दत्ता जाधव
इंद्रायणी तांदूळ म्हटले, की आठवते जिभेवर रेंगाळणारी चव अन् घरभर दरवळणारा सुवास. इंद्रायणी तांदूळ फक्त महाराष्ट्रातीलच भात खाचरांत पिकतो आणि फक्त महाराष्ट्रातीलच घराघरांत शिजतो. मराठी माणूस जगाच्या पाठीवर जिथे जिथे गेलाय तिथे तिथे इंद्रायणीचा सुवास दरवळतो.
यंदा इंद्रायणी तांदळाचे चांगले उत्पादन होईल, असे जाणकारांनी सांगताच प्रसार माध्यमांतूनही इंद्रायणीचा सुवास दरवळू लागला. या तांदळाच्या जन्माची कथाही रंजक आहे. पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळच्या भात संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव कळके हे इंद्रायणीच्या सुधारित वाणाचे जन्मदाते आहेत. कळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सलग १५-१६ वर्षे संशोधन करून १९८७ मध्ये ‘आय.आर.८’ आणि ‘आंबेमोहोर’ या दोन जुन्या भात वाणांचा संकर केला. त्यातून नवे सुधारित सुवासिक इंद्रायणी वाण तयार झाले. उत्तम सुवास, चिकट आणि चवदार तांदूळ ही इंद्रायणीची खास ओळख. या इंद्रायणीला सुवास मिळालाय, तो आंबेमोहोर या पारंपरिक भाताचा. मावळात हा आंबेमोहोर शेकडो वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने पिकवला जात आहे.
मुळात आंबेमोहर हेच मावळातील पारंपरिक वाण. त्याला सुवास, चव आणि परंपरा आहे. पण, हेक्टरी उत्पादन फक्त १८ ते २० क्विंटल. उंच वाढणारे आणि कीड-रोगांना लवकर बळी पडणारे हे वाण. भाताची रोपे उंच वाढत असल्यामुळे दरवर्षी परतीच्या पावसात काढणीला आलेला आंबेमोहर भात खाचरात साठलेल्या पाण्यात पडून कुजून जायचा, काळा पडायचा. मूळात उत्पादन कमी, कीड रोगांमुळे संक्रांत आणि ज्या मावळात पाऊस धो-धो बरसतो, अशा ठिकाणी परतीच्या पावसाचा जोरही मोठा. शेतकऱ्यांची ही अडचण डॉ. कळके यांनी हेरली आणि आंबेमोहोरचे मूळ उत्तम गुण कायम ठेवून त्यात सशक्तपणा व जादा उत्पादनाचा गुणधर्म आणून सुधारित इंद्रायणी वाणाला जन्म दिला.
इंद्रायणी भाताला असलेला चिकटपणा ‘अमायलेज’ घटकामुळे येतो, तर ‘२ एपी’ नावाच्या सुवासिक घटकामुळे सुवास मिळतो. मावळातील डोंगराळ जमीन, नदीकाठची चांगली जमीन आणि मध्यम प्रतीच्या जमिनीतही प्रति एकर ४० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू लागल्यामुळे हे वाण अल्पावधीत लोकप्रिय झाले.
आता मावळाबरोबरच लोणावळा, कामशेत, भोर, वेल्हा, सातारा, सांगली, कोल्हापूर, कर्नाटकचा सीमाभाग (आजरा) आणि नाशिक परिसरात इंद्रायणी तांदळाचे उत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. राज्यात तांदळाच्या एकूण उत्पादनाची आकडेवारी जाहीर होते. त्यामुळे केवळ इंद्रायणीचे, केवळ आंबेमोहोर तांदळाचे उत्पादन किती झाले, या बाबत ठोस माहिती मिळत नाही. केवळ अंदाजच बांधावे लागतात.
इंद्रायणी तांदळाची जी जमेची बाजू आहे, तीच तिची नाजूक बाजूही आहे. इंद्रायणी तांदळाचे उत्पादन देशात केवळ महाराष्ट्रातच आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रातच होते. शिवाय पश्चिम महाराष्ट्रातच इंद्रायणी आवडीने खाल्ला जातो. अलीकडे महाराष्ट्रभरातील घराघरात इंद्रायणी शिजू लागला आहे. मुळात इंद्रायणीचा चिकटपणा महाराष्ट्राबाहेरील खवय्यांना आजपर्यंत आवडलेला नाही. महाराष्ट्राबाहेर इंद्रायणी अगदी क्वचित खाल्ला जातो. मराठी माणूस देशात आणि जगात जिथे कुठे गेला आहे, त्याच्या घरात इंद्रायणी शिजतो. अगदी अमेरिका, ब्रिटन आणि युरोपातील ज्या देशांत मराठी माणूस गेला त्याच देशांत इंद्रायणीची निर्यात होते. आखाती, अरबी देशांत इंद्रायणीची अगदी नगण्य निर्यात होते. या भाताची चव आजवर महाराष्ट्राबाहेरील खवय्यांच्या पसंतीस उतरलेली नाही.
राज्यात इंद्रायणीचा दर्जा प्रदेशनिहाय बदलतो. मावळात पिकणाऱ्या इंद्रायणीवर प्रक्रिया करणाऱ्या भातगिरणी उद्योगात सुधारणा झालेली नाही, त्यामुळे येथील इंद्रायणी भातात तुकड्याचे प्रमाण अधिक राहते. त्यामुळे मावळातील इंद्रायणीला प्रति क्विंटल होलसेल दर ४००० ते ४२०० रुपये दर मिळतो. त्याच्या खालोखाल नाशिक परिसरातील इंद्रायणीला ४५०० ते ४८०० रुपयांपर्यंत दर मिळतो. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा परिसरात इंद्रायणीचे क्षेत्र वाढले आहे. तिथे चांगल्या दर्जाच्या भातगिरण्या आहेत. तांदळाचा तुकडा पडत नाही, सुवासही चांगला येतो, त्यामुळे आजरा इंद्रायणीला सर्वाधिक प्रति क्विंटल ५००० ते ५२०० रुपये इतका (होलसेल) दर मिळतो.
या इंद्रायणीला आता राज्याबाहेरील आणि जगाच्या पाठीवरील अन्य देशांत पोहोचवून इंद्रायणीच्या चवीची सवय लावणे गरजेचे आहे. बासमतीचे उत्पादन संपूर्ण देशात होते. इंद्रायणीचे फक्त महाराष्ट्रातच आणि तेही ठरावीक पट्ट्यांत. त्यामुळे इंद्रायणीच्या उत्पादनाला मोठी मर्यादा आहे.
राज्यात तांदळाचे क्षेत्र फारसे नाही. त्यातही पारंपरिक आणि सुधारित वाणांचे क्षेत्र वेगळे आहे. सुधारित वाणांच्या एकूण क्षेत्रापैकी इंद्रायणीची लागवड सुमारे ७० टक्क्यांपर्यंत होते. पण, तरीही इंद्रायणी तांदूळ बासमती, कोलमसारख्या अन्य वाणांची बरोबरी करू शकत नाही. मात्र, जे काही उत्पादन होते, त्याचे ब्रँडिंग करण्याची गरज आहे. इंद्रायणीचे ब्रँडिंग झाले तरच देशाची आणि जगाची बाजारपेठ या तांदळासाठी खुली होईल आणि अस्सल मराठी वाणाचा सुवास जगभर दरवळेल.
dattatray.jadhav@expressindia.com