प्रा. डॉ.नयनकुमार आचार्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकोणिसाव्या शतकातील महान वैदिक विचारवंत व थोर समाजसुधारक महर्षी दयानंद सरस्वती हे खऱ्या अर्थाने सर्वोच्चस्थानी मानले जातात . त्यांच्या उदात्त जीवन व कार्यापासून अनेकांनी प्रेरणा घेतली, तर त्यांच्या विचारांची मशाल हाती घेऊन अनेकांनी सामाजिक व राष्ट्रीय चळवळीत भाग घेतला. आज २०० वर्षानंतर देखील स्वामीजींचे प्रखर विचार हे समाज व राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात तितकेच समयोचित ठरतात.

एकोणिसाव्या शतकात अनेक समाजसुधारकांनी ज्ञाननिष्ठा, बुद्धिप्रतिभा, अपूर्व त्याग व संघर्षाच्या बळावर समाज परिवर्तनाचे कार्य सुरू केले. समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. अशा समाजसुधारकांमध्ये स्वामी दयानंद हे प्रमुख मानले जातात. स्वामीजींच्या जीवन, कार्य व विचारांचा मूलभूत आधार म्हणजे वेदज्ञान ! महाभारताच्या विनाशकारी युद्धात अनेक वैदिक विद्वान व आचार्यगण मारले गेल्याने वेदविद्यादेखील लुप्तप्राय झाली. अशातच तथाकथित पंडितांनी वेदमंत्रांचे चुकीचे अर्थ लावून अर्थांचा अनर्थ केला. यामुळे तर्कनिष्ठ जिज्ञासू बुद्धिवाद्यांचा वेदांवरचा विश्वास उडाला व सामान्य लोकांमध्ये भ्रम निर्माण झाला. वेदांमध्ये प्रतिपादित सत्यज्ञान, एकमेव असा निराकार परमेश्वर, एक पूजापद्धती, प्रेम, दया, करुणा व सहिष्णुता यांच्यावर आधारित मानवता धर्म, जन्माऐवजी गुण, कर्म, स्वभाववैशिष्ट्यांवर आधारित वर्णव्यवस्था , वैश्विक एकात्मता या पवित्र बाबी नाहीशा होत गेल्या. इतकेच काय तर धर्माचार्यांनी केलेल्या बुद्धिविसंगत भाष्यांमुळे देवी- देवतांच्या नावावर मोठ्या प्रमाणात थोतांड वाढू लागले. भक्ती व उपासनेच्या नावावर देखील अंधश्रद्धा वाढत होती. यज्ञाचे स्वरूप बिघडून यज्ञामध्ये पशुबळी व नरबळीचेही अनिष्ट प्रकार वाढत चालले होते. दलित, स्त्रिया व बहुजनांना वेद वाचण्याचा व शिकण्याचा अधिकार नव्हता. सामान्य लोकांना केवळ कर्मकांडामध्येच अडकवले गेले होते.

हेही वाचा : महाराष्ट्र हेच माझे कुटुंब, माझी जबाबदारी!

अशा भयावह परिस्थितीत गुजरातच्या जिल्हा मोरवी या गावी १८२४ साली करशनजी तिवारी या जमीनदाराच्या घरी मूळशंकर (दयारामजी) यांचा- म्हणजेच स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म झाला. बालपणीच प्रारंभिक संस्कृत व मंत्रपाठाचे शिक्षण झाले. वयाच्या चौदाव्या वर्षी महादेवाच्या पिंडीवर खेळणाऱ्या उंदराला पाहून मूर्तीपूजेवरील विश्वास उडाला. काही वर्षांतच प्रिय भगिनी व आवडते काका यांच्या निधनामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि हृदयी तीव्र वैराग्य निर्माण झाले. याच जिज्ञासू भावनेतून एके दिवशी खऱ्या ईश्वराचा शोध आणि मृत्यूभयावर विजय या दोन गोष्टींसाठी घरदार सोडले. वाटेत अनेक योगी महात्मे भेटले , पण समाधान काय झाले नाही. निरंतर भ्रमंती व अपार तपश्चर्येतून मथुरा येथे गुरू विरजानंद दंडी या संन्याशाचे दर्शन झाले. त्यांच्याकडून सत्य वेदार्थाची जणू भांडारच खुले झाले. तीन वर्षात विद्या प्राप्त करून दयानंद सरस्वतींनी वेदज्ञानाच्या प्रचार व प्रसारासाठी आपले समग्र आयुष्य वाहिले. देशाटन करीत अनेक पंडितांशी शास्त्रार्थ केले. राजे- महाराजे यांना भेटून वैदिक धर्माची सार्थकता पटवून दिली. गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब इत्यादी प्रांतात फिरून प्रवचने दिली व चर्चा घडवून आणल्या.

महाराष्ट्राशी अतूट संबंध

स्वामीजी व महाराष्ट्राचा संबंध देखील तितकाच ऐतिहासिक आहे. राजधानी मुंबईत आर्य समाजाची स्थापना व तिथे झालेली प्रवचने यामुळे ते मराठी विचारवंतांना सुपरिचित झाले होते. नंतर न्यायमूर्ती म. गो. रानडे, महादेव कुंटे, गणेश जनार्दन आगाशे या प्रतिष्ठित मंडळींच्या आग्रहावरून २० जून १८७५ रोजी स्वामीजी पुण्यात आले. वेताळ पेठेतील शंकर शेठ यांच्या वाड्यात त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. स्वामीजी जवळपास अडीच ते तीन महिने स्वामीजी पुण्यात वास्तव्यास होते. यादरम्यान याच पुण्यनगरीत त्यांची जवळपास ५० व्याख्याने झाली . यापैकी पंधरा व्याख्याने बुधवार पेठेतील तांबड्या जोगेश्वरीजवळच्या भिडेवाड्यात झाली. हिंदी भाषेतून दिलेल्या व्याख्यानांना महादेव कुंटे व जनार्दन आगाशे यांनी अनुवादित करून दररोज प्रसिद्ध केले. काही व्याख्याने महात्मा फुले व न्यायमूर्ती रानडे यांचे स्नेही गंगाराम भाऊ मस्के यांनी लष्कर भागात चालवलेल्या इस्टेट स्ट्रीट वरील मराठी शाळेत झाली. एक व्याख्यान दलित बांधवांच्या आग्रहावरून दिले. यावेळी त्यांनी वेद वाचण्याचा अधिकार सर्वांना असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. शेवटच्या दिवशी स्वामीजींची पुण्याच्या बुधवार पेठेतून हत्तीवरून भलीमोठी मिरवणूक काढण्यात आली. यात महात्मा फुले आपल्या समर्थकांसह सहभागी झाले होते. त्यावेळी पुण्यातील कट्टर सनातनी मंडळींनी या मिरवणुकीस प्रखर विरोध केला होता. रमाबाई रानडे यांनी आपल्या आत्मचरित्रात या मिरवणुकीचा उल्लेख केला आहे.

हेही वाचा : इम्रान खान “प्लेयर ऑफ द मॅच”; लोकांनी तर कौल दिला, आता पाकिस्तानात काय होणार?

वेदविद्या आणि राष्ट्रवाद

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महर्षी दयानंदांनी विशुद्ध वेदार्थासाठी केलेले प्रयत्न. व्याकरण व निरुक्त ग्रंथांच्या आधारे मंत्रांचे यौगिक अर्थ लावून त्यांनी यथार्थ असा विज्ञानवादी व शुद्ध स्वरूपातील वेदार्थ जगासमोर मांडला. वेद हे केवळ धार्मिक व कर्मकांडाचे ग्रंथ नसून त्यात सर्व प्रकारच्या ज्ञान -विज्ञानाचा, सामाजिक, आर्थिक, आध्यात्मिक, राष्ट्रीय यांचा अंतर्भाव आहे, विचारांचा अंतर्भाव आहे, असे दयानंदांनी स्पष्टपणे कथन केले. म्हणूनच स्वामीजींना वेदांचे पुनरुद्धारक मानले जाते.

स्वामी दयानंद हे तितकेच राष्ट्रवादी विचारांचे पुरस्कर्ते होते. स्वराज्य व स्वदेशीचा प्रथम त्यांनीच उद्घोष केला. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीत त्यांच्याविरुद्ध ते तितक्याच निर्भयतेने ‘आपल्या देशात स्वदेशी राज्य यावे’, अशी भूमिका मांडतात. ‘सत्यार्थ प्रकाश’ या आपल्या ग्रंथात ते स्पष्टपणे म्हणतात- “कोणी काही म्हटले तरी ही गोष्ट निर्विवाद आहे की स्वदेशी राज्य असणे हे सर्वात श्रेष्ठ व उत्तम आहे. तेच सुखदायक देखील आहे. मत – मतांतरांचा आग्रह धरणारे पक्षपातरहित प्रजेवर मात्या-पित्यांप्रमाणे कृपा करणारे न्याय व दया यांनी युक्त असे परक्यांचे राज्य असले तरी ते सुखदायक नाही. हा सार्वत्रिक नियम आहे.” आपल्या देशाच्या अधोगतीसाठी स्वामीजी एतद्देशीय राजांच्या आपसातील मतभेद, फूट व यादवीला तसेच आळस, अविद्या व अज्ञान यांना मूलभूत कारण मानतात. जोपर्यंत भारतीयांच्या मनामनांमध्ये रुजलेल्या अंधश्रद्धा व अनिष्ट रूढी परंपरा दूर होणार नाहीत, तोपर्यंत देशाची सर्वांची प्रगती होऊ शकणार नाही, असे स्वामीजींचे स्पष्ट मत होते.

धर्म, मूर्तिपूजा

महर्षी दयानंद हे बुद्धिप्रामाण्यवादी होते. कोणतीही गोष्ट डोळे मिटून किंवा बुद्धीला टाळे ठोकून करणे म्हणजे वेडेपणा आहे. त्यासाठी माणसाने तर्क व बुद्धीच्या आधारे ती तपासून पहावी. नंतरच त्याचे आचरण करावे, असे स्वामीजी सांगत. शुद्ध विज्ञानवादी दृष्टिकोन समोर ठेवून स्वामीजींनी प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान, धार्मिक कर्मकांड व अध्यात्माची योग्य ती चिकित्सा केली. वैदिक आर्ष साहित्यावर पडलेली विसंगत अर्थांची धूळ झटकली. ‘जे तर्कावर आधारलेले व प्राणिमात्रांच्या कल्याणाची प्रेरणा देते, तेच ज्ञान होय. अशा ज्ञानावर आधारलेली कर्तव्यकर्मे म्हणजेच धर्म होय,’ अशी त्यांची धारणा होती. शारीरिक, बौद्धिक, आत्मिक, सामाजिक, राष्ट्रीय व जागतिक उन्नती हेच धर्माचे प्रमुख उद्दिष्ट आहे. इतरांना सुखी करण्यासाठी केले जाणारे सर्व कर्म म्हणजेच धर्म होय. याच्या उलट जे काही असेल ते अधर्म आहे, असे स्वामीजींचे मत होते.

हेही वाचा : परिघावरचे लोक हाच इथल्या राजकारणाचा मुख्य प्रवाह…

‘संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती करणारा परमेश्वर हा धातू व दगडांनी घडवलेल्या जड मूर्तीत कसा येऊ शकतो ? म्हणून मूर्तिपूजा ही मोक्षाकडे जाणारी शिडी नसून भयंकर अशी दरी आहे. कारण मूर्तिपूजेमुळे भारतीय समाजात असंख्य दोष निर्माण झाले. त्यामुळे हा समाज दुबळा बनला. अशा या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा होऊ शकत नाही. कारण परमेश्वर हा तर चेतन, सर्वशक्तिमान, दयाळू, अजन्मा, अनंत, निर्विकार, अनादी, सर्वाधार, सर्वेश्वर ,सर्वज्ञ आहे,’ असे स्वामीजी स्पष्टपणे सांगतात. सर्वांसाठी एकच उपासनापद्धती असून ती शुद्ध आचरण व एकाग्रतापूर्ण ध्यानाने पूर्णत्वास येते. वेदामध्ये मूर्तिपूजेला मुळीच स्थान नाही. यासाठी ते यजुर्वेदाच्या ‘न तस्य प्रतिमाऽस्ति, यस्य नाम महद्यश:।’ या ऋचेचे प्रमाण देतात.

वर्णव्यवस्थेबद्दलची मते

स्वामीजींनी गुण, कर्म, स्वभावावर आधारित वर्णव्यवस्थेचे प्रतिपादन केले आहे. राष्ट्र व समाजाच्या प्रगतीसाठी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र हे चारही वर्ण तितकेच महत्त्वाचे आहेत. पण वर्ण किंवा जाती या जन्मावरुन ठरत नसून त्या त्या व्यक्तीच्या कर्मांवर आधारलेल्या आहेत. ते म्हणतात- जो ब्रह्मतत्व जाणतो, तोच खरा ब्राह्मण ! तसेच जो सात्विक, शुद्ध व पवित्र आचरण ठेवत सतत विद्यादान व प्रबोधनाच्या कार्यात व्यग्र असतो. त्यालाच ब्राह्मण समजावे. जो समाज व राष्ट्राचे रक्षण करतो, दीनदु:खितांची दुःखे दूर करण्यासाठी शौर्य गाजवितो व प्रसंगी प्राणही देतो, तो क्षत्रिय होय. जो देशाची अर्थव्यवस्था चालवण्याकरिता व्यापार, उद्योग, शेती, पशुपालन इत्यादी कार्य करतो, तो वैश्य ! आणि जो मनोभावे कर्तव्यभावनेतून सेवेचे व्रत आचरतो, तो शूद्र होय. हे चार वर्ण म्हणजे राष्ट्ररूप पुरुषाचे क्रमशः मुख, बाहू, मांडी व पाय होत . हे चारही घटक समाज व राष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. जगातील सारे लोक या चार वर्णात विभागले जातात. जे काही प्रचलित मत-पंथ आहेत ते मानवनिर्मित असून धर्म कदापी होऊ शकत नाहीत.

स्वामी दयानंद यांनी सत्याचे मंडन व असत्याचे खंडन केवळ याच उद्देशाने सत्यार्थ प्रकाश, ऋग्वेदादिभाष्यभूमिका, दोन वेदांचे भाष्य, संस्कारविधी, व्यवहारभानू, आर्याभिविनय , आर्याभिविनय, भागवत खंडन, संस्कृतवाक्यप्रबोध, गोकरुणानिधी, वेदांगप्रकाश इत्यादी जवळपास ३० ग्रंथ रचले आहेत. त्यांच्या साहित्यातून मानवाच्या शाश्वत सुखासाठी आवश्यक असणाऱ्या नैतिक मूल्यांचे दर्शन घडते. स्वामीजींचे वाङ्मय हे विश्वातल्या प्रत्येक मानवासाठी मार्गदर्शक स्वरूपाचे आहे . कोणताही भेदभाव त्यात दिसून येत नाही.

हेही वाचा : दिल्लीत आजपासून विश्व पुस्तक मेळा

आपल्या मूल्यात्मक विचारांच्या प्रसार व प्रचारासाठी त्यांनी मुंबई येथे इ.स. १८७५ सांगली ‘आर्य समाज’ या विश्वकल्याणकारी संघटनेची स्थापना केली. या संस्थेच्या दहा नियमांत समग्र मानवाचे उत्थान दडले आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आर्य समाजाने मोठे योगदान दिले आहे. स्वामीजींच्या अनेक शिष्यांनी वेदप्रचार, जातीप्रथा निर्मूलन, गुरुकुल संचालन, डीएव्ही शिक्षण संस्था, योग प्रसार, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती अभियान या कार्यांसह हिंदी सत्याग्रह, गोहत्या बंदी आंदोलन, हैदराबाद स्वातंत्र्यसंग्राम इत्यादी चळवळींतदेखील सहभाग नोंदवला. अशा या थोर युगपुरुषांचे जीवन व कार्य हे व्यक्ती, समाज, राष्ट्र व समग्र जगाच्या सर्वांगीण कल्याणासाठी अतिशय उपकारक असून ते सदैव प्रासंगिक ठरणारे आहेत.

लेखक स्वामी दयानंद जीवनचरित्राचे तसेच वेदांचे अभ्यासक आहेत.

nayankumaracharya222@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharshi dayanand saraswati founder of arya samaj 200 th jayanti life work and four vedas css