चेतन शिंदे
नरेंद्र मोदींच्या वादळात दिशा भरकटलेल्या काँग्रेसने गेल्या वर्षी २६ ऑक्टोबर २०२२ रोजी दक्षिण भारतातील दलित समाजातून आलेल्या, ५० वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय, सामाजिक, प्रशासकीय कामकाजाचा अनुभव असणाऱ्या स्वच्छ प्रतिमेच्या मल्लिकार्जुन खरगे यांना गांधी कुटुंबाबाहेरचे अध्यक्ष म्हणून निवडले. पराभूत मानसिकतेत असणाऱ्या या पक्षाला खरगे यांनी सर्वसमावेशक नेतृत्व आणि कौशल्याच्या बळावर विश्वास गेल्या वर्षभरात दिला. योग्य समन्वय, संवाद आणि अनुभवाच्या बळावर त्यांनी कर्नाटकात भाजपचा पराभव करून गोंधळलेल्या काँग्रेसला सूर मिळवून दिला. काँग्रेस पक्ष मोदी-शाह यांना टक्कर देऊ शकतो, ही उमेद दिली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या गांधी-नेहरूंच्या १३८ वर्षीय काँग्रेसला नामशेष करण्याच्या आरोळ्या पंतप्रधानदेखील प्रचारसभांतून देत असताना, खरगेंनी दक्षिण भारतातल्या एकमेव राज्यातून भाजपला मुक्त केले आणि काँग्रेस जिवंत राहील हे कृतीतून दाखवून दिले.

अनेकवेळा अनेकांनी काँग्रेसवर गांधी कुटुंबाच्या घराणेशाहीचा आरोप केला आहे. मात्र गेल्या दशकभरात, भाजपच्या आरोपांनी काँग्रेस पहिल्यांदाच कधी नव्हे एवढी घायाळ झाली. विशेषत: २०१९ नंतर मोदी-शहांच्या आक्रमक राजकारणामुळे विरोधी पक्षांची अवस्था केविलवाणी झाली. मोदींनी भल्याबुऱ्या पद्धतीने सत्ता राबवून अन्य पक्षीयांना जेरीस आणले. अनेकांना तुरुंगात पाठवले, अनेकांची संपत्ती गोठवली, तपासयंत्रणांकडून नोटिसा धाडल्या, धाडी घातल्या, अनेक राज्यांतील सरकारे पाडून भाजपला त्या त्या राज्यात सत्ता मिळवून दिली. अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. याचा सर्वाधिक परिणाम काँग्रेसवर झाला. काँग्रेसमधील अनेक ‘धनवान’ नेतेमंडळी भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’मधून पवित्र होण्याची धडपड करू लागली होती. ज्योतिरादित्य सिंदिया, हेमंत बिस्वा सरमा, जगदम्बिका पाल, चौधरी बिरेंद्र सिंह, एस. एम. कृष्णा यांच्यासारखे कधीकाळचे काँग्रेसनिष्ठ पक्षनेतृत्वावर आरोप करून भाजपत गेले. काही नेते जी-२३ सारखा गट तयार करत होते. पक्षाला लोकसभेत, विविध राज्यांच्या विधानसभेत यश मिळत नव्हते. अशा संकटकाळात काँग्रेसला तारण्याचे मोठे शिवधनुष्य काँग्रेसच्या नऊ हजार ५४८ मतदारांपैकी सात हजार ८९७ मतदारांनी, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी खरगेंच्या खांद्यावर दिले. खरगेंनीही वर्षभरात आपल्या सर्वसमावेशक नेतृत्वकौशल्याने काँग्रेसला कूस बदलण्यास भाग पाडले आहे. खरगे पक्षाध्यक्ष झाल्यानंतरच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या गृहराज्यात हिमाचल प्रदेशात प्रियंका गांधी आणि खरगेंच्या मेहनतीने राज्याला काँग्रेसचा मुख्यमंत्री मिळाला. खरगेंनी स्वतःच्या गृहराज्यात, कर्नाटकात भाजपचा दारुण पराभव केला. काँग्रेस गटबाजीने पोखरली आहे, ही चर्चा शिखरावर असताना कर्नाटकातील डी. के. शिवकुमार आणि सिद्धरमय्या यांच्यात खरगेंनी योग्य समन्वय केला. राजस्थानात अशोक गेहलोत आणि सचिन पायलट, छत्तीसगढमध्ये भूपेश बघेल आणि टी. एस. देव यांच्यात यशस्वी सामोपचार घडवला. मध्यप्रदेशात स्थानिक नेतृत्वाला सर्वाधिकार देत स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची मुभा दिली. त्यांनी आज छत्तीसगढ, मध्यप्रदेश, राजस्थानात काँग्रेस जिंकेल अशा स्थितीत पक्ष उभा केला आहे. तेलंगणासारख्या राज्यात पक्षाला प्रमुख प्रतिस्पर्ध्याच्या तुलनेत उभे केले आहे. काँग्रेसनिष्ठ विचारांची पक्की बैठक असलेल्या खरगेंनी आपल्या नीतिमत्तेच्या बळावर राजकारण केले. कर्नाटकात त्यांची मुख्यमंत्रीपदाची संधी पक्षनेतृत्वाने तीनवेळा घालवली. अशाही परिस्थितीत खरगेंनी पक्षाला कधीही दुय्यम स्थान दिले नाही. काँग्रेसचा विचार, सामाजिक न्यायाची भूमिका, स्पष्टवक्तेपणा, भाजपच्या आक्रमक राजकारणाला थेटपणे भिडण्याचा स्वभाव, तटस्थपणा, कुठल्याही दबावाला बळी न पडता संसदेत आणि संसदेबाहेर भाजपला टोचतील असे प्रश्न विचारण्याचा खमकेपणा त्यांचे राजकारण अधिक प्रगल्भ करतो. त्यांनी पक्षात दिलेले योगदान, बाळगलेली निष्ठा ५१ वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय जीवनात कधीही भ्रष्टाचाराचा आरोप न झालेली त्यांची स्वच्छ प्रतिमा, त्यांचे पक्षातील नैतिक अधिष्ठान वाढवते. त्याच नैतिकतेच्या बळावर खरगेंनी काँग्रेसला हळूवारपणे हवे तसे बदलण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्या प्रयत्नाचा भाग म्हणूनच आज देशात होत असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेस एकसंधपणे मोठ्या विश्वासाने निवडणुकीला सामोरा जात आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीत काँग्रेसला त्यांनी केंद्रस्थानी आणले आहे.

Yogendra Yadav, Bharat Jodo Andolan,
‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
Manifesto Mira Bhayander, Mira Bhayander,
मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा
Viral Video Shows Pet Dog Help Her Owner
मैं हूँ ना…! मालकिणीला मदत करण्यासाठी श्वानाची धडपड; काठी काढण्यासाठी मारली उडी अन्… पाहा VIRAL VIDEO

खरे तर, काँग्रेसचे नवे अध्यक्ष रबरस्टॅम्पप्रमाणे काम करतील हा विरोधकांचा आणि पत्रकारांचा दावा खरगेंनी खोटा ठरवला आहे. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी उमेदवारी अर्ज भरतानाच त्यांनी आपल्या सर्वसमावेशक बहुआयामी नेतृत्वाची छाप राष्ट्रीय राजकारणात पाडली होती. जी-२३ गटाची वर्षभर होत असलेली चर्चा खरगेंनी उमेदवारी अर्ज भरतानाच संपवली. सर्वांना सोबत घेऊन ते विजयी झाले. अध्यक्षपदाचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी पक्षातील अनेक वादविवाद मिटवले. वाचाळवीरांना गप्प केले. पक्षात शिस्त आणि निष्ठा, पक्षवाढीचे काम याला महत्त्व दिले. गटबाजी मोडीत काढण्याचे काम केले. तेलंगणात राहुल गांधींच्या जवळचे समजले जाणारे मणिकम टागोर यांना गोव्याला पाठवून त्यांनी महाराष्ट्रातील माणिकराव ठाकरे यांची नव्याने तेलंगणाचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली. एवढेच नव्हे, तर टागोर यांनी तेलंगणात ज्या ए. रेवंत रेड्डींना काढण्याचे ठरवले त्यांनाच खरगेंनी तेथील प्रमुख बनवले. काँग्रेसच्या नवनियुक्त समितीत शशी थरूर यांना स्थान दिले. चंद्रकांत हंडोरे, मनीष तिवारी, नासीर हुसेन, यशोमती ठाकूर, सचिन पायलट, रमेश चेन्नीथला, के. राजू इत्यादी नेत्यांना त्यांनी संधी दिली. उदयपूरच्या अधिवेशनात अनेक नवे ठराव संमत केले. यावेळी अध्यक्ष म्हणून त्यांच्या कामकाजात कोणी हस्तक्षेप केल्याचे जाणवले नाही.

राहुल गांधींच्या आतील गोटातील लोक पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असले तरी खरगे ती संधी त्यांना देत नाहीत. ते आपल्या स्वतंत्र प्रतिभेने, विचाराने सर्वांना सामील करून घेतपुढे चालत असल्याचे दिसते. म्हणूनच काँग्रेसचे हायकमांड असणारा पूर्ण गांधी परिवार अध्यक्ष म्हणून खरगेंच्या सन्मानाचा शिष्टाचार पाळत आहे. खरगेंनी घेतलेले निर्णय, पक्षाला केलेले मागर्दशन ते स्वीकारत असल्याचे सिद्ध होत आहे. सार्वजनिक ठिकाणी, सभा-संमेलनात, कार्यक्रमात गांधी परिवार विशेषतः राहुल गांधी खरगेंचा अतीव आदर करत असल्याचे दिसून येते. बदलत्या राहुल गांधींमध्ये खरगेंच्या मार्गदर्शनाचा प्रभाव दिसून यायला लागला आहे. राहुल गांधी आज पक्षाचे अध्यक्ष असते, तर इंडिया आघाडी केवळ कल्पना ठरली असती. त्यांचे वय आणि प्रतिमा पाहता नितीशकुमार, शरद पवार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरिवाल यांच्यासारख्या नेत्यांनी त्यांच्यासोबत आघाडीची चर्चाही केली नसती. मात्र ८० वर्षे पार केलेल्या खरगेंनी नीतीशकुमारांची संकल्पना सोबत घेऊन इंडिया आघाडीत जीव आणला आहे. राहुल गांधी इंडिया आघाडीच्या नेत्यांशी संवाद करतात, राज्याराज्यांतील प्रादेशिक पक्षांची ताकद मान्य करतात, जागा वाटपात काँग्रेस लवचिक भूमिका घेईल असे पाटण्यात पत्रकारांना सांगतात. कर्नाटकात खरगेंच्या मार्गदर्शनाखाली प्रचार आणि भाषणाचे मुद्दे ठरवतात. युवा, महिला, दलित, अल्पसंख्याकांना ५० टक्के प्रतिनिधित्व देण्याचे मान्य करतात. विदेशवाऱ्यांची संख्या कमी होऊन भारत जोडो यात्रेसारखी ऐतिहासिक देश बदलणारी यात्रा करतात. यात खरगेंचे मार्गदर्शन लक्षात येते. खरगे अध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेस दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक, महिला यांच्या प्रश्नांवर ठामपणे बोलत आहे. ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहे, सामाजिक न्यायाची भूमिका मांडत आहे.

विरोधकांच्या इंडिया आघाडीत खरगेंनी काँग्रेसला केंद्रस्थानी आणले आहे. काँग्रेसशिवाय जिंकता येणार नाही, ही भावना त्यांनी इंडिया आघाडीत रुजवली आहे. काँग्रेससोबत बोलायचे झाल्यास १० जनपथऐवजी खरगेंचे राज्यसभेतील कार्यालय, १०, राजाजी मार्ग हे निवासस्थान हा विरोधी नेत्यांच्या चर्चेचा नवा पत्ता आहे. खरगेंनी ससंदेत आणि संसदेबाहेर ठामपणे मोठ्या हिंमतीने तपासयंत्रणांच्या दडपशाहीला भीक न घालता मोदी-शाह यांना टोचतील असे प्रश्न विचारले आहेत. आक्रमकपणे काँग्रेसच्या मतदारांचे प्रश्न मांडले आहेत. छोट्या-मोठ्या पक्ष संघटनांशी ते आपुलकीने बोलत आहेत, त्यांचे ऐकून घेत आहेत. पाच भाषांचं उत्तम ज्ञान असेलेले खरगे राजकारणापलीकडे देशभरातील साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था यांच्यासोबत व्यक्तिगत पातळीवर संपर्क ठेऊन आहेत. देशात काय चालले आहे, याचा ते कायम अंदाज घेत असतात. प्रत्येक विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी करताना दिसतात. वाचन, चिंतन, संवाद, व्यक्तिगत पातळीवर नसलेली अभिलाषा आणि पक्षाला वेळ देण्याची त्यांची तयारी ही खरगेंच्या जमेची बाजू आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्यासमवेत दिल्ली-बंगळूरु प्रवास करताना खरगे विमानातही सोबत आणलेल्या वर्तमानपत्रांचे लेख काळजीपूर्वक वाचून टिपणे काढताना दिसले. एकदा बंगळूरुहून दिल्लीला तातडीने जायचे असताना आपल्या सचिवाला जे स्वस्त तिकीट असेल त्याच विमानाचे तिकीट घे, पक्षाचे पैसे वाचव असा आग्रह करताना दिसले. पक्ष कार्यालयात देशभरातून आलेल्या सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला भेटले पाहिजे, बोलले पाहिजे असा आग्रह करताना ते दिसतात. यामुळेच भाजपसारख्या विरोधी पक्षांची अस्वस्थता वाढली आहे. कर्नाटकातील पराभवानंतर भाजपने सत्तेच्या मस्तीत सोडून दिलेल्या एनडीएमधील छोट्या पक्षांना महत्त्व द्यायला सुरुवात केली आहे. जिंकण्याची क्षमता नसलेले सी. टी. रविसारखे अनेक नेते राष्ट्रीय कार्यकारणीत घेऊन पाच-दहा हजार मतांचा विचार केला जात आहे. विरोधकांची इंडिया आघाडी यशस्वी होऊ शकते ही भीती मोदी-शाह यांच्या मनात खरगे, शदर पवार, नितीशकुमार या नेतेमंडळींनी उभी केली आहे. आरएसएसचे अघोषित मुखपत्र ऑर्गनायझरला २०२४ ची निवडणूक मोदींच्या नावावर जिंकणे कठीण असल्याची चिंता लागली आहे. इंडिया आघाडीच्या नावापासून कामापर्यंत भाजप अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे. राहुल गांधींवर व्यक्तिगत टीका करणारी भाजप खरगेंवर टीका करण्याची संधीच मिळत नाही म्हणून हतबल आहे. खरगेंकडे साखर कारखाना, मोठा उद्योग-व्यवसाय नसल्याने तपास यंत्रणांना त्यांच्या घरी पाठवण्याची संधी नाही. खरगेंनी आपल्या आयुष्यात गांधी-नेहरू यांच्याबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानले. डॉ. आंबेडकरांकडूनच प्रेरणा घेऊन त्यांनी कर्नाटक पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्याअंतर्गत लाखो गरीब, वंचित, सर्वहरा समाजाच्या मुलांना शिक्षणाची संधी मिळवून दिली. त्यांनी दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या बौद्ध स्तुपाची उभारणी करून आंबेडकरांची स्वप्ने साकार करण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारला या दोन्ही ठिकाणी काही सापडत नसल्याने अडचण झाली आहे. खरगेंवर ८१ वर्षांच्या राजकीय जीवनात भ्रष्टाचाराचे, अफरातफरीचे साधे आरोपही नाहीत. त्यामुळे खरगेंवर टीका करणे भाजपला जड जात आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी पक्षासाठी पूर्णवेळ निःस्वार्थ भावनेने काम करणारा नेता इंडिया आघाडीच्या यशस्वी वाटचालीमुळे, समन्वयवादी भूमिकेमुळे प्रधानमंत्रीपदाच्या शर्यतीत येऊ शकतो. काँग्रेससाठी ही बाब फायद्याची ठरेल.

(लेखक डॉ. बी. आर. आंबेडकर मीडिया सेंटरचे संचालक आहेत.)

thepeoplespost2014@gmail.com