‘चंद्रयान-३’ मोहिमेची महती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) प्रकाशित केलेल्या पुस्तिकेत देवी-देवतांच्या रथांपासून ते रावणाच्या पुष्पक विमानापर्यंत अनेक ‘शोधां’चा उल्लेख करणे हे अशा ‘शोधमालिके’तील आणखी एक पुष्प म्हणावे लागेल. कारण गेल्या काही वर्षांत अशाप्रकारचे अनेक दावे करण्यात आले आहेत. २०१४ नंतर केंद्र सरकारच्या नेत्यांकडून आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये गणपतीच्या प्लास्टिक सर्जरीची भलामण केली गेली. नंतर डार्विनचा सिद्धांत नाकारला गेला. त्याचप्रमाणे नुकताच करण्यात आलेला विनोद म्हणजे डार्विनच्या आणि आईन्स्टाईनच्या सिद्धांताला न्यायालयात दिलेले आव्हान! न्यायालयाने अर्थातच ते फेटाळले, हे चांगलेच झाले. निदान न्यायालय तरी अद्याप सुज्ञ आहे. तेव्हा या पद्धतीची वक्तव्ये ऐकण्याची आताशा सवय झाल्यामुळे अशा बातम्यांचे आश्चर्यही वाटेनासे झाले आहे.
प्राचीन भारत वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत असण्याला कोणाची हरकत असण्याचे काहीही कारण नाही. अशी वस्तुस्थिती असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. प्रत्येक भारतीय माणसासाठी तर अभिमानास्पद! पण प्रश्न खणखणीत पुराव्याचा आहे. नाकारता येणार नाही असा पुरावा… जगातली कोणतीही वैज्ञानिक संस्था आणि वैज्ञानिक नाकारूच शकणार नाही असा पुरावा! असा पुरावा म्हणजे परिवाराशी संलग्न असलेल्या वैज्ञानिकांची भाषणे नव्हेत, की दावे नव्हेत. तेथे हवे प्रात्यक्षिक… फक्त आणि फक्त प्रात्यक्षिक! सत्ता आहे तुमच्याकडे, प्राचीन भारताच्या वैज्ञानिक प्रगतीविषयी तुम्ही जे दावे करत आहात ते प्रात्यक्षिकाने सिद्ध करण्यासाठी लावा वैज्ञानिकांची फौज कामाला. द्या त्यांना भरपूर निधी. करू देत त्यांना पुष्पक विमानाची निर्मिती. दाखवू देत त्यांनी जगाला गणपतीची अवयव रोपणाची शस्त्रक्रिया भारतीय वैज्ञानिकांनी कशी केली ते. दाखवू देत त्यांना तिचेही प्रात्यक्षिक. पाठवा एखाद्याला सूक्ष्म देहाने चंद्रावर नाहीतर मंगळावर. होऊन जाऊ देत सिद्ध भारतीयांची परग्रह प्रवासाची क्षमता! कारण प्रश्न खणखणीत पुराव्याचा आहे. फक्त आणि फक्त प्रात्यक्षिकाचा! आहे तयारी?
हेही वाचा : बिहारची जातीय जनगणना राजकीय बदल घडवू शकेल ?
पक्ष्यांकडे पाहून त्यांच्यासारखीच आकाशात उड्डाण करण्याची इच्छा माणसाला पुराणकाळीही होतीच. पण तंत्र अवगत नव्हते, म्हणून अनेक कवी आणि लेखकांनी आपल्या कल्पनाशक्तीने विमानोड्डाण केले आणि मौखिक परंपरेमुळे कालांतराने ते लोकांना खरे वाटू लागले. रामायण सर्वांत जुने महाकाव्य असले तरी तो भारताचा इतिहासच आहे, असे सामान्यजन समजत असल्यामुळे लोकांचा त्यावर विश्वास बसला. विषय अंगाशी आला म्हणजे एका बाजूने ही ‘पुराणातील वानगी’ आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करा, असे सावाचा आव आणून सांगायचे आणि दुसरीकडे त्याच वानग्यांना विज्ञानाचा संदर्भ लावून त्यांचा एनसीईआरटीने अवांतर वाचनासाठी प्रकाशित केलेल्या पुस्तिकेत प्राचीन भारतीयांची विज्ञान भरारी म्हणून उल्लेख करायचा आणि विद्यार्थ्यांना भ्रमित करायचे, हा तर दुटप्पीपणा झाला.
हेही वाचा : नितीश राजकारणाची दिशा बदलतील?
दुसरे असे की, जसे शुल्ब, कणाद, भास्कराचार्य, आर्यभट, वराहमिहीर, चरक, ब्रह्मगुप्त इ. यांच्या अभ्यासाचे उत्खननात पुरातत्व लिखित पुरावे सापडले तसेच विमान वा अस्त्रे वा संजयाची दिव्य दृष्टी म्हणजेच आजचे दूरदर्शन या संबंधीचे पुरावे सापडायला हवे होते. त्या पुराव्यांमुळे उपरोल्लेखित ऋषींची विद्वात्ता मान्य करता येते, पण महाकाव्यातील कल्पनांना वैज्ञानिक मान्यता देता येत नाही. तेव्हा आतातरी आपण सूतावरून स्वर्ग गाठण्याचा आतताईपणा न करता आणि पूर्वजांचे वृथा गोडवे न गाता अथक परिश्रम करून संशोधन क्षेत्राकडे वळणे गरजेचे आहे, पण अजूनही आपण अमेरिकेत आणि इतर देशांत गलेलठ्ठ पगाराच्या आमिषाने उच्चभ्रू कामगार म्हणूनच रुजू होत असतो. हे दुर्दैवी आहे. संशोधन करून मोबाईलचा शोध त्यांनी लावावा आणि आम्ही फक्त पूर्वजांचा अभिमान बाळगत त्याच मोबाईलवरून पाश्चात्यांना तुच्छ लेखावे, एवढेच आमची धाव असते. हे आता बदलणे गरजेचे वाटत नाही काय?
हेही वाचा : पाकिस्तानात शरीफ परतले, भारताबद्दल बोलूही लागले, याचा आखाती देशांशी काय संबंध?
गांधारीच्या १०१ मुलांचा संबंध टेस्टट्यूब बेबीशी कुठलाही संदर्भ उपलब्ध नसताना जोडणे याला पोरकटपणा म्हणतात. म्हणजे विज्ञानात दस्तऐवजीकरणाला महत्व असते. तेव्हढ्याच पुरातन काळातील ग्रीक संस्कृतीमध्ये भूमिती आणि विज्ञानाचे संदर्भ सापडू शकतात, पण आपल्याकडे मात्र तसे संदर्भ सापडत नाही. कारण त्या आहेत फक्त कवी कल्पनाच! त्यालाच आम्ही विज्ञान समजतो. कारण ते आपले भावविश्व कुरवळणारे असते. बरे, प्राचीन काळात आम्हाला हे आधुनिक शोध माहीत होते, ते संदर्भ पाश्चात्यांनी पळवून आपल्याच नावावर खापवले असे जर भक्तांना वाटत असेल, तर आता केंद्रात आणि बव्हंशी राज्यात हिंदुत्ववादीच सरकार असल्यामुळे त्यांनी तीन-चार हजार कोटींचा निधी विजय भाटकर वा दीनानाथ बात्रांसारख्या संशोधकांना उपलब्ध करून द्यावा, म्हणजे ते या प्राचीन ग्रंथांतील शोधांचे पुरावे शोधून काढतील. त्यातील तांत्रिक माहिती देऊन ते प्रयोग सिद्ध करतील. नुसताच उल्लेख करून दावे करण्यापेक्षा अशा प्रकारची माहिती जर पुस्तकांतून दिली तर ती विद्यार्थ्यांना ज्ञान वाढविण्यास उपयोगी पडणे शक्य नाही. तेव्हा पूर्वजांचा फुकाचा पोकळ डिंडीम बडवण्यापेक्षा झेलावेच त्यांनी हे आव्हान!