प्रा. डॉ. संजय खडक्कार
सध्या उच्च शिक्षणात जागतिक पातळीवर अभूतपूर्व वेगाने बदल होताना आपल्याला दिसत आहे, हे मुख्यत्वे विद्यार्थ्यांच्या आणि जागतिक कार्यबलाच्या सतत बदलत्या गरजांशी जुळवून घेण्यासाठी होत आहे. त्यात आता डिजिटल विद्यापीठाचा उदय होत आहे. डिजिटल विद्यापीठ ही एक अशी शैक्षणिक संस्था आहे जी जीवनाच्या सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांना लवचीक सुलभ आणि उच्च गुणवत्तेचे शिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते. हे विद्यापीठ इंटरनेट आणि संप्रेषण तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासक्रम प्रामुख्याने प्रदान करते. त्याबरोबर डिजिटल विद्यापीठे अनेकदा ऑनलाइन आणि प्रत्यक्ष शिक्षण अशा दोन्ही पद्धतीने विद्यार्थ्यांना अध्यापन करते. अशी विद्यापीठे विद्यार्थ्यांना जगभरातील शिक्षकांकडून शिकण्याची संधी देतात ज्यामुळे वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक शिक्षण वातावरण निर्माण होते. ही विद्यापीठे आजीवन शिक्षणाच्या संस्कृतीला प्रोत्साहन देतात आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या कारकीर्दीत त्यांची कौशल्ये व ज्ञान सतत विकसित करण्यात प्रोत्साहित करतात.

भारतात, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये (२०२०) अनेक शैक्षणिक सुधारणा सुचवल्या आहेत, त्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या दाराशी वैयक्तिकृत अनुभवांसह जागतिक दर्जाचे सार्वत्रिक शिक्षण प्रदान करणे, हीदेखील शैक्षणिक सुधारणा सुचविली आहे. त्यासाठी डिजिटल विद्यापीठाची स्थापना करणे हे जरुरीचे ठरते. त्यादृष्टीने भारतात नॅशनल डिजिटल विद्यापीठ या पहिल्या डिजिटल विद्यापीठाची सुरुवात झाली आहे. केरळ युनिव्हर्सिटी ऑफ डिजिटल सायन्सेस इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी हे भारतातील पहिले डिजिटल विद्यापीठ केरळ सरकारने २०२० मध्ये सुरू केले. विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानव्य शास्त्रातील संशोधन आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करून देशातील ज्ञान क्रांतीचे प्रमुख प्रेरक बनणे हे या विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे.

Education Institute Quality, Education Institute ,
अशा वातावरणात कशी वाढणार शिक्षणाची गुणवत्ता?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
nashik online application for school admission starts to integrate children from deprived sections
सर्वांना शिक्षण हक्क प्रक्रियेत ४०७ शाळा सहभागी
CET registration, students, Ticket facility, CET ,
सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’
sbi education loan Study abroad
परदेशात शिक्षण घ्यायचे; पण पैशांची अडचण येतेय? मग SBI च्या शैक्षणिक कर्जाचा ‘हा’ पर्याय एकदा घ्या जाणून
Home Schooling Education System
होम स्कुलिंग शिक्षण व्यवस्थेचे भविष्य ठरू शकेल का?
Uday Samant request to the central government regarding Marathi language
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्व लाभ द्या; मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची केंद्र सरकारला विनंती
Higher Education Policy State University Chancellor Elections
उच्च शैक्षणिक धोरणदशा!

हेही वाचा : आर्थिक फायदा होतो म्हणून व्याघ्रपर्यटनाचा तमाशा ?

महाराष्ट्रातही विद्यार्थ्यांना लवचीक, आकर्षक व दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने डिजिटल विद्यापीठ स्थापन करण्याचे योजिले आहे. आज इंटरनेट, स्मार्टफोन व इतर डिजिटल उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे ऑनलाइन शिक्षण देणे अधिक सुलभ झाले आहे तसेच विद्यार्थ्यांना लवचीक शिक्षण पर्यायाची गरज भासत आहे. ही डिजिटल विद्यापीठे कधीही व कुठेही अभ्यास करण्याची लवचीकता प्रदान करतात, त्यामुळे काम करणाऱ्या व्यावसायिकांना किंवा पालकांना, गृहिणींना आणि दुर्गम भागात राहणाऱ्यांना पण शिक्षण घेणे सुलभ होऊ शकते. पारंपरिक विद्यापीठातील शैक्षणिक शुल्कापेक्षा स्वस्त व परवडणारे शैक्षणिक कार्यक्रम ही विद्यापीठे देऊ शकतात.

परंतु, डिजिटल विद्यापीठाबद्दल काही प्रश्न उपस्थित होत आहेत. जरी विद्यापीठ अनुदान आयोगाने ऑफलाइन व ऑनलाइन या दोन्ही प्रकारच्या पदवींना समान महत्त्व दिले तरी ऑनलाइन पदवी ही नियमित पदवीइतकीच उपयुक्त ठरणार आहे का? नियोक्ते डिजिटल विद्यापीठाची पदवी प्राप्त करणाऱ्यांना नोकरी प्रदान करणार आहेत का? पारंपरिक शिक्षणात वर्गात विद्यार्थी व शिक्षकांची सुसंवाद व क्रियाकलाप, हे अध्यापन किंवा अध्ययन, ऑनलाइन शिक्षण पद्धतीपेक्षा अधिक प्रभावी करतात. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने उच्च शिक्षणात, शिक्षक – विद्यार्थी गुणोत्तराचे प्रमाण १:२० वर आग्रही असताना ऑनलाइन पद्धतीत अमर्याद विद्यार्थी राहू शकतात, त्यामुळे विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष देणे कितपत शक्य होईल, याबाबतही शंका उपस्थित होते. तसेच दुर्गम भागात खराब इंटरनेट कनेक्टिव्हिटी हीसुद्धा डिजिटल विद्यापीठासाठी मोठे आव्हान ठरू शकते.

४ सप्टेंबर २०२० रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाने (मुक्त आणि दूरस्थ शिक्षण कार्यक्रम आणि ऑनलाइन कार्यक्रम) नियमावली, २०२० अधिसूचित केली. या नियमांनुसार, उच्च शिक्षण संस्था म्हणजे प्रामुख्याने विद्यापीठेही दूरस्थ शिक्षण/किंवा ऑनलाइन शैक्षणिक कार्यक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊ शकतात, जर ते समान शैक्षणिक कार्यक्रम पारंपरिक/ दूरस्थ शिक्षण मोडमध्ये चालवत असतील, आणि तेथून एक बॅच उत्तीर्ण झाली असेल. याचा अर्थ असा की राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे ऑनलाइन पद्धतीने पदवी कार्यक्रम राबवू शकतात. मग आता असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो की मग नव्याने डिजिटल विद्यापीठ कशाला?

हेही वाचा : शिक्षण संस्था आणि उद्योगजगत यांचा समन्वय दोहोंच्याही फायद्याचा…

महाराष्ट्र शासनाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे डिजिटल विद्यापीठात रूपांतर करण्याचे योजिले आहे, असे समजते. डिजिटल विद्यापीठाअंतर्गत विद्यार्थ्यांना उत्तम आणि चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील सर्व प्राध्यापकांना अध्यापनासाठी उच्च दर्जाचे ऑनलाइन प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणामुळे ऑनलाइन वर्गातून विद्यार्थ्यांना प्रत्येक विषय सहज व सोप्या पद्धतीने शिकवणे प्राध्यापकांसाठी सहज शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य सहज उपलब्ध व्हावे यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील सर्व पारंपरिक अभ्यासक्रमांचे रूपांतर संवादात्मक डिजिटल स्वरूपात करून देण्यात येणार आहे.

आता येथे स्वाभाविकपणे प्रश्न उद्भवतो की ‘मुक्त’ विद्यापीठ यासाठी खरंच सक्षम आहे का?

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभियांत्रिकी, स्थापत्यशास्त्र व तंत्रशिक्षण संबंधीचे सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्यापीठ आयोगाने घेण्यास मनाई केली आहे. आज या मुक्त विद्यापीठात ६८ शिक्षकांची पदे मंजूर आहेत, त्यापैकी आठ पदे ही विभागीय संचालकांसाठी राखीव आहेत. सद्या:परिस्थितीत, विद्यापीठात काम करणाऱ्या मंजूर ६० शिक्षकांच्या पदापैकी फक्त १९ जण कार्यरत आहेत व बाकीची ४१ पदे, म्हणजे ६८ टक्के पदे रिक्त आहेत. तसेच येथे मानव्य विद्या, वाणिज्य आणि व्यवस्थापन, शिक्षणशास्त्र कृषी इत्यादी बहुविद्याशाखांचे शिक्षक असल्याने यापैकी किती तंत्रस्नेही आहेत व ते डिजिटल विद्यापीठाच्या अनुषंगाने कितपत उपयुक्त ठरतील हा प्रश्नही येथे निर्माण होतो.

हेही वाचा : यूजीसीच्या अधिसूचनांचा पुनर्विचार हवाच!

भारतातील पहिले डिजिटल विद्यापीठ हे केरळ सरकारने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटला अपग्रेड करून स्थापन केले. त्यात २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात एम. एस्सी., एम. टेक., एम. बी. ए.आणि पीजी डिप्लोमा प्रोग्राम सुरू केले आहेत. याचाच अर्थ की केरळ राज्याने डिजिटल विद्यापीठ हे अद्यायावत तंत्रज्ञानाने विकसित विद्यापीठात सुरू केले. त्यामुळे महाराष्ट्रातही डिजिटल विद्यापीठ हे मुक्त विद्यापीठात सुरू न करता ते आय. आय. टी, आय. आय. आय. टी. किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ किंवा मुंबई विद्यापीठात का सुरू करू नये?

भारत सरकारच्या ‘अमृत काळ’ ध्येयाला सक्रियपणे महाराष्ट्र राज्याने डिजिटल विद्यापीठाची स्थापना करावी, व तीही प्रतिष्ठित व अद्यायावत तंत्रज्ञानाने विकसित महाराष्ट्रातील विद्यापीठात, जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला कधीही आणि कुठेही दर्जेदार शिक्षण सुलभरीत्या उपलब्ध होईल. ज्याचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होईल तसेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आवश्यक असलेले कौशल्य प्रशिक्षण देणेही सुलभ होईल.
sanjaytkhadakkar@rediffmail.com

प्रा. डॉ. संजय खडक्कार

माजी तज्ज्ञ सदस्य,

विदर्भ वैधानिक विकास मंडळ

Story img Loader