डॉ. मुंकुंद इंगळे
जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार करून जवळपास २६ निरपराध पर्यटकांचा बळी घेतला. या हल्ल्याचा सारा देश तीव्र निषेध व संताप व्यक्त करत असून या हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी करत आहे. या क्रूर व अमानुष हल्ल्यामुळे समस्त भारतीयांचा संताप साहजिकच अनावर झाला आहे. म्हणून आतातरी सरकारने आपला विवेक जागा ठेवून कडक कारवाई करून अशा दहशतवादावर प्रभावी उपाययोजना करणे काळाची गरज आहे. पुलवामा हल्ला झाला तेव्हा ४० च्या वर जवान शहीद झाले. तेव्हाही देशात संतापाची लाट होती. पण देशवासीयांमध्ये त्याची तीव्रता तेवढी दिसून आली नव्हती. आता मात्र ही तीव्रता फार टोकाची झाल्याचे विविध वाहिन्यांवरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांवरून दिसते. कारण काय तर या वेळेला दहशतवाद्यांनी नाव व धर्म विचारून फक्त हिंदू पर्यटकांना गोळ्या घातल्या असे म्हणतात. या आशयाचे वृत्त सर्व चित्रवाणी वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित केले गेले आणि तसाच सूर कायम राहावा यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत असे दिसते. पण सत्य काय आहे याची लवकरच लोकांना जाणीव होईल ही अपेक्षा.
खरे म्हणजे असा दहशतवादी हल्ला हा निषेधार्ह आहेच – मग तो कोणावरही होवो. कारण आम्ही समस्त भारतीय आहोत. पण देशात सध्या भारतीयत्वाची भावना कमी होत चालली असून जात आणि धर्म जास्त महत्त्वाचा होत आहे. त्यामुळे एखाद्या घटनेचा निषेध किती व कसा करावा हे त्या घटनेतील आरोपी आणि बळी जाणाऱ्या लोकांची जात व धर्म पाहून ठरविले जाते. ही संकुचित मानसिकता भारताच्या एकता आणि अखंडतेला फार मोठा धक्का देणारी ठरणार हे निश्चित.
देशात गेल्या १० वर्षांपासून भाजप सत्तेत आहे आणि ‘देश आता खऱ्या अर्थाने सुरक्षित व मजबूत हातात आहे. देशाला कणखर नेतृत्व लाभले आहे’; ‘आम्ही आता खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो’; ‘आम्ही देशाला महासत्ता बनवत आहो’; ‘आम्ही जगात भारताचा दरारा निर्माण केला आहे’; ‘आम्ही दहशतवाद कमी केला असून तो मुळासकट उखडून फेकण्याची ताकद आता भारतात निर्माण झाली आहे. त्यामुळे आता देश दहशतवाद मुक्त होईल’ असे दावे सरकार व अंधभक्त सतत करत असतात. पण वास्तव काय आहे याची प्रचीती आपण सगळ्या भारतीयांनी घेतली आहे.
पहलगाम येथील हल्ल्यानंतर देशात निर्माण झालेल्या संतापाच्या लाटेने सरकार खडबडून जागे झाले आणि ‘ॲक्शन मोड’वर आले असून बदला घेण्यासाठी सज्ज झाले आहे अशाही बातम्या येत आहेत. ही फार चांगली गोष्ट आहे. पण सरकारने आजपर्यंत काय केले? जम्मू काश्मीर धगधगता आहे याची जाणीव असूनही पर्यटन स्थळी सुरक्षेची व्यवस्था का नव्हती? आमच्या सक्षम व तत्पर असलेल्या गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या? देशात कुठेही १०-१५ लोकांची जरी बैठक होत असेल तर त्याची माहिती गोळा करणारे गुप्तचर विभाग कुठे गेला होता? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण दहशतवादी महिन्याभरापासून पूर्वपाहाणी (रेकी) करत होते आणि अंतिमतः पर्यटन स्थळी येऊन बेछूट गोळीबार करून निघून गेले. याबाबत सुरक्षा यंत्रणेला आणि गुप्तवार्ता विभागाला काहीही कळू नये याचे आश्चर्य वाटते.
आपल्या देशात हिंदू मुस्लिम वाद मुद्दाम पेटविला जात असल्याचे चित्र सध्या मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहे. कारण याच वादातून हिंदू धर्म धोक्यात आहे. हिंदू माणूस सुरक्षित नाही असा आभास निर्माण करून सत्तेची पोळी शेकणाऱ्या निर्लज्ज, खोटारडे, जुमलेबाज आणि राजेशाही थाटात जगणाऱ्या राजकारण्यांचा आजच्या राजकारणात सुळसुळाट झाला आहे. म्हणून आता या देशात कोणत्याही घटनेचा वापर राजकीय हेतूने प्रेरित होऊन केला जातो. ही या देशाची, लोकशाहीची आणि लोकांची फार मोठी शोकांतिका आहे.
भारतात जातीवाद, धर्मवाद, प्रांतवाद, भाषावाद आणि दहशतवाद ही राजकारण्यांची सत्ता प्राप्त करण्याची साधने झाली आहेत असेच म्हणावे लागेल. कारण राजकारण्यांची बेताल, चिथावणीखोर, दंगे भडकवणारी वक्तव्ये हे त्याचेच द्योतक आहे. त्यांनी आपल्या अंधभक्तांच्या फौजा उभ्या केल्या आहेत. या फौजा देशात जातीय आणि धार्मिक दहशतवाद पेटवत आहेत. हे सत्य आणि वास्तव आहे. पण ते कळायला उशीर लागतो. तोपर्यंत देश पेटवला जातो आणि लोकशाही व संविधान पायदळी तुडवून ‘हम करे सो कायदा’ या न्यायाने नंगानाच सुरू राहतो. परिणामी लोकांना दहशतीखाली जगण्याशिवाय पर्याय उरत नाही. खरं पाहाल तर धर्म हा माणसाला जोडतो. तो प्रेम, शांती, मानवता, करुणा, मैत्री, दया, क्षमा, शांती आणि सहिष्णुता शिकवतो. त्यामुळे कोणताही धर्म दहशतवादी असूच शकत नाही. ‘दहशतवादाला धर्म नसतो’ हे मात्र आम्ही चुकीचे ठरवत आहो, कारण आम्ही धर्मालाच दहशतवादी ठरवू लागलो. इथेच धर्मातील मानवतेचा घात झाला. वास्तविक धर्म नव्हे तर माणूस दहशतवादी व अधम आहे.
खरं म्हणजे कोणत्याही प्रकारचा दहशतवाद फोफावणार नाही याची काळजी व खबरदारी घेण्याची जबाबदारी सरकारची असते, ती त्यांनी चोखपणे पार पाडली पाहिजे. अन्यथा मोठ्या कष्टाने उभा केलेला लोकशाहीचा डोलारा आणि भारतीय संविधानाने निर्माण केलेला एकसंघ भारत कोसळून पुन्हा एकदा आमचे स्वातंत्र्य धोक्यात येईल आणि त्यासाठी स्वतः आम्ही भारतीय लोक जबाबदार असू दुसरा कोणी नाही.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या २५ नोव्हेंबर, १९४९ रोजी संविधान सभेत केलेल्या समारोपीय भाषणात याबाबतचा स्पष्ट इशारा दिला होता. त्यांनी असे म्हटले होते की, “जर येथून पुढे चुका झाल्या तर त्याबद्दल आपल्याशिवाय दुसऱ्या कोणालाही दोष देता येणार नाही.” म्हणून देशात घडणाऱ्या सर्व घटनांसाठी आम्ही, आमचे सरकार, आमची न्यायव्यवस्था, आमचे प्रशासन, आमची संरक्षण व गुप्तचर यंत्रणा आणि वृत्तपत्रे व मीडिया हेच जबाबदार असतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि बंधुभाव जोपासला पाहिजे… ते आज होत नाही, पण या स्थिती बदल घडवण्याचे काम आपण भारतीयांनी आव्हान म्हणून स्वीकारले पाहिजे. ही आव्हाने पेलण्याची गरज पहलगाम हल्ल्याने अधोरेखित केलेली आहे!
लेखक सेवानिवृत्त प्रोफेसर आणि संविधान प्रचारक, तसेच ‘डाटा’ या अध्यापक संघटनेचे अकोला विभागीय सचिव आहेत. drmukundingle@rediffmail.com