उज्ज्वला देशपांडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यातील हुजूरपागा शाळेने ईद साजरी केली आणि त्यावर अनेक नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या. भारतीय संविधानाची उद्देशिका भारताला ‘धर्मनिरपेक्ष लोकशाही’ म्हणते, पण ज्यांना संविधानाबद्दलच समस्या आहेत, त्यांना ही धर्मनिरपेक्षता आणि भारतातील विविधताही नकोशीच आहे का?

In a moment the ashes are made, but a forest is a long time growingll. – Seneca

पुण्यात धार्मिक अल्पसंख्याक आणि भाषक अल्पसंख्याक अशा दोन्ही महाविद्यालयांत शिकविण्याच्या अनुभवावर आधारित पुढील हितगुज…

मी नुकतीच एम. ए., नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन धार्मिक अल्पसंख्याक पदवी महाविद्यालयात अध्यापन सुरू केले होते. आज ज्यांना ‘त्या’ धर्माचे म्हटले जाते, अशा व्यक्तींचे प्रमाण त्या महाविद्यालयात सुमारे ९९.९९ टक्के होते. त्यात माझ्या विद्यार्थिनी, माझ्या विभागप्रमुख, कार्यालयातील कर्मचारी, इतर विषयांचे शिक्षक अशा सर्वांचाच समावेश होता. त्या सर्वांबरोबर मी काम केले आणि तेदेखील अगदी आनंदाने केले. नवीन वेगळे वातावरण, शिकवण्याचा अनुभव नाही तरी हे सारे काही छान जमले. ‘ते’ आणि ‘मी’ असे कधीच जाणवले नाही. ‘अंडरकरंट’ असतील तर ते माझ्यापर्यंत पोहोचले नाहीत किंवा माझ्यावर त्यांचा परिणाम झाला नाही. इतरांचे अनुभव वेगळे असूही शकतात.

वातावरण नवीन वेगळे, त्यामुळे ‘काय आहे?’ हे समजून घ्यायची उत्सुकता. प्रार्थनेच्या वेळेस डोके झाकायचे का? डोळे उघडे ठेवले तर चालतील का? वेगळ्या धर्माच्या चालीरीती, त्यांचे अर्थ? हे सर्व प्रश्न मोकळेपणाने विचारून, उत्तरे समजून घेणे सुरू असायचे. माझ्यावर कोणतीच बंधने नव्हती, असे मोकळे वातावरण देण्यात माझ्या विभागप्रमुख मॅडमचे योगदान खूप महत्त्वाचे होते. त्यांनी एकदा सहलीमध्ये मुलींना सांगितलेसुद्धा की उज्ज्वला मॅडम शाकाहारी आहेत, तुम्ही तुमचा डबा खा. मला एकाच टेबलावर बसून खाण्यात काहीच अयोग्य वाटत नव्हते. नंतर अनेक वर्षांनी मी ज्या कंपनीत काम केले तिथे माझ्या सहकाऱ्यांपैकी मांसाहारी डबा आणणाऱ्यांत माझ्या धर्माच्या व्यक्तींचाही समावेश होता. देशातील धार्मिक अल्पसंख्याक, माझ्या त्या पहिल्या महाविद्यालयातील व्यक्ती आणि कंपनीत मांसाहारी पदार्थ आणून खाणारे आम्ही सारेच परस्परांचे मित्र.

हेही वाचा >>> प्लास्टिकचा भस्मासूर शेतांना गिळंकृत करू पाहतोय…

त्या पहिल्या अल्पसंख्याक महाविद्यालयातील नोकरी मला सोडावी लागली त्यामागचे एकच कारण होते. हे शिक्षकाचे पद अनुदानित (एडेड) नव्हते. तासिका तत्त्वावर माझी नेमणूक झाली होती. करिअरच्या सुरुवातीला ते माझ्यासाठी फार महत्त्वाचे होते, पण पुढे मी हे धार्मिक अल्पसंख्याक महाविद्यालय सोडून भाषिक अल्पसंख्याक महाविद्यालयात शिकविण्यास सुरुवात केली. हे पद विद्यापीठ अनुदान आयोगाचे अनुप्राप्त पद होते. साहजिकच सहाव्या वेतन आयोगानुसार पगार वगैरे सर्व सुविधा होत्या. या सुविधा धार्मिक अल्पसंख्याक महाविद्यालयात मिळाल्या नसत्या. आठ-नऊ वर्षे अध्यापन केल्यानंतर मी शिक्षकाची नोकरी सोडली. माझ्या एका वरिष्ठ सहकारीने मला विचारलेदेखील, की जे पद मिळविण्यासाठी बाहेरचे लोक २५ लाख रुपये मोजण्यास तयार आहेत ती नोकरी तू का सोडते आहेस?

तिथे अप्रतिम ग्रंथालय होते. मी इंग्रजी-मराठी माध्यमांतील बी.ए., एम.ए.च्या विद्यार्थ्यांना समाजशास्त्र शिकवीत असे. ज्या कुटुंबांतील पहिलीच पिढी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली आहे, त्या पिढीला जम बसविण्यासाठी मदत करता येणे, हा खूप छान अनुभव होता. हे महाविद्यालय भाषिक अल्पसंख्याक असले तरी तिथे ‘माझ्याच’ धर्मातील व्यक्तींची संख्या अधिक होती. तरीही तिथे किती त्रास झाला! महाविद्यालयामधील तास घेऊन सर्व धार्मिक समारंभांना उपस्थित राहणे अनिवार्य असे.

‘करता काय?’ मस्टर (म्हणजे आपण केलेली कामे, राबविलेले उपक्रम नोंदवून ठेवण्याची वही) अशा समारंभांतच मिळत असे. साहजिकच हे म्हणजे जो या धार्मिक समारंभांना उपस्थित राहणार नाही, त्याची रजाच लावण्यासारखे होते. जे विद्यार्थी अशा समारंभात सहभागी होत, त्यांच्यासुद्धा प्रत्येक समारंभागणिक दहा उपस्थिती नोंदविल्या जात असत. त्यामुळे अशा कार्यक्रमांना गर्दीच गर्दी होत असे. नोकरीच्या सुरुवातीलाच एक प्रतिज्ञापत्र द्यावे लागले होते. या प्रतिज्ञापत्रात नमूद होते, की मी कोणत्याही कर्मचारी संघटनेत सहभागी होणार नाही. ‘असे का?’, हा प्रश्न विचारण्याची मुभा नव्हती. विचारणा केलीच तर ‘वेगळ्या’ प्रकारच्या वागवणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागत असे. स्वत:चा धर्म सोडल्यास इतरांबद्दल काही देणेघेणे नाही. परिणामी नोकरी सोडणे भाग होते. करिअरला सुरुवात होऊन १५ वर्षे झाली होती. त्यामुळे अनुदानप्राप्त पद हा मुद्दा महत्त्वाचा वाटेनासा झाला होता. न्याय, स्वातंत्र्य, समानता ती तत्त्वे अधिक महत्त्वाची वाटू लागली होती. विचारांचे, प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य खूप गरजेचे आहे, याची जाणीव झाली होती.

हे सर्व लिहायचे कारण पुण्यातील हुजूरपागेने ईद उत्साहात साजरा केल्याची बातमी आली आणि त्यावर अनेक नकारात्मक विचार समाजमाध्यमांत आणि काही वर्तमानपत्रांतही मांडले गेले. भारतीय संविधानातील उद्देशिका भारताला ‘धर्मनिरपेक्ष लोकशाही’ म्हणते. आता ज्यांना या संविधानाबद्दलच समस्या आहे, त्यांना ही धर्मनिरपेक्षता आणि भारतातील विविधता नकोच आहे.

पुणे हे शहर विविध कारणांसाठी ओळखले जाते- लाल महाल, शनिवार वाडा, कर्मठ वृत्ती, मुलींची पहिली शाळा, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे केंद्र, बेशिस्त वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या समस्या, रस्त्यांवरील खड्डे इत्यादी. त्यामुळे अशा या पुण्यात हुजूरपागेसारख्या एका जुन्या, नामवंत शाळेत ईद साजरी होणे माझ्या दृष्टीने धर्मनिरपेक्षतेला आणि पर्यायाने संविधानाला बळकटी देणारा क्षण ठरतो. शैक्षणिक संस्थांमध्ये सर्व जाती-धर्मांचे विद्यार्थी शिक्षण घेत असतात. ते हेदेखील शिकत असतात की सावित्रीबाई फुले यांच्याबरोबरच फातिमा शेखही अध्यापनाचे कार्य करत होत्या.

माझ्या आजूबाजूच्या समाजात इतर जाती-धर्मांचे लोक राहतात, तर त्यांचे सणवार, चालीरीती समजून घेण्यात कसला आला आहे संकोच? आणि तसे समजून घेतल्यास का असावा ‘ते’ आणि ‘मी’ असा भेद? माझा जीव वाचवणारे डॉक्टर इतर जाती-धर्मांचे असू शकतात, कोर्टात मला खटला जिंकून देणारे वकील इतर जाती-धर्मांचे असू शकतात, एवढेच कशाला घर सांभाळणारी मोलकरीण ही इतर जाती-धर्मांची असू शकते; मग त्यांचे जगणे समजून घेताना का बरे ‘ते’ आणि ‘मी’?

पुण्यातीलच एक धार्मिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था दरवर्षी विविध जाती-धर्मांतून पुढे आलेल्या विचारवंतांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम करते. त्यात महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, मोहम्मद पैगंबर इत्यादींच्या जन्मदिनाचा समावेश असतो. या कार्यक्रमांच्या सचित्र बातम्या वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होतात. इंग्रजी माध्यमाच्या शाळांत किंवा कॉन्व्हेन्ट शाळांत धर्मनिरपेक्षता शिकवत नसतील तर चर्चेतून ‘असे का?’ हे समजावून घेता आले पाहिजे आणि चर्चेतूनच, गरज पडल्यास शैक्षणिक कायद्याची मदत घेऊन, ‘असं का नको,’ हे समजावता आले पाहिजे. वरील सर्व विचारांचा प्रतिवाद केला जाऊ शकतो, याची जाणीव मला आहेच. ‘‘असा सहिष्णुवादी विचार फक्त ‘आपणच’ करतो, ‘ते’ कधीच करत नाहीत.’’ ‘‘ ‘त्यांना’ शिकवा जाऊन, मग ते काय करतात ते पाहा.’’ पण श्रीरामांना सीतेच्या शुद्धतेबद्दल शंका विचारणारा आपलाच अयोध्यावासी होता, ना की लंकावासी? महात्मा गांधींच्या, दाभोलकरांच्या अंताला कारण ठरले ते कोणत्या धर्माचे होते? ही सर्व मते फारच निरागस वा भोळसट वाटू शकतात. अतिशय महत्त्वाच्या विषयाचे अतिसुलभीकरण केले आहे, असेही वाटू शकते. ‘ते’ विरुद्ध ‘आपण’ यापेक्षा ‘अपण सर्वजण’ अधिक महत्त्वाचे आहोत. लेखाच्या सुरुवातीला असलेल्या Seneca च्या इंग्रजी वाक्यात म्हटल्याप्रमाणे ‘राख होण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो, मात्र जंगल वाढण्यासाठी खूप वेळ लागलेला असतो’. आपण राख करायची की जंगल वाढवायचे, हे ज्यानेत्याने ठरवावे. मात्र जंगलाची राख करताना आपणही भस्मसात होतो, हे विसरून चालणार नाही.

ujjwala.de@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Moments that strengthen secularism hujurpaga girls school pune celebrated eid e milad event zws