अजिंक्यचे माणूसपण, शहाणपण, साधेपण, संवेदनशीलता असे विविध पैलू ‘गप्पां’मध्ये उलगडत जातात आणि निव्वळ मैदानावर बहारदार फलंदाजी करण्यापलीकडले हे व्यक्तिमत्त्व आहे याची खात्री पटून जाते. त्याला बोलते आणि खुलते करण्याची जबाबदारी क्रिकेटप्रेमी रंगकर्मी विनय येडेकर आणि ‘लोकसत्ता’च्या मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक सिद्धार्थ खांडेकर यांनी पार पाडली.

प्रथितयश फलंदाज आणि कल्पक कर्णधार अजिंक्य रहाणे याच्याशी भेटीगाठीचा योग यंदाच्या ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमात जुळून आला. डोंबिवलीतून पुढे येऊन शिवाजी पार्कसारख्या क्रिकेटपंढरीमध्ये जम बसवणे हेच पहिले मोठे आव्हान. ते पेलत पुढे ज्युनियर ग्रेड, रणजी असे टप्पे पार करत भारतीय संघात स्थान पक्के करणे अशी ही उत्तरोत्तर अवघड होत जाणाऱ्या आव्हानांची मालिकाच. परदेशी मैदानांवर शतके आणि अर्धशतके झळकावणारा हा झुंजार फलंदाज. कसोटी, एकदिवसीय, टी-२० किंवा फ्रँचायझी क्रिकेटमध्ये सारख्याच तेजाने तळपणारा अजिंक्यतारा. प्रतिकूल परिस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी येऊन पडल्यानंतरही ऑस्ट्रेलियासारख्या अत्यंत खडतर प्रतिस्पध्र्याला एक-दोन नव्हे तर तीन सामन्यांमध्ये मात देणारा करारी सेनानी.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
Adam Gilchrist says Sir Don Bradman would have troubled ahead Jasprit Bumrah in batting
Jasprit Bumrah : ‘….बुमराह असता तर ब्रॅडमनची सरासरी ९९ नसती’, आस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचं मोठं विधान
Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?
Jasprit Bumrah : Kapil Dev shoots down 1983 World Cup teammates controversial take on Bumrah's workload
Jasprit Bumrah : ‘बुमराहशी माझी तुलना करू नका…’, वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे वर्कलोड मॅनेजमेंटबाबत मोठं वक्तव्य
Bumrah may lose out on Test captaincy
कसोटी कर्णधारासाठी दीर्घकालीन पर्यायाची गरज; बुमराच्या क्षमतेवरून निवड समितीमध्येच संभ्रम
Will Pakistan lose hosting rights of Champions Trophy cricket tournament
चँपियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान गमावणार? भारताच्या दबावाचा किती परिणाम?

अजिंक्यचे हे पैलू सर्वज्ञात आहेत. परंतु या आव्हानगाथेमागची एक व्यक्ती म्हणून अजिंक्यने लढलेली लढाई फारशी ज्ञात नसते. वाटचालीतील प्रत्येक चढ-उतारामध्ये कुटुंबीयांचा – आई-वडील आणि पत्नी – यांचा खंबीर आशावाद आणि पाठिंबा किती साहाय्यभूत ठरला, हे फार थोडय़ांना ठाऊक असते. यशापयशाच्या अस्थिर आवर्तनांमध्येही ‘प्रोसेस’चे शाश्वत महत्त्व ओळखणे किती निर्णायक असते, हे समजावून सांगणारा अजिंक्य मोठा वाटू लागतो. शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे त्यांच्या व्यथांनी विचलित होणारा आणि त्यांच्या मदतीसाठी धावून जाणारा संवेदनशील अजिंक्य वय आणि वलयाच्या परिघापलीकडचा संवेदनशील दिसू लागतो. समाजहितास बाधक ठरणाऱ्या ब्रँड्सची जाहिरात नाकारताना कोटी-कोटींवर पाणी सोडणारा अजिंक्य सध्याच्या नफेखोरीच्या बजबजपुरीत दुर्मीळ नायकच ठरून जातो. अजिंक्यचा हा प्रवास त्याच्याच शब्दांत..

‘प्रोसेस’ महत्त्वाची..

हे तत्त्व मी चुकांमधून शिकलो. माझं लक्ष नेहमीच निकाल किंवा परिणामांकडे लागलेलं असायचं. आपल्याला कुठे जायचंय, काय मिळवायचंय याविषयी ठोकताळे असलेच पाहिजेत. १००, १५०, २०० धावा करायच्यात हे मनात कुठेतरी असायचं. माझी उद्दिष्टे काय असावीत, याविषयी सतत विचार करायचो, ते डायरीत लिहून ठेवायचो. सतत विचारच. जे करतो त्याचा आनंदही लुटायचा असतो हे तेव्हा ठाऊक नव्हतं. पण नंतर लक्षात आलं, की आपण खेळतो, सराव करतो यात आनंद शोधला पाहिजे. अगदी अपयश आलं तरी ते आनंदानं स्वीकारलं पाहिजे. माझ्या जे हातात आहे – रोज जाऊन खेळणे, सराव करणे – त्यावर लक्ष केंद्रित करून त्यात मजा शोधली पाहिजे. निकाल काय लागेल, याचा विचार करण्यात अर्थ नाही. यशापयशाला सारखेच महत्त्व देत आशावादी आणि विनम्र राहणे, यालाच मी ‘प्रोसेस’ म्हणतो. ती महत्त्वाची. आपले लक्ष ‘प्रोसेस’कडे असले पाहिजे, ‘रिझल्ट’ किंवा ‘आउटपुट’कडे नव्हे!

डोंबिवली.. आणि तो फोटो!

डोंबिवलीत आम्ही राहायचो आणि क्रिकेट खेळायचो. माझ्याविषयी बिल्डिंगमधली मंडळी तक्रार करायची, की हा खिडक्यांच्या काचा फोडतो. पण या तक्रार करणाऱ्यांपलीकडे एक डॉक्टर शेजारीही होते, ज्यांनी माझा खेळ पाहून ‘याला अॅकॅडमीत का नाही पाठवत’ असा सल्ला माझ्या वडिलांना दिला, जो त्यांनी गांभीर्याने घेतला. रेल्वे ग्राउंडजवळ द्रोणाचार्य अॅकॅडमीत मी गेलो. तिथं माझे पहिले कोच खातू सर होते. त्यांनी मला एक फोटो दाखवला नि विचारलं, की तुला यांच्याबरोबर खेळायचं आहे का? मी लगेच म्हणालो.. हो! तो फोटो होता सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचा. ती सुरुवात होती. अॅकॅडमीत सर्वात लहान होतो. मी सहासात वर्षांचा, बाकीचे बारा-तेरा वर्षांचे होते. ठाण्यात त्यावेळी निवडचाचण्या व्हायच्या. तिथं गेलो तर दोनएकशे मुलं होती. त्यांच्यातून मी निवडला गेलो. पण काही सिलेक्टर म्हणाले, की हा अजून खूप लहान आहे तेव्हा याला आता संघात नको घेऊया. एक सिलेक्टर संजय पाटील मात्र म्हणाले, की लहान असला, तर संघाबरोबर राहून शिकेल. आमची पहिली स्पर्धा वरळी स्पोर्ट्स क्लबला होती. तिथं जाताना सांगण्यात आलं की, तू संघात नसशील. पण पाणी वगैरे पोहोचवणे अशी कामं करावी लागतील. मी म्हटलं आनंद आहे. काही तरी मदत माझ्याकडून होईलच. त्या सामन्यात एक सलामीवीर जायबंदी झाला. मला संधी मिळाली. त्या सामन्यात ६४ धावा केल्या आणि माझा प्रवास सुरू झाला. पहिले शतकही डोंबिवलीतच. त्याचा आनंद अवर्णनीय आहे. क्रिकेटसाठी पाटकर विद्यालयातून एस. व्ही. जोशी शाळेत आलो. त्यांनी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायला सांगितलं. अभ्यासही महत्त्वाचा आहे असं वाटत होतंच. घरनंही तसं सांगितलं जायचं. जीवनात अनिश्चितता असतात. दहावीनंतर मात्र क्रिकेटनेच आयुष्य व्यापलं.

‘खडूस’ क्रिकेट भिनलेलं..

रणजी ते कसोटी आणि डोंबिवली ते सीएसएमटी यांत दुसरा प्रवास अधिक खडतर असावा. त्यातून येणारा खडूसपणा कदाचित खेळात दिसत असावा. सहाव्या-सातव्या वर्षी रेल्वेने प्रवास करून आझाद मैदानात जायचो, तेव्हा सुरुवातीस बाबा बरोबर यायचे आणि तिथून ते ऑफिसला जायचे. एकदा त्यांनी मला संगितले, की इथून पुढे तुला एकटय़ानेच प्रवास करावा लागेल, कारण दरवेळी मी तुझ्याबरोबर नाही येऊ शकत. मला ती लोकलमधली गर्दी पाहून भीती वाटायची. पहिल्यांदाच मी एकटा लोकलने सीएसएमटीला गेलो. त्या पहिल्या दिवशी बाबा मला न सांगता माझ्या गाडीत होते. ते त्यांनी नंतर कधीतरी सांगितलं. पुढे कधी दादर कधी आझाद मैदानात गेल्यानंतर शून्यावर बाद झाल्यानंतर घरी परतताना खूप निराश वाटायचं. इतक्या लांबच्या प्रवासानंतर खेळताना लवकर बाद व्हायचं नाही, हा खडूसपणा त्यामुळे मुरत गेला. काही ना काही तरी योगदान दिलंच पाहिजे, ही ती भावना. खडूस शब्द हा असा मुंबईकरांच्या बाबतीत प्रवासातूनच येतो. अर्थात मैदानाबाहेर मी तसा नाही!

परदेशी मैदाने आवडी बहु..

ती एक गंमतच आहे. मला ड्रेसिंगरूममध्ये फार वेळ बसायला आवडत नाही आणि भारतात तशी वेळ बऱ्याचदा येते. विशेषत: चौथ्या-पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत असाल, तर कधीकधी तीन तास किंवा दिवसभरही बसावं लागतं. याउलट परदेशात अनेकदा फलंदाजी करायची संधी पहिल्या सत्रातच मिळते. प्रतीक्षा करत बसण्यापेक्षा खेळात सहभागी होणं मला आवडतं. घरच्या मैदानांवर अनेकदा ड्रेसिंगरूममध्ये विचार करूनच थकवा येतो. परदेशी मैदानांवर चेंडू हवेत अधिक वळतो, उसळी घेतो. त्यामुळे तिथं खेळणं अधिक आव्हानात्मक असतं आणि आव्हानं स्वीकारायची माझी तयारी असते. ३ बाद ३० या परिस्थितीत मला फलंदाजी करायला आवडतं. ३ बाद ३०० अशी स्थिती असते, तेव्हा थोडा कंटाळा येतो. ३ बाद ३० या परिस्थितीमध्ये तुमची संघाला गरज अधिक असते. माझ्यासाठी ही स्थिती – देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची संधी नेहमीच अधिक उत्साहवर्धक ठरते. भारतीय संघासाठी चांगली कामगिरी हेच उद्दिष्ट राहते.

ऑस्ट्रेलियातली ती मालिका!

ती मालिका आपल्या सर्वासाठी – सर्व भारतीयांसाठी अतिशय ‘स्पेशल’ होती. तीन-चार महिने आधी म्हणजे दुबईत आयपीएल सुरू असताना त्या मालिकेसाठी तयारी सुरू झाली होती. विराट केवळ पहिल्या कसोटीपुरता खेळेल, पुढील मालिकेत तुला नेतृत्व करावे लागेल, असं त्यावेळीच मला सांगण्यात आलं होतं. मी काही योजना लिहूनही ठेवल्या. आम्ही ऑस्ट्रेलियात गेलो. दोन सराव सामने होते. त्यावेळी प्रत्यक्ष मालिकेत आपले डावपेच काय असतील याचा एक अभ्यास मैदानावर करून पाहिला. अलीकडे जस्टिन लँगरने याविषयी सांगितलं, की मी त्यावेळी स्टीव्ह वॉला भेटलो. त्याच्याशी अनेक विषयांवर बोललो. पहिल्या कसोटीत – आणि आपण त्या सामन्यात सुरुवातीला वरचढ होतो – तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुन्हा खेळायला उतरलो, त्यावेळी अडीचशे-तीनशे धावा करून ऑस्ट्रेलियावर दडपण आणता येईल असं वाटत होतं. पण मी लवकर बाद होऊन परतलो. निराश होऊन एक क्रिकेट पॅड उतरवत असताना पाठोपाठ आणखी एक फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतला. दुसरे क्रिकेट पॅड उतरवत असताना आणखी एक जण परतला. हेल्मेट आणि ग्लव्ह ठेवत असताना तिसरा परतला. आमच्यातल्या एकाला विचारलं की हे काय सुरू आहे? त्यानं सांगितलं, की तीन विकेट्स तुझ्यानंतर पडल्या. वरच्या मजल्यावर जाईपर्यंत आणखी काही फलंदाज परतले. ९ बाद २७ आणि पुढे सर्वबाद ३६! कुणाचाच यावर विश्वास बसत नव्हता. पुढे संघाची सूत्रं मला स्वीकारायची होती. त्यावेळी आपले कोच रवी शास्त्री यांना सांगितलं, की आज या सामन्यावर चर्चा नको. विचारही नको. ज्याला जे करायचंय, ते करू द्या. मेलबर्नला गेल्यानंतर आपण चर्चा करू. मी त्या विचारांपासून दूर जाण्यासाठी मित्रासमवेत फिरायला गेलो. मेलबर्नला गेल्यानंतर मी म्हणालो, की जे झालं ते झालं. केवळ एकदा ३६ वर सर्वबाद झाल्यामुळे आपण वाईट संघ ठरत नाही. अजून तीन सामने आहेत. ही तीन सामन्यांची मालिका आहे असं समजून आपण तिचा आनंद घेऊ. कोणावरही चांगली कामगिरी करून दाखवायचं दडपण नाही. मजेत खेळा, सर्वस्व ओतून खेळा असं मी सांगितलं. या मालिकेविषयी बरंच बोललं जात होतं. सगळेच अशा वेळी ज्योतिषी बनतात आणि भाकितं करू लागतात! मी शक्यतो मालिका सुरू असताना, समाजमाध्यमांवर जात नाही किंवा तिथलं काहीच वाचत नाही. बाहेरच्यांशी मला काहीही घेणं-देणं नाही. आपण १५-१७ खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांनी एक राहायचं. एकमेकांच्या पाठीशी राहायचं. कुठेतरी असं वाटत होतं, की आम्हाला ३६ धावांत गारद केल्यानंतर ऑस्ट्रेलिया थोडेफार फाजील आत्मविश्वासाच्या चक्रात सापडतील. जो चांगला खेळेल त्याचं कौतुक करायचं, जो चांगला खेळणार नाही त्याला आधार द्यायचा हे आम्ही ठरवलं. त्या अवघड क्षणी आम्ही एकत्र राहिलो. काही जणांनी बाहेरूनही आधार दिला. भारत पुन्हा चांगला खेळेल अशी आशा काहींनी व्यक्त केली. अर्थात माझी पत्नी राधिका, माझे आई-वडील, माझा मित्र अखिल या सगळय़ांनी खूप धीर दिला. ते माझं बळ होतं.

मेलबर्न कसोटी आम्ही जिंकली, त्यावेळी जाणीव होती की मालिका अजून सुरू आहे. दोन महत्त्वाचे सामने आहेत. पण त्या दिवशी आम्ही आनंदलो होतो. अर्थात पार्टी वगैरे नाही केली. अॅडलेडचा निकाल मागे सोडला, तसाच मेलबर्नचा निकालही आमच्यासाठी लगेच इतिहासजमा झाला. इथं सांगावंसं वाटतं, की तो विजय एका प्रक्रियेचा भाग होता. एका व्यापक प्लानिंगचा भाग होता आणि एका पराजयाने किंवा विजयाने आम्ही विचलित होणार नव्हतो. त्यामुळेच एकेक खेळाडू जायबंदी होत असूनही आम्ही सरकत होतो. ब्रिस्बेन कसोटीच्या आधी सिडनीतील सामना आपण अवघड परिस्थितीत अनिर्णित राखला. शिवाय आणखी एका अडचणीचा सामना करावा लागला. त्यावेळी कोविड सुरू होता, पण मेलबर्नपर्यंत काही निर्बंध नव्हते. सिडनीत आल्यानंतर मात्र ब्रिस्बेनचा सामना सुरू होईपर्यंत आम्हाला ‘बबल’मध्ये राहण्यास सांगितले गेले. म्हणजे सर्व प्रकारच्या हालचाली आणि वावरावर बंदी. पण आमचा हॉटेल स्टाफ मात्र त्यांच्या घरी वगैरे जात होता, त्यांना ‘बबल’चे निर्बंध नव्हते. म्हणजे आमच्यावर बंधने आणून मानसिक खच्चीकरणाचा ऑस्ट्रेलियाने केलेला तो एक प्रयत्न होता. पण उलट त्यामुळे आम्ही मानसिकदृष्टय़ा अधिक कणखर बनलो. मी एक गोष्ट केली, ती म्हणजे माझ्या खेळाडूंना पूर्ण स्वातंत्र्य दिले. मैदानावर आणि मैदानाबाहेरही. असे केल्यास कामगिरी सुधारते असा माझा अनुभव आहे. उदा. शुभमन आणि ऋषभ हे पहिल्या सामन्यात खेळले नव्हते. ते दुसऱ्या कसोटीपासून खेळले. दोघांनीही ब्रिस्बेन कसोटीत बहुमोल योगदान दिले. त्या सामन्याच्या चौथ्या दिवशी पाऊस सुरू झाला. शेवटच्या दिवशीही पावसाचा अंदाज होता. आम्ही ठरवलं, की पावसाचा विषयच ड्रेसिंगरूममध्ये काढायचा नाही. खेळायचं ते जिंकण्यासाठीच. दुसऱ्या दिवशी कडक ऊन पडलं. शुभमन-पुजाराची भागीदारी चांगली झाली. त्यानंतर मी फलंदाजीसाठी गेलो त्यावेळी मला वाटलं, की हाच तो क्षण. आपण बाजी उलटवू शकतो. याविषयी सहकाऱ्यांना काहीही सांगितलं नव्हतं आणि प्रतिहल्ला चढवण्याचं मी स्वत:च ठरवलं. धावा २८-३० केल्या, तरी त्या खेळीने सामन्याचा नूर बदलला. त्यानंतर ऋषभ पंत ती अप्रतिम खेळी करून गेला. ती मालिका आम्ही जिंकली, कारण प्रत्येक जण दुसऱ्याला आधार देत होता. अर्थात देवाची कृपाही होतीच. शेवटच्या कसोटी सामन्यासाठी मैदानावर ११ जण घेऊन उतरणं हेदेखील आव्हानात्मक होतं. कुणाची पाठ दुखतेय, कुणाचे गुडघे जायबंदी आहेत. आमचे कोच रवी शास्त्री, भरत अरुण यांनाही पांढरे किट्स घालायला लावावं काय अस वाटून गेलं ! आमचे त्यावेळचे फिजियो नितीन पाटील यांना सांगितलं, की काहीही कर. एखादा ५० टक्के फिट असेल, तर त्याला मैदानावर सांभाळून घेण्याची जबाबदारी माझी.

नेतृत्व आणि ‘इन्स्टिंक्ट’

सहजप्रवृत्ती (इन्स्टिंक्ट) आणि तयारी या दोहोंचे मिश्रण नेतृत्वामध्ये असते. मी इतक्या प्रकारचे क्रिकेट खेळलोय. प्रत्येक सामन्यात मी विचार करतो की कर्णधार असतो तर या स्थितीत काय केलं असतं? किंवा करायलं हवं होतं? इन्स्टिंक्ट हेही असतंच. पण ते अनुभवातून येतं. तुम्ही खेळाचा जेव्हा सतत विचार करता, परिस्थितीचा विचार करता, तेव्हा कर्णधार म्हणून तुमच्या समोर तीन-चार पर्याय उभे राहतात. काही वेळा यातून काही तरी पटकन सुचून जातं आणि ती खेळी यशस्वी ठरते. याला आपण इन्स्टिंक्ट म्हणत असू. पण तो अनुभवाचाच भाग असतो. एकदम एका क्षणी डोक्यात काहीही आलं आणि ठरवून टाकलं असं काही होत नाही. उदा. मेलबर्न कसोटीमध्ये नवव्या षटकाला मी अश्विनला आणलं. त्यावेळी मोहम्मद सिराजलाही गोलंदाजी करायची होती. मी काही बोललो नाही. पण अश्विनने दोघांना बाद केलं.

लॉर्ड्सवरील शतक..

ते शतक विशेष होतं, कारण आपण तो सामना जिंकला. त्या सामन्याच्या आधी ज्यांना भेटायचो, ते सगळे सांगायचे, ‘लॉर्ड्सवरील शतक स्पेशल असतं.’ ते ऐकत मी झोपी गेलो आणि दुसऱ्या दिवशी मैदानावर गेलो त्यावेळी ते शब्द ऐकू येत होते. तेव्हा त्या शतकाचं श्रेय या सगळय़ांचं.

शेती आणि शेतीकारण..

मी शेतकरी कुटुंबातलाच. लहानपणी आजीला शेतात काम करताना पाहिलंय. मग एकदा श्रीलंका दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंबंधी ऑनलाइन बातमी वाचली आणि दु:ख झालं. शेतकऱ्यांचे कष्ट जवळून पाहिलेले असल्यामुळे काही तरी मदत केली पाहिजे असं वाटत होतं. शिवाय ही मदत मी प्रसिद्धीसाठी करत नाही. ती माझी आवड आहे. अनेक संस्थांना मदत केली आहे.

सोशल मीडिया..

चांगला संदेश हाच उद्देश आहे. सामने सुरू असताना मी सहसा तेथे फिरकत नाही. माझी टीम ते सगळं सांभाळते. मी ज्यात सहभागी असतो अशा बाबी, शेती, क्रिकेट अशांविषयी व्यक्त व्हायला आवडतं. मिलेट्स हा आवडीचा विषय असल्यामुळे त्यावरही मध्यंतरी पोस्ट केलं होतं.

क्रिकेट आणि आयपीएल..

माझ्यासाठी देश प्रथम असतो. देशासाठी खेळताना वेगळाच अभिमान वाटतो. भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली याबद्दल मी कृतज्ञ आहे. नवीन खेळाडूंना काय देता येईल, याचा विचार करत असतो. जे पालक मुलांना आयपीएलमध्ये पाठवण्याविषयी आग्रही असतात, त्यांना एकच सांगू इच्छितो – मुलांना एकटं सोडा. त्यांना स्वातंत्र्य द्या. खेळाच्या मैदानावर आईवडिलांचं आजूबाजूला असणं काही वेळा मुलांच्या मनावर दडपण आणणारं ठरतं. त्याऐवजी मुलांना सांगा, की जे काही करशील ते आवडीनं आणि मेहनत घेऊन कर. क्रिकेटच्या विकासासाठी असोसिएशनच्या पातळीवरही प्रयत्न सुरू आहेत. गेली दोन वर्षे मी त्यांच्याशी संबंधित आहे. मुंबई क्रिकेटचे वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आयपीएल हे बदलत्या क्रिकेटचं रूप आहे. प्रत्येक प्रकारचं क्रिकेट गांभीर्याने घेतलं पाहिजे. प्रत्येक सामना सारख्याच तन्मयतेनं खेळता आलं पाहिजे. आयपीएल माझ्यासाठीही महत्त्वाचं ठरलं. माझं पुनरागमन हे आयपीएल आणि रणजी अशा दोन्हींच्या माध्यमातून झालं.

ब्रँडची निवड करताना..

ब्रँड्स निवडताना त्याच्या माध्यमातून चांगला संदेश देता येऊ शकतो हे आम्ही पाहिलं. मी, माझा मित्र अखिल आणि माझ्या कुटुंबीयांशी याविषयी मी बोलत असतो. सर्व ब्रँडविषयी आदरच आहे. काहींनी मोठमोठय़ा रकमा देऊ केल्या होत्या; पण त्यातील काही आमच्या भूमिकेशी सुसंगत नव्हते. शेवटी खेळाडू असो वा सेलेब्रिटी, ब्रँडच्या माध्यमातून योग्य संदेश जातो का हे पाहणं खूप महत्त्वाचं असतं. कारण लहानांपासून सारेच तुम्हाला पाहात असतात, तुमचे अनुकरण करत असतात. मी तरीही खूप ब्रँडच्या जाहिराती केल्या आहेत. अजूनही विशेषत: महाराष्ट्रातील ब्रँडच्या माध्यमातून चांगले संदेश मी पोहोचवू शकतो. काही वेळा ब्रँड नाकारताना काही कोटींवर पाणी सोडावं लागलं. शेवटी तुमच्याकडे दहा कोटी आले काय शंभर कोटी आले काय, तुम्ही लोकांना काय देणार आहात? माझ्यासाठी किती घ्यावं यापेक्षाही किती द्यावं, ही गोष्ट अधिक महत्त्वाची आहे. कुणाला काही देण्यातून मिळणारं समाधान कदाचित जाहिरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून मिळत नाही.

यश म्हणजे नक्की काय असतं?

माझे आईवडील, माझी पत्नी, सासरचे, माझे मोजके मित्र यांच्यामुळे मी विनम्र राहू शकतो. बाबांनी एक गोष्ट सांगितली होती. तू क्रिकेट खेळतोस ही चांगली गोष्ट आहे. पुढे जाऊन भारतासाठी क्रिकेट खेळलास, तर लोक तुला क्रिकेटपटू म्हणून ओळखतील; पण प्रत्येक जण ‘अजिंक्य हा माणूस म्हणून फार चांगला आहे’ असे म्हणेल, ते तुझ्यासाठी खरे यश असेल!

संगीत, कुटुंब हाच वेगळा विरंगुळा..

नाटकं पाहायला आवडतात; पण फार संधी मिळत नाही; पण संगीत मात्र आवर्जून ऐकतो. आता पत्नी आणि दोन मुलं असं आमचं चौकोनी कुटुंब आहे. कुटुंबासमवेत रमायला केव्हाही आवडतं. इतर खेळ पाहायला आवडतात. विशेषत: टेनिस आणि फुटबॉल.

शब्दांकन : सिद्धार्थ खांडेकर

Story img Loader