संजय चिटणीस
सलीम दुराणी ज्या काळात क्रिकेट खेळले त्या काळात क्रिकेटमध्ये पैसे नव्हते. त्यामुळे चांगली कामगिरी केलेले खेळाडू निवृत्त झाले की, त्यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ गौरव सामना मंजूर करत असे. त्याप्रमाणे दुराणींना गौरव सामना मंजूरही झाला. त्याला गर्दीही चांगली झाली. साहजिकच दुराणींना चांगली थैली मिळेल असे वाटले होते. पण कसचे काय? आठ हजार निमंत्रित (खरे तर फुकटे प्रेक्षक) आणि आपले उखळ पांढरे करून घेण्याचा दिल्ली क्रिकेट असोशिएनचा लांच्छनास्पद प्रयत्न यामुळे दुराणी यांच्या हाती फारसे काही लागले नाही. कोणत्याही खेळाडूच्या बाबतीत असा प्रकार घडला तर वाईटच. पण दुराणींसारख्या सभ्य व संवेदनशील क्रिकेटपटूच्या बाबतीत असे व्हावे याचा विशेष खेद वाटला होता.
आयुष्यात दुराणी यांनी पैशाची पर्वा कधीच केली नाही. दुराणी क्रिकेट मग ते कोणत्याही पातळीवरचे असो, खेळले ते स्वत: मनमुराद आनंद लुटण्यासाठी व प्रेक्षकांना रिझवण्यासाठी. हे करीत असताना जो काही अल्पसा द्रव्यलाभ झाला असेल तीच दुराणी यांची क्रिकेटची मिळकत. त्या काळात प्रत्येक कसोटीगणिक खेळाडूला मिळत जेमतेम अडीचशे रुपये! त्यातही दुराणी हळव्या मनाचे. होतकरू क्रिकेटपटूंना मदत करण्यास सदैव तयार. व्यवहार तर त्यांना कधीच जमला नाही. त्यामुळे स्वारी तशी कफल्लकच राहिली. परंतु लौकिक अर्थाने दुराणी कफल्लक असले तरी क्रिकेटच्या बाबतीत मात्र श्रीमंत! उंचीपुरी शरीरयष्टी, गौरवर्ण, निळे डोळे यामुळे नजरेत भरणारे व्यक्तिमत्व दुराणी यांना सिनेसृष्टीतही घेऊन गेले. परंतु सुनील गावसकर, संदीप पाटील यांच्याप्रमाणेच सिनेसृष्टीतील दुराणींचा प्रवास मर्यादितच ठरला.
ते स्वाभाविकच म्हणायचे. कारण दुराणी स्वत:च म्हणाले होते की, कसोटी क्रिकेटमधील पहिला चेंडू खेळताना आले नव्हते इतके दडपण माझ्यावर कॅमेऱ्यासमोर प्रथम गेल्यावर आले. याचाच अर्थ दुराणी हे नखशिखान्त क्रिकेटपटू होते. क्रीडांगणावर त्यांना पाहताना याची आपोआप प्रचीती येत असे. त्यांची गोलंदाजी, फलंदाजी म्हणजे कलात्मकतेचा आविष्कार. एका प्रतिभासंपन्न कलावंताच्या अभिव्यक्तीचा नमुनाच. म्हणूनच दुराणी हे ‘प्रिन्स चार्मिंग’ म्हणून ओळखले जात. दुराणींच्या क्रिकेटचे नेमके हेच मर्मस्थान होते. आकडेवारीच्या मोजपट्टीने दुराणींसारख्या कलावंताचे अचूक मूल्यमापन कधीच करता येणार नाही. २९ कसोटी सामन्यांमध्ये २५.४ च्या सरासरीने १२०२ धावा व ३५.४३ च्या सरासरीने ७५ विकेटस, ही आहे दुराणींची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी.
पण ब्रॅडमनपूर्वीचे सर्वोत्कृष्ट ऑस्ट्रेलियन फलंदाज म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, ते व्हिक्टर ट्रम्परसुध्दा आकडेवारीच्या बाबतीत कुठे आहेत ? कसोटी क्रिकेटमधील त्यांची सरासरी आहे जेमतेम ३९! परंतु ट्रम्पर अजरामर झाले ते शैलीदार फलंदाज म्हणून. तीच गोष्ट दुराणी यांच्या बाबतीत आहे. ते आपल्या गुणवत्तेला साजेशा प्रमाणात धावा करू शकले नाहीत, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे क्रिकेटकडे बघण्याचा त्यांचा हौशी दृष्टिकोन. त्यामुळे टिच्चून फलंदाजी करणे सलीमभाईंना कधीच जमले नाही. प्रेक्षकांनी मागणी करावी आणि त्यांनी षटकार मारावा, हे नेहमीचेच झाले होते. मग तो सामना पहिल्या दर्जाचा असो की, कसोटी! षटकार आणि दुराणी यांचे नाते इतके अतूट की, त्यांनी पुस्तक लिहायचा विचार केल्यावर त्याला ‘आस्क फॉर सिक्सर’ असेच नाव द्यावयाचे ठरविले होते. प्रत्यक्षात ते पुस्तक त्यांच्या हातून लिहून झालेले नाही, ही गोष्ट वेगळी.
‘तडाखेबंद’ वेडेपणा…
दुराणी यांनी आपल्या कसोटी कारकीर्दीत एकमेव शतक झळकाविले ते वेस्ट इंडिजविरुध्द पोर्ट ऑफ स्पेन येथे १९६२ मध्ये. त्या शतकाबद्दल भारतीय संघाचे जायबंदी कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर म्हणाले, “दुराणींची ती फलंदाजी लाजवाब तर खरीच, पण तो शुद्ध वेडेपणाही होता. अशा तऱ्हेने कोणी खेळू शकेल असे कधीही मला वाटले नव्हते. दुराणी वेस्ट इंडिजच्या तोफखान्यावर अक्षरश: तुटून पडले.”
गोलंदाजी कशीही असो, सामना कशाही अवस्थेत असो, दुराणी नेहमी आपल्या तडाखेबंद शैलीतच फलंदाजी करीत असत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जानेवारी १९७३ चा मद्रास येथील कसोटी सामना. दुसऱ्या डावात बऱ्याचशा भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे सामना अगदी नाजुक परिस्थितीत आला. विजयासाठी आवश्यक असलेल्या अवख्या ८६ धावांचे आव्हानही मोठे वाटू लागले. अशा परिस्थितीत इंग्लंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज नॉर्मन गिफर्डला दोन उत्तुंग षटकार मारून दुराणी यांनी भारतीय संघावरील दबाव एकदम कमी केला. त्या डावात दुराणीने ३८ धावा केल्या. त्यावेळी दुखापतग्रस्त पतौडीला एक हात बॅन्डेजमध्ये असूनही फलंदाजीला यावे लागले आणि अखेर भारताने तो सामना जिंकला मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. त्या मालिकेत बऱ्याचशा भारतीय फलंदाजांना डेरेक अंडरवूड या प्रख्यात डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने बराच त्रास दिला. पण गिफर्डबरोबर त्याचाही दुराणी यांनी चांगला समाचार घेतला. सलीमभाईंच्या फलंदाजीने गिफर्ड किती वैतागला होता, याची कल्पना यावी म्हणून एक किस्सा देतो : इंदूर येथे मध्य विभागाकडून इंग्लंडविरुध्द खेळताना दुराणी यांनी एक उत्तुंग षटकार ठोकला. क्रीडांगणाबाहेर गेलेला चेंडू मिळविण्याचा प्रयत्न चालू असताना गिफर्डने दुराणी यांना विचारले, टेड डेक्स्टरच्या संघाला हरविण्याची किमया करणारा तूच का? दुराणी ‘हो’ म्हणाल्यावर गिफर्ड उपहासाने म्हणाला, तेव्हादेखील तू असाच आडव्या बॅटने खेळायचास का? त्यावर दुराणी यांनी त्याला ताडकन सुनावले, ‘होय. पुन्हा मी असेच करीन. पण बोलू नकोस. चेंडू घेऊन ये’
फलंदाजीच्या या खास शैलीने दुराणी यांनी प्रेक्षकांना रिझविले असले तरी कर्णधारांना त्यांच्याबद्दल किती खात्री वाटत असेल? मग पतौडी असो की वाडेकर, भारतीय संघात दुराणींचे स्थान निश्चित असे २१ कसोटी सामन्यांपुरतेच होते. हा काळ म्हणजे १९६१ ते १९६६. अन्यथा त्यांची कारकीर्द म्हणजे तीन पुनरागमनांची कथा. त्यापैकी पहिले पुनरागमन १९६१ मध्ये झाले. दुसरे १९७१ तर तिसरे १९७२ मध्ये. ते पुनरागमन मात्र शेवटचे ठरले. इंगंलडविरुद्धच्या त्या मालिकेनंतर दुराणींची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली.
दुराणी यांचे नाव प्रथम सर्वतोमुखी झाले ते इंग्लंडविरुध्दच्या १९६१-६२ च्या मालिकेत. पाच कसोटी सामन्यांच्या त्या मालिकेत दुराणी यांनी २४.८७ च्या सरासरीने एकूण १९९ धावा केल्या, तर २७.०४ च्या सरासरीने २३ विकेटस घेतल्या. कलकत्ता व मद्रास येथील कसोटी सामन्यांत दुराणी यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. कलकत्ता येथील कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात दुराणी यांनी ४७ धावा देऊन ५ विकेट घेतल्या, तर दुसऱ्या डावात ६६ धावांच्या मोबदल्यात ३ विकेट घेतल्या. मद्रास येथील कसोटी सामन्यात दुराणी यांनी पहिल्या डावात दुराणी यांनी पहिल्या डावात १०५ धावा देऊन ६ विकेट घेतल्या, तर दुसऱ्या डावात ७२ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट घेतल्या.
ती विजयी गोलंदाजी…
पण सर्वांच्या कायमची स्मरणात आहे ती १९७१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावातील दुराणी यांची गोलंदाजी. सामन्याला कलाटणी देणारी अशी ती गोलंदाजी होती. लागोपाठ २ चेंडूंवर लॉईड व सोबर्ससारखे मोहरे दुराणी यांनी तंबूत पाठवून दुराणी यांनी भारतीय विजयाचाच मार्ग मोकळा केला. सोबर्सला टाकलेला चेंडू तर अप्रतिम होता. डावखुऱ्या गोलंदाजाचा तो गुगली होता. सोबर्सच्या बॅट आणि पॅडमधून गेलेल्या त्या चेंडूने डावी बेल उडविली. अखेरीस भारताने तो कसोटी सामना तर जिंकलाच, पण त्या विजयामुळे मालिकाही जिंकली. भारतीय क्रिकेटच्या तोपर्यंतच्या ३९ वर्षांच्या कोटी इतिहासात भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध जिंकलेला तो पहिलाच कसोटी सामना होता आणि तोसुद्धा वेस्ट इंडिजमध्ये! विशेष म्हणजे त्या मालिकेसाठी भारतीय संघ जेव्हा वेस्ट इंडिजमध्ये पोहोचला, तेव्हा ‘क्लबचा संघ’ म्हणून वेस्ट इंडिजच्या समीक्षकांनी या संघाची टर उडवली होती.
दुराणी यांच्या त्या दोन चेंडूंनी काय किमया केली होती, त्याची चांगली कल्पना त्या मालिकेतील भारतीय विजयाचे एक शिल्पकार दिलीप सरदेसाईंना होती. त्या मालिकेत सरदेसाई यांनी ८०.२५ च्या सरासरीने ६४२ धावा करून अजोड कामगिरी केली होती. त्याबद्दल गोव्यामध्ये त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी सरदेसाई म्हणाले, “खरे तर आज येथे दुराणीचा सत्कार व्हायला हवा होता; कारण भारतीय विजयाचा तोच खरा शिल्पकार आहे.” सलीम दुराणी यांच्याबद्दल खुद्द गारफिल्ड सोबर्सला किती आदर होता याची कल्पना यावी म्हणून एक उदाहरण देतो. एकदा ऑस्ट्रेलियातील ॲडलेडच्या विमानतळावर सोबर्स व मुंबईचा रणजीपटू व सुनील गावसकरचा खास मित्र मिलिंद रेगे यांची गाठ पडली. त्यावेळी सोबर्सने मिलिंद रेगेला विचारले की, तो ‘जीनिअस’ (सलीम दुराणी) सध्या काय करतोय?
दुराणींना हे कसे साधले?
दुराणी यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते अस्सल अष्टपैलू होते. फलंदाजी, गोलंदाजी या दोन्हींवर त्यांची असामान्य हुकूमत होती. त्यामुळे ते मॅच विनर म्हणून ओळखले जायचे. ते एक क्लासिकल डावखुरे गोलंदाज म्हणून ओळखले जायचे. मुळात ६ फूट उंची लाभल्यामुळे चेंडूला उंची देण्याची त्यांना गरज भासली नाही. परंतु डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाचे हुकमी अस्त्र समजला जाणारा ‘आर्मर’ दुराणींना चांगला अवगत होता. त्याशिवाय चेंडूची दिशा, टप्पा तसेच तो वळवण्यावर दुराणींची हुकमत होती… आणि त्यांची फलंदाजी ही टायमिंगवर बेतलेली होती. त्यामुळेच त्यांचे षटकार लीलया मारले जायचे.
दुराणी यांचे क्रिकेट जितके नैसर्गिक, तितकेच त्यांचे वागणे-बोलणेही सहज. बोलण्यात नम्रता जाणवायची. मुस्लिम असूनही तुम्ही महादेवाचे भक्त कसे, असे विचारले असता दुराणी म्हणाले, ‘परमेश्वराजवळ जातिभेद कसला?’
आजपर्यंत मी काही क्रिकेटपटूंना प्रत्यक्ष भेटलो आहे. पण दुराणींची झालेली पहिली भेट मी कधीच विसरणार नाही. हिंदू जिमखान्याच्या टेरेसवर एकता मी व एकनाथ सोलकर गप्पा मारत होतो. तेवढ्यात दुराणी तेथे आले. त्यावर सोलकरने दुराणी यांच्याशी माझी ओळख करून दिली.त्याबरोबर दुराणी म्हणाले, ‘ग्लॅड टू मीट यू’ वास्तविक मी दुराणी यांना असे म्हणण्याच्या आधीच ते बोलून मोकळे झाले.
आता उरल्या त्या दुराणींच्या भेटींमुळे- आणि निव्वळ त्यांच्या असण्यामुळेही, मिळत राहिलेल्या आनंदाच्या आठवणी!
sanjay.chitnis51@gmail.com