तो पक्ष माझा… मग तत्व, निष्ठा, विचारसरणी हे बोलण्यापुरते आहेच… ही आपल्या राजकारणाची व नेत्यांची अवस्था आता उघड झालेली आहे.

हेही वाचा >>>नेत्यांच्या भाषेत ही सवंगता येते तरी कुठून?

सर्वात वाईट भाग म्हणजे अत्यंत टोकाला व खालच्या पातळीला गेलेला जातीयवाद. कोणी धर्मभेदाचा फायदा मिळवण्यासाठी टपलेले तर कोणी ‘या समाजाचा पाठिंबा आम्हालाच’ अशी वल्गना करणारे.

हे रसातळाला गेलेले वातावरण पाहून सामान्य मतदाराला प्रचंड वेदना होत असतील.

कुणी उठते, कुणाशीही गद्दारी करते, अख्खा पक्षच्या पक्ष हायजॅक केला जातोय, ‘आम्हीच मूळ पक्ष’ अशा बढायाही मारल्या जातात… मग गद्दारी, ५० खोके एकदम ओके, याला आत घालू, त्याला मंत्री करू.. ही यांची भाषणे, आपल्यात आला तर स्वच्छ अन दुसऱ्या पक्षात गेला की चोर, इतका साधा हिशेब. त्याहीपेक्षा यंदा गाठली गेलेली हीन पातळी म्हणजे अत्यंत घाणेरड्या भाषेत भरसभेत, महिला मुलींसमोरं अश्लील भाषेत भाषणे दिली जातात.. त्यातला वाईट भाग म्हणजे समोरील मंडळीहि निर्लज्ज पणे टाळ्या वाजवतात.

पैशाचा अक्षरशः पाऊस ( नक्कीच काळ्या पैशाचा ), प्रचंड प्रमाणात पकडली गेलेली पैश्याची रक्कम, ‘पैशातून सत्ता अन सत्तेतून पैसा व त्यातून आलेला माज’ हे दुष्टचक्र फिरण्याचा वेग आता चांगलाच वाढला आहे- उमेदवारांच्या वाढलेल्या मालमत्ता त्याचीच साक्ष देताहेत.

सामान्य माणसाच्या विचारांच्या बाहेरच्या गोष्टी आहेत या सर्व… पण तो हि बिनडोकपणे या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आहे- म्हणूनच, कुणी कमळ घेऊन फिरतो तर कुणी हात दाखवतो, कुणी तुतारी फुंकतो तर कुणी मशाल फिरवतो, कुणी आयोगाने घेऊन दिलेल्या धनुष्यातून तीर मारतो तर कुणी बंद घड्याळात वारंवार वेळ पाहतो, तर कुणी झाडू घेऊन इंजिन साफ करतो. पण यातल्या कुणाची धोरणे काय, याचा काहीही विचार केला जात नाही. या पक्षांच्या कार्यकर्त्यांपैकी कुणी स्वार्थासाठी तर कुणी जातीसाठी तर कुणी अंधभक्तीसाठी एकमेकांवर तुटून पडताहेत. इतके विदारक चित्र या महाराष्ट्रात दिसते आहे.

हेही वाचा >>>महाराष्ट्र वाहून जाणार की आपली वेगळी वाट आखणार?

चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य, खरा विकास, समृद्ध व सुसंस्कृत भारत, भविष्यातील समस्या व त्यावरील उपाय, भ्रष्टाचार कमी करून चांगली सेवा यावर कुणी बोलायलाच तयार नाही. यांच्या प्रचार-भाषणांतला आणि आता तर जाहिरातींतलाही सगळ्यात मोठा मुद्दा हा भ्रष्टाचार, पण भ्रष्टाचाराच्या आरोपांवर कारवाईची संधी असूनही कारवाई मात्र पुढे जात नाही. किती चुकीचे आहे हे, पण जनतेलाही काहीच वाटत नाही.

अशा अवस्थेत बिनमहत्त्वाचे फालतू मुद्दे सर्वात जास्त चर्चेला येतात.

त्यात आणखी एका चुकीच्या गोष्टीची भर पडली ती म्हणजे फुकट पैसे वाटप! ही मुळात अत्यंत चुकीची योजना. लोकांच्या मेहनतीचा पैसा अश्या पद्धतीने वाटल्याने चुकीचे पायंडे पडतात, यांनी दिड वाटले तर दुसरे दोन वाटतात. हा प्रकार म्हणजे मत विकत घ्यायचा प्रकार तो ही लोकांच्या करांच्या पैशावर. हे समाज विकासासाठी आणि देशासाठीही अत्यंत घातक आहे.

अशा आपल्या निवडणुका, ही आपली लोकशाही, हे आपले संविधानाचे राज्य, अन हा आपला विकास… ही परिस्थिती भविष्यात सुधरायची शक्यताही दिसत नाही. हे सर्व पाहिल्यावर एकच दिसते ते म्हणजे आपण तथाकथित विकासाचे नाव घेऊन विनाशाकडे निघालोत… तेही वेगाने.

ज्यांना हे पटते आहे त्यांनी कुठल्याही पक्षाच्या, नेत्याच्या अंधाभक्तीत न राहता, जो उमेदवार ‘चांगला, प्रामाणिक व संवेदनशील’ तो माझा हे धोरण (याच नव्हे, पुढल्याही अनेक) निवडणुकांसाठी अवलंबले आणि प्रामाणिकपणे, भ्रष्टाचारा विरुद्ध व चांगला समाज, नीतिशील विकास यांसाठी काम केले तरच आपल्याला भविष्य आहे. नाही तर, जग मंगळावर आणि आपल्याला मंगळ ही परिस्थिती लवकरच येईल.

‘जवळपास सगळे पक्ष,नेते हे सारखेच झालेत’ ही रड आहेच, पण त्यातूनही चांगले उमेदवार निवडणे, हेच तर मतदार म्हणून आपले कौशल्य आहे!

लेखक शिक्षण क्षेत्राशी व भ्रष्टाचार निर्मूलन चळवळीशी संबंधित आहेत. tanavi911@gmail.com


मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra legislative assembly election 2024 campaign election 2024 amy