तुषार चांदवडकर
महानोर यांचे नाव मी ऐकून होतो परंतु महानोरांना सर्वात पहिल्यांदा कुठे पाहिले असेल तर बालकवींच्या जन्मशताब्दी निमित्ताने १९९०-९१ मध्ये त्यांनी जळगावी कविवर्य कुसुमाग्रजांना बोलावून जो अप्रतिम कार्यक्रम केला होता त्या कार्यक्रमाप्रसंगी पाहिलेले आठवते. धरणगावी महानोर यांनी कार्यक्रम घडवून आणला.यानंतर अमळनेरला साने गुरुजी तत्त्वज्ञान केंद्रात संत तुकोबारायांच्या कवितांवर आधारित चर्चासत्रामध्ये महानोर तुकोबारायांच्या अभंगावर अतिशय सुंदर बोलण्याचे आठवते. संत तुकारामांची कविता ही समाजाभिमुख कविता कशी होती आणि कोणत्याही कवीची जातकुळी ही निसर्ग, शृंगार, प्रणय जरी असली तरी त्याच्या कवितेचे केंद्र हे सामाजिक संवेदनात्मक असले पाहिजे, असे महानोर म्हणाले होते. ‘कवितेतील मातृ प्रतिमा’ या आई वरील कवितांचे संपादन ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले, या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला देखील महानोर उपस्थित होते. महानोरांच्या कवितांमध्ये त्यांच्या आई बद्दलच्या भावना या खूप तीव्रपणे व्यक्त झालेल्या आहेत.महानोर पाचवीला जेव्हा शेंदुर्णीला शिकायला आले त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आईला एक खोली घेऊन दिली होती आणि महानोर आईसोबत राहत होते. आई अशिक्षित होती परंतु तिला शिक्षणाचे महत्त्व उमगले होते. आई गावात कष्ट करायची आणि महानोरांना सतत वाचन आणि शिक्षणाबद्दल प्रोत्साहित करायची. ‘तिची कहाणी’ किंवा ‘पावसाळी कविता’ या काव्यसंग्रहांमध्ये ही आई बद्दलची जाणीव प्रखरपणे व्यक्त होते. या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी देखील महानोर आई बद्दल भरभरून बोलत होते.
आणखी वाचा-जात-वर्ग जाणिवेचा क्रांतिकारी साहित्यिक : अण्णा भाऊ साठे
महानोरांच्या कवितांवर माझे संशोधनाचे काम सुरू असताना मी त्यांना अनेकदा भेटायचो. मला जेव्हा जेव्हा कोणत्याही प्रकारची अडचण यायची त्यावेळी महानोर मला मनापासून सहकार्य करायचे. सर्वात महत्त्वाची बाब मला जाणवली ती म्हणजे महानोर हे प्रयोगशील कवी आणि साहित्यिक होते. रानातल्या कवितांनी महानोरांना निसर्ग कवी म्हणून मोठा नावलौकिक मिळवून दिला. साठीच्या दशकानंतरच्या मान्यवर कवींमध्ये महानोर यांचे नाव हे समीक्षक आणि अभ्यासकांना आवडू लागले. त्यावेळच्या अतिशय प्रतिष्ठेच्या सत्यकथा या नियतकालिकामधील विजया राज्याध्यक्ष यांच्या लेखानंतर महानोर यांची दखल ही समीक्षा क्षेत्रात अधोरेखित झाली. महानो गोष्टीवेल्हाळ होते मित्रांचा संग्रह मोठा होता. यामुळे चंद्रकांत पाटील, नागनाथ कोत्तापल्ले, मधु मंगेश कर्णिक यांच्यासारख्या त्यावेळच्या समकालीन मित्रांनी तर त्यांच्या कवितांवर मनस्वी लिहिले. मात्र त्यानंतर श्रीकांत देशमुख, इंद्रजित भालेराव या कवींनादेखील महानोर यांच्या कवितेने वेड लावले. ‘रानातल्या कविता’ यशस्वी झाल्यामुळे १९७०च्या दशकात ‘जैत रे जैत’ चित्रपटासाठी मंगेशकर कुटुंबाने महानोरांना प्रभकुंजवर बोलावले. जैत रे जैत ची गाणी यशस्वी ठरली. रसिकप्रिय महानोर अत्यंत लोकप्रिय झाले.
महानोर यांच्या कवितेला लोकसाहित्याचा बाज होता. पळसखेडच्या भागात चालत आलेल्या लोकसंस्कृतीने आणि लोकपरंपरांनी महानोर समृद्ध झालेले होते. यामुळे महानोर यांनी पुढे ‘पळसखेडची गाणी’ हा या भागातील महिलांच्या सहकार्याने लोकगीतांचा संग्रह संपादित केला .खानदेशातील लोकसाहित्यात गीताचा ‘वही’ हा रचनाबंध आहे. या फॉर्मचा वापर करून त्यांनी ‘वही काव्यसंग्रह रसिकांना दिला. त्यांनी लिहिलेल्या कविता लता मंगेशकर ,आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर यांनी मिळून ‘माझ्या आजोळची गाणी’ या कार्यक्रमाद्वारे घरोघरी पोहोचविल्या.
आणखी वाचा- स्वामी विवेकानंदांना समजून घेऊया!
यानंतर आला तो ‘पावसाळी कविता’ हा काव्यसंग्रह. त्यामधून आईच्या दुःखाची जाणीव तीव्रतेने व्यक्त झाली. इचलकरंजीच्या साहित्य संमेलनात यशवंतराव चव्हाण आणि पु.ल देशपांडे यांनी महानोरांना सर्वप्रथम ऐकले आणि यशवंतराव महानोर व पु. ल देशपांडे या कवीच्या कवितांच्या प्रेमात पडले. पुढे महानोरांना विधान परिषदेची आमदारकी देखील मिळाली . महानोर यांनी या आमदारकीचा उपयोग साहित्यसाठी भरभरून केला. अशाच एका दुष्काळी समितीवर काम करीत असताना त्यांना अजिंठा परिसरात पारू आणि रॉबर्ट गिल यांची प्रेम कहानी समजली आणि महानोरांनी ‘अजिंठा’ या दीर्घकाव्यातून या प्रेमाला शब्दबद्ध केले. (पुढे अजिंठा चित्रपट देखील आला) .
‘प्रार्थना दयाघना’ या दीर्घकवितेवर आधारलेला काव्यसंग्रह म्हणजे महानोर यांच्या कवितेला मिळालेले तीव्र असे सामाजिक वळण होते. निसर्गाबरोबरच शेती, पाणी आणि शेतकरी यांचा विचार करणाऱ्या या कवीची निसर्गकविता आता सामाजिक कविता झाली होती. पुढे महानोरांचा ‘पानझड’ काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला . याला साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील मिळाला. ‘गाथा शिवरायांची’ हा छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनातील निवडक प्रसंगांना लोकसाहित्यातील अभंग, पाळणा अंगाई गीत, गौळण, लावणी असे विविध रचनाबंध वापरून महानोरांनी वाचकांच्या हाती दिला. ‘तिची कहाणी’मधून त्यांना स्त्रियांच्या प्रश्नांची जाणीव व्यक्त करायची होती. स्त्रियांच्या भळभळत्या दुःखाची वेदना महानोरांनी ‘तिची कहाणी’मधून मांडली.
आणखी वाचा-मुस्लिम महिलांना समान नागरी कायद्याची आवश्यकता आहे का?
साने गुरुजींच्या जीवनकार्याचा महानोरांवर प्रभाव होता, यातून ‘जगाला प्रेम अर्पावे’ हा काव्यसंग्रह निर्मिला गेला. ‘सुना सोन्याचा पिंपळ’ किंवा ‘गंगा वाहू दे निर्मळ’ या काव्यसंग्रहामधून महानोर निसर्ग आणि समाज या दोघांच्या नात्यातले ताणतणाव आपल्या प्रतिभासंपन्न शब्दांतून मांडत होते. ‘गांधारी’सारखी हैदराबादच्या मुक्तिसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली कादंबरी देखील महत्त्वपूर्ण ठरली. गपसप आणि गावाकडल्या गोष्टी हे महानोरांचे कथासंग्रह देखील त्यांच्या लोकसाहित्य विषयक अभ्यासाचे द्योतक होते.
महानोरांवर अनेकांनी प्रेम केले.या आठवणीतील सर्व स्नेही मित्रांचे प्रेम कवी प्रकाश होळकर यांनी संपादित केलेल्या ‘रानगंधाचे गारुड’ या अतिशय सुंदर अशा पुस्तकात दिसून येते व्यक्तिचित्रणात्मक लेखन म्हणून पु ल देशपांडे, यशवंतराव चव्हाण ,शरद पवार या व्यक्तींवर महानोरांनी अंतकरणपूर्वक प्रेम केले आणि लिहिले देखील. जैत रे जैत, अबोली, दोघी, एक होता विदूषक, अजिंठा, सर्जा अशा महत्त्वपूर्ण चित्रपटांची त्यांनी लिहिलेली गाणी आजही प्रचंड लोकप्रिय आहेत.
महानोर आज आपल्यातून निघून गेले.परंतु या ८१ वर्षात महानोर यांनी मराठी वाचकांना रसिकांना समीक्षकांना अभ्यासकांना भरभरून दिले.महानोर यांची कविता म्हणजे निसर्गाचा सहजोद्गार होती. पावसाच्या हिरव्या ऋतूमध्ये हा हिरवी बोली देणारा कवी आपल्यातून निघून गेला आहे.
लेखकाने महानोर यांच्या काव्यसंपदेवर प्रबंध लिहून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली असून, सध्या ते पदव्युत्तर विभागात अध्यापनकार्य करतात.
tusharchandwadkar75@gmail.com