देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईमध्ये शिवसेनेचा दबदबा होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावला आणि शिवसेनेची दोन शकले झाली. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत ३९ आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. मात्र उरलेल्या शिलेदारांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे खिंड लढवत राहिले. लोकसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पारड्यात मतदारांनी भरभरून मते टाकली, परंतु विधानसभा निवडणुकीत हे यश महाविकास आघाडीला टिकवता आले नाही. महायुतीने जाहीर केलेल्या लाडकी बहीणसारख्या योजना आणि प्रचारादरम्यान केलेल्या बटेंगे तो कटेंगे, एक हैं, तो सेफ हैं या घोषणा समाजमनावर परिणाम करून गेले. त्याचे पडसाद मुंबईतही उमटले. मुंबईतील ३६ पैकी २२ जागा जिंकून महायुतीने निर्विवाद यश प्राप्त केले. महाविकास आघाडीला १४ जागा मिळाल्या आहेत.
जागतिक पातळीवर मानाचे स्थान असलेल्या मुंबईमध्ये आजघडीला अनेक समस्या भेडसावत आहेत. वातावरण बदलामुळे आरोग्याचे प्रश्न गंभीर ठरू लागले आहेत. वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध पाणीसाठा यातील व्यस्त प्रमाण, पिण्याच्या पाण्याचे मर्यादित स्राोत, कचराभूमींचा गंभीर प्रश्न, मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचा रखडलेला पुनर्विकास, खोळंबलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना, रोजगाराच्या मर्यादित संधी असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांना भेडसावत आहेत. मुंबईमध्ये पायाभूत सुविधांचे अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मात्र त्या अनुषंगाने भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यात राजकारणी अपयशी ठरत आहेत. मोठा गाजावाजा करीत ‘मेट्रो ३’ प्रकल्पातील बीकेसी-आरे दरम्यानचा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला. मात्र सुविधांचा अभाव असतानाच हा टप्पा वाहतूक सेवेत घाईघाईने दाखल झाला. तशीच गत मुंबई सागरी किनारा मार्ग प्रकल्पाची झाली. हे प्रकल्प थोड्याशा पावसातही ‘गळके’ ठरले. या सर्व मुद्द्यांवर महाविकास आघाडीतील नेत्यांना महायुतीला घेरता आले नाही. प्रचारादरम्यान केवळ धारावी पुनर्वसन प्रकल्पावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. उर्वरित प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांचे अपयश मतदारांपुढे मांडण्यात महाविकास आघाडी अपयशी ठरली.
हेही वाचा : तेव्हा कसोटी खेळणाऱ्याला प्रतिदिन ५० रुपये मिळत… आठवणी एका ज्येष्ठ कसोटीपटूच्या
किंबहुना महाविकास आघाडीतील बडे नेते मुंबईमध्ये प्रचार करण्यात कमी पडले. मुंबईमधील प्रचार केवळ दुसऱ्या फळीतील नेत्यांवर सोपवून तिन्ही पक्षांतील नेत्यांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले होते. त्याचाही परिणाम निकालावर दिसून आला. त्याचबरोबर एक हैं तो सेफ हैं आणि बटेंगे तो कटेंगे या भाजपच्या घोषणांचाही जनमानसावर परिणाम झाला. त्याचाही परिणाम शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पराभवावर झाला.
मुंबईच्या एका टोकाला असलेला कुलाबा विधानसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु शिवसेना-भाजप युती असतानाच काँग्रेसला आपला गड सांभाळता आला नाही. आता हाच मतदारसंघ राहुल नार्वेकर यांचा बालेकिल्ला म्हणून भाजपने काबीज केला आहे. काँग्रेसचा गड असलेला मलबार हिल मतदारसंघ एकेकाळी शिवसेनेने मित्रपक्ष भाजपसाठी सोडला आणि आता या मतदारसंघात भाजपला जणू अढळपद मिळालेले आहे. उत्तर मुंबईमधील एकेका मतदारसंघात भाजपने आपले स्थान बळकट केले आणि अंतर्गत कलहामुळे शिवसेना दुबळी होत गेली. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपने मुंबईतील एकेक मतदारसंघ काबीज करीत तेथे बस्तान मांडले. तेथे कार्यकर्त्यांची फळीही उभी केली. शिवसेनेची शकले झाल्यानंतर मुंबईतील काही आमदारांनी एकनाथ शिंदेंना साथ देण्यासाठी उद्धव ठाकरे यांना अखेरचा जय महाराष्ट्र केला. परंतु त्या त्या मतदारसंघात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाला आपले स्थान बळकट करता आले नाही. त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीच्या निकालावर उमटले.
हेही वाचा : ‘लाडकी बहीण’ला प्रत्युत्तर देण्याला अडथळा कोणाचा?
परिणामी मुंबईत भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. सर्वाधिक १५ जागा भाजपने जिंकल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या सहा तर अजित पवार गटाची एक जागा निवडून आली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे १० जण निवडून आल. काँग्रेस ३ तर समाजवादी पार्टीची एक जागा निवडून आली.
देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नजीकच्या काळात होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर मुंबई महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत मिळालेले संख्याबळ राखणेही शिवसेनेला (उद्धव ठाकरे) अवघड ठरू शकते. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा मुंबई महानगरपालिकेत काढता यावा या दृष्टीने शिवसेनेला (उद्धव ठाकरे) प्रयत्न करावे लागणार आहेत. विधानसभेचा मुंबईतला निकाल ठाकरे गटासाठी धोक्याचा इशारा आहे.
prasad.raokar@expressindia.com