ध्यानधारणा म्हटले की डोळ्यांपुढे लहानपणी रामायण, महाभारत मालिकांत पाहिलेले ऋषीमुनी येत. ते साधारणपणे एखाद्या हिमाच्छादित शिखरावर एकांतात बसलेले असत. तेव्हापासून एकांत ही ध्यानाची पूर्वअट आहे, अशी खूणगाठ मनाशी बांधली गेली होती. अर्थात पडद्यावर दिसतो तो निव्वळ अभिनय असतो, तिथे एकांतात दिसणाऱ्या ऋषींच्या भोवताली चित्रिकरण करणारा अख्खा क्रू असतो, हे हळूहळू कळू लागले. पुढे २०१९मध्ये अशीच एक प्रतिमा स्मृतिपटलावर कोरली गेली. ती होती कशाय वेश धारण करून गुहेत ध्यानधारणा करत बसलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची. निवडणुकीची रणधुमाळी शमली होती आणि विरोधकांवर तोफ डागणारे मोदीजी आता केदारनाथच्या गुहेत जय-पराजय, मोह-माया अशा यःकश्चित, मिथ्या भावनांच्या पलीकडे पोहोचले होते. कोणताही देशभक्त, अध्यात्मिक वृत्तीचा भारतीय भारावेल, असेच ते दृश्य होते. त्याआधीच्या पाच वर्षांत भारताने असे भारावलेपण अनेकदा अनुभवले होते. पण यावेळी काहींना प्रश्न पडला…
हे दृश्य टिपले कोणी? पंतप्रधानांच्या एकांताचा भंग करण्याची प्रज्ञा कोणाची असावी? तरी एक बरे की तोवर मोदीजींना ते परमात्म्याचा दूत असल्याचा साक्षात्कार झाला नव्हता, नाहीतर एकांतभंग केल्यामुळे क्रुद्ध होऊन त्यांनी त्या छायाचित्रकाराला शाप वगैरे दिला असता… तर ही छायाचित्रे हाती लागताच मोदींच्या समर्थकांनी लगोलग ती व्हायरल केली आणि पाठोपाठ मोदीविरोधकांनी ध्यानधारणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केली. अर्थात टीका टिप्पणी हे विरोधकांचे कामच आहे. ऋषी तरी कुठे अजातशत्रू होते? त्यांनाही ध्यानभंग करणाऱ्यांचा उच्छाद सहन करावा लागलाच होता की. त्यामुळे या टीकेकडे फार गांभीर्याने पाहण्याचे कारण नव्हते, पण ज्यावर प्रश्न उपस्थित केले गेले, असे हे मोदींचे एकमेव छायाचित्र नव्हते.
हेही वाचा… मुस्लीम आरक्षण रद्द करण्याचा निकाल वादग्रस्त का ठरतो?
नरेंद्र मोदींनी नुकतेच त्यांच्या मातोश्रींचा उल्लेख करत म्हटले की ‘माझी आई हयात होती, तोवर मी जैविकरितीने जन्माला आलो आहे, असं मला वाटत होतं. पण आईच्या निधनानंतर आता मला खात्री पटली आहे की मी जैविकरित्या जन्माला आलेलो नाही,’ मला परमात्म्याने धाडले आहे. तर मोदींच्या मातोश्री हिराबेन हयात होत्या तेव्हा, ज्या – ज्या वेळी मोदी त्यांच्या भेटीला जात त्यावेळी कधी आईच्या पदप्रक्षालनाचे, कधी आईबरोबर भोजन ग्रहण करतानाचे, कधी आईच्या चरणांपाशी बसलेले, तर कधी आईचा आशीर्वाद घेतानाचे फोटो व्हायरल होत. असे फोटो पुढे आले की लगोलग विरोधक टीका सुरू करत- ‘हा फोटो कोणी काढला? आपल्या घरात पार जेवणाच्या खोलीपर्यंत माध्यमांना कोण नेतं? खासगी क्षण असे सार्वजनिक कोण करतं? वगैरे वगैरे’ आज विकासासाठी मोदींना साथ देणारे अजित पवार यांनीही त्यावेळी म्हटले होते, ‘यांनी नोटा बंद केल्या आणि सळ्यांना ४० दिवस रांगेत उभं केलं. मी माझ्या आईला रांगेत उभं करेन का? पण या महाराजांनी काय केलं? आपल्या वृद्ध आईला रांगेत उभं केलं. अरे काय चाललंय… मी काटेवाडीला जातो, तेव्हा आईला भेटतो, पण इथे जर दुसरी व्यक्ती असती तर आधी चॅनलवाले बोलावले असते. मग घराच्या बाहेर दोन खुर्च्या लावल्या असत्या आणि आईला सांगितलं असतं माझ्या हनुवटीला हात लाव… आणि मग लगेच कॅमेरे कचकचकचकच…’ अजित पवार महायुतीत गेल्यानंतर हा त्यांच्या खास शैलीतला व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला. अर्थात आता ते असं काही म्हणण्याची शक्यता नाही. मोदींच्या व्यक्तिमत्त्वाची भुरळ उशिरा का होईना त्यांनाही पडली असणारच.
कोणी काहीही म्हणो, मोदी यातले काही जाणूनबुजून करत नसणारच. पंतप्रधानपदाच्या धबडग्यात या सगळ्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ तरी कुठून मिळणार? पण त्यांची लोकप्रियताच एवढी प्रचंड आहे की कॅमेरा त्यांचा पिच्छाच सोडत नाही. त्यांची छबी टिपण्यासाठी छायाचित्रकार शब्दशः आकाश पाताळ एक करतात. त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी मोदींनी समुद्रात बुडी मारली किंवा आकाशात झेप घेतली तरी तिथेही कोणी ना कोणी कॅमेरे रोखून सज्ज असतेच. त्यांनी गुजरातमध्ये जिथे प्राचीन द्वारका नगरी होती असे मानले जाते, त्या भागत जाऊन समुद्रात बुडी मारली. बाहेर आल्यावर म्हणाले, की ‘प्राचीन द्वारकानगरीत साक्षात श्रीकृष्णाने उभारलेली भव्य प्रवेशद्वारं, अतिशय उंच इमारती होत्या म्हणतात. आज मी समुद्रतळाशी असताना हे सारं दिव्यत्व अनुभवलं. कृष्णाला मोरपीस वाहिलं’ वगैरे. पण त्यांनी हे सारे सांगेपर्यंत त्यांच्या त्या दिव्य अनुभूतीची दृश्य सर्वत्र प्रसारित झाली होती. त्यांची छबी टिपणाऱ्यांना त्या दिव्यत्वाची अनुभूती आली की नाही, हे कळण्यास मार्ग नाही. ते त्या अनुभूतीत मग्न झाले असते, तर बाळकृष्णच्या छबीसमान भगवा कुर्ता, त्यावर मोदी जॅकेट, कमरेला बांधलेला मोरांची नक्षी असलेला जरतारी पटका, हातात मोरपीस असा वेश करून समुद्रतळाशी बसून श्रीकृष्णाची प्रार्थना करणाऱ्या मोदींची छायाचित्रे कोणी टिपली असती? अर्थात काहींच्या मते मोदी कृष्णाचा अंशच आहेत, त्यामुळे ही देखील ईश्वरसेवाच. त्याआधी मोदी लक्षद्वीपला गेले होते, तिथेही हे पापाराझी जाऊन पोहोचले. त्यांच्या त्या फोटोसेशनने एक अख्खा पर्यटन प्रतिस्पर्धी देश हादरवून सोडला होता. मोदी तेजस या लढाऊ विमानाची स्वारी करून आले. विमान ढगांमध्ये असताना अचानक कॅमेरा त्यांच्यासमोर प्रकटला… आता ते तरी काय करणार, सवयीप्रमाणे हात उंचावून अभिवादनची पोझ दिली. लगेच ‘ढगात कोणाला हात दाखवत होते?’ म्हणत ट्रोलधाड! अटल बोगद्याच्या उद्घटनावेळीही ट्रोलर्स असेच काहीबाही बडबडत होते की रिकाम्या बोगद्यात कोणाला अभिवादन करतायत वगैरे. कौतुक करता येत नसेल तर किमान निंदा तरी करू नये.
हेही वाचा… अग्रलेख : अमरावतीतील तुघलक!
म्हणतात ना, पिकते तिथे विकत नाही, तेच खरे. पण परदेशात मात्र अशी पाय खेचण्याची प्रथा नाही. मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्याच्या पुढच्याच वर्षी ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने भारताचे पंतप्रधान कसे सेल्फी प्रेमी आहेत, याविषयीचा एक लेख प्रसिद्ध केला होता. त्यात त्यांनी त्यांचा दावा अतिशय सकारात्मक पद्धतीने आणि सोदाहरण सिद्धही केला होता. जगभरातील महत्त्वाच्या नेत्यांबरोबर सेल्फी घेताना पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधानांबरोबर सेल्फी घेताना सर्वसामान्य भारतीय, अशी अनेक छायाचित्र, ट्विट्स त्यांनी उदाहरणादाखल प्रसिद्ध केली होती. मध्ये ‘सेल्फी विथ मोदी’ ही अतिशय अभिनव योजनाही केंद्र सरकारने आणली, ज्याअंतर्गत सरकारी कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे आणि शाळा महाविद्यालयांत मोदींचा भव्य कटाउट असणरा सेल्फी पॉइंट उभारण्याचे आवाहन करण्यात आले होते. दक्षिणेतल्या काही राज्यांनी खळखळ केली, मात्र उर्वरित भारताने ही कल्याणकारी योजना सहज स्वीकारली होती. आपल्या आणि कॅमेऱ्याच्यामध्ये येणाऱ्यांना (मार्क झकरबर्ग वगैरे) मोदी हाताला धरू बाजूला करत असल्याची, प्रार्थना सुरू असताना, सार्वजनिक समारंभात कुठेही मोदींची नजर कॅमेरावरच स्थिरावलेली असल्याची छायाचित्र, चित्रफिती विरोधक पुन्हा पुन्हा पसरवतात. शेवटी म्हणतात ना, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण.
प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व मोदींसारखे आकर्षक आणि प्रभावशाली कुठे असते. सामान्यांच्या आयुष्यात काय रोज तेच-ते… तेच डिस्काउंट, ऑफरमध्ये ऑनलाइन खरेदी केलेले कपडे, स्वतःएवढेच अतिसामान्य मित्र, वर्षाकाठी एखादी तीर्थयात्रा किंवा लोणावळा- महाबळेश्वरादी घिशापिट्या ठिकाणी पर्यटन. यात कशाचे फोटो काढणार आणि कोणाला त्याचे काय कौतुक वाटणार. म्हणून काही मुठभर माणसे उगाच खुसपट काढून टीका करत बसतात. मोदी स्वतःची ओळख पूर्वी चायवाला अशी करून देत असले, तरी आता ते जैविक राहिलेले नाहीत. परमात्म्याच्या या दुताचे सारेच कसे भव्यदिव्य आहे. प्रसंगानुरूप लक्षावधी रुपये किमतीचे उंची पोषाख, जाकिटे, उपरणी, टोप्या, पगड्या, पादत्राणे, गॉगल्स, कशायवस्त्र (अद्याप कोणीही न पाहिलेला झोला)… आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा असणारे जिगरी दोस्त, समुद्रतळाशी तीर्थयात्रा, वरचेवर कामानिमित्त परदेशवाऱ्या… मग ते फोटो काढून आपल्या चाहत्यांना, भक्तांना दाखवणारच ना…
हेही वाचा… संविधानभान: मेरी मर्जी!
असो, तर एक जर्मन समाजशास्त्रज्ञ होते- मॅक्स वेबर. त्यांनी करिज्मा किंवा ज्याला आपण करिष्मा म्हणतो, ती संकल्पना मांडली. अनेकांनी वेबर यांच्या या संकल्पनेशी मोदींचे व्यक्तिमत्त्व ताडून आपापली मते मांडली आहेत. तर हे वेबर म्हणतात- करिज्मा म्हणजे व्यक्तिमत्त्वातील असा ‘कल्पित’ किंवा ‘कथित’ गुण जो असाधारण ‘मानला’ जातो. ज्या गुणामुळे ती व्यक्ती नेता ‘मानली’ जाते. हा करिज्मा ज्याच्याकडे असल्याचे ‘मानले’ जाते ती व्यक्ती आणि तो त्या व्यक्तीत आहे, असे ‘मानणारा’ समूह यांच्यातील सामाजिक संबंधांवर करिज्मा निर्माण होणे आणि टिकणे अवलंबून असते. थोडक्यात करिज्मा ही एकंदर संकल्पनाच मानण्या- न मानण्यावर आधारित आहे.
मोदींचा असा ठाम विश्वास आहे की ते असाधारण आहेत. त्यामुळे ते आपले अनोखे व्यक्तिमत्त्व जगासमोर मांडतात. बहुसंख्य भारतीयांना ते भावते. पण वेबर यांनी असेही म्हटले होते की कालांतराने करिज्मा विरत जातो. असामान्य गोष्टी रोज-रोज दिसू लागल्या की सामान्य वाटू लागतात. मोदींबाबत असे काही होण्याची शक्यता नाहीच. कारण कोणी कितीही करिष्मा वगैरे म्हणोत, आहेत तर ते परमात्म्याचे दूत. त्यामुळे नाविन्य कधी लोपणार नाही. सध्या तरी संपूर्ण भारत त्यांच्या विवेकानंद रॉकवरील नव्या-कोऱ्या छायाचित्राच्या प्रतीक्षेत आहे…
vijaya.jangle@expressindia.com