चेतन शिंदे
काँग्रेसला विशेषत: २०१९ नंतर चोहोबाजूंनी खिंडीत पकडून, पक्षाचे नेते, समर्थक खऱ्या-खोट्या आरोपाखाली तुरुंगात डांबले जात असताना; गांधी परिवाराची हेटाळणी केली जात असताना; सातत्याने वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये पराभूत होत असलेल्या काँग्रेसचे सर्वार्थाने मनोबल खचलेले असताना; काँग्रेसमध्ये उच्च पदे मिळवलेले उच्च जातीतील नेते काँग्रेस सोडून जात असताना; देशात जातीयवाद, प्रांतवाद, मूलतत्त्ववादी शक्ती प्रचंड वेगात वाढत असताना; धर्मवादी, मनुवादी विचारांना प्राधान्य मिळत असताना थोडक्यात अत्यंत नकारात्मक परिस्थितीत मल्लिकार्जुन खरगे लोकशाही मार्गाने काँग्रेसचे अध्यक्ष झाले. राजकीय भवताल संघर्ष आणि आव्हानांनी भरलेला असताना, दैवी अवतार पुरुषांच्या पक्षाला देश केवळ काँग्रेसमुक्तच नव्हे, तर विरोधी पक्षमुक्त करायचा असताना ते विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून पुढे आले आणि त्यांनी आपल्या ५३ वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय, सामाजिक, प्रशासकीय अनुभवाच्या बळावर अफाट बुद्धी कौशल्याने, योग्य समन्वयाने त्यांनी काँग्रेसला नवसंजीवनी दिली. काँग्रेस घराणेशाहीत अडकली अशी चर्चा केली जात असताना १३८ वर्षांची पार्श्वभूमी असलेल्या पक्षाने खरगे यांच्यासारख्या दलित समाजातून पुढे आलेल्या नेत्याला पक्षाध्यक्ष बनवणे, ही काँग्रेससाठी नवचैतन्याची बाब ठरली आहे.
खरगेंनी पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अर्ज भरतानाच आपल्या सर्वसमावेश नेतृत्वाची, संवाद आणि समन्वयाची झलक दाखवली. काँग्रेस पक्षाच्या निर्नायकी अवस्थेत जी-२३ नावाने उदयास आलेल्या गटातील अनेक नेते खरगे अध्यक्षपदाचा अर्ज भरताना उपस्थित राहिले आणि काँग्रेस एकसंध असल्याचा संदेश देण्यात खरगे यशस्वी झाले. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे गृहराज्य हिमाचल प्रदेशात सत्ता मिळवली. हिंदुत्वाची प्रयोगशाळा ठरू पाहणाऱ्या कर्नाटकात अत्यंत कौशल्याने भाजपचा दारुण पराभव केला. डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यातील मोठी दरी बुजवून काँग्रेस एकसंध ठेवून सत्ता मिळवली. तेलंगणात सत्ता मिळवली. वेळप्रसंगी पक्ष संघटनेतील नेतृत्वात बदल केले. काँग्रेस विविध राज्यांमध्ये पराभूत होत असताना अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेऊन राज्यात सत्ता मिळवून आपण जिंकू शकतो, समन्वयाने, एकोप्याने आपण भाजपचा पराभव करू शकतो, हा दुर्दम्य आत्मविश्वास काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यांच्यात पेरला. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’ला पाठबळ मिळत असताना संघटना बांधली. काँग्रेस सामाजिकदृष्ट्या बदलली असून ती नवे बदल करून घ्यायला तयार असल्याचे छत्तीसगड येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात खरगेंनी दाखवून दिले. त्याच अधिवेशनात तरुणांना संधी देण्याचे, सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना सत्तेत भागीदारी देण्याचे, ५० टक्के आरक्षणासारखे अनेक ऐतिहासिक ठराव केले. संघटनात्मक फेरबदल केले. नेत्यांची, कार्यकर्त्यांची बाजू ऐकून घेतली. योग्य वेळी योग्य उपाययोजना सुचवली. मोदी-शहांच्या चढत्या आलेखाची, ईडी, सीबीआय यांसारख्या तपास यंत्रणांची देशभर विशेषत: विरोधी पक्षांमध्ये भीती असताना त्यांनी अत्यंत धाडसाने राजकारणात दीर्घ काळ जोपासलेल्या नीतिमूल्यांच्या, पारदर्शक स्वच्छ प्रतिमेच्या नैतिक बळावर संसदेत आणि संसदेबाहेर भाजपला जशास तसे उत्तर दिले. अनेक वेळा मोदी-शहांना जाहीर आव्हान दिले. भाजपच्या आक्रमक राजकारणाला भिडण्याचा स्वभाव, तटस्थपणा, दबावाला बळी न पडण्याची हिंमत, स्वाभिमान, आत्मसन्मानासोबत तडजोड न करता अपेक्षाविरहित समाजहिताचे, पक्षहिताचे राजकारण करण्याचा विचार खरगेंचे पक्षातील मोठेपण वाढवत आहे. पक्षाने तीन वेळा कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद दिले नाही याची खंत न बाळगता पक्षासाठी वयाच्या ८३ व्या वर्षी १४-२५ तास काम करण्याची त्यांची वृत्ती काँग्रेसला यश मिळवून देत आहे. खरगे प्रत्येक राज्यात जातीने लक्ष घालून, वेळ देऊन संघटन मजबूत करण्यावर भर देत आहेत.
हेही वाचा :आंबेडकरवादी राजकारणाला प्रस्थापितांचा ‘खो’!
कधी नव्हे ते पहिल्यांदाच काँग्रेसच्या वर्किंग कमिटीत दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक समूहांची संख्या वाढलेली दिसत आहे. राज्याराज्यांतील वादविवाद त्यांनी चार भिंतीच्या आत मिटवल्यामुळे पक्षाच्या खासदारांची संख्या २०१९ मधील ५२ वरून २०२४ मध्ये ९९ पर्यंत नेणे शक्य झाले. काँग्रेसपासून दूर गेलेला दलित, अल्पसंख्याक सूमह परत मोठ्या संख्येने जोडला गेला. गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच काँग्रेस देशाच्या राजकीय क्षितीजावर केंद्रबिंदू ठरली. खरगेंच्या सर्वसमावेशक नेतृत्वामुळेच इंडिया आघाडी लोकसभेत २३८ जागांचे संख्याबळ प्राप्त करू शकली. लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी देशभरात २१ राज्यांत इंडिया आघाडीसाठी ८९,२१८ किलोमीटरचा प्रवास केला. तीन सभा, २१ पत्रकार परिषदा, ६३ च्या वर मुलाखती, सहा राज्यांत प्रत्यक्ष लोकांच्या घरी जाऊन काँग्रेसचा प्रचार केला. संविधान धोक्यात आहे. ते वाचवले तर देश वाचेल, हे त्यांनीच देशात पहिल्यांदा ठासून सांगण्यास सुरुवात केली. त्यांनीच २०२४ च्या निवडणुकीत संविधान धोक्यात असल्याचा राष्ट्रीय मुद्दा बनवला आणि भाजपचा स्वावलंबी रथ परावलंबी करून टाकला. खरगेंमुळे इंडिया आघाडी मजबूत राहिली, लढली आणि जिंकली. एरवी सर्वांची टिंगलटवाळी करणारा भाजप खरगेंच्या वाटेला मात्र कधीच जात नाही. खरगेही ईडी, सीबीआयला हव्या असलेल्या लाभात कधी अडकलेले दिसत नाहीत. ते कधी दलित असल्याचे सांगून सहानुभूती मिळवत नाहीत. उलटपक्षी ते मोदींना थेटपणे प्रश्न विचारताना विकासाच्या मुद्दयावर, देशहिताच्या विषयावर चर्चा करण्यास सांगतात. रडून मते मागण्याऐवजी, सहानुभूतीने लोकप्रिय होण्याऐवजी कर्तृत्वाने मोठे होण्याचा सल्ला देतात.
खरगे दलित असल्याने ते काँग्रेसचे केवळ नामधारी अध्यक्ष आहेत, हा विरोधकांचा आरोप त्यांनी खोटा ठरवला आहे. त्यांच्यामुळेच काँग्रेसी गेल्या दोन वर्षांपासून १० जनपथऐवजी १०, राजाजी मार्गावर जात आहे. इथेच इंडिया आघाडीचे देशभरातील नेते काँग्रेसविषयी अधिकृत चर्चा, युत्या-आघाड्या आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी येत असतात. पक्षाचे सर्वेसर्वा समजले जाणारे राहुल गांधींही खरगेंच्या निवासस्थानी येऊन चर्चा करतात. सार्वजनिक ठिकाणी, सभा, संमेलनात आपल्या पक्षाध्यक्षांचा पूर्ण सन्मान राखला जाईल, याची काळजी घेतात. काँग्रेसचे अध्यक्ष रबर स्टॅम्पप्रमाणे काम करतील, हा आरोप खरगेंनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन खोटा ठरवला आहे. पक्षात शिस्त, निष्ठा आणि कर्तबगारीला महत्त्व दिले आहे. पक्षहित हाच नियम सर्वांसाठी लागू केला आहे.
हेही वाचा :ध्येयनिष्ठ विदुषी- डॉ. रोहिणी गोडबोले
पाच भाषांचे उत्तम ज्ञान असलेल्या खरगे यांचे अफाट वाचन आहे. काहीही बोलण्याच्या आधी ते अभ्यास करतात, विचारप्रर्वतक मते मांडतात. तिकीट वाटप असो की निवडणूक जिंकण्याची रणनीती, पक्षाच्या हितासाठी पक्षासह पक्षाबाहेरील हितचिंतकांकडून कानोसा घेतात. पक्षाचा धोरणात्मक निर्णय असेल, जाहीरनामा असेल यासाठी ते व्यक्तिगत पातळीवर चिंतन-मनन करतात. देशातील अनेक लेखक, साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात राहतात. एखाद्या पुस्तकाचे, लेखाचे वाचन करताना प्रत्येक शब्दाचा अर्थ, त्याची व्युत्पत्ती, कारण आणि त्यामागील आशय समजून घेतात. त्यांच्या भाषणाच्या पूर्वतयारीवेळी उपस्थित राहणे म्हणजे एकाचवेळी इतिहास, भूगोल, राजकारण, समाजकारण, तत्त्वज्ञान, त्याचे बरेवाईट परिणाम याविषयी ज्ञान मिळवणे असते. १३८ वर्षांच्या पक्षाचे अध्यक्ष बोलतात तेव्हा त्याचे देशासह जगात पडसाद उमटतात, याची त्यांना जाणीव असते. जागतिकीकरण, पर्यावरण, इतिहास, साहित्य, कला, संस्कृती इत्यादी अनेक विषयांमध्ये सुरू असलेल्या बदलांचा ते कानोसा घेतात. वैयक्तिक स्वार्थाची अभिलाषा न बाळगता, प्रतिष्ठेच्या पदाचा हव्यास न करता गांधी, नेहरू, आंबेडकरांच्या विचारमूल्यांवर कार्यरत राहणे, ही वृत्ती त्यांचे काँग्रेसमधील स्थान अधिक बळकट करत आहे.
हेही वाचा :प्राधान्य हवे महिला-मुलांच्या सुरक्षिततेला…
अध्यक्षपदाच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी आत्मविश्वास गमावलेल्या पक्षात आपणही जिंकू शकतो. हा विचार रुजवला. २०१९ मध्ये लोकसभेत अधिकृत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी ५५ एवढीही सदस्यसंख्या नसलेल्या पक्षाला ९९ जागा मिळवून देत त्यांनी विरोधी पक्षनेत्याचे पदही मिळवून दिले. त्यांच्यामुळे देशभरातील दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक समूह परत काँग्रेसशी जोडले गेले आहेत. काँग्रेसच राष्ट्रीय प्रमुख विरोधी पक्ष आहे, हे त्यांनी इंडिया आघाडीचे नेतृत्व करताना सिद्ध केले आहे. काँग्रेस देशात लोकशाही, धर्मनिरपेक्ष विचारांसाठी लढणारा पक्ष असल्याचे पटवून देण्यात ते यशस्वी झाले. कर्नाटकात २० वर्षे मंत्री, १८ वर्षे विरोधी पक्षनेते, केंद्रात आठ वर्षे मंत्री, सात वर्षे विरोधी पक्षनेते एवढा प्रदीर्घ काळ राजकारणात वावर असलेल्या खरगे यांच्यावर कधीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत. म्हणूनच ते शक्तिशाली मोदी-शहांना बेधडकपणे अंगावर घेताना घाबरत नाहीत. नीतिमूल्ये आणि विचारधारा यांच्याप्रति निष्ठा असेल तर घाबरण्याचे कारण नाही हे त्यांनी सिद्ध केले आहे. दलित समाजातून आलेली, कायमच अन्याय-अत्याचाराची, विषमतेची पार्श्वभूमी असलेली व्यक्ती राजकारणात संधी मिळाली तर प्रतिकूल परिस्थितीतही देशाचे, समाजाचे आणि पक्षाचे सक्षम नेतृत्व करू शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
(लेखक राजकीय अभ्यासक आहेत.)
chetanshinde35@gmail. com