नरेंद्र मोदी, पंतप्रधान

संत शिरोमणी आचार्य विद्यासागर महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वात ज्ञान, करुणा आणि सेवा यांचा त्रिवेणी संगम होता. भारताला संतपरंपरेचा प्रदीर्घ वारसा लाभला आहे. या संत आणि समाजसुधारकांच्या पंक्तीत आचार्यजींना विशेष स्थान आहे. त्यांची मूल्ये प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत…

Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
mla satyajeet tambe writes letter to maharashtra cm devendra fadnavis for bangladesh hindu protection
बांगलादेश मधील हिंदूंचे रक्षण करा; आमदार सत्यजित तांबे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका
Chandrakant Patil appeal to Pune residents regarding the book festival Pune news
नागपूरचा की पुण्याचा पुस्तक महोत्सव मोठा करायचा हे तुम्ही ठरवा- चंद्रकांत पाटील यांचे पुणेकरांना आवाहन
Revealing Interview Yuval Noah Harari Problem Crisis Artificial Intelligence
सशक्तदेखील स्वत:ला ‘बळी’ म्हणवतात, ही आजची समस्या!

संत शिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांनी समाधी घेतली आणि आम्ही सर्व दुःखात बुडून गेलो. त्यांचे आयुष्य म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध असे युग आहे, ज्यामध्ये प्रगाढ ज्ञान, अमर्यादित करुणा आणि मानवतेच्या उद्धारासाठीची अतूट वचनबद्धता यांचा अंतर्भाव आहे. मला अनेक प्रसंगी त्यांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले. त्यामुळेच मला अतीव दुःखाची जाणीव होत आहे, माझ्यासह असंख्य आत्म्यांसाठी मार्ग प्रकाशित करणारा एक दीपस्तंभ गमावल्याची आणि व्यक्तिगत नुकसान झाल्याची तीव्र संवेदना जाणवत आहे. त्यांचे वात्सल्य, दयाभाव आणि आशीर्वाद हे केवळ चांगुलपणाचे द्योतक नव्हते तर त्यांच्या आध्यात्मिक ऊर्जेचा प्रवाह हा त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व भाग्यवंतांच्या जीवनाला नवीन प्रेरणा देणारा होता.

पूज्य आचार्यजी हे नेहमीच ज्ञान, करुणा आणि सेवा यांचा त्रिवेणी संगम म्हणून ओळखले जातील. ते एक खरे तपस्वी होते, ज्यांचे आयुष्य भगवान महावीरांच्या आदर्शांनी प्रेरित होते. जीवन जैन धर्माच्या मूलभूत तत्त्वांचे मूर्तिमंत उदाहरण होते आणि त्यांनी आपल्या कृती आणि शिकवणींद्वारे त्यांचे आदर्श प्रत्यक्ष आचरणात आणले. सर्व सजीवांबद्दल त्यांना वाटणारी काळजी म्हणजे, जैन धर्मातील आयुष्याबद्दलच्या नितांत आदराचे प्रतिबिंब आहे. ते सत्यनिष्ठ जीवन जगले, ज्यातून विचार, उच्चार आणि कृतीबाबतचा जैन धर्मातील प्रामाणिकपणा ठळकपणे दिसून येतो. त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. त्यांच्यासारख्या महात्म्यांमुळेच या जगाला जैन धर्माचे आचरण आणि भगवान महावीर यांच्या आयुष्याचे अनुसरण करण्याची प्रेरणा मिळत आहे. ते जैन समुदायासाठी तर एक प्रेरणास्रोत होतेच मात्र त्यांची शिकवण केवळ एका समुदायापुरती मर्यादित नव्हती. सर्व धर्म, पंथ आणि संस्कृतीचे लोक त्यांच्याकडे येत असत आणि आध्यात्मिक जागृतीसाठी विशेषतः युवावर्गामध्ये प्रबोधनासाठी अविरत कार्य करत असत.

हेही वाचा >>> लेख : ‘शेतकऱ्यांना गृहीत धरू नका…’

शिक्षण क्षेत्र त्यांच्या हृदयाच्या अगदी जवळ होते. बालपणातील विद्याधर नावाच्या एक सामान्य मुलापासून ते आचार्य विद्यासागर होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास, त्यांची ज्ञान संपादन करण्याची आणि संपूर्ण समाजाचे त्या ज्ञानाने प्रबोधन करण्याची सखोल बांधिलकी दर्शवतो. शिक्षण हा न्यायी आणि प्रबुद्ध समाजाचा पाया आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. लोकांना सक्षम करण्यासाठी आणि जीवनातील ध्येय साध्य करण्यासाठी ज्ञान हे सर्वोपरी असल्याचे त्यांनी सांगितले. खऱ्या ज्ञानाचा मार्ग म्हणून स्वअध्ययन आणि आत्म-जागरूकतेचे महत्त्व यावर त्यांचा विशेष भर होता. यासोबतच त्यांनी आपल्या अनुयायांना सतत शिकण्यासाठी आणि आध्यात्मिक विकासासाठी अथक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

त्याच वेळी संत शिरोमणी आचार्य विद्यासागरजी महाराज यांना असे वाटायचे की आपल्या युवा वर्गाला असे शिक्षण मिळाले पाहिजे ज्यामध्ये आपल्या सांस्कृतिक मूल्यांची पाळेमुळे रुजलेली असतील. ते नेहमी म्हणायचे की आपण आपल्या भूतकाळातील ज्ञानापासून दूर गेलो असल्याने आपल्याला वर्तमानातील पाणी टंचाईसारख्या समस्यांवर उपाय शोधणे शक्य होत नाही. कौशल्यांवर आणि नवोन्मेषावर भर देणारे शिक्षण हेच समग्र शिक्षण अशी त्यांची धारणा होती. भारताच्या भाषिक विविधतेचा त्यांना अतिशय अभिमान होता आणि त्यांनी युवा वर्गाला भारतीय भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले.

पूज्य आचार्यजींनी स्वतः संस्कृत, प्राकृत आणि हिंदीमधून मोठ्या प्रमाणावर लिखाण केले. एक संत म्हणून त्यांनी गाठलेली उंची आणि तरीही जमिनीवर असलेले त्यांचे पाय यांची प्रचीती त्यांच्या मूकमाटी या महान रचनेमधून येते. त्यांच्या कामांमधून ते वंचितांचा आवाज बनले.

आरोग्याच्या क्षेत्रात देखील पूज्य आचार्यजींचे योगदान परिवर्तनकारी होते. अपुऱ्या सोयीसुविधा असलेल्या भागांमध्ये त्यांच्याकडून विविध प्रकारचे कार्य केले जात होते. आरोग्याविषयीचा त्यांचा दृष्टिकोन व्यापक होता, शारीरिक आरोग्याला त्यांनी आध्यात्मिक निरामयतेची जोड दिली आणि एक व्यक्ती म्हणून आवश्यक असलेल्या गरजांची पूर्तता केली.

हेही वाचा >>> ‘वाढवण’साठी लोकांशी स्वच्छ संवाद हवा

मी विशेषत्वाने भावी पिढ्यांना हा आग्रह करेन की त्यांनी संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी महाराजजींच्या राष्ट्र उभारणीविषयीच्या बांधिलकीचा सखोल अभ्यास करावा. कोणत्याही भेदभावयुक्त विचारसरणीच्या पलीकडे जाऊन देशहितावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन ते नेहमीच लोकांना करत असत. ते मतदान प्रक्रियेचे खंदे समर्थक होते कारण लोकशाही प्रक्रियेमधील लोकसहभागाची मतदान ही एक अभिव्यक्ती आहे असे त्यांना वाटत होते. त्यांनी निरोगी आणि स्वच्छ राजकारणाचा पुरस्कार केला. धोरणे तयार करताना लोकांच्या कल्याणाचा विचार असला पाहिजे, स्वतःच्या स्वार्थाचा नव्हे (लोकनीती ही लोभसंग्रह नव्हे तर लोकसंग्रह आहे) असे ते सांगत.

एक बलशाली राष्ट्र नागरिकांच्या आपल्या कर्तव्यांप्रतिच्या, आपले कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांच्या प्रति असलेल्या कर्तव्यांच्या बांधिलकीच्या पायावर उभारलेले असते. आचार्यजी यांनी लोकांना कायम इमानदारी, सत्यनिष्ठा आणि आत्मनिर्भरता यांसारखे गुण जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिले. न्यायी, दयाळू आणि समृद्ध समाजासाठी हे गुण आवश्यक आहेत. आज आपण विकसित भारताच्या निर्माणाच्या दिशेने सातत्याने काम करत असताना कर्तव्यभावना अधिकच मोलाची ठरते.

जगभरात पर्यावरणावर अनेक संकटे घोंघावत असतानाच्या काळात संत शिरोमणी आचार्यजी यांनी केलेले मार्गदर्शन खूप उपयुक्त ठरणार आहे. निसर्गाचा ऱ्हास कमीत कमी होईल, अशा प्रकारची जीवनशैली अवलंबण्याचे आवाहन त्यांनी केले. अशाच प्रकारे अर्थव्यवस्थेत त्यांनी शेतीला सर्वाधिक महत्त्व दिले. शेती आधुनिक त्याचसोबत शाश्वतरित्या करण्यावर त्यांनी भर दिला. तुरुंगातील कैद्यांच्या सुधारणेसाठी त्यांनी केलेले कार्यही उल्लेखनीय होते.

आपल्या भूमीचे सौंदर्य म्हणजे आपल्या भूमीने संत महात्म्यांना जन्म दिला ज्यांनी इतरांना प्रकाशाच्या वाटेवर नेऊन एक चांगला समाज घडवला. या संत आणि समाजसुधारकांच्या विलक्षण वारशात पूज्य आचार्यजी उत्तुंग व्यक्तिमत्त्व ठरतात. त्यांनी जे कार्य केले ते केवळ वर्तमानकाळ डोळ्यासमोर न ठेवता भविष्यकाळाचा विचार करूनही केले. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मला छत्तीसगडमधील डोंगरगड येथील चंद्रगिरी जैन मंदिराला भेट देण्याची संधी मिळाली. ही भेट पूज्य आचार्यजींसोबतची माझी शेवटची भेट ठरेल, असे वाटले नव्हते. ते क्षण खूप खास होते. त्यांनी माझ्याशी बराच वेळ संवाद साधला, देशसेवेच्या माझ्या प्रयत्नांसाठी आशीर्वाद दिला. आपला देश घेत असलेले नवे वळण आणि जागतिक स्तरावर भारताला मिळत असलेला आदर, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ते करत असलेल्या कामाबद्दल त्यांनी मोठ्या उत्साहाने सांगितले. तेव्हा आणि नेहमीच त्यांची प्रेमळ दृष्टी आणि प्रसन्न हास्य शांत व समाधानाचा भाव निर्माण करण्यास पुरेसे ठरत असे. त्यांचा आशीर्वाद आत्म्यासाठी चंदनासारखा भासतो, आपल्यात आणि आपल्याभोवती असलेल्या दैवी  अस्तित्वाचे स्मरण करून देतो. संत शिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांची उणीव त्यांना ओळखणाऱ्या आणि त्यांच्या शिकवणीने आणि त्यांच्या जीवनाने प्रभावित झालेल्या सर्वांनाच जाणवत राहील. मात्र त्यांच्यापासून प्रेरणा घेतलेल्या सर्वांच्या हृदयात आणि मनात त्यांची स्मृती सतत राहील. त्यांच्या स्मृतीच्या सन्मानार्थ त्यांची मूल्ये प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी आम्ही वचनबद्धता व्यक्त करतो. हीच त्यांना विनम्र श्रद्धांजली ठरेल, त्याचसोबत त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून मार्गक्रमण केल्यास राष्ट्रनिर्माण आणि राष्ट्रकल्याण साधता येईल.

Story img Loader