जयंत दिवाण
पिंजारलेले केस, मळलेले धोतर, रात्रीच्या जागरणाने डोळ्यांवर ताण… नाकावरील चष्मा सावरत दंगल शमविण्यासाठी ते त्या गदारोळात शिरले आणि जे घडू नये ते घडले. गणेश शंकर विद्यार्थी मारले गेले. घरातल्या लोकांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु विद्यार्थीजींचे उत्तर होते, मला संपूर्ण कानपूर ओळखते. मला कोणीही हात लावणार नाही. तो दिवस होता २५ मार्च १९३१. म्हणजे आजपासून त्यांच्या हौतात्म्याचे ९५ वे वर्ष सुरू झाले.
दोन दिवसांपूर्वी त्यांचा लाडका भगतसिंग व त्याचे सहकारी फाशी गेले होते. त्याचे दुःख त्यांना पोखरत असणारच. विद्यार्थीजी काही सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते नव्हते. ते गांधीजींचे अनुयायी होते. त्यांचे म्हणणे होते, “गांधीजींनी आपल्याला सत्याग्रह-अहिंसेचे शस्त्र दिले असताना सशस्त्र क्रांतीची गरज नाही. परंतु जे तरुण सशस्त्र क्रांतीवर विश्वास ठेवून आपल्या प्राणांची आहुती द्यायला निघाले आहेत त्यांना आपण हीणवता कामा नये.”
सशस्त्र क्रांतिकारकांच्या पहिल्या फळीतील अश्फाक उल्लाह खान विद्यार्थी यांचा प्रिय होता. फाशी जाण्यापूर्वी अश्फाकने विद्यार्थीजींना निरोप पाठविला होता की, मला उद्या येऊन नक्की भेटा. दुसऱ्या दिवशी विद्यार्थी रेल्वे स्टेशनवर गेले. पार्थिव ट्रेनच्या ज्या डब्यात ठेवण्यात आले होते तेथे त्यांनी त्याचे अंत्यदर्शन घेतले आणि त्याच्या भावाला पैसे देऊन म्हटले की, “सध्या एक साधी कबर बांध. नंतर मी त्याची नजरेत भरेल अशी मजार बांधेन.” पण ती संधी मिळण्याआधीच विद्यार्थीजी शहीद झाले.
विद्यार्थीजींनी या क्रांतिकारकांसाठी काय केले नाही! शहीद रामप्रसाद बिस्मिल यांची आत्मकथा तुरुंगातून चोर मार्गाने त्यांनी बाहेर आणली आणि प्रकाशित केली. शहीद रोशन सिंगच्या मुलीच्या लग्नात स्वतः तिचे पिता म्हणून उपस्थित राहिले. भगतसिंग लाहोरहून पळून आला तेव्हा त्याला प्रताप कार्यालयात आश्रय दिला. ज्या काळात शहिदांच्या परिवाराच्या सावलीलाही कोणी उभे राहत नसत, त्या काळात विद्यार्थीजी त्यांच्या कुटुंबाचे पालक बनले होते. रामप्रसाद बिस्मिलच्या आईला महिन्याला एक ठराविक रक्कम मिळावी यासाठी नेहरूंशी बोलून त्यांनी एक व्यवस्था लावून दिली होती.
विद्यार्थीजींची ओळख आहे ती पत्रकार म्हणून! वयाच्या २३ व्या वर्षी १९१३ साली कानपूर येथून त्यांनी ‘प्रताप’ नावाचे साप्ताहिक सुरू केले आणि १९३१ सालापर्यंत म्हणजे शहीद होईपर्यंत अठरा वर्षात ‘प्रताप’ने उत्तर भारत ढवळून काढला. तरुणांना गुलामीच्या विरोधात लढण्याची प्रेरणा दिली. मजूर व शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात ‘प्रताप’ लढला आणि या अठरा वर्षात विद्यार्थी यांनी त्यासाठी पाच वेळा तुरुंगवासही भोगला.
बारडोलीचा लढा आपणास माहीत असतो, कारण या लढ्यातून वल्लभभाई पटेल यांना ‘सरदार’ ही उपाधी मिळाली. हे साल होते १९२८! परंतु बारडोली लढ्याच्या सात वर्षांपूर्वी, १९२१ साली रायबरेली येथील शेतकऱ्यांच्या लढ्याला विद्यार्थीजींनी ‘प्रताप’द्वारे लोकांपर्यंत नेले. पहिले जागतिक महायुद्ध संपले होते, महागाई वाढली होती आणि त्यात रायबरेली परिसरात दुष्काळ पडला होता. शेतकऱ्यांना शेतसारा देणे शक्य नव्हते. परंतु जमीनदार मानायला कबूल नव्हते. त्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करण्यात सुरुवात केली. शेतकऱ्यांमध्ये उद्रेक झाला. रायबरेली जवळ नदीच्या पुलावर शेतकरी जमले होते. जमीनदाराने ब्रिटिश सरकारला हाताशी धरले व शेतकऱ्यांवर गोळीबार केला. त्यात साडेसातशे शेतकरी मारले गेले. ‘प्रताप’ने हा विषय लावून धरला. विद्यार्थीजींनी या घटनेला ‘जालियनवाला बाग’ संबोधिले. विद्यार्थीजींनी लिहिलेल्या लेखांमुळे सरकारने त्यांच्यावर खटला भरला व त्यांना जेलमध्ये जावे लागले. कानपूरला गिरणी कामगारांचा लढाही त्यांनी लढविला होता. ‘प्रताप’ लेखणीच्याद्वारे अन्यायाविरुद्ध लढत होता तर विद्यार्थी रस्त्यावरील लढाई लढत होते. त्यांनी स्वतः लिहिले आहे, ‘आता मजूर व शेतकऱ्यांचे युग येत आहे. ज्या संस्था शेतकरी व मजुरांच्या सेवेपासून दूर राहतात, त्या संस्था जास्त दिवस जिवंत राहू शकत नाहीत…’
स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रवादाचा बोलबाला होता आणि तो स्वाभाविकही होता. गुलामीतून मुक्तीसाठी राष्ट्र संकल्पनेला पुढे आणले गेले. परंतु ही राष्ट्र संकल्पना दुधारी तलवार आहे. एका मर्यादेनंतर ती फॅसिझमकडे झुकू लागते. याचे भान विद्यार्थी यांना होते. राष्ट्रवाद व धर्म यांची भेसळ झाली की त्याची झिंग समाजाला कशी येते, याचा प्रत्यय विद्यार्थीजींच्या काळातही इतिहासाला आला आहे. आजची स्थितीही त्यावेळी पेक्षा वेगळी नाही. राष्ट्रवाद सामाजिक चेतनेत रूपांतरित व्हायला पाहिजे. अन्यथा राष्ट्रवाद अनियंत्रित होऊन फॅसिझमच्या सीमेपर्यंत जाऊ शकतो. हे विद्यार्थी यांनी लिहिले आहे.
विद्यार्थी केवळ गुलामीतून मुक्तीचा लढा लढवीत नव्हते, तर स्वातंत्र्य, समता, बंधुता व धर्मनिरपेक्षतेच्या मुल्यांवर आधारित समाज घडविण्याचा प्रयत्नही करीत होते. इतका व्यापक विचार करणाऱ्यालाच असा मृत्यू येऊ शकतो. विद्यार्थीजींच्या मूत्यूची बातमी ऐकताच गांधीजी शोकसंदेशात म्हणाले होते, “मलाही विद्यार्थीसारखा मृत्यू यावा. विद्यार्थीजींचे रक्त हिंदू-मुस्लिम एकतेला सुदृढ बनवेल” बहुसंख्यांकवादाच्या आजच्या काळातही विद्यार्थी यांचे म्हणणे कालातीत ठरते. ते म्हणाले होते, ‘केवळ हिंदूच भारतीय राष्ट्राचे सर्व काही असणार नाही आणि जे काबूल, टर्कीचे स्वप्न पाहत आहेत त्यांची कबर इथेच असेल… त्यांची शोकगीते, जर ते त्यायोग्य असतील तर, या देशातच गायली जातील.’
विचारांची इतकी स्पष्टता असणारा, मात्र ब्रिटिशांनी टाकलेल्या जाळ्यात अडकला. ब्रिटिशांनी स्पॉन्सर केलेल्या दंगलीत मारला गेला. दंगल उत्स्फूर्त नसते. दंगल सत्ताधारी घडवीत असतात वा त्यांचा त्याला वरदहस्त असतो. अन्यथा विद्यार्थी यांचे पोलिसांनी रक्षण केले असते. पण पोलीस बघ्याच्या भूमिकेत बसून होते. भगतसिंग व त्याच्या साथीदारांना झालेल्या फाशीमुळे देशात उद्रेक होऊ नये, म्हणून विषयाला बगल देण्यात सत्ताधारी यशस्वी झाले. विद्यार्थीजींच्या मृत्यूतून आपणांस बरेच काही शिकण्यासारखे आहे. आजच्या घडीलाही ही शिकवण अधिक विचारयोग्य आहे. स्वातंत्र्य लढ्यातील भारतमातेच्या गालावरील अश्रू म्हणजे मृत्युंजयी गणेश शंकर विद्यार्थी होय.Jayantdiwan56@gmail.com