राशिद खान यांचा जन्म १९६८ मध्ये उत्तर प्रदेशातील बदायूँ जिल्ह्यात झाला. त्यांचे मामेआजोबा उस्ताद निसार हुसैन खान यांच्याकडून त्यांना संगीताचे प्राथमिक धडे मिळाले. रामपूर-सहसवान घराण्याची स्थापना करणारे उस्ताद इनायत हुसैन खान हे त्यांचे पणजोबा होत. गायकीमध्ये ग्वाल्हेर घराण्याशी जवळीक साधणारे घराणे म्हणून ते प्रसिद्ध झाले. मध्यम-मंद गती, गाताना पूर्ण कंठाचा वापर आणि व्यामिश्र तालबद्धता ही या गायकीची वैशिष्टय़े मानली जातात.
मुघल सम्राट अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक असलेल्या मियाँ तानसेनच्या ३१ व्या पिढीत राशिद खान यांचा जन्म झाला. त्यांनी १९७८मध्ये वयाच्या ११व्या वर्षी पहिल्यांदा जाहीर कार्यक्रमात गायन केले. एप्रिल १९८०मध्ये, उस्ताद निसार हुसैन खान कोलकात्याला स्थायिक झाले. त्यांच्याबरोबर राशिद खान देखील कोलकात्याला आले. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी अकादमीमध्ये औपचारिक संगीत शिक्षणाला सुरुवात केली. १९९४ पर्यंत त्यांना अकादमीमध्ये संगीतकार म्हणून मान्यता मिळाली होती.
हेही वाचा >>>राशिद खान यांच्यावर आज अंत्यसंस्कार
आजोबा निसार हुसैन खान यांच्याप्रमाणेच विलंबित ख्याल या गायकी प्रकारावर राशिद खान यांची हुकूमत होती. तीन दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी हिंदूुस्तानी शास्त्रीय गायकीच्या चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. उस्ताद आमिर खान आणि पंडित भीमसेन जोशी यांच्या गायनशैलीचा त्यांच्यावर प्रभाव होता. आपल्या गुरूंप्रमाणे त्यांनी तराण्यांवर प्रभुत्व मिळवले होतेच, त्याशिवाय स्वत:ची विशिष्ट शैलीही विकसित केली. निसार हुसैन खान हे वाद्याबरहुकूम गाण्यासाठी प्रसिद्ध होते, तर राशिद खान ख्याल गायकीचा अधिक वापर करत. कधी बंदिश गाताना किंवा गीताच्या अर्थावर जोर देण्यासाठी आपण आलाप घेताना त्यामध्ये भावनिकता अधिक असावी अशी त्यांची धारणा होती.
हिंदूुस्तानी शास्त्रीय गायनाबरोबरच त्यामध्ये त्यांनी त्यामध्ये कधी कधी सुगम शैलीची जोड दिली तर कधी पाश्चिमात्य वादकांबरोबर शास्त्रीय अधिक आधुनिक असे संगीताचे प्रयोगही केले. कोविडकाळातही ते सक्रिय होते. या कठीण काळात ते घरातच त्यांच्या मुलासह संगीताची मैफल भरवत आणि त्याचे ‘ऑनलाइन स्ट्रिमिंग’ केले जाई.
हेही वाचा >>>सांस्कृतिक पुनर्जागरणाचे ‘नव’वर्ष!
पुरस्कार
२००६ – पद्मश्री
२००६ – संगीत नाटक अकादमी पुरस्कार
२०१० – जागतिक भारतीय संगीत अकादमी पुरस्कार (जीआयएमए)
२०१२ – महा संगीत
सन्मान पुरस्कार
२०१२ – पश्चिम बंगालचा सर्वोच्च बंगभूषण पुरस्कार
२०१३ – मिर्ची संगीत पुरस्कार
हिंदी चित्रपटांसाठीही गायन
माय नेम इज खान, जब वी मेट, इसाक, मंटो, मौसम, बापी बारी जा, कादंबरी आणि मितिन मासी या चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. जब वी मेट या चित्रपटातील ‘आओगे जब तुम’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय आहे.