कुलदीप घायवट
गेल्या काही दिवसांत मुंबई आणि जगातील मुख्य पर्यटन केंद्र असलेल्या थायलंडच्या बँकॉक शहरात कमालीचे साम्य आढळले. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये त्यांची नोंद झाली. नंतर मुंबईने काही प्रमाणात त्यात बँकॉकलाही मागे टाकले. थायलंड सरकारने तातडीची उपाययोजना म्हणून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला. मात्र आपल्याकडील कोणत्याही यंत्रणेने प्रदूषणाच्या या पातळीचे गांभीर्य अद्याप आपल्यापर्यंत पोहोचवलेले नाही.
थंडीचा ऋतू असल्यामुळे धुके दाटले आहे की हवेची पातळी बिघडल्याने ढग नसूनही विचित्र धुरकट रंगाचा थर दिवसभर भवताली दिसत आहे, याबाबत यंदा मुंबईकरांना निसर्गाने कोडय़ात टाकले होते. मात्र प्रदूषणाचा जागतिक उच्चांक गाठून इथल्या हवेनेच धोक्याची पातळी गाठल्याचे दिसत आहे. एकीकडे शहरविकासाची उपनगरांपर्यंत पसरलेली कामे, बांधकामे, वाहनांची गर्दी आणि लोकसंख्येची आक्रस्ताळी वाढ याचे दुष्परिणाम आता ठळक व्हायला लागले आहेत. त्याकडे प्राधान्याने न पाहिल्यास पुढील काळ शुद्ध हवेसाठी लढण्याचा असेल.
वाढत्या बांधकामांमुळे (इमारती, विकासात्मक प्रकल्पे, इमारतीचा पुनर्विकास) सिमेंट-काँक्रीट, माती, रेती या सर्वाचे धूलिकण, रंगाचे विषारी पदार्थाचे बाष्प हवेत मिसळते. सतत सुरू असलेल्या वाहनांमुळे विषारी धूर हवेत साचतो. तसेच, उद्योगधंद्यामुळे आणि कचरा जाळल्याने हवेत विषारी वायू जमा होतात. या सर्वामध्ये नियोजनबद्ध कामे केली, नियमांचे पालन केले तर, हवा प्रदूषण आटोक्यात ठेवण्यास मदत होईल. मात्र, न्यायालयांचे निर्णय, प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना यांना बाजूला सारून मूळ समस्येला बगल दिली जाते. सरकार आणि प्रशासनाच्या विविध विभागांत समन्वयाचा अभाव असल्याने प्रदूषणाची बिकट परिस्थिती उद्भवली आहे.
भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक मानवाला प्रदूषणमुक्त पर्यावरणात राहण्याचा, स्वच्छ हवा, पाणी मिळवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कायद्यानुसार, या अधिकाराची अंमलबजावणी राज्य आणि केंद्र सरकारने करणे आवश्यक आहे. वाढत्या प्रदूषणकारी घटकांना मर्यादेत आणून नागरिकांना कायद्यानुसार स्वच्छ हवा असलेले वातावरण तयार करून देणे बंधनकारक आहे. मात्र, सरकारची आणि प्रशासनाची उपाययोजनात्मक पावले कासवगतीने पडत असल्याने धोरणात्मक ठरावाला दिरंगाई होत आहे.
धोकादायक स्थितीच्या उंबरठय़ावर..
सध्या थंडीचा हंगाम सुरू असल्याने किमान तापमानात घट झाली आहे. जमिनीलगतच्या थंड हवेमुळे हिवाळय़ात उन्हाळय़ापेक्षा हवा प्रदूषणाचे प्रमाण अधिक असते. तसेच, उत्तर भारतात पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांसोबत धुराचे लोट हिमालयामुळे अडले जाऊन दिल्लीसह लगतच्या परिसरात वायुप्रदूषणात वाढ होते. यासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश येथे शेतातील पेंढा जाळल्याने आणि इतर मानवनिर्मित कारणांनी दिल्ली प्रदूषित होते. महाराष्ट्रात मात्र या काळातील वाऱ्यांच्या स्थितीमुळे धूलिकण दूर वाहून जातात त्यामुळे प्रदूषणात जास्त प्रमाणात वाढ होत नाही. मात्र, सध्या वाऱ्यांच्या विशिष्ट स्थितीमुळे मुंबई आणि परिसरात प्रदूषके वेगाने वाहून न गेल्याने प्रदूषणाच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत हवा प्रदूषणाची पातळी ‘प्रदूषित’ ते ‘अतिप्रदूषित’ या स्थितीत आहे. तर, येत्या काळात धोकादायक स्थितीचा उंबरठा ओलांडण्याच्या स्थितीत आहे.
दोन महिन्यांची स्थिती..
गेल्या दोन महिन्यांत हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) २०० ते ३०० हून अधिक नोंदवण्यात येत आहे. वांद्रे-कुर्ला संकुल, माझगाव, चेंबूर, मालाड, कुलाबा येथे पार्टिक्युलेट मॅटर (पीएम २.५) कायम ३०० हून अधिक असल्याने येथील हवेचा दर्जा (एक्यूआय) अतिप्रदूषितह्ण स्थितीत दिसून येतो. काही वेळा एक्यूआय धोकादायक स्थितीत असतो. एक्यूआयमध्ये वारंवार चढ-उतार होत असतो. मात्र, या ठिकाणांचे एक्यूआय हे कायम आहेत. माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल येथे नायट्रोजन डायऑक्साइड (एनओ २) चे प्रमाण २५० हून अधिक पीपीबी असते.
प्रश्न का चिघळला?
मुंबई महानगरात दरवर्षी लाखोंच्या संख्येने वाहनांमध्ये वाढ होत असून देशात सर्वात जास्त वाहनांची घनता मुंबईत आहे. मुंबईत अनेक छुप्या आणि उघड पद्धतीने लघु-मध्यम-मोठे उद्योगधंदे सुरू आहेत. मुंबईत कचरा व्यवस्थापनावर ताण पडल्याने खुल्या वातावरणात कचरा जाळला जातो. हवा प्रदूषणाशी निगडित या प्रत्येक मुद्दय़ामुळे हा प्रश्न आणखीन चिघळला जातोय.
हिवाळय़ात प्रदूषण अधिक का ?
हिवाळय़ामध्ये जमिनीलगतचे तापमान खूप थंड असते. त्यामुळे ‘थर्मल इन्व्हर्शन’ होते. जमिनीलगतचा खालचा थर थंड आणि जड असल्याने दोन थरांमधील चक्र थांबते. त्यामुळे प्रदूषणकारी घटक मध्येच अडकून राहतात. परिणामी, धूळ, धूर, धुके मिश्रित धूरके तयार होतात. तर, उन्हाळय़ात कोरडय़ा वातावरणामुळे उन्हाळय़ात प्रदूषणकारक घटक हवेत पसरतात आणि दूर अंतरापर्यंत वाहून नेले जातात. यामुळे एका ठिकाणची धूळ दुसऱ्या ठिकाणी वाहतात.
निरीक्षण..
गेल्या काही वर्षांपूर्वी मुंबई हवामान कृती आराखडय़ाच्या प्रभाव मूल्यांकनादरम्यान, जागतिक संसाधन संस्थेला (डब्ल्यूआरआयआय) असे आढळून आले की, देवनार, गोवंडी, मानखुर्द आणि ट्रॉम्बे यांसारख्या एम (पूर्व) वॉर्डातील परिसरात सातत्याने अतिप्रदूषणाची स्थिती नोंदवण्यात आली. त्यापाठोपाठ एम (पश्चिम) वॉर्ड आणि एफ (उत्तर) चा भाग असलेल्या अँटॉप हिल, शीव आणि घाटकोपर येथे देखील हवा प्रदूषणात वाढ होताना दिसून आली. या ठिकाणी पार्टिक्युलेट मॅटर (पीएम २.५ आणि पीएम १०) आणि नायट्रोजन डायऑक्साइड (एनओ २) यात वारंवार चढ-उतार होताना दिसून आला.
लवकरच आणखी बिकट स्थिती..
नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२२ मध्ये हवेची गुणवत्ता ‘प्रदूषित’ ते ‘अतिप्रदूषित’ होण्यामागे केवळ औद्योगिक स्रोतांद्वारे होणारे उत्सर्जन हे एकच कारण नसून मुंबईत सुरू असणाऱ्या बांधकामांमुळे होणारे उत्सर्जनामुळे उच्च हवा प्रदूषणाच्या घटना वाढत आहेत. सध्या वातावरणात पार्टिक्युलेट मॅटर २.५ आणि पी.एम.१० दोन्ही वाढत असून बांधकामातून उडणाऱ्या धुळीमुळे दोन्हीचे प्रमाण वाढण्यास चालना मिळत असून मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
१ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या दरम्यानच्या काळात ४० दिवसांपैकी २२ दिवस मुंबईतील हवेची गुणवत्ता ‘प्रदूषित’ ते ‘अतिप्रदूषित’ स्तरावर होती. त्यापैकी चार दिवस (५, ६, ७ आणि ८ डिसेंबर) हे ‘अतिप्रदूषित’ स्तरावर होती. तर, २०२१ मध्ये १ नोव्हेंबर ते १० डिसेंबर याच काळात केवळ सहा दिवस हवेची गुणवत्ता ‘प्रदूषित’ स्तरावर होती आणि हवेची गुणवत्ता ‘अतिप्रदूषित’ असणारा एकही दिवस नव्हता. २०२१ मध्ये १ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या काळात, १८ दिवस पार्टिक्युलेट मॅटरचे (पीएम २.५ ) प्रमाण विहित मर्यादेच्या आत होते. मात्र १ नोव्हेंबर आणि १० डिसेंबर २०२२ दरम्यान केवळ एकच दिवस पीएम २.५ चे प्रमाण विहित मर्यादेच्या आत होते. नोव्हेंबर, डिसेंबर २०२२ आणि जानेवारी २०२३ अशा तीन महिन्यांत एकच दिवस हवेचा स्तर चांगला किंवा सुरक्षित होता. २०२१ मध्ये तीन महिन्यांत १९ दिवस सुरक्षित होते.
सारेच असमाधानकारक..
मुंबईतील हवा प्रदूषणाचे प्रमाण वाढत असून गेल्या दोन वर्षांत हवेची गुणवत्ता प्रचंड प्रमाणात खालावलेली असल्याचा ग्रीन प्लॅनेट सोसायटीचा अहवाल आहे. पवई केंद्रावरून घेण्यात आलेल्या नोंदींनुसार, मुंबईतील २०२२ वर्षांमधील ३६५ दिवसांपैकी २८० दिवस कमी-अधिक हवा प्रदूषणाचे नोंदवण्यात आले. ३६५ दिवसांमधील ४० दिवस स्वच्छ हवेचे, १३६ दिवस समाधानकारक हवेचे, १०४ दिवस सामान्य प्रदूषणाचे, ३७ दिवस प्रदूषित, ३ दिवस अतिप्रदूषित, ४५ दिवसांची आकडेवारी उपलब्ध झाली नाही. तर, मुंबईसह कल्याणमध्ये २८३ दिवस, ठाण्यात २७६ आणि नवी मुंबईत २५७ दिवस कमी-अधिक प्रदूषणाचे नोंदवण्यात आले आहेत.२०२१ वर्षांमधील ३६५ दिवसांपैकी २४७ दिवस कमी-अधिक हवा प्रदूषणाचे नोंदवण्यात आले. ३६५ दिवसांमधील १०३ दिवस स्वच्छ हवेचे, १२६ दिवस समाधानकारक, ७४ दिवस सामान्य प्रदूषणाचे, ४४ दिवस प्रदूषित, ३ दिवस अतिप्रदूषणाचे नोंदवण्यात आले. १५ दिवसांची आकडेवारी उपलब्ध झाली नाही.
जानेवारी २०२३ मध्ये मुंबईत १६ दिवस अतिप्रदूषणाचे नोंदवण्यात आले. तसेच, मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण या चारही औद्योगिक क्षेत्रातील जानेवारीमधील सर्वच दिवस कमी-अधिक प्रदूषणाचे नोंदवले. तसेच, समाधानकारक हवेचे २ दिवस, प्रदूषित हवेचे १३ दिवस, अतिप्रदूषणाचे १६ दिवस नोंदवण्यात आले.
आरोग्यासाठी कोणता ऋतू चांगला ?
मुंबईच्या २०२१ आणि २०२२ वर्षांतील १२ महिन्यांच्या आकडेवारीनुसार उन्हाळा आणि हिवाळा या दोन ऋतूंमध्ये हवेचा दर्जा ढासळत असून वर्षांतील सात महिने प्रदूषणाचे आणि पाच महिने आरोग्यदायी असल्याचा अहवाल ग्रीन प्लानेट सोसायटीने दिला आहे. २०२१ आणि २०२२ वर्षांतील मे, जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर हे महिने स्वच्छ हवेचे असल्याचे नोंद झाले. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हे महिने मुंबईसाठी प्रदूषणाचे ठरले.
मुंबईकरांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी, राज्य सरकार आणि स्थानिक महापालिका यंत्रणांनी ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लान तयार करण्याची गरज आहे. बांधकाम क्षेत्र, वाहतुकीमध्ये अनियंत्रित आणि वेगाने वाढणारी खासगी वाहने आणि औद्योगिक उत्सर्जन या सर्व क्षेत्रांचे कठोर मानके आणि अचूक यंत्रणेद्वारे नियमन होणे आवश्यक आहे. – भगवान केसभट, संस्थापक, वातावरण फाऊंडेशन मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळतेच आहे हे वादातीत आहे. वाऱ्यामध्ये बदल होऊन हवेचा दर्जा अधिक खालावला आहे. मात्र वारे असते तरीही पूर्वीच्या तुलनेत हवेची स्थिती खालावलेलीच राहिली असती. प्रदूषकांचे प्रमाण वाढले आहे. वाढलेली बांधकामे हे एक कारण आहे. यापूर्वी हवेतील प्रदूषकांमध्ये बांधकामामुळे असलेल्या धुलिकणांचे प्रमाण साधारण २० टक्के होते, ते आता ४० टक्क्यांपर्यंत गेले आहे. वाढती वाहनेही प्रदूषणाला कारणीभूत आहेत. – डॉ. गुर्फान बेग, सफर, संस्थापक अध्यक्ष
वायुप्रदूषण वेगाचा आलेख..
नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२२
हवा गुणवत्ता निर्देशांक १८ दिवस ‘प्रदूषित’आणि चार दिवस ‘अतिप्रदूषित’ स्तरावर होती. या काळात मालाड, चेंबूर आणि माझगाव हे तीन सर्वाधिक प्रदूषित भाग होते. तर या दरम्यान बोरिवली, नवी मुंबई आणि वरळी या ठिकाणी हवा स्वच्छ होती.
डिसेंबर ते १० डिसेंबर २०२२
हवा गुणवत्ता निर्देशांक ५ दिवस ‘प्रदूषित’ आणि ४ दिवस ‘अतिप्रदूषित’ स्तरावर होते. या काळात मालाड, वांद्रे-कुर्ला संकुल आणि चेंबूर हे तीन सर्वाधिक प्रदूषित भाग होते. तर, या दरम्यान वरळी, बोरिवली आणि नवी मुंबईत हवा स्वच्छ होती.
समुद्रकिनारा लाभूनही..
देशभरात अतिप्रदूषित होणाऱ्या शहरांना समुद्रकिनारा लाभला नसल्याने, त्या शहरात प्रदूषणाची पातळी वाढत जाते. या ठिकाणी अनेक उपाययोजना राबवून, खबरदारीची पावले उचलूनदेखील प्रदूषण आटोक्यात येत नाही. समुद्राच्या प्रवाहामुळे हवामान नियंत्रित होते. समुद्री वाऱ्यांमुळे हवेतील प्रदूषके जलद गतीने विखुरली जातात. त्यामुळे प्रदूषणकारी घटकांची घनता तुलनेने कमी जाणवते. मात्र, मुंबईला तिन्ही बाजूने समुद्रकिनारा असूनदेखील मुंबईला विषारी वायू, धूलिकणांनी वेढले आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईतील प्रदूषकांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे आता समुद्री वाऱ्यांची गती आणि दिशा बदलली नाही तर, येत्या काळात मुंबईत मोकळा श्वास घेणे कठीण होईल. सध्या मुंबईत करोनाची साथ आटोक्यात आली असली तरी प्रदूषणापासून वाचण्यासाठी फिरताना मुखपट्टी बांधण्याची वेळ आली आहे. हवा प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात घेतले नाही तर, भविष्यात ‘प्राणवायूचे सिलेंडर’ सोबत घेऊन मुंबईतून फिरण्याची वेळ येईल.
‘kuldeep.ghaywat@expressindia.com