प्रकाश मगदूम
३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी हा माणूस रूढ अर्थाने या जगातून गेला, पण तो अजूनही भारतीय जनमानस व्यापून आहे. सिनेमा हे माध्यम त्याला अजिबात आवडले नव्हते. पण त्या माध्यमाचे मात्र आजही त्याच्याशिवाय पान हलत नाही..
तुम्ही विचार करा, एक कृश, दुबळा आणि डोक्यावर केस नसलेला वृद्ध माणूस सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर शोभेल का? तेही शरीरावर खादीच्या कापडाचा जेमतेम एखादा तुकडा असताना? त्याच्या आवाजातही फार दम नाही आणि डोळय़ांवर पंतोजी घालतात तसा गोल काडय़ांचा चष्मा. हे कमी म्हणावे तर चालताना आधारासाठी काठी. सिनेमाच्या झगमगाटी दुनियेत असा म्हातारा कुठल्या तरी एका छोटय़ा भूमिकेत चमकला तरी खूप झाले अशी परिस्थिती. त्याची जमेची म्हणावी अशी एकच बाब ती म्हणजे प्रेमळ डोळे आणि बोळक्या दातांतून सांडणारे तोंड भरून हसू. पण हा म्हातारा काही साधासुधा नव्हता तर ते एक जगावेगळे रसायन होते. म्हणूनच मोहनदास करमचंद गांधी हा माणूस जिवंत असताना त्याच्यावर भरपूर संख्येने न्यूज रील निघाल्या. त्याची छबी टिपण्यासाठी देशोदेशीच्या सिनेमावाल्यांनी आणि छायाचित्रकारांनी गर्दी केली आणि त्याच्या मरणानंतर अजूनपर्यंत त्याच्यावर विविध भाषांत चित्रपट निघताहेत. म्हणूनच ज्यांचे सर्वाधिक फोटो काढले गेलेत आणि सर्वात जास्त चित्रीकरण झालेल्या जगातल्या काही मोजक्या व्यक्तींमध्ये या गांधीबाबाचे नाव घेतले जाते.
असे असूनसुद्धा या सगळय़ा गोष्टींमध्ये एक मोठा विरोधाभास होता. तो म्हणजे ज्या गांधीबाबावर एवढे सगळे चित्रीकरण झाले आणि सिनेमे निघाले, त्याला मुळात चित्रपट नावाचा प्रकारच आवडत नव्हता. वेळ वाया घालवणारे आणि ज्याचा काहीही उपयोग नाही असे हे मनोरंजनाचे माध्यम अशी एक चमत्कारिक समजूत या बाबाने करून घेतली होती. म्हणूनच आपल्या संपूर्ण आयुष्यात त्याने केवळ दोन चित्रपट पाहिले तेही आजारपणात लादलेल्या सक्तीच्या विश्रांतीमध्ये. पहिला इंग्रजी होता. मग आता एक भारतीय भाषेतला पाहा या सहकाऱ्यांच्या आग्रहापुढे मान तुकवून एक हिंदी चित्रपट पाहिला. या दोन्ही चित्रपटांसाठी गांधीबाबा पूर्ण वेळ बसले नाहीत. पैकी इंग्रजी चित्रपटातील अर्धनग्न स्त्रियांची नृत्य-दृश्ये पाहून चित्रपटांविषयी कलुषित झालेले त्यांचे विचार आणखीनच दृढ बनले आणि मग ‘रामराज्य’सारखा आवडीचा विषय असलेला चित्रपट पाहूनसुद्धा ते कधीच बदलले नाहीत.
अशा पद्धतीने सिनेमासारख्या एका नवीन कला आविष्काराला, ज्याला नवीन शतकाची जादूमय देणगी असे अनेकांनी म्हटले, आपल्या नायकाने पूर्णपणे नाकारले. पण या हलत्या-बोलत्या चित्रांची जादू आणि त्याचा जनमानसांवर होणारा परिणाम दुर्लक्षित करता येणार नव्हता. विशेषत: भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये जिथली बहुसंख्य जनता निरक्षर होती, तिथे खेडय़ातल्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी रुपेरी पडदा हे एक वरदानच होते. आणि ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी जो स्वातंत्र्यलढा गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू होता त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी ते एक उत्तम आणि परिणामकारक माध्यम होते. मग दोन अटी घालून गांधींनी यातून मार्ग काढला. एक, फोटो किंवा चित्रीकरण करताना त्यांच्या कामात व्यत्यय आणायचा नाही आणि दुसरे फ्लॅश बल्ब वापरायचा नाही. शिवाय कॅमेऱ्यासाठी पोझ देण्यास त्यांनी कायमच नकार दिला. असा चालताबोलता माणूस या पृथ्वीतलावर होऊन गेला यावर पुढच्या पिढय़ांना विश्वास ठेवणे कठीण जाईल, असे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाइनने यांनी गांधीबद्दल म्हटले आहे. गांधींजींनी दिलेल्या दोन सवलतींचा आदर करून जगभरातल्या अनेक फोटोग्राफर्सनी आणि कॅमेरामननी त्यांचे जे फुटेज उपलब्ध करून ठेवले आहे, ते पाहून त्या विधानाची सत्यता पटेल.
आणखी वाचा – लोकरंग विशेष : गांधी एक अपरिहार्य रहस्य
१९१२ मध्ये गांधी आफ्रिकेत असताना गोपाल कृष्ण गोखले त्यांच्या आमंत्रणावरून तेथे गेले होते. जोहान्सबर्गमध्ये त्यांच्या स्वागत समारंभाची काही दृश्ये चित्रित केली गेली. गांधींचे आणि त्यांचे गुरू गोखले यांचे ते पहिलेवहिले चित्रीकरण होते. तेव्हापासून ते गांधींच्या हत्येपर्यंत त्यांच्यावर अनेक न्यूज रील बनवल्या गेल्या. भारतात परत आल्यानंतर ज्या पद्धतीने गांधींनी काँग्रेस सर्वसमावेशक केली. त्या लोकचळवळीमध्ये असलेले नाटय़ चित्रपट व्यवसायाने अचूक हेरले. गांधींच्या सभेला होणारी गर्दी, अठरापगड जातीधर्माचे लोक, त्यांचे पोशाख, त्यांच्या घोषणा, परदेशी कापडांची होळी, दांडीयात्रेची उत्कंठा वाढवणारी दृश्ये, चले जाव चळवळीतील थरार हा सगळा न्यूज रीलच्या फॉर्मला आवश्यक असा मसाला होता. त्याचबरोबर, गांधींनी चालवलेली समाजसुधारणेच्या मोहिमेमध्येही चित्रपटकर्त्यांना अनेक कथानकांची बीजे सापडली.
अनेक अर्थानी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा प्रवास आणि भारतातील चित्रपट उद्योगाची वाटचाल ही समांतर होती. चित्रपटाचे बदलते तंत्रज्ञानही त्याला अपवाद नव्हते. म्हणूनच मार्च १९१३ मध्ये तोपर्यंत मुका असणारा चित्रपट बोलका झाला. त्याच्या पुढच्याच महिन्यात फॉक्स मुव्हीटोन या जगातील अग्रगण्य स्टुडिओची एक टीम गुजरातमधल्या बोरसाड या आडवळणी गावी बैलगाडीवर सिनेमाची जडसर उपकरणे लादून पोहोचली ती गांधींची मुलाखत चित्रित करण्यासाठी. ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने या घटनेची दखल दुसऱ्याच दिवशी घेतली आणि हॉलीवूडच्या चित्रपट मासिकांनी ‘सिनेमा उद्योगाचा विजय’ असे या मुलाखतीचे वर्णन केले. या महत्त्वाच्या मुलाखतीसाठी चांगल्या हवेशीर आणि प्रकाश असलेल्या जागी बसायचे त्यांनी नाकारले आणि वर आपल्या नेहमीच्या ‘अर्धनग्न फकीर’ वेशात त्यांनी उत्तरे दिली.
महापुरुषांचे चरित्रपट शक्यतो ती व्यक्ती निधन पावल्यानंतरच बनतात. याला गांधी अपवाद ठरले. ते जिवंत असतानाच त्यांच्यावर चरित्रपट निर्माण झाला. लोकांना सिनेमा थिएटरमध्ये आकर्षित करण्यासाठीसुद्धा गांधींच्या नावाचा उपयोग जाहिरातीमध्ये केला गेला. त्यांनी ज्या मूल्यांचा आग्रह धरला अशा ग्रामसुधार, स्त्री कल्याण, विधवा विवाह, स्वच्छता, धार्मिक ऐक्य, हरिजन उद्धार, स्वदेशी इत्यादी अनेक विषयांवर विविध भाषांत चित्रपट झाले. अनेक चित्रपटगीते रचली गेली. गांधींच्या हत्येच्या दुर्दैवी घटनेमध्येसुद्धा काही दिग्दर्शकांना नाटय़मयता जाणवली आणि त्यावर चित्रपट रचले गेले. असे असूनसुद्धा पूर्ण लांबीची फीचर फिल्म व्हायला १९८२ साल उजाडावे लागले. त्याचा दिग्दर्शक होता ब्रिटिश दिग्दर्शक रिचर्ड अॅटनबरो. असा भव्यदिव्य चित्रपट झाला पाहिजे याची मूळ प्रेरणा आणि संकल्पना तत्कालीन सातारा जिल्ह्यात जन्मलेल्या मोतीलाल कोठारी या गांधीप्रेमाने झपाटलेल्या, चित्रपट व्यवसायाशी दुरान्वयेही संबंध नसलेल्या व्यक्तीची होती. त्या चित्रपटाचे भव्य यश पाहायला मात्र कोठारी जिवंत नव्हते.
गांधींच्या चरित्रपटाचे यश पाहिल्यानंतर त्यांच्या समकालीन अनेक सहकाऱ्यांवर आणि स्वातंत्र्याच्या चळवळीत मोलाचा सहभाग असणाऱ्या अनेक नेत्यांवर चित्रपट झाले. अर्थातच त्या त्या नेत्यांवर आणि चरित्र नायकांवर ते होते. या नेत्यांच्या दृष्टिकोनातून गांधी कसे दिसतात हेही लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न झाला. काही वेळा अशा नेत्यांची रुपेरी उंची वाढवण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या टाळय़ा मिळवण्यासाठी हेतुपुरस्सर संवादरचना करून गांधींना कमी लेखण्याचा प्रयत्न कलात्मक स्वातंत्र्य या नावाखाली खपवला गेला. गांधी ही काय वल्ली होती त्याची नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी काही दिग्दर्शकांनी आपल्या चतुर कथानकांमध्ये या म्हाताऱ्याला वर्तमान काळात आणले. अशा वेळी गांधी केवळ उपदेश करणारा कर्मठ म्हातारा न राहता एक लोभस आजोबा बनून आला आणि त्याने सध्याच्या तरुणाईच्या भाषेत संवाद साधला. वर्तमान काळात गांधी असते तर काय या प्रश्नाने काही दिग्दर्शकांना खुणावले आणि मग सध्याच्या भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांना गांधी कसे सामोरे गेले असते ही फँटसी घेऊन कथा सादर झाल्या.
आणखी वाचा – चतु:सूत्र : गांधीजींच्या जनआंदोलनांमागील भूमिका
२०१९ मध्ये गांधींच्या जन्माला १५० वर्षे पूर्ण झाली तेव्हा अनेकानेक कार्यक्रम देशभर आणि जगभर झाले. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या माध्यमातून आम्ही काही कार्यक्रम केले. त्या सुमारास गांधी आणि चित्रपट या विरोधाभासाने भरलेल्या विषयामध्ये एक नाटय़पूर्ण गोष्ट दडलेली आहे असे मला जाणवले. करोनाच्या लाटेत थोडासा विसावा आणि चिंतन करण्यासाठी अवकाश लाभला आणि सिनेमा न आवडणाऱ्या या माणसावर चित्रपटसृष्टीने इतका का जीव लावला हा शोध घेता घेता त्याचे एक पुस्तक झाले. सिनेमा न आवडूनसुद्धा आपल्या सिनेमाचा गांधी हा कसा एक अविभाज्य घटक होता, आहे आणि राहील याची ही मनोरंजक गोष्ट आहे.
दोन गोष्टी याची साक्ष देतात. एक तर, चित्रपट पाहायला जाणारे प्रेक्षक ज्या वेळी तिकीट खरेदी करतात त्या वेळी गांधींचा फोटो असलेली नोट देऊन तिकीट खरेदी करतात. ज्या आनंदाची अनुभूती घेण्यासाठी गांधींचे चित्र असलेल्या नोटेचा वापर होतो, तो अनुभव गांधींनी जाणूनबुजून नाकारला होता. दुसरे म्हणजे ज्या भारतीय चित्रपटांत न्यायालयाचा एक तरी सीन असतो त्यात न्यायाधीशाच्या मागच्या भिंतीवर गांधींचा फोटो असतो. आपण मानले की चित्रपट हा समाजाचा आरसा असतो, तर त्या न्यायाने एक राष्ट्र म्हणून आतापर्यंत भारताची संकल्पना घडवण्याची किंवा बिघडवण्याची अनेक दृश्ये अशा कोर्टकचेरीत रोज घडत असतात. आपल्या प्रसिद्ध अशा गोल काडय़ांच्या चष्म्यातून पाहणारे गांधी त्याला कायम साक्षी असतात. म्हणूनच जोपर्यंत आपल्या देशात सिनेमा बनत राहील तोपर्यंत गांधी त्याचा एक भाग असतीलच असतील. गांधींवर आतापर्यंत हजारो पुस्तके लिहिली गेलीत आणि लिहिली जातील. आता नवीन काय शोधायचे आणि नवीन काय लिहायचे असा प्रश्न या माणसाबाबत संभवत नाही. म्हणूनच या जगावेगळय़ा माणसाकडे सिनेमाच्या चष्म्यातून पाहण्याचा हा प्रयत्न.
लेखक सरकारी अधिकारी आहेत.
prakashmagdum@gmail.com