एकाच कुटुंबातील नऊ जणांनी एकाच कारणासाठी आत्महत्या केल्याची बातमी विचित्र होतीच, पण दोन अटकांनी त्यास निराळे वळण मिळाले…
प्रभाकर नानावटी
सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ या गावातील डॉ. माणिक वनमोरे व त्यांचा भाऊ पोपट वनमोरे यांच्या एकाच कुटुंबातील नऊ जणांच्या २० जून रोजी घडलेल्या मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. ही सामूहिक आत्महत्या नसून हत्याच, अशी बातमी आता आल्याने हा धक्का आणखीच वाढला आहे. ‘जादूटोणा व अंधश्रद्धामूलक प्रथा विरोधी कायदा’ ज्या राज्यात आहे, तेथे दोघा मांत्रिकांना या प्रकारासंदर्भात अटक होणे हे धक्कादायक आहे. पोलिसांकडून तपास सुरू राहीलच; पण गुप्तधनाचा शोध, त्यासाठी टोळीच्या आहारी जाणे, मांत्रिकाची संगत, त्यातून कर्जबाजारीपण, तणाव असे अनेक कोन या घटनेला आहेत.
या कुटुंबाने कर्जबाजारीपणामुळे निराशेच्या भरात आत्महत्येचा निर्णय घेतला असावा, अशी बातमी पोलीस सूत्रांच्या हवाल्याने बहुतेक माध्यमांनी मृतदेह सापडल्यानंतर काही तासांत दिली होती. परंतु पोलीस तपासातून आधी अवाचेसव्वा व्याज आकारणाऱ्या सावकारांकडे, नंतर गावातील मांत्रिकाकडे संशयाचा काटा सरकत गेला आणि अखेर, मृत्यूच्या आदल्याच दिवशी या कुटुंबाच्या घरी आलेल्या मांत्रिकावर स्थिरावला. आज तरी गुप्तधनाच्या हव्यासापोटी कर्जबाजारी झालेल्या कुटुंबातील सदस्यांना चहाच्या कपात विष कालवून हत्या केली म्हणून दोघा मांत्रिकांना तपास यंत्रणेने ताब्यात घेतले आहे, अशी बातमी ‘ब्रेकिंग न्यूज’ ठरली.
जेव्हा संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली अशी बातमी येऊन धडकली तेव्हा नैराश्यापोटी एखाददुसरा आत्महत्या करू शकतो, परंतु एक अख्खे कुटुंब असे काही करू शकते तेही एकाच कारणासाठी, हे अनाकलनीय होते. खरे पाहता माणसे आत्महत्या का करतात ही एक जगभरच्या मानसतज्ज्ञांना नेहमीच सतावणारी समस्या आहे. आपल्यासारख्या देशात टोकाचे दारिद्र्य, असह्य वेदना देणारे आजारपण अथवा कर्जबाजारीपणा ही कारणे आत्महत्येसाठी पुरेशी ठरतात यावर एकवेळ विश्वास ठेवला तरी विकसित देशांत अशा प्रकारची कारणे नसतानासुद्धा माणसे आत्महत्या का करतात, हे एक न सुटलेले कोडे ठरत आहे. अलीकडील आधुनिक अभ्यासकांच्या मते विषण्णता, नैराश्य, भावनिक उद्वेग, वा हताश स्थिती ही कारणे माणसांना आत्महत्या करण्यास उद्युक्त करतात. अर्थात, हे विधान अत्यंत ढोबळ स्वरूपाचे असून हे अभ्यासक अजूनही आत्महत्येसंबंधीच्या मुळाशी जाऊन विचार करत नाहीत असे वाटते.
आत्महत्या केल्यानंतर ‘आपण सर्व जण स्वर्गात जाऊ, व त्यासाठी एक सुसज्ज यान तयार आहे.’ अशा धार्मिक कारणासाठी हेवन्स गेट या पंथातील ३८ जणांनी आत्महत्या केल्याचे उदाहरण आपल्यासमोर असले तरी ते एक अपवाद असे म्हणता येईल. त्याचप्रमाणे २०१८ सालची दिल्ली येथील बुरारी गावातील चुंदावत कुटुंबातील ११ जणांची आत्महत्यासुद्धा चक्रावून टाकणारी ठरली. तेथेही सर्व शक्यतांची तपासणी पोलिसांनी केली व शेवटी ती आत्महत्या होती हे सिद्ध झाले. परंतु अशा घटना फार तुरळकपणे घडत असतात व त्यांना अपवाद म्हणूनच बघायला हवे.
गूगलच्या सर्च इंजिनवर गुप्तधन हा शब्द टाइप केल्यास ‘जमीन में सोना देखने का तरीका।’, ‘घर में सोने चांदी का मलसा देखने का तरीका’, ‘जानिए गुप्त धन को पाने के लिए कौन से मंत्र का जाप सही’, ‘गुप्त और अपार धन प्राप्तिके ५ अचूक मंत्र’ असली अनेकानेक संकेतस्थळे सूचित केली जातात. सुमारे दोन लाख तरी संदर्भ असल्याचा दावा गूगल करत आहे. एकविसाव्या शतकातसुद्धा अशा गोष्टींची चलती आहे, हेच यावरून सिद्ध होते. कारण आपल्या देशात जमिनीच्या खाली, विहिरीच्या तळाशी, शेत-जमिनीत अशा अनेक ठिकाणी सोन्याच्या नाण्यांनी भरलेल्या घागरी/ रांजणे आहेत अशी एक (अंध)श्रद्धा मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. पूर्वीच्या राजा-महाराजांनी सोने-नाणे कुठे तरी पुरून ठेवलेले आहे व ते आपण आपल्यातील मंत्रशक्तीने ‘हाशील करू शकतो’ असे छातीठोकपणे सांगणारे महाभाग अजूनही आपल्यात आहेत. खरे पाहता आपल्या देशात कर्नाटक येथील कोलार गोल्ड फील्डचा तुरळक अपवाद वगळता सोन्याच्या खाणी कधीच नव्हत्या आणि भूगर्भाची छाननी करू शकणारे प्रगत तंत्रज्ञान असूनसुद्धा अजून एकही सोन्याची खाण भारताच्या जमिनीखाली सापडलेली नाही. तरीसुद्धा गुप्तधनाच्या हव्यासापोटी फसवणूक झालेल्यांची संख्या कमी नाही. ‘रावणाची सोन्याची लंका जाळल्यानंतर तेथील सर्व सोने भारतभर विखुरलेले आहे व हे सोने फक्त काही मंत्रविद्येतूनच कळू शकते.’ यावर भाबडा विश्वास असल्यामुळे त्याचाच फायदा घेऊन लुबाडणाऱ्यांची संख्याही घटली नाही व बळी पडणाऱ्यांचीसुद्धा!
मुळात आपली मानसिकताच कायमची फसवून घेण्याची असल्यामुळे येनकेनप्रकारेण आपल्याला लुबाडले जाते. मग त्यासाठी जमिनीतील गुप्तधनाची वा क्रेडिट कार्डची वा सायबरविश्वातील करामतींची, नासाला पाठविण्यासाठी ‘दुर्लभ धातू’ची, क्रिप्टोकरन्सीची… अशांपैकी कुठली ना कुठली क्लृप्ती वापरली जाते. हे सारेच ‘अंधविश्वास’ आहेत. असल्या एखाद्या अतिअंधविश्वासामुळे फसवणुकीच्या चक्रात माणूस भरडला जातो. दुसरा कुठलाही पर्याय नसल्यास संबंधित व्यक्ती आत्महत्या करून मोकळी होती. त्यामुळे आपल्या राज्यातील लाडके व्यक्तिमत्त्व पुलंनी म्हटल्याप्रमाणे ‘जगात गाढवे फार, तू कुंभार हो’ याची आत्यंतिक गरज आहे.
खरे पाहता २०१३साली कायद्यात रूपांतरित झालेले अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणाविरोधी कायदा या बाबतीत सुस्पष्ट आहे. आर्थिक कारणासाठी अंधश्रद्धांचा वापर करणे गुन्हा आहे. परंतु कायदा कागदावर आहे व त्याच्या कारवाईकडे सर्व संबंधितांकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे फसवणूक करणाऱ्या तथाकथित ‘मांत्रिकां’च्या पिढीत भर पडत आहे. तपास यंत्रणेने, अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या पुरोगामी सामाजिक संघटनांनी व समाजाविषयी कळकळ असलेल्यांनी वेळीच ही विषवल्ली खुरटली असती तर अशा आत्महत्यासदृश वा हत्याकांडासारख्या घटना घडल्या नसत्या असे म्हणण्यास भरपूर वाव आहे.
लेखक विज्ञानवादी कार्यकर्ते व ‘अंधश्रधा निर्मूलन वार्तापत्रा’चे माजी संपादक आहेत.
pkn.ans@gmail.com