डॉ. राजीव जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘गीता प्रेस गोरखपूर’ या संस्थेला यंदाचा (२०२३) ‘गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर झाला आहे. [गांधीविचार पटल्यामुळे अहिंसेच्या मार्गास लागलेले दक्षिण आफ्रिकेचे नेते नेल्सन मंडेला हे या पुरस्काराचे पहिले विजेते होते आणि ‘मोदी-काळा’त रामकृष्ण मिशननेही हा पुरस्कार मिळवला, तेव्हा गांधीविचाराशी संबंध असलाच पाहिजे असे काही नाही, शांततेसाठी केलेले काम पुरेसे आहे, अशी भलामण करण्यात आली होती. या वादात येथे न पडणे बरे.] पण गीता प्रेस आणि आजचे ‘सनातन धर्मा’चा कैवार घेणारे हिंदूत्व यांचा संबंध जवळचा आहे. अशा विद्वेषी वृत्तीची जडणघडण कोणत्या मुशीत घडली ते समजण्यासाठी  अक्षय मुकुल यांनी परिश्रमपूर्वक ग्रथित केलेल्या ‘गीता प्रेस अ‍ॅण्ड द मेकिंग ऑफ हिंदू इंडिया’इतका दुसरा माहितीपूर्ण ग्रंथ मला तरी माहिती नाही.

हिंदू धर्मातील सुधारणांचे प्रयत्न ब्राह्मो समाज (१८२८) आणि आर्य समाज (१८७५) इत्यादींनी केले, परंतु हा एकमेव प्रवाह नव्हता. १९१९-२४ मधील खिलाफतचे लांगूलचालन, १९२१ मधील मोपल्यांचे अत्याचार इ.मुळे संघटित सनातन धर्माचेसुद्धा आकर्षण वाढले. जयदयाल गोयंदका आणि हनुमान प्रसाद (भाईजी) पोद्दार यांनी ‘गीता प्रेस’ आणि ‘कल्याण’ मासिक यातून जे परिश्रम केले, त्याचा मुकुल यांनी अभ्यास केला आहे. मुकुल यांनी दिवसरात्र एक करून इतिहास धुंडाळला तो असा:  गोयंदका प्रामाणिक व्यापारी होते. पोद्दार यांच्या सर्व उपक्रमाला गोयंदका यांनी संपूर्ण साथ दिली. कामाच्या वेळेनंतर ‘गोबिंद भवन’मधील गोयंदका यांच्या खोलीत १९२२ पासून छोटय़ाशा गटातील गीतापठण आणि इतर धार्मिक चर्चेतून हा पसारा उदयास आला. १९२३ मध्ये कलकत्ता येथे नोंदणी झालेल्या गीता प्रेसचा पसारा नंतर गोरखपूरला गेला. अनेक पुस्तके प्रकाशित झाली, हिंदी ‘कल्याण’चा खप दोन लाखांच्या घरात आणि इंग्रजी ‘कल्याण-कल्पतरू’चा खप एक लाखाच्या घरात आहे, या दोघांच्या मृत्यूनंतरसुद्धा त्यात खंड नाही. धर्मविचारांबद्दल इतर नियतकालिकांतही चर्चा झाल्या तरी बहुतेक सर्व निष्प्रभ झाली, कित्येक अल्पावधीतच लुप्त झाली. यामुळे ‘कल्याण’ आणि ‘गीता प्रेस’ची नोंद २०१४ पूर्वीच घेणे मुकुल यांना आवश्यक वाटले आणि ऑगस्ट २०१५ मध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले.

उर्दू शिक्षण हे हिंदू संस्कृतीच्या विरोधात असल्याचे पोद्दार यांचे वयाच्या सातव्या वर्षीच मत झाले. वयाच्या १२ वर्षी कलकत्ता येथे व्यापाराचे आणि विशेषत: सनातनी धार्मिक विचारांचे संस्कार घट्ट झाले. क्रांतिकारकांसह काम करताना त्यांना अटक झाली, ते दूरच्या गावी स्थानबद्ध झाले, एकटेपणात गीता, देव यांचा प्रभाव वाढला. मुंबईला आल्यानंतर भजन इत्यादी चालूच राहिले. व्यापार इत्यादीत मारवाडी समाजाच्या मान्यवरांशी संपर्क झाला. ‘गीता प्रेस’, ‘कल्याण’ मासिक आणि इतर कामांमुळे तो वृद्धिंगत झाला. अस्पृश्यतेचे पालन करणे, विधवांच्या पुनर्विवाहाला विरोध करणे हे त्यांच्या सनातनतेचे निकष होते. पारंपरिक ‘शास्त्रे’ आणि आधुनिक विज्ञानाच्या आभासातून ते अस्पृश्यतेचे समर्थन करीत. ‘पूर्वसंचितामुळे त्यांची शरीरे अपवित्र झाली’ (पुस्तकातील पृष्ठ २७०), ‘पिढय़ान्-पिढय़ा घाणीचे काम केल्यामुळे त्यांच्या शरीरात जंतूंचा शिरकाव होऊन जीवशास्त्रीय बदल झाले’ (पृ. २६९) असे त्यांचे मत होते. अस्पृश्य किंवा मुसलमान यांच्या स्पर्शाने अपवित्र होण्याची शक्यता असल्यामुळे (पृ. ८०) बाहेरचे अन्न (उदा. पाव) खाण्यास त्यांचा विरोध होता. डॉ. आंबेडकरांवर ‘हीन वर्णा’चे म्हणून विखारी टीका केली (पृ.  २२), त्यांनी हिंदू कोड बिल आणल्याने अधिकच कठोर टीका (पृ. २५९) पोद्दार यांनी केली.

महात्मा गांधींशी पोद्दार यांचे पूर्वी अत्यंत जवळचे संबंध होते तरीही पुढे पुणे करार (पृ. ५२), मंदिरप्रवेश (पृ. १७४), तसेच मुसलमानांबाबतची भूमिका (पृ. १७५) यावरून त्यांच्यात तीव्र मतभेद झाले. ‘मरणान्ते वैराणि’ हे तत्त्व पंचम जॉर्ज, मोतीलाल आणि जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर पोद्दार यांनी पाळले (पृ. १५४), परंतु गांधींच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालेल्या फेब्रुवारी आणि मार्च १९४८च्या अंकात ‘कल्याण’मध्ये गांधींचा ओझरता उल्लेखही आढळत नाही (पृ. ५८).

 स्त्रियांबाबत पोद्दार यांची भूमिका प्रतिगामी होती. ‘हिंदू सामाजिक व्यवस्थेत स्त्रिया परावलंबी असल्यामुळे’ विभक्त होणाऱ्या स्त्रियांना कोणतीही भरपाई देण्यास त्यांचा सक्त विरोध आहे (पृ. २५८), स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध होता (पृ. ३५१), आनंदीबाई जोशींच्या परिचयात साडी परिधान करणे, बांगडय़ा, कुंकू लावणे, देवादिकांचे फोटो वापरणे (पृ. ३५७) फक्त याचाच उल्लेख आहे. पोद्दार यांच्या जन्माची दैवी भविष्यवाणी झाली असल्याचे, पोद्दार यांना साक्षात्कार होत असल्याचे दावे करून त्यांच्याभोवती गीता प्रेसने वलय निर्माण केले. मंत्रोच्चार विभाग सुरू करणे (पृ. १०६), पुराणे, महाभारत इत्यादीच्या कथा-नाटकांमधून रामचरितमानसाच्या पारायणातून भक्तिभाव रुजविणे (पृ. १९), गीता, रामायण इत्यादी पाठ आयोजित करणे (पृ. २०), आणि जपजाप्यातून आरोग्य, संपत्ती, इतर भौतिक समस्यांवर तात्काळ उपाय मिळेल यातून भक्तिभाव आणि निष्ठा वाढविणे (पृ. २२९) इत्यादीतून एका आंधळय़ा भक्तीचा पंथ करण्याचे प्रयत्न दिसतात. ‘गीतेमुळे नाझी प्रभावित झाले’ अशी माहिती (पृ. १२६) पुस्तकात आहे.

हिंदू राष्ट्र व्हावे, मुसलमानांना लष्कर किंवा वरिष्ठ दर्जाच्या नोकऱ्यांत स्थान नसावे (पृ. २५४), संघबळ वाढावे (पृ. १०२), हिंदूंची भाषा म्हणून हिंदीचा वापर व्हावा (पृ. ३), सनातन हिंदू धर्म वाढावा (पृ. २२९) ही त्यांची राष्ट्रीयत्वाची कल्पना होती. प्रत्येक बाब (उदा. हिंदी विरुद्ध उर्दू वाद, हिंदू मुलींना वारसा हक्क) हिंदू विरुद्ध मुसलमान याच दृष्टिकोनातून बघितली. लेखांमध्ये मुसलमानांविषयी तिरस्कारयुक्त भडक शब्दांचा वापर (पृ. २३५), आणि त्यांच्याबाबत तीव्र संताप (पृ. २३७), खोटय़ा अत्याचारांचे वर्णन (पृ. २३६) असे दिसते. अर्थात कधीकधी दोलायमान भूमिकाही घेतली. हिंदू-मुसलमान एकतेचा पुरस्कार, सांप्रदायिक एकतेचा आग्रह, सर्व एकाच देवाची मुले आहेत असा उल्लेख हेसुद्धा आढळते (पृ. २३६, २३७, २४१).

मुस्लीम हे ‘परके’ आहेत, ‘विषयासक्त’ आहेत, त्यांच्यापासून हिंदू स्त्रियांचे रक्षण केले पाहिजे (पृ. २९) असा प्रचार झाला. मुसलमानांच्या कथित आसक्तीबद्दल आक्षेप घेणारे पोद्दार, उच्चभ्रू समाजात सिफिलिसचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर असण्याबद्दल अवाक्षर काढत नाहीत. उलट ‘‘एका डालमिया यांचा स्वैराचार ही देवाची इच्छा आहे, लवकरच ते वर्तन सुधारेल’’ (पृ. ६२) असे सांभाळून घेणे दिसते. त्यांच्या गोबिंद भवनमध्ये सेक्स स्कँडल झाले ते लक्षात येऊनही त्याकडे दुर्लक्ष झाले, पोलिसात तक्रारच झाली नाही (पृ. ११६ ते ११८), असा दुट्टपीपणा होता.

हिंदू समाज एक दिसावा म्हणावे म्हणून गीता प्रेसने अनेक विवाद झाकले. पुराण इत्यादीतून भक्तीचा प्रसार होतो, पण वेदवाङ्मयाकडे दुर्लक्ष केले (पृ. १९), वेदांती वाङ्मयातील विचार मांडताना श्रुति आणि स्मृति यांच्यातील मतभेदांची चर्चाच केली नाही (पृ. १६९), हिंदू महासभा आणि आर्य समाज यांचे अस्पृश्यता इत्यादी सुधारणांचे कार्यक्रम याबाबत मतभिन्नता स्पष्ट असूनसुद्धा वैचारिक संघर्ष टाळला गेला (पृ. २२९-२३०), बौद्ध, जैन आणि शीख नेत्यांशी मतभेद होऊ दिले नाहीत (पृ. २३३), ‘चांद’ किंवा ‘हिंदू पंच’ यांनी परकीय सत्तेच्या विरोधात भूमिका घेतली, पण ‘कल्याण’ने सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेतले (पृ. ३९०) अशी वृत्ती होती.

पोद्दार यांचे (नेहरू पिता-पुत्र वगळता) विविध स्तरांतील मान्यवरांशी घनिष्ठ संबंध होते (पृ. १५४), बहुतेकांना हिंदू विचारांचे आकर्षणही होते. गीता प्रेससाठी पंडित नेहरूंनी तर अल्पसा औपचारिक संदेश देण्यासही नकार दिला (पृ. १८०). गीता सोसायटीच्या कामात नेते, उद्योगपती, कुलगुरू, न्यायाधीश, विचारवंत यांचा सहभाग होता (पृ. १२५), ‘भारतीय चतुर्धाम वेद भवन ट्रस्ट’मध्ये काँग्रेस, हिंदू महासभा नेते, उद्योगपती, गव्हर्नर आदींचा पोद्दार यांच्याशी संपर्क झाला. राजेंद्रप्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील ऑल इंडिया कल्चरल अकॅडमीच्या १९५१च्या परिषदेत त्यांना सरकारने आमंत्रित केले होते. ‘गांधी आणि गीता’ यांच्यावर माहितीपट काढण्यासाठी त्यांना उप-पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी १९६९ मध्ये निमंत्रित केले (पृ. १२९), पोद्दार यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट काढण्याचा निर्णयही १९९२ मध्ये पंतप्रधान नरसिंह राव यांनी घेतला होता. डालमिया आणि जैन यांच्या अटकेबाबत (पृ. ६५), आणि मोहनलाल गोयंदका यांच्या अटकेबाबत (पृ. ९५), रदबदली करण्यासाठी १९६४ साली पंतप्रधान शास्त्री यांच्या भेटीची परवानगी मिळाली.

महात्मा गांधींच्या हत्येसंबंधात अटक झालेल्या २५,००० लोकांमध्ये पोद्दार आणि गोयंदका यांचाही समावेश होता. परंतु ‘तुमच्या नावे अटक वॉरंट निघण्याची शक्यता आहे, तुम्ही शहरात येऊ नका’ अशी सावधगिरीची सूचना पोद्दार यांना गोरखपूरच्या जिल्हा मॅजिस्ट्रेटनी खुद्द दिली होती (पृ. ५८).  १९३० च्या सुमारास, अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशाबाबत मुंबईत देवळातील मतपेटय़ांत २४,९७९ सवर्णानी प्रवेशाच्या बाजूने कौल दिला, फक्त ४४५ सवर्ण विरोधात होते (पृ. ५३). म्हणजे, ‘सनातन’ धर्मविचाराला जनाधार तेव्हापासूनच नव्हता. मात्र गीता प्रेस आणि ‘कल्याण’ या सनातनी विचारांचा प्रभाव आजही दिसू शकतो आहे. दलितांविषयी परकेपणा, राखीव जागांना विरोध, पाश्चिमात्य विकासापेक्षा सनातनी विचार पुढे आणणे असे प्रयत्न होतात; पण व्यवहाराचे, राजकीय गणिताचे भान येताच माघार घ्यावी लागते. अर्थात, धर्माधिष्ठित असो किंवा भाषिक/प्रादेशिक असो, ब्राह्मणी असो किंवा अ-ब्राह्मणी असो, मानवी प्रगतीत भावनाधिष्ठित राजकारण अडथळाच आणते. ‘‘काय व्हायला आवडेल आणि काय घडवून आणता येईल’’, यातील अंतर उमजण्यास सनातनी विचारांच्या मुशीत घडलेल्यांना विलंब लागल्यामुळे असेल, असहिष्णुतेविरुद्ध बोलण्यास बरीच खळखळ केली; पण मोदींना शेवटी सहिष्णुतेचा मुखवटा चढवावा लागला आहे.

(डॉ. राजीव जोशी यांनी हे दीर्घ टिपण ऑक्टोबर २०१५ मध्येच लिहिले होते. येथे ते संपादित करण्यात आले आहे.)