डॉ. शुभा थत्ते
मंगल गेली. आमची ७० वर्षांची मैत्री. मागच्या वर्षी तिच्या वाढदिवशी ( १७ मे २०२२ ) तिच्याकडे गेले होते तेव्हा तिची तब्येत ठीक होती. पण जूनअखेरीस म्हणाली की, महिनाभर बारीक ताप येतोय आणि काही निदान होत नाहीये. नंतर दोन महिन्यांनी भेटलो तेव्हा खंगल्यासारखी वाटली. एप्रिलअखेरीस भेटायला गेले तेव्हा तिला बोलवत नव्हतं, पण ती या जीवघेण्या आजारातून बाहेर पडेल अशी आशा वाटत होती. ती खोटी ठरली. ही आमची लखलखत्या बिजलीसारखी तल्लख, सर्वच आघाडय़ांवर अव्वल असलेली, जगन्मित्र, जयंतसारख्या आपल्या देशाचे भूषण असलेल्या नवऱ्याच्या बरोबरीने स्वत:चा ठसा उमटवणारी मंगल अशी डोळय़ादेखत कशी मिटत गेली याचा विषाद वाटतो.
आमची पहिली भेट सातवीच्या वर्गातील. दादरच्या किंग जॉर्ज शाळेतील. आमचा सहा मैत्रिणींचा ग्रुप होता. त्यातील तिघी पुढे वेगळे विषय घेतल्याने आणि दोघी लग्न होऊन गोव्याला गेल्यामुळे मी, मंगल व अजिता दिवेकर (काळे) यांची मैत्री अतूट राहिली. शाळेत असताना आमचा मुक्तसंचार ज्येष्ठराम बाग, अजिताचे किंग्ज सर्कलचे घर आणि वर्सोव्याचा बंगला, मंगलच्या आईचे पुण्याचे वसतिगृह आणि गोपिकाश्रमातील मंगलचे चितळय़ांकडील आजोळ येथे असे. मंगलची आई पुण्याच्या शेठ ताराचंद रामनाथ रुग्णालयात प्रसूतीशास्त्र प्रमुख तसेच विद्यार्थिनींच्या वसतिगृहाची रेक्टर होती. सुट्टय़ांमध्ये वसतिगृह रिकामे झाले की आम्ही तिथे आठवडाभर धमाल करत असू. दहावीनंतर आम्ही तिघीही रुईया कॉलेजमध्ये दाखल झालो. मी मानसशास्त्र हा विषय घेतल्याने पुढे रुपारेलमध्ये गेले. मी १९६१ मध्ये माझं लग्न ठरवलं, तर मी निवडलेल्या माझ्या जोडीदाराची मंगल आणि अजिता या दोघींनी दोन तास खडसावून मुलाखत घेतली. जयंतबरोबरच्या विवाहानंतर ती केंब्रिजला गेली. तिथून ती वैशिष्टय़पूर्ण, वाचनीय पत्रे आणि फोटो पाठवत असे. १९७२ साली ते दोघेही तेथील सर्व प्रलोभने नाकारून, छोटय़ा गीताला घेऊन केम्ब्रिजहून परत आले आणि टीआयएफआरमधील जबाबदारी घेतली.
मंगल कुलाब्याला टीआयएफआरमध्ये आल्यानंतर आमच्या परत गाठीभेटी होऊ लागल्या. मंगलचे सासूसासरे (तात्यासाहेब व ताई) शेवटपर्यंत तिच्याकडे राहिले. ते खाण्यापिण्याच्या वेळा, दिनक्रम या बाबतीत खूप काटेकोर होते. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुली, अतिव्यस्त नवरा आणि सासूसासरे यांच्या वेळा सांभाळणे ही तारेवरची कसरत करता करता तिचे पीएच.डी.चे कामही सुरू असे. कोणतेही काम नोकरांवर न सोपवता ती जातीने करत असे. मंगलची गणितशास्त्रातील आणि माझी क्लिनिकल सायकॉलॉजी या विषयातील पीएच.डी. १९८२ साली झाली. आम्ही दोघी मैत्रिणी पदवीदान समारंभाच्या मिरवणुकीत काळे डगले घालून जोडीने चाललो.
त्यानंतर १९८८ साली पुण्यातील ‘आयुका’च्या रूपात जयंतची स्वप्नपूर्ती झाली. त्याच्या उभारणीतही मंगलच्या अनेक मोलाच्या सूचना होत्या. तिच्या गणितावरील प्रेमामुळे पुण्यात तिचे बालभारतीचे व भास्कराचार्य प्रतिष्ठान येथे शिकवण्याचे काम सुरू झाले. शिकवण्याच्या कामात ती मनापासून रमत असे. कामानिमित्ताने होणाऱ्या जयंतबरोबरच्या प्रवासातही तिचे वाचन, काम आणि पाहिलेल्या ठिकाणांची मुळात जाऊन माहिती जमवणे सुरू असे. सर्वाच्या उपयोगी पडण्याचे बाळकडू तिला आईपासून मिळाले होते. निर्मलाताई राजवाडे या नामवंत वैद्य होत्या. ताराचंद रुग्णालयातील प्रदीर्घ सेवेनंतर त्यांनी गरजूंसाठी आत्रेय रुग्णालय सुरू केले. त्यांच्या शेवटच्या काळात मंगलने त्यांच्याकडून ‘आयुर्वेदिक उपचार’ नावाचे पुस्तक लिहून घेतले आणि १९९७ साली प्रकाशित केले. हे खास लिहिण्याचे कारण तिच्यातील अनेक पैलू जवळच्या माणसांनाही माहिती नाहीत व आपणहून सांगण्याचा तिचा स्वभाव नव्हता.
मंगल जाण्याच्या दोन दिवस आधी आमची भेट ही मोठी आश्चर्याची बाब होती. मला तिची प्रकृती अधिक बिघडल्याचे कळले होते व मी २२/२३ तारखेला येईन असे तिला तसे कळवले होते. पण फोन कर असा निरोप तिने मला बुधवारी पाठवला. तिला फोनवर बोलणे शक्य नव्हते हे मला माहीत होते तरी मी प्रयत्न केला. ती खोल आवाजात ‘शुभा, आत्ता लगेच ये’ असे म्हणाली. मी दुसऱ्या दिवशी लगेच गेले. चार तास तिच्या सोबत घालविले. तिच्या मुलीने गिरिजाने विचारले, ‘तुम्हा दोघी मैत्रिणींचा फोटो काढू का?’ मी नकार दिला. आमच्या आठवणीतील मंगलची छबी मला पुसायची नव्हती. तिच्या वेदना पाहावत नव्हत्या. आवाज खोल गेला होता पण तरी मला खुणेने सांगत होती, ‘तू बोल, मी ऐकते आहे.’ मी जुन्या आठवणी काढत होते आणि तिचा चेहरा फुलत होता. माझ्या सांगण्यात काही गफलत झाली तर ती लगेच दुरुस्त करत होती. तिची आठ वर्षांची नात रोशनी मधूनमधून येऊन आजीच्या चेहऱ्यावर हात फिरवत होती आणि ‘आजी, लौकर बरी हो,’ असे सांगत होती. गेले काही दिवस मंगलला लिहिण्यासाठी एक वही ठेवली होती. हात सुजल्याने पेनही हातात नीट धरवत नव्हते. तिला सांभाळणाऱ्या बाईंनी तिला बसवत हातात वही दिली तर ती एकाच अक्षरावर गिरवत राहिली व आडवी झाली. गेल्या काही दिवसांतील लिहिलेले मी वाचू लागले. अक्षर लावून लावून वाचावे लागत होते. तीन दिवसांपूर्वी लिहिले होते. ‘विनासायास मृत्यू प्रार्थयामि’ त्याआधी एक दिवस लिहिले होते, ‘काल रात्री जाग आली. कोपऱ्यात हिरवानिळा प्रकाश होता. वाटले मृत्यू आला. पण सकाळी जाग आली.’ तो पैलतीर तिला दिसत होता, जाणवत होता. तिथे जाण्याची मनाची पूर्ण तयारी झाली होती. निघताना माझा पाय निघत नव्हता. जयंतच्या चेहऱ्यावरील असाहाय्यता पाहावत नव्हती. तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवून तिचा मुका घेत मी निरोप घेतला. खाली येऊन गाडीत बसल्यावर माझ्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.