जयेश सामंत-सागर नरेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यासह काही शहरांमध्ये अलीकडच्या काही दिवसांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे सामान्यांचे अतोनात हाल झाले. खरे तर त्यांचे असे हाल गेली काही वर्षे दर पावसाळ्यात सातत्याने होतच आहेत. शहरांमध्ये प्रचंड वेगाने होत असलेली बेसुमार बांधकामे, नद्यांच्या प्रवाहांशी केलेली छेडछाड, वृक्षतोड आणि तथाकथित विकासाचा अनाठायी सोस ही कारणे त्यामागे आहेत. शहर नियोजन ही गांभीर्याने करायची गोष्ट आहे, हे आपण कधी समजून घेणार आहोत?

नागपुरातून थेट 

मुंबई-ठाण्याच्या दिशेने झेपावणारा समृद्धी महामार्ग, गुजरातपासून नवी मुंबईच्या जवाहरलाल नेहरू बंदरापर्यंत निर्माणाधीन असलेला बडोदा-मुंबई मार्ग, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, विरार-अलिबाग कॉरिडॉर, नवी मुंबई विमानतळ याशिवाय अनेक लहान-मोठे उड्डाणपूल, उन्नत मार्ग, बोगद्यांची कामे रायगड, ठाणे आणि पालघर या तीन जिल्ह्यांमध्ये सुरू आहेत. नवी शहरे, नव्या प्रकल्पांसाठी केले जाणारे शेकडो एकर जमिनींचे संपादन, भातशेतींच्या जमिनीवर सुरू असलेला दगड, माती, काँक्रीटचा भराव, लहान टेकड्या कापून सपाट झालेल्या जमिनीवर उभे केले जाणारे प्रकल्प आणि कसलाही धरबंध नसल्याप्रमाणे खाडी, नदी, नाले बुजवून वाड्या, वस्त्या, गाव, शहरांमध्ये उभी रहाणारी बेकायदा बांधकामे यामुळे मुंबईलगत असलेल्या महानगरांच्या प्रदेशाला दरवर्षी महापुराचा फटका बसू लागला आहे.

हेही वाचा >>> विकासाचा सोस;शहराच्या गळ्याशी

अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आले आणि महानगर प्रदेशासह ठाणे जिल्हा विकासाच्या केंद्रस्थानी आला. मुंबई महानगर विकास प्राधिकरण, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, सिडको यासारख्या शासकीय संस्थांनी अक्षरश: हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प या भागात आखण्यास सुरुवात केली. महानगर प्रदेश प्राधिकरण हे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या नगरविकास विभागाचा महत्त्वाचा भाग. त्यामुळे अलिबागपासून, पालघरपर्यंत जेथे मोकळी जमीन दिसेल तेथील विकासाचे अधिकार या प्राधिकरणाकडे सोपविण्याचा सपाटाच सुरू झाला. नवे रस्ते, बोगदे, पूल, उड्डाणपूल, उन्नत, खाडी, भुयारी मार्ग यासाठी सव्वादोन लाख कोटींचे प्रकल्प राज्य सरकारने ठाणे आणि आसपासच्या प्रदेशात आखले आहेत. यासाठी मिळेल तेथील, मिळेल तितकी जमीन संपादित करायची आणि गावागावांच्या वेशीवर अवाढव्य प्रकल्प करायचा असा शिरस्ताच या भागात सुरू आहे. .

पूरवाहिनी नदी

ठाणे जिल्ह्यातून वाहणाऱ्या उल्हास नदी किनारी गेल्या काही वर्षांत अमर्याद बांधकामे उभी राहिली आहेत. त्यामुळे बदलापूर अलीकडे पूरग्रस्त शहर ठरले आहे. या शहरात अनिर्बंध पद्धतीने नाले अडवले गेले. नैसर्गिक नाल्यांचे मार्ग बदलण्यात आले. काही ठिकाणी ते अरुंद करून तिथे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे दरवर्षी एक ते दोन दिवस बदलापूर शहरातील हजारो घरे पाण्याखाली जातात. त्यानंतरही स्थानिक बांधकाम व्यावसायिक जे लोकप्रतिनिधीही आहेत, पूररेषा हटवावी अशी मागणी राज्याच्या प्रमुखांकडे करण्यासाठी सातत्याने कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत.

भातशेती गिळली

ठाणे जिल्ह्यात सध्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग आणि उरण-वडोदरा महामार्गाची उभारणी अंतिम टप्प्यात आहे. त्याच्या उभारणीसाठी अंबरनाथ, कल्याण, शहापूर आणि भिवंडी तालुक्यांतील जमीन भूसंपादित करण्यात आली आहे. यात बहुसंख्य जमिनी या शेतजमिनी होत्या. जलयुक्त शिवार योजनेत भातशेती पाणी धरून ठेवण्यासाठी आणि पाणी जमिनीत मुरवण्यासाठी ती महत्त्वाची मानली गेली. या भातशेतीत आता भराव घालून समृद्धी आणि मुंबई-वडोदरा महामार्गाचे रस्ते बांधले जात आहेत. हा भराव अनेक ठिकाणी तो दहा फुटांपासून ३० फुटांपर्यंत गेला आहे. या शेतजमिनीवर साचणारे पाणी आता रस्त्यावर जाऊन साचते आहे. त्याचा फटका वाहतुकीला बसतो आहे. गेल्या वर्षात शहापूर तालुक्यातील महाळुंगे या कोयना धरणग्रस्तांच्या गावातील विहिरीत ‘समृद्धी’च्या कामामुळे सांडपाणी शिरल्याच्या तक्रारी आल्या. समृद्धीच्या वाटेवरील गावागावांमधून अशा तक्रारी आता पुढे येत आहेत. नैसर्गिक प्रवाह अडल्याने पावसाचे पाणी मुख्य रस्त्यांवर येऊ लागले आहे. मलंगगड आणि परिसरातून वाहत येणारे पावसाचे पाणी आधी शेतांमध्ये, मोकळ्या जमिनींवर थांबत, मुरत होते. कल्याण, शीळ रस्त्यापासून कल्याण तालुक्याच्या कानाकोपऱ्यांत आता बडे बिल्डर प्रकल्प उभारत आहेत. त्यांच्या परवानग्या देताना पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहांचा विचार कुणी करायला तयार नाही. कल्याण शिळ रस्त्यावर पाणी का साचते, पलावासारख्या गृहसंकुलात पुराचे पाणी का शिरते, खोणी, नेवाळी, अंबरनाथ रस्ता दरवर्षी पाण्याखाली का जातो याचे उत्तर सोपे आहे. खाडीच्या दिशेने जाणारे प्रवाह अनेक ठिकाणी बंद झाले आहेत. काही ठिकाणी रस्त्यांची उंची वाढली आहे. रस्त्यांच्या बांधणीत गटारे काढायची राहून गेली आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत बदलापूर- कर्जत राज्यमार्ग, कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग, कल्याण-बदलापूर राज्यमार्गाला पावसाचा मोठा फटका बसताना दिसतो आहे. या भागातही जमिनींचे संपादन करून शेतजमिनी व्यापल्या गेल्या. हे मार्ग उभारताना नैसर्गिक प्रवाह बदलले गेले. पाण्यासाठी दिलेल्या वाटेवर पाणी वळलेच नाही.

अर्धवट रस्ते, कामांची दैना

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे महामार्गावरील वर्सोवा पुलापासून विरार फाट्यापर्यंत ससूनवघर, मालजीपाडा पुलाच्या खाली, लोढा धाम, रेल्वे वाहिनी उड्डाणपूल, पेल्हार परिसरात पाणी साचू लागले आहे. वसई पूर्वेला स्मार्ट सुरक्षा सिटी हा मोठा गृहनिर्माण प्रकल्प तयार झाला आहे. त्यामुळे एव्हरशाईन, वसंत नगरी हा भाग पाण्याखाली जाऊ लागला आहे. विरारमध्ये शापूरजी पालनजी गृहनिर्माण प्रकल्प उभा आहे. त्यासाठी झालेला भराव विरार पश्चिम, बोळिंज येथील नागरिकांसाठी त्रासदायक होतो आहे. नवी मुंबईत विमानतळासाठी शेकडो एकर जमीन संपादित करण्यात आली. लहानलहान टेकड्या फोडण्यात आल्या. नदीचे प्रवाह बदलले गेले. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात विमानतळाच्या धावपट्टीसह संपूर्ण परिसरात पूर येतो. हे चित्र बदलणार कसे हा प्रश्न मात्र कायम आहे. jayesh.samant@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra monsoon floods causes in maharashtra cities causes of urban floods in maharashtra zws
Show comments