ना. धों. महानोर

शेतमजुराच्या कुटुंबातल्या मुलापासून प्रगतीशील शेतकऱ्यापर्यंत आणि संवेदनशील निसर्ग कवीपासून कृषीक्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या आमदारापर्यंतचा ना. धों. महानोर यांचा जीवनप्रवास त्यांच्या कवितांसारखा शेतबांधाच्या आसपास फिरताना दिसतो. हाच जीवनपट त्यांनी जुलै २०१८मध्ये ‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग’ पुरवणीत मांडला होता. त्याचा संपादित अंश..

पळसखेडे. औरंगाबाद जिल्ह्यतलं- जळगाव जिल्ह्यतल्या सरहद्दीवरलं लहानसं खेडं. पळसखेडला १६ सप्टेंबर १९४२ ला माझा जन्म झाला. त्या वेळी गावाची लोकसंख्या जवळपास सातशे होती. दूरस्थ खेडं.  कुठल्याही सुखसोयीपासून तुटलेलं. अजिंठा लेणीच्या पायथ्याशी पाच किलोमीटर अंतरावर! परिसर सगळा लहान दगड-टेकडयमंचा. हलकी बरड जमीन. बंजारा, भिल्लं, मुस्लीम, महादेव कोळी, मेवाती अशा अनेक लहान-लहान जाती-जमातींतला आदिवासी तांडय़ांचा-खेडय़ांचा परिसर!

आई-वडील अशिक्षित. (धाकटी आई, थोरली आई) जमीनदारांकडे शेतीत मजुरी करणारे, नंतर पाच एकर जमीन विकत घेतली. आई-बाबा मजुराचे शेतकरी झाले. पळसखेडला एका धाबलीच्या लहानशा खोलीत पहिली ते चौथी शिकलो. तीस-पस्तीस विद्यार्थी. दोन शिक्षक. मी चौथी पास झाल्याचं मास्तरांनी घरी सांगितलं. थोडय़ा अंतरावरच्या शेंदुर्णी या गावी शिकायला पाठविलं. गुरुजींकडे कुठे-कुठे कसं तरी राहाणं- शिकणं- ते बालपण याबाबत आता  सारं सांगणं कठीण. अकरावीपर्यंतचं शिक्षण तिथे झालं. जळगावला महाविद्यालयात एक वर्ष काढलं! पैसे नाहीत. दुष्काळ-नापिकी आणि कौटुंबिक नको तेवढी गुंतागुंत. मी दुसऱ्या वर्षी महाविद्यालय सोडून पुन्हा पळसखेडच्या शेतीत आलो, वय वर्षे अठरा. आई-बाबांसोबत प्रचंड कष्ट करीत गेलो. कितीही वाईट दिवस-परिस्थिती असली तरी पुस्तकांचं गाठोडं, छंद यांची जिवापाड जपणूक केली. 

१९७८-८४ मला महाराष्ट्र विधान परिषदेत राज्यपालनियुक्त आमदार म्हणून घेतलं गेलं. त्यावेळी शरदराव पवार मुख्यमंत्री होते. अतिशय जाणत्या, अनेक क्षेत्रांतल्या जाणकार आमदारांची, मंत्र्यांची भाषणं व कार्य पाहून मी भारावून गेलो. ते आत्मसात करीत गेलो. राज्यकर्त्यांच्या सहकार्यानं ‘पाणी अडवा, जिरवा’ -जलसंधारण पाणी व्यवस्थापन, फळबागा ठिबक सिंचनचं तंत्रज्ञान हे सगळं अर्धा तास, एक तास चर्चा, ठराव या आयुधांनी मी सभागृहात मांडलं. ते पारित झालं. शासनमान्यता मिळवून हा शेतीचा नवा फलदायी विचार मी महाराष्ट्रभर जाऊन रुजवीत गेलो. हजारो शेतकऱ्यांचे हात हाती आले आणि आशीर्वादसुद्धा मिळाले. साहित्यापेक्षा माझं पहिलं प्रेम शेती आहे. त्यानंतर साहित्य! माझ्याबरोबरच इतरांचं साहित्यही तेवढंच महत्त्वाचं मी मानतो. मात्र अनेक क्षेत्रांत चांगलं थोडं, पण नको तेवढं प्रदूषण-झटपट मोठं होण्याचे, संपत्तीचे व खुर्चीचे मार्ग व विचारांची घसरण, या सर्वामुळे मी खूप अस्वस्थ होऊन, सुन्न होऊन शून्यात जातो; पण त्यासाठी बोलायलाच हवं, लिहायलाच हवं म्हणून स्पष्ट लिहितो-बोलतो. ‘विधिमंडळातून’ व ‘या शेताने लळा लाविला’ ही माझी पुस्तकं जरूर वाचावी, अशी विनंती.

 शेतात दिवसभर काम करायचं. रात्री कंदिलाच्या मिणमिण प्रकाशात पुस्तकं वाचायची. अनेक कवींच्या कविता गुणगुणताना अखेर माझ्याही ओठांवर माझे शब्द आले. त्याची कविता झाली. पुन:पुन्हा लिहीत गेलो. पुस्तक होईल, रसिक, साहित्यिक शाबासकी देतील, असं थोडंही वाटत नव्हतं. आपला छंद-नाद मी जोपासला. १९६२ ला माझ्यासारखेच तरुण नवे कवी चंद्रकांत पाटील भेटले. अनेक गोष्टींचं साम्य म्हणून घट्ट मैत्री जुळली ती आजवर तशीच, पंचावन्न वर्षांची! त्याचं माझं साहित्यावर विशेषत: कवितेवर निस्सीम  प्रेम. महाराष्ट्रभर आम्ही कवितेच्या प्रेमापोटी भटकत गेलो. अनेक कवींना भेटून आमचं भरण करीत गेलो. हैदराबादच्या अ.भा. साहित्य संमेलनात ‘पुन्हा कविता’ हा नव्या नामवंत कवींचा प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रसिद्ध केला. खिशात शंभर रुपये नव्हते. तरीही हे झालं. १९६६ला ‘पॉप्युलर प्रकाशन’चे रामदास भटकळ माझी कवितेची वही घेऊन गेले – त्या ‘रानातल्या कविता’ संग्रहाचं मोठं स्वागत झालं. रसिकांची पत्रं आली.  पुरस्कार इत्यादी सर्व झालं. प्रकाशनापेक्षाही आजवर रामदास भटकळ यांनी आपुलकी व मैत्रीची जोड दिली. त्यांच्यासोबत अनेक साहित्यिकांशी जवळीक झाली.  पळसखेडच्या पीकपाणी, झाडं-फळझाडं आणि ज्वारी-बाजरी-कापूस, बोरी, आंबा, मोसंबी, सीताफळ, केळी- दांडातलं झुळझुळ शुभ्र पाणी- शेती माऊलीचं स्वर्गवत बहरणं- त्या मातीचा दरवळ आणि दरवर्षीचं रूपखणी सौंदर्य, दुष्काळात निष्पर्ण होणं, शेतीझाडं-खेडी माणसं छिन्नविच्छिन्न होणं हे जे पाहिलं, प्रत्यक्ष जगलो त्यांचं गणगोत झालो. ते कवितेत उभं राहिलं.

   डिसेंबर १९७४ इचलकरंजीच्या अ.भा. साहित्य संमेलनात सर्व क्षेत्रांतल्या जाणत्या माणसांची लेखक कवी-रसिकांची गर्दी होती. माझ्या कविता वाचनाला त्या ठिकाणी रसिकांनी भक्कम दाद दिली.तिथेच अनेक थोर लेखक, कवींच्या भेटी-स्नेह जडला. यशवंतराव चव्हाणसाहेब तिथेच भेटले. अतिशय दिलखुलास, भरभरून आनंदानं ‘रानातल्या कविता’ त्यांनी वाचल्या. पत्रव्यवहार सुरू झाला.  मी विधान परिषदेत कलावंतांचा प्रतिनिधी होतो.  शासनात भक्कम काम करतोय हे पाहून त्यांना आनंद होता. शरदराव पवार यांचं १९७४ ला माझं पुस्तक वाचल्यावर पत्र आलं होतं, १९७५ ला प्रत्यक्ष भेट झाली. मुख्य विषय साहित्यापेक्षा शेती-पाणी असा होता. १९७८-८४ या काळात व १९९०-९५ या काळात त्यांनी मला विधान परिषदेवर घेतलं. एखाद्या प्रश्नापेक्षा साहित्य-कला क्षेत्राविषयी तसेच शेतीपाणी, सामाजिक क्षेत्रातल्या विषयाला धरून  एक झ्र् दोन तास चर्चा घडवून आणली. भाषणापेक्षा आकडेवारी, सप्रमाण मुद्दे  यावर भर द्यायला सांगितलं. जलसंधारण,  सामाजिक वनीकरण, नवं तंत्रज्ञान यासोबतच विश्वकोश-साहित्य संस्कृती मंडळातही खूप काही केलं. 

  सर्व क्षेत्रांतल्या अनेकांसाठी काम करण्याची धडपड मला सतत ऊर्जा देत राहिली. समाजाचे आपण देणं लागतो या भावनेनं जेवढं जमेल तेवढं केलं.  मी केलं यापेक्षा अनेक अशा सहकारी-प्रेमी मंडळींमुळे हे घडलं. मात्र यात घर, संसार याकडे खूप दुर्लक्ष केलं.   मी आयुष्यभर साधनाच केली. यश मिळत गेलं. मी कुणाचं काही हिरावून घेतलं नाही. कुणाला त्रास होईल असं वागलो नाही. जे जवळ आहे ते देतच राहिलो. नकळत चूक झाली असली तर नम्रपणानं सुधारली, माफी मागितली. कवितेनं भरभरून खूप आनंद दिला. मराठी कविता आजही ओठांवर मला वेढून आहे. प्रेम, निसर्ग याइतकं जगात सुंदर मोठं काही नाही. ते शब्दांमध्ये, गीतांमध्ये गुंफत गेलो. चांगली कविता लिहिणं सोपं नाही. आयुष्यभर शब्दांशी खेळ मांडून आहे. ‘कविता’ या लहान अक्षराने जादूगिरी केली, आयुष्य सुंदर केलं.

डोळे गच्च अंधारून,

तेंव्हा माझे रान,

रानातली झाडे

मला फुले अंथरून.

  • अजिंठा (कवितासंग्रह) 
  • कापूस खोडवा (शेतीविषयक) 
  • गंगा वाहू दे निर्मळ (कवितासंग्रह)
  • गपसप (कथासंग्रह)
  • गावातल्या गोष्टी (कथासंग्रह)
  • जगाला प्रेम अर्पावे (कवितासंग्रह)
  • त्या आठवणींचा झोका 
  • दिवेलागणीची वेळ (कवितासंग्रह)
  • पळसखेडची गाणी (लोकगीते) 
  • पक्ष्यांचे लक्ष थवे ल्लपानझड 
  • पावसाळी कविता (कवितासंग्रह)
  • पु. ल. देशपांडे आणि मी
  • यशवंतराव चव्हाण
  • यशवंतराव चव्हाण आणि मी (व्यक्तिचित्रणपर)
  • या शेताने लळा लाविला
  • रानातल्या कविता (कवितासंग्रह)
  • शरद पवार आणि मी 
  • शेती, आत्मनाश आणि संजीवन

मराठी मातीतला ‘रानकवी’ हरपला मातीत रमणारा, निसर्गाची अनेक रुपे आपल्या शब्दांतून उलगडून दाखवणारा संवेदनशील रानकवी हरपला आहे. मराठी माती सर्जनशीलतेची खाण आहे. यात ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी आपल्या शब्द सामर्थ्यांने निसर्गाची, राना- वनातील, पानाफुलांतील सौंदर्य, अनेकविध रूपे रसिकांसमोर मांडली. ते प्रयोगशील शेतकरी होते. शेतकऱ्यांच्या सुखदु:खाची मांडणी करताना त्यांनी ग्रामीण जीवनाच्या अनेक पैलूंवर आपल्या लेखनातून प्रकाश टाकला. शेत, साहित्यिक मंच ते विधान परिषद असा त्यांचा प्रवास झाला. या सगळय़ाच ठिकाणी महानोर यांनी आपल्या संवेदनशील कवी मनाची अमीट छाप उमटविली आहे. -एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

रसिक मनाचे रानाशी मैत्र घडवून आणणारा आणि मराठी साहित्याला एका वेगळय़ा उंचीवर नेणारा महान साहित्यिक आपण गमावला आहे. महानोर यांनी कवितेला हिरवा शालू नेसविला. निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थाने आहेत. त्यांच्या कवितेत विविध गंध आणि ध्वनी आहेत. ‘रानातल्या कविता’ या त्यांच्या कवितासंग्रहाने मराठी माणसावर गारूड केले. लोकसाहित्यावर त्यांनी अलोट प्रेम केले. त्यांनी चित्रपटासाठी लिहीलेली गीते मनाचा ठाव घेणारी आहेत. – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

महानोर खऱ्या अर्थाने ‘रानकवी’ होते. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी साहित्यसेवा केली. मराठी साहित्याला मातीचा गंध दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवन व ग्रामीण संस्कृतीचे वैभव त्यांनी मराठी साहित्यात आणले. त्यांच्या ‘रानातल्या कविता’नी वाचकांना निसर्गाची सहल घडविली. मराठवाडी बोलीतल्या ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ ‘पळसखेडची गाणी’ सारख्या लोकगीतांनी मराठी साहित्य समृद्ध केले. कवयित्री बहिणाबाई, बालकवींचा वारसा पुढे नेत त्यांनी साहित्यक्षेत्रात अढळ स्थान निर्माण केले. पवार कुटुंबियांनी आपला घनिष्ठ मित्र गमावला आहे. अजित पवार, उपमुख्यमंत्री

महानोर गेल्याचं कळलं तेव्हा अनेक आठवणी दाटून आल्या. मनमाडला माझे वडील असताना तिथं ते आले होते तेव्हा त्यांना प्रथम भेटले. मी लिहायलाही लागले नव्हते त्या वयात..पण ती ओळख त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सुलोचनाबाई यांनी कायम लक्षात ठेवली. कवी म्हणून आपल्या मोठेपणाचा जराही तोरा नसलेले महानोर जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा तेव्हा आपल्या लेकीला भेटावं इतक्या प्रेमानं भेटले. पुण्यातल्या साहित्य संमेलनात ‘निर्थकाचे पक्षी’ या माझ्या चौथ्या संग्रहाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं. ही माझ्यासाठी खूप मोलाची गोष्ट होती. ते आणि मी दोघेही पॉप्युलर प्रकाशनाचे कवी. त्यामुळे आणखी एक ऋणानुबंध आमच्यात होताच, पण खऱ्या अर्थानं घरोबा झाला तो बाबांच्या मुळे. बाबांनी त्यांच्या ‘रानातल्या कविता’ या संग्रहावर विस्तृत लेख लिहिला आहे. त्यांची कविता विश्लेषणाच्या पलिकडची होती आणि तिच्याविषयी बोलणं म्हणजे चांदणे मुठीत पकडण्याचा प्रयत्न करणेच आहे, असं बाबांना वाटायचं.  महानोरांची कविता केवळ रोमँटिक आणि गावाचं भाबडं वर्णन करणारी कविता कधीच नव्हती. त्यांची कविता ऐंद्रिय अनुभव देतानाच रसिकांच्या संवेदनशीलतेच्या कक्षा रुंदावणारी अस्सल कविता आहे. त्यांना विनम्र आदरांजली. – नीरजा, कवयित्री

माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दु:ख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेडय़ात गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ना. धों.चे बालपण कष्टात गेले, पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना.धों.च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी, जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले. त्यांची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत. ते खूप हळवे, त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी, प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. त्यांचे निधन देखील पावसाळय़ाच्या दिवसांत व्हावे हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटुंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो. – शरद पवार, ज्येष्ठ नेते

अजिंठय़ाच्या कपारीतले लेणे हरपले

महानगरांकडे धावणाऱ्या मराठी मनाला, सिमेंट काँक्रीटने घट्ट झालेल्या आपणा सर्वानाच महानोरांनी वावराकडे, मातीकडे वळवले. ‘चहा उकळुनी काळा झाला’ अशा शहरी मनाला त्यांनी जोंधळय़ाच्या चांदण्यांकडे नेले. गेल्या ५० वर्षांत कृषी पर्यटन, निसर्ग वगैरेचा बोभाटा होतोय. हे हिरवे गारूड मराठी मनावर पसरवण्यात या रानातल्या प्रतिभावंताचा मोलाचा अदृश्य वाटा! त्यांनी मोटेवरच्या पाण्याने मराठी मनाची कवितेची तहान जागी केली आणि भागवली. त्या विहिरीला जेथून पाणी मिळते त्या झऱ्याने कवितेची ओंजळ भरून घेतली. रानातल्या कवितेने मराठी कवितेत पाऊल टाकल्यावर ‘मी वणवण वाटा हिंडते तू रस्ता सांग ना?’ अशी शेतीच्या जगण्यातली हताश दु:खद वेदनाही मांडली. त्यांच्या जाण्याने मराठी कवितेतले अजिंठय़ाच्या कपारीतले लेणे हरपले. – अशोक नायगावकर

 ‘वही’ची गंमत

१९७५च्या आधीपासून आमचा संबंध होता. महानोरांची जवळजवळ सगळी पुस्तके ५० वर्षे आम्ही प्रकाशित केली, परंतु प्रकाशक म्हणून नव्हे तर मित्र म्हणून आमचे जवळचे संबंध होते. त्यांच्या शेतावरही मी जाऊन आलो आहे. त्यामुळे आमच्या आठवणी खूप आहेत. त्यांच्याबद्दल आवर्जून सांगायची आठवण म्हणजे ‘वही’ हे पुस्तक.

ही ‘वही’ म्हणजे मराठवाडय़ाची लावणी. हा किस्सा मला तेव्हा माहिती नव्हता. मला ‘वही’ म्हटल्यावर फक्त आपण लिखाणाला वापरतो ती वही इतकेच माहिती होते. तर त्यांची ‘वही’ म्हणण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, ती त्यांना हृदयनाथ मंगेशकरांना ऐकवायची होती. त्यासाठी ते मुंबईला आले. माझ्या घरापासून हृदयनाथ मंगेशकरांचे घर जवळ होते आणि एकदा तिथे गेल्यानंतर जवळपास आठ तास महानोरांची कविता आणि हृदयनाथ मंगेशकरांचे गाणे यात वेळ कसा गेला हे कळलेच नाही. या त्यांच्या भेटीनंतर पुढचा इतिहास घडला तो म्हणजे ‘जैत रे जैत’ चित्रपटातील गाणी. महानोर कवी होते ते गीतकार झाले. त्यांची गाणी लता मंगेशकरांनी गायली.

वा. ल. कुलकर्णी हे आमच्या संस्थेचे मार्गदर्शक होते. एकदा त्यांचे मला पत्र आले की, तुम्ही कवी महानोरांची कविता मागवून घ्या आणि लगेच ती प्रसिद्ध करा. त्याच वेळी आमची ‘नवे कवी, नवी कविता’ ही मालिका सुरू होत होती. त्यात पहिले पुस्तक ग्रेस यांचे आणि दुसरे महानोरांचे. ही दोन्ही पुस्तके एकत्र प्रसिद्ध झाली आणि त्या दोन्ही पुस्तकांना एकत्र पुरस्कार मिळाले. पहिला पुरस्कार हा एकच असतो, पण त्यावर्षी राज्य स्पर्धेमध्ये दोघांनाही प्रथम पुरस्कार मिळाला. दोघांनाही प्रथम प्रकाशन म्हणून पुरस्कार मिळाला होता. यानंतर त्यांचे काव्यवाचनदेखील ठेवण्यात आले होते आणि त्यात महानोरांनी बाजी मारली. तिथे वसंत बापट होते, नारायण सुर्वे होते, ग्रेस होते, पण महानोरांनी फारच सुंदर काव्यवाचन करून सगळय़ांची मने जिंकली. पुढे त्यांची असंख्य काव्यवाचने झाली. त्यांनी इतरांच्या कवितासुद्धा वाचल्या. काव्यावर त्यांचे प्रचंड प्रेम. महानोरांची विविध रूपे आहेत. म्हणजे ते शेतकरी होते, कवी होते, काव्यावर प्रेम करणारे होते, समीक्षक होते आणि कुटुंबवत्सल माणूसही होते.  – रामदास भटकळ, प्रकाशक

प्रतिभेचं मनस्वी बेट

आपल्याही आवडी-निवडीचा आलोक बदलत जात असतो, पण त्याला केवळ व्यक्तिगत आवडीनिवडीच्या मर्यादा नसतात. त्यापलिकडचं असं काही आपल्याला जाणवलेलं असतं, आकळलेलं असतं आणि सार्वजनिक चर्चाविश्वाच्या पटलावर ते यावं असंही वाटत असतं. जळगावला कुसुमांजली साहित्य संमेलनात एका सत्रात मी एक निबंध वाचला होता. ‘साठोत्तरी कवितेतील स्त्री- प्रतिमा’ असा काहीसा विषय असावा. त्यात ना. धों. महानोर यांच्या कवितेच्या संदर्भात माझ्या मांडणीत मी काही प्रश्न उपस्थित केले होते. नेमके महानोर सर पहिल्याच रांगेत प्रेक्षकांमध्ये बसलेले. त्यांच्या कवितेवर भाष्य करण्याआधी मी जरा थांबले. न राहवून त्यांच्याकडे माझं लक्ष गेलं. ते शेजारी बसलेल्या कुणाशी तरी फार प्रेमाने बोलत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेची अवघी प्रभा उजळलेली. नंतर कसा कोण जाणे, पण मला त्यांच्याविषयी एकदम विश्वास वाटला. मी सलग मांडणी केली, एक शब्दही न बदलता. गंमत म्हणजे, त्या टीकेला इतरांप्रमाणे तेही हसून दाद देत होते. सत्र संपल्यावर त्यांनी माझं मनापासून कौतुक केलं. ‘तुझ्या शब्दांची ही धार कधी गंजू देऊ नकोस’, असं आवर्जून म्हणाले. – प्रज्ञा दया पवार, कवयित्री