डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक
गेल्या जवळजवळ दीड शतकाचा आपल्या भारताचा इतिहास हा आक्रमकांशी सतत संघर्षांचा आहे. सुरुवातीच्या आक्रमणांचा उद्देश लुटालूट व कधीकधी (उदा. अलेक्झांडरचे आक्रमण) राज्यसत्ता हडपण्यासाठी एवढाच असे. परंतु इस्लामच्या नावाखाली पश्चिमेकडून झालेले आक्रमण हे सर्वंकष विध्वंस व समाजाचे परकीयीकरण घेऊनच आले. देशीय समाजाचे मनोबल खच्ची करण्याकरता त्यांची श्रद्धास्थाने नष्ट करणे अनिवार्य होते, म्हणून भारतातही परकीय आक्रमकांनी मंदिरे तोडली. त्यांनी तसे एकदा नव्हे तर अनेक वेळा केले. उद्देश हा होता की भारतीय समाजाचे मनोबल नष्ट व्हावे, भारतीय कायमचे दुबळे बनावेत आणि त्यांच्यावर अबाधितपणे राज्य करता यावे. अयोध्येतील श्री राम मंदिराचा विध्वंस याच मनोवृत्तीतून व याच उद्देशाने झाला. आक्रमकांची ही नीती अयोध्येपुरती किंवा एकाच मंदिरापुरती नव्हे तर सर्व जगभर राबवलेली युद्धनीती होती. भारतीय राज्यकर्त्यांनी कधी कोणावर आक्रमण केले नाही. मात्र जगभरातील राज्यकर्त्यांनी आपल्या राज्यविस्तारासाठी आक्रमक होऊन अशी कुकर्मे केली आहेत. परंतु भारतीय जनतेवर याचा जो परिणाम त्यांना अपेक्षित होता तो झाला नाही. समाज दबला नाही. उलट भारतामध्ये समाजाची जी श्रद्धा व निष्ठा होती, मनोबल होते, ते कधीच कमी झाले नाही. समाजाकडून प्रतिकाराचा संघर्ष सतत सुरू राहिला त्यामुळे अयोध्येमध्ये जी जन्मस्थळाची जागा आहे ती हस्तगत करून तिथे पुन्हा मंदिर बांधण्याचे वारंवार प्रयत्न करण्यात आले. त्याकरिता अनेक लढाया झाल्या, संघर्ष झाले, बलिदान झाले. हिंदूंच्या मनामध्ये रामजन्मभूमीच्या मुक्तीचा मुद्दा सतत कायम होता.
अठराशे सत्तावनमध्ये ब्रिटिश परकीय सत्तेविरुद्ध जेव्हा युद्धाची योजना बनू लागली तेव्हा अयोध्येतील हिंदी व मुसलमानांनी एकत्र येऊन लढण्याकरता, परस्पर विचारविनिमयातून गोहत्याबंदी आणि रामजन्मभूमी मुक्ती या मुद्दय़ांवर समेट घडवून आणला. बहादूरशहा जफर यांनी गोहत्या बंदीचा आपल्या घोषणापत्रात समावेश केला होता. समाज एकच होऊन लढला परंतु भारत परतंत्रच राहिला. ‘फोडा आणि राज्य करा’ या ब्रिटिशांच्या राजनीतीनुसार हिंदी-मुसलमानांची, या आधी घडत आलेली व या देशाच्या स्वभावानुसार अधिकाधिक घट्ट होत चाललेली, एकता भंग करण्याकरता ब्रिटिशांनी अयोध्येतील संघर्षांच्या नायकांना फासावर चढवले व रामजन्मभूमीच्या मुक्तीचा प्रश्न तसाच राहिला. राम मंदिरासाठीचा संघर्षही चालत राहिला.
हेही वाचा >>>सांस्कृतिक राष्ट्रवादाचे ‘रामकारण’!
१९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर, सर्वसंमतीने सोमनाथ मंदिराचा जीणोद्धार झाला तेव्हाच अशा मंदिरांसंबंधी चर्चा सुरू झाली होती. रामजन्मभूमीच्या मुक्तीबाबत अशा सर्व सहमतीचा विचार करता आला असता. परंतु राजकारणाची दिशा बदलली. भेदाभेद, लांगूलचालन अशा प्रकारच्या स्वार्थी राजकारणाचे स्वरूप प्रचलित होऊ लागले. आणि, त्यामुळे हा प्रश्न कायमच राहिला. सरकारांनी या प्रश्नासंबंधी हिंदी समाजाची इच्छा व मन ध्यानात घेतले नाही. उलट समाजाकडून घेतल्या जाणाऱ्या पुढाकारास त्यांनी खीळ घालण्याचे प्रयत्न केले. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच या संबंधातील कायद्याची लढाई सतत सुरू होती. रामजन्मभूमीच्या मुक्तीकरिता १९८० च्या दशकात जनआंदोलन सुरू झाले, ते सतत ३० वर्षे चालले.
१९४९ या वर्षी रामजन्मभूमीवर प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती प्रकट झाल्या. १९८६ मध्ये मंदिराची कुलुपे न्यायालयाच्या निर्णयाने उघडली. पुढील काळात अनेक अभियाने व कारसेवा यांच्या माध्यमातून हिंदी समाजाचा सतत लढा सुरूच होता. २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल स्पष्ट रूपाने समाजासमोर आला. लवकरात लवकर अंतिम निर्णयातून हा प्रश्न सुटावा यासंबंधी आणखी आग्रह सतत सुरू ठेवावा लागला. १ नोव्हेंबर २०१९ मध्ये १३४ वर्षांच्या न्यायालयीन संघर्षांनंतर, सर्वोच्च न्यायालयाने सत्य व तथ्य पारखून संतुलित निर्णय दिला. दोन्ही पक्षांच्या भावनांचा आणि तथ्यांचा विचार या निर्णयात करण्यात आला. या निर्णयाअन्वये मंदिर निर्माण करता विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात आली. ५ ऑगस्ट २०२० मध्ये मंदिराचे भूमिपूजन झाले व आता पौष शुक्ल द्वादशी युगाब्द ५१२५, तदनुसार दिनांक २२ जानेवारी २०२४ ला श्री राम ललांच्या मूर्तीची स्थापना व प्राणप्रतिष्ठा होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून देण्यात आलेला आहे. श्रीराम धार्मिक दृष्टीने समाजाच्या बहुसंख्य लोकांचे पूजनीय दैवत आहे व संपूर्ण समाजाला व्यवहाराचे आजही मान्य असलेले प्रतिमान श्री रामचंद्रांचे जीवन आहे. तेव्हा आता या नाहक विवादापोटी उत्पन्न झालेले पक्षविपक्ष संपले पाहिजेत. मध्यंतरी उत्पन्न झालेली कटुता संपली पाहिजे. समजूतदार लोकांनी ती पूर्णपणे संपावी याची दक्षता घ्यायला हवी आहे. अयोध्या या शब्दाचा अर्थ जिथे युद्ध नाही, जी कलह मुक्त जागा आहे ती नगरी असा आहे. संपूर्ण देशामध्ये या अर्थाने मनाच्या अयोध्येचे पुनर्निर्माण होणे ही सद्यकालीन आवश्यकताही आहे व आपले सर्वाचे कर्तव्यही आहे.
अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माणाचा हा प्रसंग म्हणजे राष्ट्रीय स्वाभिमानाच्या पुनर्जागरणाचे प्रतीक आहे. राष्ट्रीय पुरुषार्थाच्या विजयाचे स्मारक आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या चरित्रातून स्थापित झालेल्या, तेव्हापासून आजपर्यंत सतत कायम राहिलेल्या, भारतीय समाजातील आचरणाच्या मर्यादेला आधुनिक भारतीय समाजाकडून मिळालेली स्वीकृतीची पावती आहे. मंदिरातील श्रीरामाची पूजा ही ‘‘पत्रम् पुष्पम् फलम् तोयम्’’ या परंपरागत पद्धतीने जशी होईल, तशी व त्याबरोबरच मनोमंदिरामध्ये रामहष्टी स्थापित करून, त्या प्रकाशात आदर्श ठरणाऱ्या आवरणाकडे चालत राहूनही आपल्याला श्रीरामाची पूजा साधावी लागेल कारण ‘शिवो भूत्या शिवं यजेत्, रामो भूत्वा रामं यजेत्’ यालाच आपल्याकडे खरी पूजा मानल्या गेले आहे.
ही दृष्टी विचारात ठेवून, भारतीय संस्कृतीच्या मूल्यांवर आधारित ‘‘मातृवत् परदारेषु परद्रव्येषु लोष्ठवत् आत्मवत् सर्वभूतेषु य: पश्यति स पंडित:’’ अशा श्रीरामाच्या व्यवहारपथावर चालणे आपले कर्तव्य ठरते. म्हणून जीवनात सत्यनिष्ठा, बल आणि पराक्रमासोबतच क्षमाशीलता, आर्जव आणि नम्रता, सर्वाशी आत्मीय आप्तवत व्यवहार, अंतकरणाची मृदुता व कर्तव्य पालनात स्वत:विषयी कठोरता इत्यादी श्रीरामाच्या गुणवैशिष्टय़ांचे आवरण व्यक्तिगत जीवनात व निदान आपल्या कुटुंबीयांच्या जीवनात, आणण्याचा प्रयत्न प्रत्येकाला प्रामाणिकपणे, चिकाटीने व कसोशीने करावा लागेल. तसेच आपल्या सामाजिक जीवनातसुद्धा अनुशासन बाणवावे लागेल त्या अनुशासनाच्या बळावरच १४ वर्षांचा
वनवास आणि महाबलाढय़ रावणाशी यशस्वी संघर्ष श्रीरामांनी संपन्न केला हे आपण जाणतो न्याय आणि करुणा, समरसता, नि:स्पृहता इत्यादी, श्रीराम चरित्रातून दिसून येणारी सामाजिक गुणवत्ता समाजात पुन्हा एकदा प्रचलित करणे, शोषणमुक्त, समतायुक्त, न्यायाधिष्ठित, शक्तिसंपन्न, करुणावान व विवेकसंपन्न असणारा पुरुषार्थी समाज बांधणे, ही या श्रीरामांची सामाजिक पूजा होय.
अहंकार, स्वार्थ आणि भेद यांच्यामुळे अनंत प्रकारच्या आपत्ती स्वत:वर ओढवून घेऊन सर्व विनाशाच्या चिंतेमध्ये हे जग खितपत पडले आहे. त्याला सुमती, ऐक्य, उन्नती व शांतीचा मार्ग दाखवणारा जगदाभिराम भारत पुन्हा उभे करण्याच्या सर्वकल्याणकारी आणि सर्वेषाम् अविरोधी अभियानाचा प्रारंभ श्रीराम लल्लांच्या रामजन्मभूमीत प्रवेशाने व प्राणप्रतिष्ठेने होणार आहे. त्या अभियानाचे सक्रिय व आवरणकर्ते पाईक आपण सर्वजण आहोत. मंदिराच्या पुनर्निर्माणाबरोबरच भारताचे व त्यायोगे संपूर्ण जगाचे पुनर्निर्माण कळसाध्यायाला पोहोचविणे, हे व्रत २२ जानेवारीच्या भक्तीमय आनंदोत्सवात संकल्पबद्ध होऊन आपण सर्वानी पत्करावे व त्याची जाणीव मनात नित्य तेवती ठेवून पुढची वाटचाल करावी, अशी सद्य काळाची गरज आहे.
॥ जय सिया राम ॥