२८ डिसेंबर २०२४ रोजी नागपूर येथे सुप्रसिद्ध लेखक, अभ्यासक मिलिंद बोकील यांना मारवाडी फाऊंडेशनच्या वतीने समाजप्रबोधन पुरस्कार देण्यात आला. यानिमित्ताने बोकील यांनी केलेल्या भाषणाचा संपादित सारांश…
आज मला ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय, त्या प्रबोधनकार ठाकरे यांचं स्मरण यानिमित्ताने करणे औचित्यपूर्ण होईल. महाराष्ट्रामध्ये असाधारण काम करूनही ज्या व्यक्ती दुर्लक्षित राहिलेल्या आहेत त्यांच्यापैकीच प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे ही व्यक्ती आहे. प्रबोधनकार ठाकरे हे केवळ समाजसुधारक होते असे नाही तर अतिशय हुरहुन्नरी, बहुपेडी, बहुआयामी, रसिक आणि साहित्य-संगीतादी कलांचे उपासक होते. ज्या ‘प्रबोधन’ या नियतकालिकामुळे ते ओळखले जातात, त्याचे घोषवाक्य – ‘अ फोर्टनाइटली जर्नल डिव्होटेड टू द सोशल, रीलिजस अॅण्ड मोराल रिजनरेशन ऑफ द हिंदू सोसायटी’ असे होते. म्हणजे या हिंदू समाजाचे सामाजिक, धार्मिक आणि नैतिक रिजनरेशन झाले आहे हे त्यांच्या अचूक लक्षात आले होते. ‘हिंदू समाज: ऱ्हास आणि अध:पात’ या नावाचे त्यांचे पुस्तकच आहे. नागपूरशी संबंध म्हणायचा तर इथल्या हिंदू मिशनरी परिषदेचे ते अध्यक्षही होते. मात्र त्यांचा दृष्टिकोन हा आजच्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांपेक्षा बिल्कूल निराळा होता. हिंदू धर्मातल्या अनिष्ट परंपरांवर विशेषत: पुरोहितशाहीवर त्यांनी कडाडून प्रहार केले होते. दादर इथल्या गणेशोत्सवात अनिष्ट पद्धती पडताहेत म्हणून त्यांनी विरोध केला होता. परिणामी तो उत्सव बंद पडला आणि ठाकऱ्यांनी गणपती बंद पाडला अशी हाकाटी उठली होती. विवेकवादी, बहुजनवादी, बंडखोर, रुढीभंजक अशी त्यांची प्रतिमा होती.
प्रबोधनकार दुर्लक्षित राहिले याचे एक कारण म्हणजे त्यांच्या जैविक वारसदारांनी त्यांच्या वारशाची जपणूक तर केली नाहीच, शिवाय त्यापेक्षा विपरीत वाट धरली. आणि हे केवळ प्रबोधनकारांच्याच बाबतीत घडलंय असं नाही, तर महाराष्ट्रात आपण बघतो त्याप्रमाणे महापुरुषांचे जैविक वारसदार त्यांचा वारसा अजिबात पुढे चालवत नाहीत. ती जबाबदारी आपल्यासारखे जे वैचारिक वारसदार असतात त्यांच्यावर पडते. आणि तीच खऱ्या अर्थाने श्रेयस्कर गोष्ट असते. कारण आपण कुणा एकाचेच नाही तर अशा सर्वच महापुरुषांचे आणि महास्त्रियांचे वारसदार बनू शकतो. आपण रानडे-आगरकरांचे वारसदार असतो, फुल्यांचे असतो, आंबेडकरांचे असतो, गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांचे असतो, जनाई-बहिणाबाईचे असतो, गांधी-विनोबांचे असतो आणि मार्क्सचेही असतो. कार्ल मार्क्सचे नाव हल्ली इथे कोणी काढत नाही, पण करोनाकाळात आणि एरवीही इथल्या कष्टकऱ्यांची जी ससेहोलपट आणि जे शोषण होताना दिसते, तेव्हा जाणवते की आपल्या देशात गांधी-आंबेडकरांप्रमाणेच मार्क्ससुद्धा आजही रिलेव्हंट आहे.
हेही वाचा >>>‘सावित्रीच्या लेकीं’ची वाट आजही खडतरच…
विदर्भाशी आमचा जो ऋणानुबंध जडला आहे, त्याचं प्रमुख कारण आहे ते अर्थातच गडचिरोलीमधलं मेंढा-लेखा हे गाव. या गावाने स्वशासन आणि स्वराज्याचा जो अद्भुत आणि केवळ आपल्या देशालाच नाही तर अख्ख्या जगाला मार्गदर्शक होईल असा जो प्रयोग केला आहे त्यात सहभागी होण्याची संधी मला मिळाली हे माझे फार मोठे भाग्य आहे. त्याला कारणीभूत ठरलेले आमचे मित्र मोहन हिराबाई हिरालाल आणि देवाजी तोफा यांची मैत्री आणि स्नेह हा जीवनातला मोठा ठेवा आहे. मेंढा-लेखापासूनच स्फूर्ती घेऊन, पण गांधी आणि आंबेडकर यांच्या विचारांचा अभिनव संगम साधत, विजय देठे या आमच्या तरुण मित्राने चंद्रपूर जिल्ह्यात पाचगाव इथेही स्वशासनाचा जो आविष्कार केला आहे त्याचाही अभ्यास करण्याची संधी मला मिळाली आहे. आणि विदर्भातल्या मेळघाट या भागात, खोज या संस्थेने वनाधिकाराच्या माध्यमातून जो स्वराज्याचा शोध चालवलेला आहे त्यावरचे पुस्तकही प्रसिद्ध झालेले आहे.
मेंढा-लेखा या गावाची घोषणा आपणा सर्वांना माहीत असणारच. ‘केंद्रात-राज्यात आमचे सरकार – आमच्या गावात आम्हीच सरकार.’ आपल्यासारख्या खंडप्राय देशाचा कारभार चालवण्यासाठी संसदीय, प्रातिनिधिक लोकशाही आवश्यक असली तरी गाव पातळीवर प्रत्यक्ष, सहभागी लोकशाहीच्या माध्यमातून कारभार कसा चालवता येतो हे या गावाने दाखवून दिलेले आहे. मेंढा गावाच्या या घोषणेत मी थोडी भर घातलेली आहे. कारण आपण पाहतो की नुसते प्रतिनिधी निवडून देऊन भागत नाही तर त्यांच्यावर अंकुश, नियंत्रण ठेवणेही गरजेचे असते. तसे केले नाही तर प्रतिनिधी उन्मत्त होतात. म्हणून ‘केंद्रात-राज्यात आमचे सरकार’ म्हटल्यानंतर ‘आमच्या सरकारवर आमचा अधिकार’ हे म्हणणं आवश्यक ठरतं. ‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ ही तर भारतीय राज्यघटनेचीच अपेक्षा आहे. अशा तऱ्हेचे स्वराज्य हे प्रत्येक गावसमूहाला असायला पाहिजे. आणि आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाच्या प्रेरणेप्रमाणे विश्वातल्या सर्वांचीच ही आकांक्षा पूर्ण व्हायला हवी. कारण आपण एकेका देशात राहत असलो तरी अंतिमत: विश्वाचे नागरिक आहोत. म्हणून राष्ट्रराज्याच्या सीमा ओलांडून असं म्हणायला लागतं की ‘स्वराज्यातून करू विश्वराज्य साकार’. (पूर्ण घोषणा) ही भावी युगासाठी घोषणा आहे.
हेही वाचा >>>येत्या अर्थसंकल्पात हव्यात या १० गोष्टी…
प्रबोधनकारांच्या धर्मचिकित्सेच्या विचाराचा धागा पुढे नेऊन त्यात काय भर घालता येईल? प्रबोधनकार जेव्हा धर्मचिकित्सा करत होते तेव्हा तिचे स्वरूप हिंदू धर्मातील अनिष्ट रुढी, अंधश्रद्धा, उच्चनीचपणाची भावना या विरुद्ध जनजागृती करण्याचे होते. त्यांची ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ नावाची पुस्तिका प्रसिद्ध आहे. त्या पुस्तिकेच्या शेवटी त्यांनी ‘परमेश्वर समस्त हिंदू भगिनीबांधवांना देव-देवळांची धार्मिक गुलामगिरी संपवण्याची प्रेरणा देवो’, अशी प्रार्थना केली आहे. मात्र त्यांच्या काळापेक्षा आज एक वेगळेच आव्हान समोर आलेले आहे. आणि ते म्हणजे राज्यसंस्था आणि धर्म यांची झालेली युती. ही गोष्ट भारतात अभूतपूर्व अशी आहे. इतिहासात हे कधीच घडलेलं नव्हतं. आचार्य विनोबा भावे यांनी म्हटल्याप्रमाणे राज्यसंस्था आणि धर्म यांचं कधीही लग्न लावायचं नाही. कारण तसं केलं तर धर्म राज्यसंस्थेला खातो. आज आपल्यासमोर हेच आव्हान उभं आहे. राज्यसंस्था धार्मिक किंवा धर्मवादी झाली तर ती संकुचित, जुनाट, मागास विचारांची आणि तशा व्यवहाराची होते. मुख्य म्हणजे एक धार्मिक उन्माद वातावरणामध्ये भरायला लागतो. याची किती तरी उदाहरणे आपल्याला आता दिसायला लागलेली आहेत. कुठल्याही ठिकाणचा गणेशोत्सव म्हणजे कर्कशपणाचा कल्लोळ. महिन्याभरापूर्वी मी गोरखपूरला गेलो होतो. मी राहत होतो त्याच्या शेजारी एक देऊळ होते आणि तिथे पहाटे पाच ते रात्री अकरापर्यंत मोठ्या आवाजात सतत भजने सुरू होती. गोरखपूर ही तर आपली धार्मिक राजधानी. त्यामुळे तिथे घडतंय ते देशात इतरत्र घडायला अजिबात वेळ लागणार नाही. अशा धार्मिक उन्मादाला राजाश्रय मिळाल्यावर कायदा आणि सुव्यवस्थेला जुमानतंय कोण? पुण्यातल्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये पोलीस आयुक्त फौजफाट्यासहित हजर असताना, त्यांच्या नाकावर टिच्चून कर्कश आवाजात डीजे वाजवला जातो, पेयपान करून धांगडधिंगा घातला जातो आणि डोळे आंधळे करणारे लेसर किरण सोडले जातात. मंडळांचे कार्यकर्ते पोलिसांना जुमानत नाहीत. मग राष्ट्रकार्यासाठी कटिबद्ध झालेले जे स्वयंसेवक आहेत ते का नाही या कार्यकर्त्यांना लगाम घालत? ते त्यावेळी कान झाकून घरात का बसलेले असतात?
राज्यसंस्था आणि धर्म यांचं लग्न लागल्याचा एक विघातक परिणाम म्हणजे समाजात वाढीला लागणारा मठ्ठपणा. पूर्वी भारत हा गरीब देश होता, पण तो सत्याकांक्षी आणि बुद्धिवादी होता. दारिद्र्य असले तरी ज्ञानाची तृष्णा लोपलेली नव्हती. विद्यार्थिना कुत: सुखम्, सुखार्थिना कुत: विद्या। हा इथला बाणा होता. आता मात्र समृद्धीची बेडौल सूज जशी अंगावर येते आहे तसाच दिवसेंदिवस वैचारिक मठ्ठपणा वाढत चाललेला आहे. याची उदाहरणे सांगावी तितकी थोडीच आहेत. गतानुगतिक व्हायचं, बुद्धीचा उपयोग करायचाच नाही, सत्यवादी माणसांना टिकू द्यायचं नाही, छद्मा माहितीचा प्रसार करायचा अशा प्रवृत्ती सुरू झाल्या की देशाची अधोगती सुरू होते.
मग या संदर्भात काय करायला पाहिजे? तर मुळात धर्माचं खरं स्वरूप समजून घ्यायला पाहिजे. सध्या जे धर्म धर्म म्हटले जातात हे खरं तर ‘संप्रदाय’ आहेत. ते खरे धर्मच नाहीत. धर्माचे स्वरूप जे महाभारतात सांगितलंय ते आहे. त्या त्या परिस्थितीत करायचं कर्तव्य. किंवा ज्याला ‘स्वधर्म’ म्हणतात तो. स्वधर्म या शब्दाचे दोन अर्थ. माझे श्रेष्ठतम कर्तव्य आणि माझा माझ्यापुरता धर्म. भारतीयांची धर्माची खरी समजूत अशीच आहे. याचा व्यावहारिक अर्थ काय? तर धर्म म्हणून जो काही आहे तो माझा, वैयक्तिक असला पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी तो घरातच ठेवला पाहिजे. तो कधीही रस्त्यावर आणता कामा नये. (‘माझी जीवनगाथा’ या आत्मचरित्रात प्रबोधनकारांनी लिहिलंय की, त्यांच्या लहानपणी अशी वदंता उठली होती की टिळकांनी घरोघरी पूजला जाणारा गणपती चव्हाट्यावर आणला म्हणून प्लेगची साथ आली. आता प्लेगची साथ आली की नाही ते माहीत नाही, पण नंतर शंभर वर्षांनी उन्मादाची आणि ध्वनिप्रदूषणाची साथ मात्र नक्की आली). म्हणून धर्म कधीही सार्वजनिक करता कामा नये. राज्यसंस्थेला तर त्यात लक्षही घालू द्यायचे नाही. मग सार्वजनिक काय करायचे? याचे उत्तर भारतीय परंपरेने दिलेले आहे. सार्वजनिक करायचा तो ‘धम्म’. धर्म आणि धम्म यांचे मूळ कदाचित एक असेल, पण त्यांचे अर्थ निराळे आहेत. धम्म म्हणजे सामाजिक नीती. धर्म वैयक्तिक आहे तर धम्म सामाजिक आहे. दुसऱ्याला कोणत्याही प्रकारे उपद्रव द्यायचा नाही, दुसऱ्याचे अहित करायचे नाही उलट त्याचे हित जपायचे, दुसऱ्याच्या अस्तित्वाचा स्वत:प्रमाणेच आदर करायचा, दुसऱ्याशी बंधुता, मैत्र आणि करुणेनेच वागायचे याला धम्म असे म्हणतात. अशा धम्माची आपण समाजात उपासना केली पाहिजे. घरात धर्म आणि रस्त्यावर धम्म.
आपल्या समाजाची खरोखरच प्रगती व्हावी असे वाटत असेल तर आपण आधुनिक, विवेकवादी, विज्ञानाधिष्ठित अशा समतेच्या आणि बंधुभावाच्या विचाराचीच कास धरायला हवी. जुनाट, मागास, पारंपरिक आणि बुद्धीला दुर्बलता आणणाऱ्या धर्मवादी विचारांचा आपण धिक्कार करायला हवा. ही जबाबदारी प्रामुख्याने इथल्या उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय लोकांची आहे. गरीब, कष्टकरी, बहुजन लोक जीवनसंघर्षाशी झगडताहेत. त्यांच्याजवळ असा विचार करण्याची उसंत असेलच असे नाही. आपल्यापैकी अनेकांची मुलं वा नातेवाईक परदेशात असतील. आपण एक साधा प्रश्न विचारला पाहिजे – की आपल्या परदेशातल्या लेकीसुनांना परत यावेसे का वाटत नाही? मुलगे एकवेळ परत येतील पण लेकीसुना परत येऊ इच्छित नाहीत. याचे उत्तर स्वयंस्पष्ट आहे. मुले केवळ समृद्धीसाठी जातात असे नाही तर परदेशात ज्या स्वातंत्र्य आणि समतेचा अनुभव येतो, तो आपल्याकडे येत नाही. आपल्या मुलांना परदेशी पाठवायचे आणि इथल्या समाजाला मात्र जुनाट, रुढीवादी, अंधश्रद्धाळू धर्माच्या कचाट्यात सोपवायचे ही दांभिकता झाली. ती आपण करता कामा नये.