शाकाहार बरा की मांसाहार, कोंबडी गावठी चांगली की ब्रॉयलर, बकऱ्याचं मांस खाणं हृदयासाठी चांगलं की वाईट, गोवंशातील प्राण्यांचं मांस खाणं योग्य की अयोग्य, मांस श्रेष्ठ की मासे… वगैरे वाद तेव्हाच शक्य असतात जेव्हा पोटभर अन्न मिळण्याची शाश्वती असते. जेव्हा त्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं तेव्हा केवळ पोट भरणं, पुरेसं अन्न उपलब्ध होईपर्यंत तगून राहणं महत्त्वाचं ठरतं. नामिबियाने आपल्या देशातील ७००हून अधिक प्राण्यांची मांसासाठी कत्तल करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण आहे शतकातला सर्वांत भयंकर दुष्काळ. दुष्काळामुळे तिथली निम्मी लोकसंख्या म्हणजे तब्बल २५ लाख लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर उभे आहेत.
यापूर्वी २०२३ आणि २०१९मध्येही नामिबियात दुष्काळामुळे आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. अशी परिस्थिती उद्भवली की वन्य प्राण्यांच्या शिकारीस परवानगी दिली जाते. मात्र यंदाचा दुष्काळ अधिक गंभीर आहे. अन्न आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. पाच वर्षांखालील बालकांतील कुपोषणाने गंभीर रूप धारण केले आहे. यंदा तिथे फेब्रुवारी महिन्यातल्या सरासरी पावसाच्या तुलनेत केवळ २० टक्केच पाऊस पडला. नंतर नाहीच. आसपासच्या झिम्बाब्वे, मलावी, झाम्बिया या देशांमध्येही अशीच स्थिती आहे. तिथेही राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा :सर्वकार्येषु सर्वदा : वेशीबाहेरील मुलांची शाळा
नामिबिया हा जगातील सर्वाधिक हत्ती असलेल्या देशांपैकी एक आहे. तिथे एकंदर २४०० हत्ती आहेत. पर्यावरण मंत्रालयाने ज्या ७२३ वन्यप्राण्यांची कत्तल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे त्यात पाणघोडे, म्हशी, इंपाला जातीची हरणे, नीलगायींसारखे ब्लू वाइल्ड बीस्ट, ३०० झेब्रा, ८३ हत्ती आणि १०० सांबर यांचा समावेश आहे. जिथे मोठ्या संख्येने वन्यप्राणी आहेत, अशा राष्ट्रीय उद्यानांतील प्राण्यांची शिकार करण्याचा निर्णय पर्यावरण मंत्रालयाने घेतला आहे. शिकारीचे दीर्घकालीन परिणाम जाणवू नयेत, हे त्यामागचे उद्दिष्ट आहे. सरकारने आधीच यापैकी १५७ प्राण्यांची कत्तल करून ५६ हजार ८७५ किलोग्रॅम मांस मिळविले आहे.
प्राण्यांच्या शिकारीस परवानगी देण्यामागे केवळ खाण्यासाठी मांस मिळविणे हा एकमेव उद्देश नाही. मर्यादित प्रमाणात उपलब्ध असलेल्या अन्न, पाण्यासाठी मानव आणि वन्यप्राण्यांत होणारा संघर्ष नियंत्रणात ठेवणे हेदेखील लक्ष्य आहे. नामिबियात असा संघर्ष काही नवा नाही. २०२३मध्ये मानव आणि हत्तींतील संघर्षातून हत्तींची कत्तल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जगातील एकूण हत्तींपैकी निम्मे हत्ती नामिबियासह बोटस्वाना, झाम्बिया, झिम्बाब्वेमध्ये आहेत. त्यामुळे तिथे अनेकदा असे संघर्ष उद्भवतात. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत अन्न-पाण्याच्या शोधात प्राणी मानवी वस्तीत येतील, अशी भीती असते. राष्ट्रीय उद्यानांतील प्राण्यांची संख्या मर्यादित राहिल्यामुळे उर्वरित प्राणी-पक्षांना तुलनेने अधिक प्रमाणात अन्न उपलब्ध राहील, अशा विचारातून शिकारीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्नासाठी, निव्वळ शिकारीसाठी वन्य प्राण्यांची कत्तल करणे हे नामिबियात एरवी कायदेशीर नसले तरी सर्वसामान्य आहेच. यात हत्ती, काळवीट मारले जाण्याचे प्रमाण अधिक आहे.
केवळ दुष्काळातच वन्यप्राण्यांचे मांस खाल्ले जाते किंवा आफ्रिका खंडातील देशांतच असे प्रकार होतात, असेही नाही. चीनमध्ये एरवीही वटवाघुळांपासून माकडांपर्यंत अनेक वन्यप्राण्यांचे मांस खाद्यसंस्कृतीचा भाग आहे, हे सर्वजण जाणतातच. कोविडकाळात त्यामुळेच चीन संशयाच्या गर्तेत अडकला होता. ईशान्य भारत उंदीर, गिधाडांपासून, महाधनेशपर्यंत विविध प्राण्यापक्ष्यांची मांसासाठी शिकार केली जाते. वन्यजीव संरक्षण कायदे अस्तित्त्वात आहेत, मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते, तरीही अद्याप या शिकारींवर पूर्णपणे बंदी अंमलात आणणे शक्य झालेले नाही. ‘बुश मीट’ आणि ‘रोडकिल’ अनेक देशांत खाल्ले जाते.
हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय की मत? अनुसूचित जाती व जमातींचे उपवर्गीकरण
बुश मीट
ही मूलतः आफ्रिकन संकल्पना आहे. या संकल्पनेभोवती आर्थिक संकटांचा समाना करणाऱ्या अनेक जमातींचे अर्थकारण गुंफले गेले आहे. या जमाती घनदाट जंगलांतील वन्यप्राण्यांची खाद्यान्नासाठी शिकार करतात. यात उंदीर, सापांपासून जिराफ आणि हत्तीपर्यंत अनेक प्राण्यांचा समावेश होतो. हे मांस अतिशय नाममात्र प्रक्रिया करून, भाजून-खारवून वगैरे खाल्ले जाते. शिकारी, व्यापारी, जंगलांतून शहरांपर्यंत मांस पोहोचवणारे वाहतूकदार अशी मोठी साखळीच आहे. या साखळीमुळे अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
रोडकिल मीट
केवळ अभावग्रस्त देशांतच वन्यप्राण्यांचे भक्षण केले जाते असेही नाही. अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमधील काही उपसंस्कृतींत रस्त्यांवरील अपघातांत मृत्युमुखी पडलेल्या प्राण्यांचेही मांस खाल्ले जाते. अमेरिकेत गायी- म्हशी, डुक्कर, हरिण, अस्वलांना वाहनांची धडक बसून ते मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण मोठे आहे. अशा मोठ्या प्राण्यांप्रमाणेच रस्ते अपघातांत मृत्युमुखी पडलेले विविध पक्षी, खार, रकून यांसारखे प्राणीही खाल्ले जातात. असे प्राणी खाताना त्यांच्या शरीरातील परजीवींमुळे विविध रोगांचे संक्रमण होण्याची भीती असते. त्यामुळे अशाप्रकारचे मांस प्रदीर्घकाळ शिजवले जाते. जेणेकरून सर्व परजीवींचा नायनाट व्हावा. हे मांस तिथे रोडकिल मीट म्हणून ओळखले जाते. अशाप्रकारच्या मांसाचे भक्षण करण्यास काही भागांत कायदेशीर मान्यता आहे. मोफत प्रथिनांचा स्रोत म्हणून अशा मांसाकडे पाहिले जाते. पोल्ट्रीमधील प्राणी-पक्ष्यांच्या तुलनेत यांच्या शरीरावर औषधे आणि रसायनांचा फारसा मारा झालेला नसतो. परिणामी त्याच्या दुष्परिणामांपासून हे मांस मुक्त असून त्यामुळे ते श्रेष्ठही मानले जाते.
हेही वाचा : सर्वकार्येषु सर्वदा : अनाथ, मतिमंद आणि वयोवृद्धांसाठी मायेचा आधार
आजार पसरण्याची भीती
अभावाच्या काळात सरकारे वन्य प्राण्यांची शिकार करण्यास परवानगी देत असली, तरीही त्यातून आरोग्याचे अनेक प्रश्न उद्भवण्याची भीती असते. क्षयरोग, कुष्ठरोग, कॉलरा, देवी, कांजिण्या, फ्लूसारखे अनेक आजार वन्य प्राण्यांतून संक्रमित होण्याची होऊ शकतात. एचआयव्ही एड्स, इबोलासारखे आजार अशा प्राण्यांतूनच मानवात संक्रमित झाल्याचे सिद्ध झाले आहे. कोविड वटवाघुळातून संक्रमित झाल्याचे दावे केले जातात. १९९०च्या दशकात काँगोमध्ये चिम्पान्झी आणि बोनोबो या मर्कट वर्गातील प्राण्यांची कत्तल आणि सेवन केल्यामुळे इबोलाचा उद्रेक झाला होता. कॅमरूनमधील चिम्पान्झींमधून एचआयव्हीचे संक्रमण झाले होते. मांसाच्या वाहतुकीदरम्यान संक्रमण होण्याच्या शक्यता ही मांस स्वच्छ करताना संक्रमण होण्याच्या शक्यतेच्या तुलनेत अधिक असते. कारण मांस स्वच्छ करताना प्राण्याच्या रक्ताशी थेट शारीरिक संपर्क येतो. त्यावर वाढलेले परजीवीही सहस संक्रमित होतात.
आफ्रिकी देशांनी वन्यप्राणी मारून खाण्यास परवानगी दिली असली, तरी दुष्काळामुळे अन्यही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पाण्याच्या शोधात स्त्रिया आणि मुलींना दूरवर जावे लागते. अशावेळी एकट्यादुकट्या स्त्रीला गाठून लैंगिक शोषण होण्याचं प्रमाण वाढते. मिळेल ते पाणी पिण्यामुळे अनेकदा कॉलरासारखे रोग पसरतात.
((समाप्त))