ही ४०-४२ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पुण्याला मराठी व्यंगचित्रकारांचा मैत्रीमेळावा होता. अनेक दिग्गज व्यंगचित्रकार मंडळी जमली होती. माझ्यासारखे अगदी नवखे जरा बावरूनच त्यात मागे कुठे तरी बसले होते. ज्यांची नावं आपण फक्त वाचली आहेत आणि खळखळून हसलो आहोत ते व्यंगचित्रकार व्यासपीठावर येऊन थोडेफार भाषण करून ड्रॉइंग बोर्डवर व्यंगचित्र काढून दाखवत आहेत हे सारं अनुभवणं फारच अद्भुत आणि रोमांचकारी होतं. अशातच व्यासपीठावर एक उंच, गोरा, मजबूत बांध्याचा, केसांच्या बटा कपाळावर रुळू देणारा, चष्म्यातून बारीक डोळ्यांनी सगळीकडे पाहणारा आणि चेहऱ्यावर मिश्कील हसू असणारा अंदाजे पन्नाशीतला एक वक्ता व्यासपीठावर आला. तो येताच सभागृहातलं वातावरण एकदम प्रफुल्लित झालं. माझ्या शेजारच्या व्यंगचित्रकार मित्राने मला कोपर ढोसून सांगितलं, आता मज्जा येणार!! मी म्हटलं हे कोण? तो म्हणाला हे चंद्रपूरचे मनोहर सप्रे!
पुढचा जवळपास पाऊण तास सप्रे यांनी अखंड पडणाऱ्या पावसासारखं खणखणीत आवाजात भाषण केलं आणि व्यंगचित्रकारला साजेशा हशा आणि टाळ्या घेतल्या. चित्र मात्र काढून दाखवलं नाही. भाषणात काही किस्सेवजा विनोद होते आणि ते जणू काही कालच कुठे तरी घडले आहेत अशा थाटात झकास रंगवून सांगत होते. उदाहरणार्थ, कालच एका शहरात एक सर्कस आली होती, ग्रेट इंडियन नॅशनल सर्कस या नावाची. तिच्या जाहिरातींची पोस्टर्स भिंतीवर लावायचं काम सुरू होतं. विदूषक आणि माकड यांचे फोटो असलेलं पोस्टर त्या माणसाने एका इमारतीच्या भिंतीवर लावलं आणि तो निघून गेला. मी सहज त्या इमारतीकडे पाहिलं. त्या इमारतीचं नाव होतं ‘भारतीय काँग्रेस पक्ष कार्यालय’!
यानंतर सप्रे यांची दैनिकातली आणि दिवाळी अंकातली चित्रं मी मुद्दाम आवर्जून पाहू लागलो. त्या वेळी मी महाराष्ट्र राज्य विद्याुत मंडळात अभियंता म्हणून काम करत होतो. एकदा अचानक ते ऑफिसात दिसले. मला आश्चर्य वाटलं. मी ओळख सांगितली. मंडळ सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झाली होती हे त्यांनी सांगितलं. नंतर म्हणाले, आत्ताच मी विद्याुत मंडळाला एक स्लोगन देऊन आलो आहे. ते म्हणजे ‘जनरेशन फॉर जनरेशन्स!’ त्यांच्यातील उत्स्फूर्ततेचा तो आलेला पहिला प्रत्यय. पुढे कामासाठी चंद्रपूर पॉवर स्टेशनला गेलो की त्यांच्या घरी हमखास गप्पा मारायला जात असे. एखाद्या रसिक कलावंताचं ते घर आहे हे तिथं जाताक्षणीच कळायचं. कलासक्तपणे सजवलेला तो बंगला भारावून टाकणारा होता हे नक्की.
सप्रे यांना काष्ठशिल्पाचाही नाद लागला. चंद्रपूरच्या जंगलात सापडणारी आणि चुलीत जाणारी लाकडं ते जमवू लागले. त्यांना नवा आकार, रंग आणि थोडीफार दुरुस्ती करून ते एक टेबलावरती ठेवता येईल असे उत्तम आर्ट पिसेस करू लागले. एक प्रकारे त्या लाकडाच्या जीवनात झालेली ती क्रांतीच! त्यांच्या अशा हजारो शिल्पांची, हजारो श्रीमंतांच्या दिवाणखान्यात प्रतिष्ठापना मोठ्या डौलाने होत असे. असे अनेक किस्से ते मनापासून सांगत आणि शिल्पं दाखवत. यानंतर यामध्ये आणि त्यांच्या स्वत:च्या जीवनामध्ये किती विलक्षण साम्य आहे हेही ते जाता जाता अधोरेखित करत!
त्यांच्या घरात लावलेलं घोड्याचं काष्ठशिल्प हा त्यांचा ध्यासाचा नमुना आहे. घोड्याचा चेहरा आणि त्याची आयाळ या दोन तुकड्यांमधलं अंतर काही वर्षांचं आहे. याबद्दल साक्षात पु. ल. देशपांडे यांनी त्यांना कौतुकाचं पत्र पाठवलं, त्यात पु. ल. म्हणतात, ‘सप्रे, पोटात समिधांची धग घेऊन धावणारे हे शिल्प, तुमच्यापुढे कोणी कुबेराचं भांडार मोकळं केलं तरी विकू नका. हे अरण्याने दिलेलं वरदान माना. वरदानाचा विक्रम होऊ शकत नाही!’
सप्रे यांचं बालपण प्रचंड बिकट गेलं. खूप कष्ट करून, संघर्ष करून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. शिक्षकाची नोकरी आणि पुढे प्राध्यापकाची स्थैर्य देणारी नोकरी त्यांनी मिळवली. पण कालांतराने तिला बौद्धिक गुलामगिरीचा वास येताच सुग्रास जेवण देणारी ती थाळी त्यांनी नाकारली आणि स्वतंत्रपणे जगून मीठ-भाकरी खाण्याचा कष्टप्रद मार्ग स्वीकारला.
व्यवस्थेवर प्रहार करण्याचं माध्यम म्हणून सामाजिक, राजकीय आशय असणारी त्यांची व्यंगचित्रं म्हणजे पॉकेट कार्टून्स महाराष्ट्रात अनेक वृत्तपत्रांत पहिल्या पानावर येऊ लागली. मराठी व्यंगचित्रकलेत सप्रे यांनी एक ताजा, बोचरा, हसरा विनोद आणला. चंद्रपूरला राहणाऱ्या व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांची व्यंगचित्रं मुंबईच्या ‘लोकसत्ता’त दररोज येत असत हे इंटरनेटपूर्व आश्चर्यच म्हणायचं, जे अनेक वर्षं चाललं. याचं कारण त्यांच्या चित्रांना मिळालेली वाचकांची उत्स्फूर्त दाद!
मनोहर सप्रे यांची शैली इतर व्यंगचित्रकारांपेक्षा खूपच वेगळी आहे. एखादं रफ स्केच असावं असं पेनानं, गडबडीनं केलेलं रेखाटन. पण प्रत्येक पात्राच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासारखे असतात. चिडलेले, वैतागलेले, आश्चर्याने बघणारे, आनंदाने फुललेले असे अनेक प्रकारचे चेहरे ते रेखाटतात. डोळ्याच्या जागी फक्त एखादं टिंब असतं. चित्रातील पार्श्वभूमी म्हणून अत्यंत किरकोळ तपशील असतात. सारं काही झटपट केल्यासारखं वाटतं.
पण या सर्वांना छेद देणारा त्यांचा ह्युमर आहे. तो दीर्घकाळ लक्षात राहतो. कोर्ट, हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, रस्ता, हॉटेल, कॉलेज इथं प्रसंग घडतात. चित्रात जास्तीत जास्त दोन किंवा तीन माणसं असतात .पण या साऱ्यांवर कडी करणारं असतं ते त्यांचं भाष्य. मराठी भाषेच्या सौंदर्याचा पुरेपूर वापर ते करतात आणि चपखल कॉमेंट करतात. उदाहरणार्थ, ‘दिवस कसे गेले हे कळलंच नाही’ या वाक्यातील खरा विनोद चित्र पाहिल्याशिवाय कळणार नाही.
सप्रे यांचं आणखी एक विशेष काम म्हणजे त्यांनी व्यंगचित्रकलेचं रसग्रहण करणारे अनेक लेख लिहिले आहेत. मराठीत एकूणच व्यंगचित्रांवर खूप कमी लिहिलं जातं. त्या दृष्टीने सप्रे यांचं हे काम महत्त्वाचं आहे. त्याशिवाय त्यांचा पत्रसंग्रहही प्रकाशित झाला आहे. तोही तत्त्वचिंतनाच्या मार्गाने जाणारा आहे.
अनेक देशी-परदेशी, नव्या-जुन्या लेखकांचं साहित्य त्यांनी वाचलं होतं. नुसतं वाचलं नव्हतं तर त्याची महत्त्वाची अवतरण ते बोलता बोलता सहज उद्धृत करत असत. स्पष्टवक्तेपणा, निर्भीडपणा आणि टोकदार विनोदबुद्धी हे त्यांच्या बोलण्यातलं वैशिष्ट्य सांगता येईल. त्यांच्याशी तास-दीड तास गप्पा तर अगदी सहज होत असत. पु. ल. देशपांडे, आर. के. लक्ष्मण, नर्गिस, अनेक नामवंत उद्याोगपती, कलावंत यांच्याशी त्यांचे अतिशय मैत्रीचे संबंध होते. त्यांची काष्ठशिल्पं आणि व्यंगचित्रं यांची गॅलरी पेंचच्या अभयारण्यातील एका रिसॉर्टमध्ये केली आहे. हे भाग्य काही विरळाच!
गप्पांच्या ओघात त्यांचे काही ‘वन लायनर्स’ खदाखदा हसवणारे असत. उदाहरणार्थ, मराठीतल्या एका प्रचंड खपाच्या विनोदी दिवाळी अंकाच्या संपादकांनी त्यांना एकदा सहज विचारलं की, आमच्या अंकाबद्दल तुमचं मत काय आहे? वास्तविक या अंकातील विनोदाचा दर्जा त्या वेळीही फारच खालावलेला होता. सप्रे अगदी उत्स्फूर्तपणे, क्षणाचाही विलंब न लावता म्हणाले, ‘तुमचा अंक म्हणजे म्हातारी विश्वसुंदरी!’
मराठीमधल्या एका अतिचिकित्सा करणाऱ्या कला समीक्षकाबद्दल ते म्हणाले, तो कला समीक्षक म्हणजे स्वत:ला मुलंबाळं न होणारा गायनॅकॉलॉजिस्ट आहे!!
कल्पनाशक्ती आणि विनोदबुद्धी या व्यंगचित्रकाराच्या दोन आयुधांबद्दल त्यांनी त्यांच्या एका पुस्तकात तत्त्वज्ञानाच्या अंगाने जाणारं फार महत्त्वाचं वाक्य लिहिलं आहे. ते म्हणतात, ‘‘मानवाकडे जे नाही त्याची भरपाई म्हणून त्याला कल्पनाशक्ती मिळालीय आणि जे आहे ते सुसह्य व्हावं म्हणून त्याला विनोदबुद्धी मिळालीय…’’
एकदा भरपूर गप्पा मारून त्यांच्या चंद्रपूरमधल्या बंगल्यातून मी बाहेर पडलो. जाताना त्यांच्या संग्रहातील त्यांनी जमवलेली व्यंगचित्रांची पुस्तकं त्यांनी आवर्जून भेट दिली आणि काष्ठशिल्पाचा एक नमुनाही भेट दिला. बाहेर पडलो. निरोप घेताना मागे वळून हात हलवला. त्यांच्यावर अतिशय सुंदर असा संध्याकाळचा प्रकाश पडलेला होता. ते दृश्य खूप विलोभनीय आणि गूढ दिसत होतं आणि याची त्यांनाही कल्पना आली असावी. ‘प्रशांत हे दृश्य तुझ्या कायम स्मरणात राहील,’ असं म्हणून त्यांनी निरोप दिला.
खरोखरच चंद्रपूरचे मनोहर सप्रे हे व्यक्तिमत्त्व अविस्मरणीयच!
prashantcartoonist@gmail.com