सिद्धार्थ खांडेकर
सोव्हिएत रशियाचे शेवटचे अध्यक्ष आणि गतशतकातील एक अत्यंत महत्त्वाचे नेते मिखाइल गोर्बाचेव्ह यांचे बुधवारी निधन झाले. सोव्हिएत महासंघाचे विघटन त्यांच्याच नेतृत्वाखाली कार्यान्वित झाले. त्या महासंघाच्या विविध घटकराज्यांच्या स्वातंत्र्यप्रेरणा आणि आकांक्षांना बळाचा वापर करून चिरडून टाकण्याचे आधीच्या सोव्हिएत शासकांचे धोरण गोर्बाचेव्ह यांनी कटाक्षाने पाळले. या सर्व घटकराज्यांना त्यांनी स्वतंत्र होऊ दिले आणि आज ही राज्ये स्वतंत्र प्रजासत्ताक म्हणून सन्मानाने वाटचाल करीत आहेत. परंतु या धोरणामुळे महासंघवादी रशियन नेते, विश्लेषक आणि माध्यमांचा रोष त्यांनी कायमस्वरूपी ओढवून घेतला होता. याउलट पाश्चिमात्य माध्यमांसाठी गोर्बाचेव्ह आदर्शवत होते. अमेरिका आणि युरोपचे लोकशाही प्रारूप आणि माध्यमस्वातंत्र्य प्रमाण मानणाऱ्या या बहुतेक माध्यमांनी त्यावेळी सोव्हिएत महासंघाचे विघटन या घटनेला उदारमतवादी जगताचा विजय असे मानले होते. पण ३३ वर्षांनंतर आज गोर्बाचेव्ह यांच्या निधनसमयी त्यांच्याप्रति आदर व्यक्त करतानाच, ते खरोखर द्रष्टे नेते होते की व्यवहारवादी पण अगतिक शासक, याविषयी अधिक तपशिलातून आणि अधिक वस्तुनिष्ठ चिकित्साही पाहायला मिळते.
‘दि इकॉनॉमिस्ट’ नियतकालिकाने गोर्बाचेव्ह यांच्याविषयी लिहिले आहे, की पेरिस्त्रोयका (परिवर्तन) आणि ग्लासनोस्त (खुलेपणा) या धोरणांच्या माध्यमातून सोव्हिएत महासंघामध्ये सुधारणा घडवून आणण्याविषयी गोर्बाचेव्ह प्रामाणिक होते. हिंसाचाराचा त्यांना तीव्र तिटकारा होता आणि ते भ्रष्टाचाराच्या वाटेला कधीही गेले नाही. हे दोन गुण गोर्बाचेव्ह यांना त्यांच्या पूर्वसुरींपेक्षा निराळे ठरवतात, असे ‘दि इकॉनॉमिस्ट’ने आवर्जून नमूद केले आहे. मनाने ते समाजवादी होते, परंतु गोपनीयता आणि दमनशाही या बहुतेक समाजवादी शासनप्रणालींच्या व्यवच्छेदक लक्षणांमुळे जनता कधीही सुखी राहात नाही हेही त्यांनी ओळखले होते. सोव्हिएत साम्राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी होत असताना, महागडी अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र स्पर्धा परवडणारी नाही याची जाणीव त्यांना प्रथम झाली आणि त्यामुळे इतर अनेक बलाढ्य देशांच्या नेत्यांपेक्षा गोर्बाचेव्ह वेगळे ठरतात, याचा उल्लेख ‘दि इकॉनॉमिस्ट’ने केला.
साम्यवादाच्या गुलाबी कथा रचल्या जात असतानाही, सर्वसामान्य सोव्हिएत नागरिक मात्र टंचाई आणि अभावाच्या रेट्यामुळे पिचला जात होता, हे १९८५पूर्वी, म्हणजे सत्तेवर येण्याआधीच गोर्बाचेव्ह यांनी ओळखले होते आणि त्यामुळे ते अस्वस्थ व्हायचे,. ही एक बाबच गोर्बाचेव्ह यांना इतर सोव्हिएत नेत्यांपेक्षा वेगळे आणि सरस ठरवते, असे ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे. पण केवळ नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा ओळखणे, त्यांच्या राजकीय हुंकाराला वाट मोकळी करून देणे यातून त्यांचे भले कसे साधले जाणार, याविषयीचे निश्चित ठोकताळे गोर्बाचेव्ह यांनी बांधलेले नसावेत. पूर्व युरोपातील कम्युनिस्ट किंवा सोव्हिएतविरोधी चळवळींना त्यांनी फुलू दिले. त्यांतील बहुतेक देश आज सधन आहेत. सोव्हिएत प्रजासत्ताकांच्या बाबतीत (उदा. लिथुआनिया, जॉर्जिया) सुरुवातीला तरी त्यांनी असा उदारमतवाद दाखवला नव्हता. कम्युनिस्ट सरकारांना सर्वतोपरी सोव्हिएत मदत करण्याविषयीचे ‘ब्रेझनेव्ह डॉक्ट्रिन’ त्यांनी मोडीत काढले, मात्र यामुळे रशियाची लष्करी आणि गुप्तहेर यंत्रणा नाराज झाली. त्यांना विश्वासात घेऊन सुधारणा घडवण्याचा मुत्सद्दीपणा गोर्बाचेव्ह यांना दाखवता आला नाही, असे ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने दाखवून दिले.
‘मिखाइल गोर्बाचेव्ह यांनी जग बदलले, तसला कोणताच उद्देश नसतानाही…’ अशी बीबीसी संकेतस्थळावरील मृत्युलेखाची सुरुवात आहे. सोव्हिएत व्यवस्था बदलली पाहिजे, याविषयी गोर्बाचेव्ह यांचा निर्धार पक्का होता. पश्चिम युरोपमध्ये अनेकदा जाऊन आल्यामुळे, रशियातील जनता अधिक सुखी असल्याचा कम्युनिस्ट प्रचार पोकळ असल्याची जाणीव गोर्बाचेव्ह यांना ते पक्षाचे सरचिटणीस आणि सोव्हिएत महासंघाचे अध्यक्ष बनण्यापूर्वीच झाली होती. परंतु त्यांच्या धोरणांमुळे एका व्यवस्थेतून नवीन व्यवस्थेत परिवर्तित न होता, सोव्हिएत महासंघच कोसळला. यामुळे पाश्चिमात्य जगात गोर्बाचेव्ह लोकप्रिय असले, त्यांना नोबेल पारितोषिक वगैरे मिळालेले असले, तरी रशियन जनतेच्या मनातून ते केव्हाच उतरले, या विरोधाभासावर बीबीसीने बोट ठेवले आहे.
तोच धागा ‘द गार्डियन’चे विश्लेषक प्योत्र सावर यांनी पकडला आणि लंडन, पॅरिस आणि वॉशिंग्टनमध्ये मिळाली तितकी लोकप्रियता गोर्बाचेव्ह यांना रशियात अजिबात मिळाली नाही, असे म्हटले आहे. मात्र, गोर्बाचेव्ह यांनी सुरू केलेले खुलेपणाचे पर्व रशियातील उदारमतवाद्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. आज त्याच खुलेपणाच्या अनुपस्थितीत ही मंडळी रशियातून परागंदा झाली, हेही नमूद करायला सावर विसरले नाहीत.
गोर्बाचेव्ह सत्तेवर येण्यापूर्वी सोव्हिएत महासंघ एक अविचल राष्ट्र होते. पण गोर्बाचेव्ह यांच्या एकाहून एक क्रांतिकारी धोरणबदलांनी ही परिस्थिती पालटली. विसाव्या शतकाचा प्रवाह या एका व्यक्तीने बदलला अशा निःसंदिग्ध शब्दांत ‘असोसिएटेड प्रेस’ या स्वतंत्र बाण्याच्या वृत्तसंस्थेने त्यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. या सुधारणांचा वेग गोर्बाचेव्ह यांना स्वतःलाच आवरता आला नाही हे खरे असले, तरी लाखो नागरिकांना त्यांच्या धोरणांमुळेच खऱ्या स्वातंत्र्याची चव चाखता आली हे कोणी नाकारू शकत नाही, असे ‘असोसिएटेड प्रेस’ने म्हटले आहे.
‘रॉयटर्स’ने गोर्बाचेव्ह गौरववृत्त मुबलक देत असतानाच, बाल्टिक देशांमधील जनभावनेचा धांडोळा आवर्जून घेतला. लिथुआनिया, लाटव्हिया आणि एस्टोनिया या देशांनी सोव्हिएत पतनाच्या आधीच त्या साम्राज्यातून फारकत घेऊन स्वातंत्र्य घोषित केले. त्यावेळी गोर्बाचेव्ह यांनी या देशांमध्ये रणगाडे धाडले. लिथुआनियात मनुष्यहानीही झाली. गोर्बाचेव्ह यांच्या स्वच्छ उदारमतवादी पटावरील हा काळा डाग ठरला होता.
गोर्बाचेव्ह यांनी सोव्हिएत महासंघाला मुक्त केले, पण ते या देशाला वाचवू शकले नाहीत, अशा समर्पक शब्दांत ‘द न्यूयॉर्क टाइम्स’चे विश्लेषक सर्गे श्मेमान यांनी त्यांचे वर्णन केले. सोव्हएत जरठ नेतृत्वफळीत गोर्बाचेव्ह यांच्यासारखा तरुण आणि उमदा नेता उठून दिसला आणि जनतेला भावला. परंतु आज त्यांच्याविषयी ममत्व वाटणारा रशियन शोधावा लागेल, अशा परखड शब्दांत श्मेमान यांनी गोर्बाचेव्ह चिकित्सा केली. जुन्या प्रस्थापितांसाठी, सोव्हिएत पतन घडवून आणल्याबद्दल गोर्बाचेव्ह यांच्याविषयी कधीही आत्मीयता नव्हती. तर उदारमतवादी सोव्हिएत आणि रशियनांच्या मते, पुढचे पाऊल आणि उत्तराधिकारी यांविषयी काहीच योजना नसल्यामुळे गोर्बाचेव्ह यांनी केवळ नुकसानच केले. गोर्बाचेव्ह हे सुधारणावादी होते, पण क्रांतिकारक नव्हते याचे स्मरण या मृत्युलेखात लेखकाने करून दिले आहे.
व्लादिमीर पुतिन यांच्या गेल्या काही वर्षातील दुःसाहसी दंडेलीमुळे गोर्बाचेव्ह यांनी केलेला प्रवाहाविरुद्धचा प्रवास अधिकच अमूल्य ठरतो. गतशतकातील सर्वांत मोठे भूराजकीय अरिष्ट असे सोव्हिएत पतनाचे वर्णन पुतिन यांनी काही वर्षांपूर्वी केले होते. यातून, सोव्हिएत व्यवस्थेविषयीचे त्यांचे ममत्व आणि पुनरुज्जीवनवादाची खुमखुमी पुरेशी स्पष्ट होते. युक्रेन युद्धाच्या निमित्ताने ज्या प्रकारे पुतिन यांनी जगाची आर्थिक आणि राजकीय घडी विस्कटली, तेथील उदारमतवादी व्यक्ती आणि विचारांची मुस्कटदाबी झाली, या सगळ्यांचा विचार करता गोर्बाचेव्ह यांनी किती क्रांतिकारी बदल घडवण्यासाठी प्रयत्न केले, याविषयीची जाणीव अधिकच खोलवर प्रभाव टाकते.
siddharth.khandekar@expressindia.com
ट्विटर : @GranSidhu