अर्जुन सेनगुप्ता
‘एनसीईआरटी’ची पाठ्यपुस्तके हल्ली केंद्र सरकारच्या लहरींनुसार बदलत असल्याची टीका वारंवार होते. तशातच इयत्ता सहावीच्या ‘एनसीईआरटी- इतिहास/ भूगोल/ नागरिशास्त्र’ या पुस्तकातील एका धड्यात यंदा असे लिहिण्यात आले आहे की, पृथ्वीसाठी प्रमाणवेळ ठरवणारी मध्यान्हरेषा भारतात अवंतिकानगरी (आजचे उज्जैन) शहरात होती- त्यामुळे प्रमाणवेळेसाठी ‘ग्रीनिच मध्यान्हरेषा ही काही पहिली रेषा नाही’, ‘युरोपपेक्षा कित्येक शतके आधीपासूनच भारतात मध्यान्हरेषा होती’ आणि ‘याच रेषेनुसार प्राचीन भारतातील खगोलशास्त्राचे संशोधन आणि गणन झालेले आहे’.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे काही प्रमाणात खरेही आहे. ‘सूर्यसिद्धान्त’ या प्राचीन ग्रंथात अवंतिकानगरीच्या प्रधान रेखावृत्ताचा (प्राइम मेरिडियन) उल्लेख आढळतो. भूगोल, खगोल आणि गणित यांविषयी १४ प्रकरणांत ५०० श्लोक असलेला हा ग्रंथ इसवीसनानंतरच्या चौथ्या ते आठव्या शतकात लिहिला गेला असे मानले जाते. या सूर्यसिद्धान्ताची रचना काहीशी रंजकही आहे, कारण इथे स्वत: सूर्यदेवच असुरमायेला स्वत:ची कहाणी- स्वत:ची शास्त्रीय गुपिते सांगतो आहे! इंग्रजांच्या काळात रेव्हरंड फादर एबीनेझर बर्गेस यांनी १८६० साली केलेले या ‘सूर्यसिद्धान्ता’चे इंग्रजी भाषांतर पुढे भारतातच फणीन्द्रलाल गांगुली प्रकाशनगृहाने १९३५ मध्ये प्रकाशित केले. या ग्रंथात ‘मेरिडियन’ किंवा ‘प्रधान रेखावृत्ता’चा उल्लेख ‘रेखा’ या शब्दाने पहिल्या प्रकरणापासूनच झालेला आहे. आकाशस्थ ग्रहांची स्थिती या ‘रेखे’पासून कशी मोजावी, याचे दिग्दर्शन ६० व ६१ व्या श्लोकांमध्ये आहे. मग ६२ व्या श्लोकात, खुद्द ही रेखा कुठूनकुठून जाते, याचे वर्णन येते; ते- ‘राक्षसनगरी लंकेपासून ते देवभूमी मेरूपर्वतापर्यंत जाणारी ही रेखा अवंतिका आणि रोहितक (आजचे रोहतक, हरियाणा) या नगरींतून जाते.’

हेही वाचा : लेख: अतर्क्यही घडले काही, आणि अकस्मात!

त्या काळात भारताचा व्यापार समुद्रमार्गे चालत असावा आणि समुद्राला त्यातल्या त्यात जवळ असलेले तत्कालीन हिंदू संस्कृतीचे एक केंद्र म्हणजे उज्जैन होते, हे उज्जैनमध्ये ‘प्रधान रेखावृत्ता’ असण्यामागचे एक प्रमुख कारण. हिंदू खगोलशास्त्राचा अभ्यास उज्जैनमध्ये त्या काळी होत होता याचीही खूण या रेखावृत्तामुळे पटते’- अशा अर्थाचा अभिप्राय ‘सूर्य सिद्धान्ता’चे आद्य अनुवादकार रेव्हरंड एबीनेझर बर्गेस त्यांच्या सटीक प्रस्तावनेत देतात.

या ‘सूर्य सिद्धान्त’ ग्रंथाला त्या काळातील खगोल अभ्यासकांची मान्यता मिळाली आणि साहजिकच उज्जैनचे भौगोलिक महत्त्व वाढले. त्यामुळेच बहुधा, महाराजा जयसिंह दि्वतीय यांनी ‘जंतर मंतर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्या पाच वेधशाळा बांधल्या त्यात दिल्ली, जयपूर, मथुरा आणि वाराणसीप्रमाणेच उज्जैनलाही सन १७२५ मध्ये एक वेधशाळा बांधण्यात आली.

पण ‘प्रधान रेखावृत्त’ म्हणजे काय? अखेर ती एक काल्पनिक रेषा. आजच्या भाषेत, उभ्या अक्षावरचा ‘शून्य रेखांश’ मानणारी ही रेषा जणू पृथ्वीचे दोन उभे भाग पाडते- त्यामुळे मग पूर्व आणि पश्चिम या दिशाही या शून्य रेखांशाच्या संदर्भात मानल्या/ मोजल्या जातात. केवळ भूपृष्ठावरली पूर्व वा पश्चिम नव्हे, तर आकाशातल्या दिशाही याच रेषेच्या आधारे निर्दिष्ट होतात.

हेही वाचा : अलमट्टीकडे बोट दाखवण्यापेक्षा, पूर असा टाळता येईल…

एकंदर ‘प्रधान रेखावृत्त’ ही काल्पनिक रेषाच असल्याने, तिची कल्पना अनेकांनी केलेली होती. ‘सूर्य सिद्धान्ता’च्याही किमान २०० वर्षे आधीच, इसवी दुसऱ्या शतकातला भूगोल-अभ्यासक टोलेमी याने ‘जिओग्राफिया’ या त्याच्या ग्रंथात आफ्रिकेच्या पश्चिमेकडील समुद्रात असलेल्या ‘इन्स्युले फॉर्च्युनाते’ ( याचा शब्दश: अर्थ ‘नशिबाची बेटे’ आताचे नाव ‘कॅनरी आयलंड्स’) या द्वीपसमूहातून ‘प्रधान रेखावृत्त’ जात असल्याचे नमूद केले होते. याचे कारण असे की, शून्याच्या खालचे उणे आकडे ही कल्पना पाश्चिमात्त्य विद्वानांपर्यंत तोवर पोहोचली नसावी आणि टोलेमीच्या माहितीप्रमाणे सर्वांत पश्चिमेकडे ती ‘नशिबाची बेटे’च असावीत.

पण टोलेमी काय आणि सूर्यसिद्धान्त काय, त्यांच्या या काल्पनिक रेषांमुळे या भूतलावरच्या (किंवा त्या-त्या प्रदेशातल्याही) जनजीवनात काहीही फरक पडत नव्हता. ‘प्रधान रेखावृत्त’ हवे ते खगोलाचा अभ्यास करण्यासाठी, असेच पूर्व व पश्चिमेकडील विद्यावंतांना वाटत असल्याने शेती वगैरेसाठीचे अंदाज शेतकरीच आपापले बांधत होते!

ब्रिटनमध्ये चौदाव्या शतकात अनेक ठिकाणी चर्चचे मनोरे आणि त्यांवर घड्याळे दिसू लागली, पण कालगणनेच्या प्रमाणीकरणासाठी एकच जागतिक प्रमाणवेळ तेव्हा नव्हतीच. मग अनमानधपक्यानेच घड्याळांची वेळ निश्चित केली जाई आणि किल्ली देऊन-देऊन ही घडयाळे सुरू ठेवली जात. घड्याळांचे महत्त्व खऱ्या अर्थाने वाढले ते औद्योगिक क्रांतीनंतर. मानव घड्याळाला जुंपला जाण्याची ती सुरुवात होती. हळुहळू, विशेषत: १७५० च्या नंतर जहाजांची येजा वाढली, पुढे तारायंत्र आले, मग आगगाडीही सुरू झाली… जग जोडले जाण्याची सुरुवात झालेली आहे आणि इथून आता मागे येता येणार नाही, हे अठराव्या शतकात लक्षात आल्यानंतर वेळेच्या प्रमाणीकरणाची वेळ आता येऊन ठेपल्याची जाणीव अनेकांना झाली- यामध्ये दर्यावर्दी होते, तसेच प्रशासकही होते.

हेही वाचा : वाढत्या शहरांना पाऊस सोसवेना… : विकासाच्या भस्मासुराचा बळी…

‘ग्लोबल हिस्टरी ऑफ टाइम (१८७०-१९५०)’ असा एक ग्रंथ २०१५ मध्ये व्हेनेसा ओग्ल यांनी लिहिला. त्यात ‘प्रमाणित वजना/मापांप्रमाणे वेळसुद्धा प्रमाणित असायला हवी, याची जाणीव होऊ लागली’ असे निरीक्षण उदाहरणे देऊन नोंदवले आहे. पण या प्रमाणीकरणाचा पहिला प्रयत्न ‘राष्ट्रीय प्रमाण वेळ’ ठरवण्याचा होता- म्हणजे देशांनी आपापली प्रमाणवेळ ठरवायची. पण देशांना ही वेळ ठरवण्यासाठी कुठलाही प्रमाणित असा आधारच नाही!

त्यामुळे झाले असे की, फ्रान्समध्ये ‘पॅरिस प्रधान रेखावृत्त’, जर्मनीत ‘बर्लिन प्रधान रेखावृत्त’, ब्रिटनमध्ये त्याही काळात ‘ग्रीनिच प्रधान रेखावृत्त’ (पण ब्रिटनपुरते आणि ‘ब्रिटिश प्रमाण वेळे’वर आपली घड्याळे अवलंबून ठेवणाऱ्या ब्रिटिश वसाहतींपुरते)… अशी ज्या त्या देशाची आपापली ‘प्रधान रेखावृत्ते’ त्या काळात बोकाळलेली होती. हे सारे युरोपीय देश वसाहतवादी असल्याने, आपापल्या वसाहतींत आपापली प्रमाण वेळ त्यांनी लागू केली होती.

जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त मध्यान्हरेषा ठरवण्याचा प्रयत्न १८७० च्या दशकात खऱ्या अर्थाने सुरू झाला. त्याला कारणीभूत ठरली, ती जहाजे आणि रेल्वेचे वेळापत्रक प्रमाणित करण्याची अपरिहार्यता. वॉशिंग्टन डीसीमध्ये १८८४ मध्ये, आंतरराष्ट्रीय मध्यान्हरेषा परिषद आयोजित करण्यात आली. त्यात २६ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आणि तेव्हा अस्तित्त्वात असलेल्या नानाविध मध्यान्हरेषा रद्द करून सर्व देशांसाठी एकच प्रमुख मध्यान्हरेषा स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. शेवटी, एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील भू-राजकीय परिस्थितीचा विचार करून ग्रीनिचमधील रॉयल वेधशाळेतून जाणारी ब्रिटीश मध्यान्हरेषा स्वीकारण्यात आली.

हेही वाचा : विकासाचा सोस; शहराच्या गळ्याशी

ही मध्यान्हरेषा स्वीकारण्यात आली खरी, मात्र ही प्रक्रिया ना जागतिक स्तरावर घडली ना तातडीने अंमलात आली. उदाहरणार्थ ग्रीनिच वेळेचा अवलंब करण्यास भारतातील राष्ट्रवाद्यांनी कडाडून विरोध केल्याचे ओल्गने नमूद केले आहे. अखेरीस २० व्या शतकाच्या पूर्वार्धात झालेली दोन महायुद्धे ग्रीनिच मध्यान्हरेषेचा जागतिक स्तरावर स्वीकार केला जाण्यास कारणीभूत ठरली.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meridian of the world passes through ujjain avantika nagari before the greenwich surya siddhanta book css
Show comments